बाबर जसा होता, तसा कधी मांडला गेला नाही. बाबर जसा हवा, तसा मात्र मांडला गेला!
पडघम - देशकारण
सरफराज अहमद
  • बाबर आणि ‘बाबरनामा’ची मुखपृष्ठं
  • Thu , 22 August 2019
  • पडघम देशकारण बाबर Babur बाबरनामा Baburnama

सत्ता सामान्यांच्या श्रद्धा आणि भावनांचा आधार घेऊन बळकट होते. त्यासाठी सामान्यांची प्रतीकं, श्रध्दास्थानं, त्यांचा इतिहास यांचा वापर मोठ्या खुबीने सत्तेकडून केला जातो. आपल्या राजकीय मुल्यांप्रमाणे इतिहासाची रचना व्हावी यासाठी सारेच सत्ताधीश प्रयत्नशील असतात. अकबर सत्तेत आला तेव्हा त्याने मोगलांच्या इतिहासाचे लेखन करण्यासाठी समिती नेमली. पुढे अनेक मोगल बादशहांनी हाच कित्ता गिरवला. इंग्रजांनीही तेच केले. इलियट, डाउसन, जेम्स मिल, कर्नल टॉड अशा शेकडो इतिहासकारांना वसाहतवादी अंगाने भारताचा इतिहास लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. पुढे इंग्रज गेले. पण ही भूमिका बदलली नाही. स्वतंत्र भारतात आणि पाकिस्तानात इतिहासाच्या पुनर्लेखनाचे, इतिहासावर सत्तासूत्रे लादण्याचे अनेक प्रयत्न होत राहिले. इतिहासातून राष्ट्रीय अस्मिता आणि राष्ट्रवादाची अधिष्ठानं मजबूत करण्याचे प्रयत्न झाले. पण इतिहास काही बदलला नाही. इतिहासाच्या आकलनाची दृष्टी बदलली म्हणून इतिहासाची साधने बदलली नाहीत. उलट ती साधने इतिहासाच्या वस्तुनिष्ठ आकलनाची गरज मांडत राहिली.

बाबरी मसजिद आणि रामजन्मभूमी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जमीन वादाचा निकाल महिन्याभरात येण्याची अपेक्षा आहे. बाबर आणि त्याचा इतिहास या प्रकरणाशी संबधित आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा इतिहास चर्चिला जाणार आहे. त्यानिमित्ताने बाबर आणि बाबरी मसजिदच्या अनुषंगाने ही पाच लेखांची मालिका. त्यातील हा पहिला लेख... पुढचा लेख येत्या गुरुवारी प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

बाबर स्वतःला तुर्क समजणारा योद्धा. इतिहासानं त्याला मोगलशाहीचा संस्थापक ठरवले. लोदी सत्तेचा पराभव करून इतिहासाला कलाटणी देणारा, किंबहुना इतिहास घडवणारा इतिहासपुरुष-देखील हाच बाबर. अनेकांनी त्याला राजकारणापुरते बंदिस्त करून टाकले आहे. बाबर जसा राज्यकर्ता होता, तसाच तो हळव्या मनाचा कवी आणि तत्त्वचिंतकही होता. त्याच्या चिंतनाची फलश्रुती म्हणजे त्याने सुफीवादावर लिहिलेली मसनवी. पण हा बाबर इतिहासातल्या काही घटना आणि ‘बाबरनामा’च्या पलीकडे स्मरला जात नाही.

बाबरने राजकारण केले. त्याने आक्रमणे केली. सत्ता गाजवली. पण त्याने स्वतःमधल्या माणसाला पावलोपावली उन्नत केले. त्याचा ‘वसिअतनामा’ ही त्याची साक्ष मानता येईल. बाबर जसा होता, तसा कधी मांडला गेला नाही, बाबर जसा हवा तसा मात्र मांडला गेला. इतिहासाची विटंबना करण्याची परंपरा वृद्धिंगत होत राहिली आणि बाबर विकृतीच्या ढिगाऱ्यात गाडला गेला. बाबर संपला नाही आणि संपणारही नाही, पण त्याच्याविषयीची चर्चा मात्र अभिनिवेषांच्या सीमेत बंदिस्त झाली. आणि इथे बाबराचा इतिहास खुंटीत झाला.

इथे बाबराच्या राजकीय इतिहासाची चर्चा आपल्यालादेखील करायची नाही. आपल्याला जो बाबर शोधायचा आहे, तो एका तुर्क सेनापतीने त्याच्यात जपलेला विद्वान आहे. सुफीवादाच्या तात्त्विक बैठकीवर चर्चा करणारा मर्मज्ञ साहित्यिक शोधायचा आहे. बाबर हा मुळी राज्यकर्ता नव्हता. त्याला परिस्थितीने राज्यकर्ता बनवले. तो मूळचा अभ्यासू, निसर्गाची निरीक्षणे टिपणारा, निसर्गातले एखादे तत्त्व शोधून त्यामागील सूत्र मांडणारा, साध्या – साध्या गोष्टींवर हळहळणारा, नेहमी सर्जनाची साक्ष देणारा सर्जक होता.

बाबराने मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. त्याने अनेक साहित्यिकांना राजाश्रय दिला. कवींशी वाद घातला. चर्चा केली. त्यांच्या काव्यावर टीकाही केली. बाबर आणि बाबरकालीन साहित्याचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याच्या काळातील साहित्याचा सामाजिक व राजकीय जीवनावर परिणाम जाणवतो.

बाबरकालीन साहित्यिक

बाबरने ग्रंथ लिहिले आहेत. प्रख्यात इतिहाससंशोधक आणि आधुनिक काळातील बाबरचे चरित्रकार राधेश्याम यांनी बाबराच्या साहित्यावर चर्चा केली आहे. ते लिहितात, ‘‘त्याने जवळपास ११६ ग़ज़ल, ८ मसनवी, १०४ रुबाई, ५२ मुआम्स, ८ कोते, १५ तुयुग तथा २९ सीरी मुसुन्नची तुर्की भाषेत रचना केली. याव्यतिरिक्त फारसी भाषेत त्याने ३ ग़ज़ल, १ किता तथा १८ रुबायांची रचना केली आहे.’’याव्यतिरिक्त त्याने फारसी भाषेमध्ये एक दिवानदेखील लिहिले आहे.

बाबरच्या साहित्य आणि काव्यावर अनेकांनी लिखाण केले आहे. मध्ययुगीन फारसी साहित्याचे अधिकारीक अभ्यासक सय्यद अतहर अब्बास रिजवी यांनी बाबरच्या साहित्यिक रचनांची माहिती विस्ताराने दिली आहे. ते लिहितात, ‘‘दिवान आणि ‘बाबरनामा’च्या अतिरिक्त त्याची एक अन्य महत्त्वपूर्ण रचना ‘मुबीन’ आहे. ज्याला त्याने ९२८ हिजरी (१५२२-२३) मध्ये पूर्ण केले. हे तुर्की पद्य आहे. जे फिकह (इस्लामी धर्मशास्त्र) च्या संदर्भात आहे. मीर अला उद्दौलाने ‘नफायसुल मुआसीर मध्ये लिहिले आहे. ‘त्यांनी (बाबरने) फिकहच्या विषयावर ‘मुबीन’ नावाच्या पुस्तकाची रचना केली आहे. यामध्ये इमामे आजम यांच्या सिद्धान्तावर पद्यरचना केलेली आहे. कुरोह तथा मैलाच्या हिशोबासंदर्भात त्याने ‘बाबरनामा’मध्ये ‘मुबीन’चा संदर्भ दिला आहे. शैख जैन यांनी यावर टीकादेखील लिहिली आहे. ब्रेजीनने ‘क्रेस्टोमयी टरके’ नावाच्या रचनेत याचा खूप मोठा भाग १८५७ मध्ये प्रकाशित केला आहे.’’

ऑगस्ट १५२७ मध्ये बाबरने अरुज (कवितांच्या सिद्धान्ताचे ज्ञान) संदर्भात एका पुस्तकाची रचना केली. १५२८ मध्ये त्याने ख्वाजा उबैदुल्लाह एहरार यांच्या ‘वालिदिया’ नावाच्या पुस्तकाच्या पद्य रचनेला प्रारंभ केला. बेवरीज यांनी ‘बाबरनामा’चे भाषांतर केले आहे. त्या म्हणतात, ‘‘बाबरची आत्मकथा एक अनमोल ग्रंथ आहे. ज्याची तुलना संत ऑगस्टाईन, रुसोचे स्विकृती पत्र तथा गिब्बन आणि न्युटनच्या आत्मकथांशी केली जाऊ शकते. आशियाच्या साहित्यात (ही रचना) अप्रतिम आहे.’’४ डेनिसन रास यांनीदेखील ‘बाबरनामा’ला साहित्याच्या इतिहासातील रोमांचक आणि अप्रतिम कलाकृती मानले आहे. बाबरने फारसी भाषेत लिहिलेल्या सुफीवादावरील मसनवीला विशेष महत्त्व आहे. पण दुर्दैवाने या ग्रंथाचा अद्याप अनुवाद होऊ शकलेला नाही.

बाबर हा बहुभाषी विद्वान होता. त्याने त्याच्या एकाच ग्रंथात अनेक भाषेतील शब्दांचा वापर केला आहे. बाबरने आयुष्यात एका ठिकाणी दोन वर्षापेक्षा अधिक काळ ईद साजरी केली नाही. तो सतत प्रवासात राहिला. तो जिथे गेला, तिथल्या भाषेचे त्याने रसग्रहण केले. त्यामुळे त्याच्या ग्रंथात मध्ययुगीन जगातील अनेक भाषांचा परिचय होतो. हैरात शहरातल्या साहित्यिकांना पाहून तो त्याच्या प्रेमात पडला. त्याने आपल्या आत्मवृत्तात हैरातला ‘बुद्धिजीवींची नगरी’ म्हणून गौरवले आहे. बाबर सतत प्रवासात आणि मोहिमात राहिल्याने त्याला लिखाणाला खूप कमी वेळ मिळत असे. तरीही त्याने आपल्यातला लेखक जपला. थोडीशी उसंत मिळाली तेव्हा अथवा रात्रीच्या वेळी तो लिखाणाला बसत असे. परिस्थिती कितीही विपरीत असली त्याने लिखाणात कधी खंड पडू दिला नाही. तो सातत्याने वाचत राहिला, लिहीत राहिला. ग्रंथ जमवणे व ते सोबत बाळगणे त्याला आवडत असे. मोहिमेवर असताना नैसर्गिक संकटात त्याने जमवलेले अनेक ग्रंथ गहाळही झाले. त्यामुळे तो खूप व्यथित झाल्याचे त्याने स्वतः ‘बाबरनामा’त लिहून ठेवले आहे.

भाषा आणि लिपीच्या निर्मितीत योगदान

आयुष्यभर बाबर देशोदेशी भटकत राहिला. स्वतःची बौद्धिक भूक भागवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. जितके त्याने राजकारण केले, तितकेच किंबहुना त्याहून अधिक त्याने साहित्याची सेवा केली. सय्यद अतहर अब्बास रिजवी यांनी ‘बाबरनामा’च्या प्रस्तावनेत लिहितात, ‘‘९१० हिजरीमध्ये ‘बाबरी’नामक एका लिपीची निर्मितीदेखील केली होती. निजामुद्दीन अहमदने लिहिले आहे की, बाबरने या लिपीत कुरआन लिहून भेटस्वरूप मक्का येथे पाठवले होते. नफायसुल मुआसीरने लिहिले आहे की, मीर अब्दुल हुई मशहदीच्या शिवाय कोणालाही या लिपीचे ज्ञान नव्हते. मात्र मीर्जा अजीज कोका यांचे मत आहे की, मीर अब्दुल हईचे बाबरी लिपीचे ज्ञान अत्यंत साधारण होते. मुल्ला अब्दुल कादर बदायुनीनेदेखील मीर्जा अजीज कोकाच्या मताचे समर्थन केले आहे.’’

बाबरने साहित्याच्या विषयावर अनेक विद्वानांशी चर्चा केल्या. नव्या साहित्याला समजून घेतले. वेगवेगळ्या प्रदेशातील संस्कृतीची माहिती घेण्यात बाबरला रुची होती. त्याने वेगवेगळ्या प्रदेशातील साहित्यिकांचीदेखील माहिती जमवली होती.

बाबर उत्कृष्ट कवी होता. त्यामुळे नवनव्या कवींच्या कविता वाचण्यात त्याला रस होता. त्याने अनेक कवितांची समीक्षादेखील केली आहे. शखीम बेग हा त्या काळातील प्रख्यात कवी. त्याच्या कविता वाचल्यानंतर बाबरने त्याविषयीचे मत मांडले. तो लिहितो, ‘‘त्याने ‘सुहैली’ हे नाव घेतले होते. (तखल्लुस) त्यामुळे शेख सुहैल म्हणून तो लोकप्रिय झाला होता. त्याने भयभित करणाऱ्या आणि गूढ कविता रचल्या आहेत. त्याने एका कवितेत लिहिले आहे –

‘शब ए गम गर्द व बाद आहम जजामे बर्द ए गर्दुंरा

फर्द ए बुर्द अज्द ए हाय सिल अश्कम रबीसुकुं रा’

एकदा मौलाना जामी यांच्यासमोर त्याने ही कविता वाचली, तेव्हा ते म्हणाले, साहेब तुम्ही शेर वाचता, तेव्हा एखाद्याच्या मनात भय निर्माण करता. त्याने एक दिवाण रचले होते. आणि मसनवीदेखील लिहिल्या आहेत.’’७   

याशिवाय सैफी बुखारी, मसनवीकार अब्दुल्ला, मीर हुसैन मुअम्माई, मुल्ला मोहम्मद बख्शी, युसुफ बदाई, मोहम्मद सालेह, शाह हुसैन कामी यांच्या काव्यावरदेखील बाबरने भाष्य केले आहे. त्याने अनेक कवींवर टिका केली आहे, तर काहींचा परिचय करून देणारे लिखाण केले आहे. बाबरला काव्यशास्त्रात रुची होती, त्याला काव्याच्या अनेक प्रकारांची माहिती होती. त्याच्या लहान–लहान तंत्राविषयी बाबरने विस्ताराने लिहिले आहे. त्याच्या काव्यावरील लिखाणातून त्याच्या समीक्षादृष्टीची जाणीव होते. त्याने काहींच्या कविता आपल्या ‘बाबरनामा’मध्ये वापरल्या आहेत.

बाबरने फारसी भाषेमध्ये काव्यरचना करत असताना आग्र्याच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या ब्रिज किंवा हिंदवी भाषेतील शब्द फारसी भाषेत वापरले आहेत. फारसी लिपीत भारतीय शब्द वापरण्याची पद्धत रूढ करण्यात कुली कुत्बशहा पाठोपाठ बाबरचे योगदान महत्त्वाचे आहे. कुली कुत्बशहाने इसवी सन १५१२ मध्ये कुत्बशाहीची स्थापना केल्यानंतर साहित्यनिर्मिती सुरू केली. त्यामानाने कुली कुत्बशहा बाबरचा पुर्वसुरी आहे. त्याच्यानंतर बाबरने तसाच प्रयोग फारसी लिपीत केला आहे. त्यामूळे उर्दूच्या निर्मितीत बाबरचे योगदान महत्त्वाचे मानायला हरकत नाही. पण यासंदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.

बाबर स्वतःचे भाषाप्रभुत्त्व वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील होता. एकाच पुस्तकात त्याने अरबी, तुर्की, फारसी भाषेचे शब्द वापरले आहेत. शब्द वापरताना त्याने कुठेही शब्दावडंबर माजवण्याचा प्रयत्न केला नाही. जिथे गरज आहे किंवा जो शब्द जिथे वापरणे संयुक्तिक असेल तिथेच त्याने त्या शब्दांचा वापर केला आहे. ‘बाबरनामा’च्या शैलीसंदर्भात अनेकांनी लिखाण केले आहे. बाबरनाम्याच्या शैलीने अनेकांना मोहीनी घातली आहे. बाबर हा बहुभाषाप्रभू होता, हे डेनिसन रासपासून बेवरीजपर्यंत सर्वांनीच मान्य केले आहे.  

बाबरच्या दरबारातील कवी

बाबर काव्यरसिक होता. त्यामुळे त्याने आपल्या दरबारात अनेक कवींना आश्रय दिला होता. तो नेहमी त्या कवींशी काव्यावर चर्चा करत असे. त्यातील अनेकांना त्याने वेगवेगळी प्रशासकीय व दरबारी पदेदेखील दिली होती. ‘त्यापैकी शेख जैनुद्दीन हे कवी आणि लेखकदेखील होते. ‘वाकाआत ए बाबरी’ (बाबरनामा)चा त्यांनी फारसी भाषेत तर्जुमा केला होता. काही वेळा ते युध्दमोहिमांतदेखील सहभागी झाले होते. बाबरने त्यांचा मोठा सन्मान केला होता. मख्जनमध्ये राहणाऱ्या मौलाना बकाई यांनी एक मसनवी लिहिली होती. मौलाना शहाबुद्दीन हे बाबरच्या दरबारातील मोठे नाव आहे. गूढ काव्याचे धृपद रचण्यात त्यांनी कौशल्य प्राप्त केले होते. कुरआन आणि हदिसचे तज्ज्ञ म्हणूनदेखील त्यांनी कीर्ती मिळवली होती. त्यांनी ‘हखीर’ या नावासह (तखल्लुस) कविता लिहिल्या आहेत. मुल्ला अ. कादर बदायुनी याने त्याच्या काही कविता आपल्या ‘मुंतखब उत्तवारीख’मध्ये घेतल्या आहेत. याच्यानंतर बाबरच्या दरबारात असणाऱ्या कवींमध्ये अ. वाजीद फारगी, सुलतान मोहम्मद कोसा, सुर्ख वदाई आणि शेख जमाली देखील सामील होते.’ १०

कवींसोबतच बाबरच्या दरबारात काही लेखक देखील होते. त्यांच्याकडून बाबरने अनेक ग्रंथ लिहून घेतले आहेत. इस्लामी धर्मशास्त्रावरील ‘फतवा ए बाबरी ’ हा ग्रंथ त्याने सुलतान हुसैन मिर्झा यांच्याकडून लिहून घेतला होता. स्वतः बाबरची मुलगी गुलबदन बेगमदेखील लेखिका होती.

समारोप

राजसत्ता बदलल्या की सत्तेच्या समर्थनार्थ असणारी सर्व सामाजिक, भौतिक, साहित्यिक, राजकीय, प्रशायकीय व्यवस्था बदलली जाते. सत्तेतल्या बदलानंतर मध्ययुगातल्या अनेक साहित्यिकांनी स्थलांतरे केली. नवा आश्रय शोधला. नव्या राज्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडण्यापेक्षा त्यांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबला, अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. पण बाबर मात्र अपवाद होता. त्याने सल्तनतकाळातील साहित्यवैभवावर आघात करण्याऐवजी त्याला जपले. त्याच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले. त्यामुळेच त्याच्यानंतर मोगल दरबारातील साहित्यवैभव वाढत गेले. त्याच्यानंतर अनेक ख्यातनाम साहित्यिक मोगल घराण्यात आणि दरबारात उदयास आले. मोगलशाहीचा संस्थापक असणाऱ्या बाबरच्या इतिहासाचा एक पैलू असाही आहे.  

संदर्भ

१) राधेश्याम, बाबर, पृष्ठ क्र. ४७०-७१, इलाहाबाद, सन १९८७

२) बाबर, दिवाने बाबरी, रामपूरच्या रजा लायब्ररीने मूळ दिवान फारसी भाषेत हस्तलिखित प्रतींच्या फोटोकॉपी पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या आहेत.

३) रिजवी सय्यद अतहर अब्बास, मुगलकालीन भारत (बाबर), पृष्ठ क्र. ३७,३८, सन १९६०, नवी दिल्ली

४) बेवरीज, एच. कलकत्ता रिव्ह्यु, सन १८९७

५) बूल्जे ह, वेग, द केम्ब्रीज हिस्ट्री ऑफ इंडीया ( संपादित) भाग – ४ , पृष्ठ क्र. ४

६) सय्यद अतहर अब्बास रिजवी पुर्वोक्त पृष्ठ क्र. ३८

७) सय्यद, सबाउद्दीन, अ. रहमान नद्वी, खंड – १ , पृष्ठ क्र. २७, सन २०१५ आझमगड,  

८) आधिक माहितीसाठी पहा, सय्यद, सबाउद्दीन अ. रहमान नद्वी, लिखित बज्म ए तैमुरीया – खंड १

९) रिजवी सय्यद अतहर अब्बास, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ३८ सन १९६०, नवी दिल्ली

१०) कित्ता, पृष्ठ क्र. ४२- ४३

.............................................................................................................................................

लेखक सरफराज अहमद हे टिपू सुलतानचे गाढे अभ्यासक आणि गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूरचे सदस्य आहेत.

sarfraj.ars@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 22 August 2019

सरफराज अहमद, हे ग्रंथ बाबराने खुद्द लिहिले की लिहवून घेतले? विकिवर बाबरनामा चगताई भाषेत लिहिल्याचं म्हंटलंय. बाबर हिलाच तुर्की भाषा म्हणंत असे. बाबराचं हेच जर आकलन असेल तर बाकी सारा आनंदीआनंदच आहे. असो. बाबरला फारसी भाषा येत होती का? तुमच्या लेखात बाबराने फारसीत काही साहित्य रचना केली असं लिहिलंय. तर मग बाबरनामा फारसीत का लिहिला नाही? लेखनिक मिळाला नाही वाटतं? चगताई वगैरे बोलींच्या मानाने फारसी भाषा अधिक भारदस्त आहे. असो. एकंदरीत बाबर हा चतुर, मुत्सद्दी व शिपाईगडी असला तरी त्याची साहित्यनिर्मिती इतरांनी केलेली दिसते आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......