खय्याम : एकाच रागाच्या सुरांशी किती तरी प्रकारे खेळणारा संगीतकार!  
कला-संस्कृती - सतार ते रॉक
अनिल गोविलकर
  • खय्याम (१८ फेब्रुवारी १९२७ - १९ ऑगस्ट २०१९)
  • Tue , 20 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie खय्याम Khayyam शगून Shagoon

हिंदी चित्रपट हा बहुतांशी प्रणयी भावनेशी अधिकाधिक निगडीत असतो आणि त्या भावनेचीच कास धरून, चित्रपट निर्मिती होते. अगदी पूर्वापार धांडोळा घेतला तरी हेच सत्य आपल्या हाती येते. त्यामुळे सादरीकरणातदेखील बऱ्याच वेळा तोचतोचपणा येतो आणि एकुणातच आविष्कार बेचव होऊन जातो. अर्थात, या अनुभवाला छेद देणारी निर्मिती अनुभवायला मिळते, पण त्याचे प्रमाण अगदी नगण्य म्हणावे इतपतच असते. 

या पार्श्वभूमीवर हिंदी गाणी फारच उठून दिसतात. काव्य, संगीत रचना याबाबतीत विलक्षण चोखंदळ वृत्ती दिसते आणि त्यानुरूप आपल्या रसिकतेच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याचे अनन्यसाधारण श्रेय घेऊन जातात. अगदी प्रणयी भावना जरी विचारात घेतली त्यातील अनेक छटांचे विलोभनीय स्तर आपल्याला दिसतात आणि या भावनेतील खोलीची मुक्त, आश्वासक आणि गहिरी परिमाणे जाणवतात. 

खरे तर प्रणयी भावना म्हणजे त्यात पुरुष आणि स्त्री यांच्या सहभागाचा आविष्कार इतपत जरी स्वरूप ध्यानात घेतले तरी त्या नात्यातील असंख्य विभ्रम शब्दाधारे कवींनी व्यक्त केलेले आहेत आणि आपल्या जाणीवा सजग केल्या आहेत. 

१९६४ साली आलेल्या ‘शगुन’ चित्रपटात हेच कथासूत्र कायम ठेवून निर्मिती केली आहे. वहिदा रेहमान आणि कंवलजीत यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. चित्रपट तसा यथातथाच आहे. अभिनय, दिग्दर्शन इत्यादी पातळींवर विचार करता काहीच असामान्य नाही, परंतु चित्रपटातील गाणी मात्र नि:संशय अप्रतिम आहेत. कारण त्यांचे संगीतकार खय्याम आहेत. प्रसिद्ध कवी साहिर यांच्या काही रचना तर निव्वळ कविता म्हणून दाद देण्याइतपत सुंदर आहेत. ‘तुम अपना रंज-ओ-गम’ हे गाणे याच अनुभवाची निखळ साक्ष देणारे आहे. 

दोन तरुण अकल्पित भेटतात, एकमेकांवर अनुरक्त होतात, लग्नाच्या आणाभाका घेतल्या जातात परंतु नेहमीप्रमाणे लग्नात विघ्न येते. मुलीला ‘मंगळ’ असल्याचा साक्षात्कार होतो आणि तिच्या जीवनाची परवड सुरू होते. अशाच एका हुरहूरत्या रात्रीच्या  कातर अवस्थेची नेमकी वेदना कवी सुरेश भट यांनी खालील ओळीत मांडलेली आहे- 

वेदनेला अंत नाही आणि कुणाला खंत नाही, 

गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी;

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा 

कापलेले पंख माझे… लोचने आता मिटावी 

जवळपास हीच वेदना साहिरने आपल्या या गाण्यात मांडली आहे. संगीतकार खय्याम यांनी या गाण्याची चाल बांधताना, पहाडी रागाचा आधार घेतला आहे, पण त्याचबरोबर त्यात पंजाबी ढंग मिसळलेला आहे. त्यामुळे गाण्याचा ढंग बदलला गेला.  

गाण्याच्या सुरुवातीचे पियानोचे स्वर ऐकायला हवेत. तिथे आपल्याला पहाडी रागाचे सूर ऐकायला मिळतात. त्या सुरांनीच गाण्याची लय आणि दिशा ठरवली आहे. आणि त्या सुरावटीतून गायिका जगजीत कौर यांचे सूर ऐकायला मिळतात. तालाला ढोलक वापरले आहे आणि त्याचा नाद अतिशय हलका ठेवला आहे. गाण्याचा ‘मुखडा’ किती आकर्षक आहे, शब्दांनी आणि सुरांनीदेखील मुखडा विलक्षण देखणा बनवला आहे, गझल सदृश रचना आहे, पण पारंपरिक गझल थाटाची स्वररचना टाळून, गाण्याला अधिक ‘गीतधर्मी’ केले आहे.

परिणाम असा होतो, गाणे पहिल्यापासून आपल्या मनात रुतून बसते. चालीच्या बाजूने विचार केल्यास, जरी पियानोवर पहाडी रागाची सावली निर्माण केली असली तरी गायन मात्र पंजाबी लोकसंगीताच्या स्पर्शाने केले आहे. परिणामस्वरूप रागाला बाजूला ठेवले जाते.  

तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो 

तुम्हे गम की कसम इस दिल की विरानी मुझे दे दो 

गाण्याचे शब्द कसे असावेत, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरावे. ‘रंज-ओ-गम’च्या जोडीला ‘परेशानी’ हा शब्द कसा चपखल बसला आहे. उत्तम भावकवितेची एक गरज असते. तिथे शब्दरचना अशी असावी की, तिथे वापरलेल्या शब्दाला प्रतिशब्द वापरावा, असे चुकूनही वाटू नये. हिंदी चित्रपटात, हृदयभंग वगैरे प्रसंगांची रेलचेल असते आणि त्यानिमित्ताने, गाणीदेखील प्रचंड प्रमाणात निर्माण होतात. अशा वेळी, तोच भावप्रसंग अत्यंत सशक्त शब्दात मांडणे, ही तारेवरची कसरत असते आणि साहिर या पातळीवर पूरेपूर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतो. गाण्याची चाल(च) अशी बांधली आहे की, तिथे अकारण हरकती, ताना यांना फाटा देणे आवश्यक होते. याचा अर्थ, गायन सरधोपट आहे, असा अजिबात नव्हे. लयीची वळणे(च) इतकी मोहक आहेत की, गाताना ‘गायकी’ दाखवावी, ही गरजच निर्माण होत नाही. 

पहिला अंतरा सुरू होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात पियानोचे स्वर प्रमुख आहेत, पण पार्श्वभागी व्हायोलीन वाद्याचे स्वर तरळत आहेत. ही स्वररचना मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. पियानो वाजवताना, किंचित पाश्चात्य वादनाची धाटणी स्वीकारली आहे. पियानो वाद्यावर स्वरांची सलगता गाठणे शक्य नसते आणि त्यामुळे आघाती स्वरांतून लयीची भरीवता सादर करायची असते. तंतुवाद्यात किंवा पियानोसारख्या वाद्यात वादन करताना हीच पद्धत अवलंबली जाते. अशा स्वरांमुळे, गाण्याची रचना अधिक समृद्ध होत असते.  

ये माना मैं किसी काबिल नहीं हुं इन निगाहो में 

बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुझे दे दो 

हा अंतरा गाताना, पहिली ओळ सरळ, मुखड्याच्या स्वरावलीच्या विरुद्ध अंगाने गायली आहे, पण हीच ओळ परत गाताना, ‘इन निगाहो में’ किंचित वरच्या सुरांत गायली आहे आणि तोच सूर पकडून, पुढील ओळ गायली आहे. इथे संगीतकाराचे वैशिष्ट्य दिसते. धृवपदाच्या चालीतून, गाण्याचे सूचन नेहमीच होत असते, पण पुढे गाण्याची चाल, वेगवेगळी ‘वळणे’ घेत श्रीमंत होत असताना, भारतीय संगीताच्या तत्त्वानुसार ‘समे’च्या मात्रेकडे लय विसर्जित होते. हा जो स्वरांचा प्रवास असतो, तो अवलोकणे, व्यामिश्रतेचा भाग असतो. 

मैं देखू तो सही दुनिया तुम्हे कैसे सताती हैं 

कोई दिन के लिये अपनी निगेबानी मुझे दे दो 

हा अंतरा कवितेच्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. इथे दुसऱ्या ओळीत ‘निगेबानी’ हा शब्द आला आहे जो मुळातल्या ‘निगेबान’ – ‘निगेहबान’ अशा शब्दावरून तयार झाला आहे. कविता लिहिताना, शब्दांची नव्याने मांडणी करणे आवश्यक ठरते आणि त्यानुसार, कवी असे स्वातंत्र्य नेहमी घेत असतात, जेणेकरून आशयाच्या नव्या छटा निर्माण होतात. एका बाजूने ‘मैं देखू’ -  ‘तुम्हे दुनिया कैसे सताती हैं’ असा संत्रस्त सवाल करायचा आणि त्याचा बाजूने दुसऱ्या ओळीत ‘निगेबानी मुझे दे दो’ असा अप्रतिम विरोधाभास देखील दाखवायचा!! साहिर कवी म्हणून इतरांपेक्षा वेगळा होतो, तो असा. 

गाण्याची चाल बांधताना, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो. गाण्याच्या सुरुवातीला मी पहाडी रागाचा उल्लेख केला होता आणि त्याचबरोबर पंजाबी लोकसंगीताचा. त्याचा इथे सुरेख वापर झालेला दिसतो. मुखडा रागाधारित आहे आणि हा अंतरादेखील त्याच रागाशी तादात्म्य राखून आहे तरीही स्वरांची ‘उठावण’ भिन्न आहे. संगीतकार खय्याम, एकाच रागाच्या सुरांशी किती भिन्न प्रकारे खेळत आहे.  

वो दिल जो मैंने मांगा था मगर गैरो ने पाया था 

बडी शय हैं अगर उसकी पशेमानी मुझे दे दो 

इथे देखील आपल्याला शायर साहिर भेटतो. दुसऱ्या ओळीत ‘शय’ शब्द आहे ज्याचा नेमका अर्थ, ‘बक्षीस’ किंवा ‘सौंदर्य’ अशा प्रकारे घेतला जातो. वरती म्हटल्याप्रमाणे, शब्दांची नव्याने ‘घडणावळ’ करणे, भावकवितेचे अनन्यसाधारण सामर्थ्य आहे आणि साहिरसारखा कवी, आपल्याला अशा मांडणीतून आपल्या नव्या जाणीवा दाखवून देतो. पुढे ‘पशेमानी’ या शब्दाचा अर्थ ध्यानात घेतला म्हणजे या ओळीची खासियत समजते. अरेबिक शब्द ‘पशेमान’वरून हा शब्द आलेला आहे. ‘शरमिंदा’ या भावनेशी जवळीक दाखवणारा हा शब्द आहे. हे एकदा कळल्यावर मग, ‘शय’ आणि ‘पशेमानी’ या शब्दांची संगती लागते आणि कविता म्हणून या गाण्याचा आनंद आपण अधिक घेऊ शकतो. 

साहिरच्या कवितेबाबत थोडेसे. मुळात कविता घडते शब्दांमधून. आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे तर सगळे असावेच लागते, पण हे सगळे गृहीत धरावे लागते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याची जाणीवदेखील व्हायची ती अखेर शब्दांच्याच द्वारे!! आशय गृहीत धरल्यावर कवीनं पुढे काय केलं, हेच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरते. आणि इथे प्रश्न उभा राहतो तो भाषेचा!! भाषेच्या घटकांचा, घटकांच्या घडणीचा. भाषा-शरीराशी देखील तितकाच महत्त्वाचा. आणि जोपर्यंत एखाद्या कवितेत आशय हा पूर्णपणे भाषेतून वेढला गेला आहे, केवळ ‘शब्द’ हेच एक अपरिहार्य असे अभिव्यक्तीचे रूप ठरते, असे जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत ‘कविता’ ही पूर्णत्वाने सिद्धच होत नाही. साहिरच्या बऱ्याचशा कविता या पातळीवर सिद्ध होतात.

गायिका म्हणून जगजीत कौरच्या आवाजाला काही मर्यादा आहेत. गायन शक्यतो शुद्ध स्वरी सप्तकात होते, क्वचित एखादा स्वर वरच्या सुरांत लावला जातो पण तिथे देखील नाममात्र ‘ठेहराव’ असतो, तसेच अवघड हरकती किंवा ताना कितपत जमतील अशी शंका घ्यायला जागा उरते.

खय्याम यांनी प्रस्तुत गाण्याची चाल बांधताना रचनेत जरी स्वरविकासाला जागा ठेवल्या आहेत तरी देखील, मुळातली चालीतली मोहकता इतकी अप्रतिम आहे की, तिथे कुठल्याही प्रकारचा विस्तार अक्षम्य ठरेल आणि मुळात कवितेतील आशयाला बाधक ठरेल. शब्दकळा, स्वररचना आणि गायन या घटकांचा अत्यंत सुयोग्य समन्वय फारच थोड्या गाण्यांच्या बाबतीत आढळतो. आणि हेच एकमेव कारण हे गाणे वारंवार ऐकायला भाग पाडते! 

.............................................................................................................................................

लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.

govilkaranil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख