इतिहासाची साधने टिकवली तरच सर्व समावेशक अशा सकल मानव प्रजातीच्या इतिहासाची रचना होईल!
पडघम - विज्ञाननामा
प्रकाश बुरटे
  • स्टेर्कफोण्टीन गुंफा क्र ७- मानवाची जन्मकथा अशाच येथल्या काही गुंफांत उलगडली. ते स्थान अनेक देशांतील पर्यटक पाहताना.
  • Mon , 19 August 2019
  • पडघम विज्ञाननामा प्रकाश बुरटे Prakash Burte

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्गच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील स्टेर्कफोण्टीन गुंफांमध्ये (Sterkfontein Caves) सर्वांत प्राचीन मानववंशशास्त्रीय जीवाश्मिक पुरावे मिळाले. तेथेच ‘मानवसदृश्य प्राणी तसेच आजच्या मानव प्रजातीचा पाळणा हालला’ असा निर्वाळा देणारी नोंद ‘जागतिक वारसा यादी’मध्ये झाल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेने १९९९ मध्ये जाहीर केले. स्टेर्कफोण्टीन ही सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रफळात पसरलेली चुनखडीच्या गुंफांची जागा आहे.

पृथ्वीवर या आधी जन्मलेल्या, सध्या हयात असणाऱ्या आणि भविष्यात जन्मणाऱ्या सर्व मानवांचे प्रथम पूर्वज दक्षिण आफ्रिकेच्या याच गुंफा प्रदेशात वावरले होते. तीच सर्व मानवाची मातृ-पितृभूमी आहे. ‘आधी कुरापत या का त्या धर्माच्या, भाषेच्या, देशाच्या माणसांनी काढली?’, अशा भांडकुदळ स्पर्धा आपल्याला अशाच गुहांच्या इतिहासात घेऊन जातात, याचे भान तेव्हा नव्हते; अजूनही नाही; परंतु भविष्यात येणे आवश्यक आहे. यथावकाश मानवप्राणी स्थित्यंतरे करत जगभर पसरला. साहजिकच त्याच्या इतिहासाला वेगवेगळ्या वाटा फुटल्या. कालांतराने अनेक बाबतीत माणसांत विविधता निर्माण झाली.

अशी विशाल विविधता असणाऱ्या माणसांत एक फार फार मोलाचे साम्य टिकून आहे. ते म्हणजे अमूर्त संकल्पना करता येणे, त्या इतर माणसांपर्यंत पोहोचवण्याची आणि पटवून देण्याची साधने घडवणे. उदाहरणार्थ, ‘पाऊस’, ‘सूर्य’ अशा असंख्य शब्दांच्या उच्चारांचा अथवा लिपी-चिन्हांचा आणि त्यांनी निर्देशित होणाऱ्या वस्तू अथवा संकल्पनांचा परस्परांशी काडीचाही संबंध नसतो. तरीदेखील एक कृत्रिम संबध फक्त मानवच प्रस्थापित करू शकतो. थोडक्यात भाषा घडवू शकतो. ही जी माणसाच्याच बाबत आकालानात्मक क्रांती झाली आहे, ती त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हे लक्षण असणाऱ्या माणसासाठीच फक्त त्याच्या परिसरातील जवळपास सर्व गोष्टी कुतूहलाच्या, संशोधनाच्या आणि स्पष्टीकरणाच्या, बनतात. परिणामी फक्त माणूस अगणित ज्ञानक्षेत्रे निर्माण आणि विस्तृत करू शकतो. कसे ते उदाहरणाच्या मदतीने पाहू.

युरोप आणि पश्चिम आशियात प्लेगची प्रचंड मोठी दुसरी साथ १४व्या शतकात आली होती. या प्लेग साथीत सुमारे ७ ते २० कोटी किंवा ३० ते ६० टक्के युरोपी लोकसंख्या दगावली असावी, असे तज्ज्ञांचे अंदाज आहेत. ही साथ युरोपात किती काळ टिकली, या प्रश्नाचे ‘सुमारे शंभर वर्षे’, हे उत्तर उत्तर ध्रुवाजवळील आर्क्टिकमधल्या बर्फाच्या महाकाय प्रतलांमध्ये नैसर्गिक घडामोडींतून नोंदले गेले आहे.

ग्रीनलँड हे जगातील सर्वांत मोठे बेट, बरेचसे बर्फाच्छादित. या बर्फप्रतलाचे क्षेत्रफळ आहे सुमारे १७ लाख चौ. किलोमीटर. हा प्रतल एका दिवसात अचानक तयार झाला नाही. तो अक्षरशः हजारो वर्षांपासून घडत आला आहे. प्रत्येक वर्षी हिवाळ्यात साधारणत: ६० ते ९० सेंटीमीटर तर उन्हाळ्यात फक्त २० सेंटीमीटरच्या आसपास हिमवर्षाव होतो. थोडक्या काळात त्याचे बर्फ होते. पुढील वर्षी पुन्हा तीच प्रक्रिया घडते. अशी कित्येक हजारो वर्षे बर्फाचे थरावर थर जमा झाले आहेत. त्यांच्या वजनाखाली खालील स्तरांची जाडी कमी होते.

सध्या या प्रतालाची खोली आहे दोन ते तीन किलोमीटर. दरवेळी बर्फ बनताना त्या त्या वेळच्या हवेचे नमुने बर्फाच्या छोट्या छोट्या पोकळीत (बबल किंवा बर्फकुपीत) बंद होऊन या प्रतलात गाडले गेले. उन्हाळी बर्फकुप्या हिवाळी बर्फकुप्यांपेक्षा आकाराने थोड्या मोठ्या असतात. अशा बर्फप्रतालातून विशेष ड्रिलमशिनच्या मदतीने ५ ते १३ सेंटीमीटर व्यासाचे आणि १ ते ६ मीटर लांबीचे बर्फाचे दंडगोल एका पाठोपाठ बाहेर काढले जातात. त्यातील एक दंडगोल सोबतच्या छायाचित्रात दाखवला आहे.

जोसेफ मॅक्कोनेल आणि मागे नाथन चेल्मान हे संशोधक हातात बर्फाचा दंडगोल प्रयोगशाळेत हाताळताना.

त्याच्या शेजारीच उन्हाळी-हिवाळी बर्फथरांचे पट्टे साध्या नजरेलादेखील खालील छायाचित्रात स्पष्ट दिसत आहेत.

सुमारे दोन किमी. खोलवरून काढलेल्या एक दंडगोलातील १९ सें.मी. लांबीच्या भागात एकाआड एक पांढऱ्या-काळ्या ११ पातळ्या दिसत आहेत. त्यातील हवेत आहे संबंधित ११ वर्षांचा इतिहास.

त्यातील बऱ्याच बर्फकुप्यांतून तात्कालिक हवेचे नमुने मिळतात. कुपी जितकी खोलातील, तितका तीमधील हवेचा नमुना प्राचीन. हे लक्षात घेऊन कालक्रमाने हाती येणाऱ्या हवेच्या नमुन्यांचे पृथक्करण केले, तर या नमुन्यांत आढळणाऱ्या विविध प्रदुषकांच्या आधारे संबंधित काळात माणूस कोणत्या गोष्टींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करत होता याचा इतिहास हाती लागेल.

असाच एक प्रयत्न पर्यावरणविज्ञान, भूगर्भशास्त्र, इतिहास अशा बहुशाखीय तज्ज्ञ चमूने केला. त्यात सुमारे अडीच हजार वर्षांतील हवेच्या नमुन्यांमधील ‘शिसे’ या धातूच्या अति सूक्ष्म कणांचे प्रमाण मोजले. ‘शिसे या धातूचे प्रमाण मोजण्यामागील कारणांतील काही महत्त्वाची कारणे अशी आहेत: १) शिसे आणि चांदी यांच्या रासायनिक गुणधर्मात बरेच साम्य असल्याने दोन्ही खनिजे एकत्रित सापडतात आणि चांदीतही शिशाचे अस्तित्व साधारणत: आढळते. परिणामी चांदीचे उत्पादन जास्त झाले, तर हवेतील शिशाचे प्रमाण वाढते. आर्थिकदृष्ट्या चांगल्या काळात नाणी पाडणे आणि कलात्मक भांडी बनवण्यासाठी जगात एकंदर चांदीचे उत्पादन जास्त होई. या उलट, आर्थिकदृष्ट्या काळ चांगला नसल्यास चांदीचे उत्पादन कमी होई. थोडक्यात आर्थिक घडामोडींशी चांदीचे उत्पादन आणि हवेतील शिसे या प्रदूषकाचे प्रमाण निगडीत होते.

२) शिसे या अति प्राचीन धातूचा वापर श्रीमंती महालांतून शिशाच्या नळाद्वारे पाणी खेळवण्यासाठी, नाणी बनवण्यासाठी, दारू आणि अन्न साठवण्याची विविध आकारांची भांडी बनवण्यासाठी, तसेच अनेक प्रकारच्या मातीच्या सुबक कलात्मक भांड्यांवर तकाकी देऊन रंगीत नक्षीकामासाठी शिश्याच्या भस्माचा वापर गरजेचा असे.

३) श्वासोच्छ्वास किंवा तोंडावाटे कोणत्याही रूपात शिसे शरीरात गेले तरी ते प्रथम रक्तात, नंतर यकृतात आणि सरते शेवटी हाडांमध्ये स्थिरावते. रक्तातील शिशाचे अनेक शक्य दुष्परिणाम अलीकडे अभ्यासले गेले आहेत. या परिणामांत पंडू रोग (शिशामुळे होणारा अनिमिया), पुरुषांत नपुंसकत्व, मेंदूवर परिणाम होऊन विशिष्ट मानसिक विकार हे आहेत.

राजघराण्यांच्या संदर्भात या विकारांची नोंद लिखित साहित्यातून अनेकदा होते. शिवाय हाडे दीर्घ काळ टिकतात. त्यामुळे प्राचीन काळातील मानवी हाडांतील शिशाचे प्रमाण आजही मोजणे शक्य झाले आहे. या उलट, महाभारताची कथा पांडव पिता पंडू राजाच्या बाबतीत अनिमिया आणि नपुंसकत्व ही दोन्ही लक्षणे असल्याचे सांगते. त्यामुळेच कदाचित अनिमियाचे मराठीत नाव ‘पंडू रोग’ पडले असावे. भारतीय पुराणकथांमधून इतरही अनेक राजांचे वंध्यत्व सांगितले आहे. त्यांची हाडे काही संशोधनासाठी मिळत नाहीत. पुराणकथा म्हणजे इतिहास नाही, परंतु त्या इतिहासाची साधने नक्कीच आहेत. अशा कथा रचल्या जाण्याचा अर्थ तोंडात चांदीचा चमचा घेऊन मुले जन्मणाऱ्या श्रीमंता घरी निपुत्रिकांचे प्रमाण बरेच जास्त असावे असा होतो.

थोडक्यात गेल्या अडीच हजार वर्षांचा इतिहास ग्रीनलँडच्या बर्फात गोठला आहे. तो पुन्हा वर काढून चालता-बोलता करणे शक्य झाले आहे. असे दोन संशोधन निबंध ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस’ या संशोधन पत्रिकेत’ २०१८ आणि २०१९ मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे संदर्भ लेखाच्या शेवटी दिले आहेत.

विदेशांतील अनेक पॉप्युलर विज्ञानपत्रिकांनी या महत्त्वाच्या संशोधनाची दखल घेतली आहे. युरोपात मृत्युनंतर अग्नी देण्याऐवजी मृत शरीरे पुरण्याची परंपरा होती. त्यामुळे सम्राट, राजे, तसेच गरीब प्रजा यांच्या अस्थी (हाडे) प्रयोगासाठी उपलब्ध आहेत. याच आधारे वरील संशोधन रोमन सम्राटांच्या अवशेषांत शिशाचे प्रमाण जास्त असल्याचे दाखवते. रोमन साम्राज्यातील बरेच राजे निपुत्रिक असल्याने सत्ता पुढील पिढीकडे सुरळीतपणे जाऊ शकली नाही, हे या साम्राज्य नष्ट होण्याचे अनेक कारणांतील एक कारण मानले जाते.

आत्ता कुठे या प्रकारचे संशोधन शक्य होऊ लागले आहे. तशात ऐतिहासिक नोंदी झालेले ध्रुव प्रदेशांतील ग्रीनलँडसारख्या प्रदेशांतील बर्फ प्रतल जागतिक तापमान वाढीमुळे अलीकडे वेगाने वितळू लागला आहे. पूर्वी अवाढव्य असणाऱ्या बर्फाचे प्रतल आता पातळ आणि क्षेत्रफळाने लहान होत आहेत. हे इतिहासाचे साधन वितळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक तापमानवाढीमुळे कॅलिफोर्नियात आगी लागत आहेत आणि महापूरही येत आहेत. त्यामुळे आता कुणी भारतीय राजकारणी ‘कोकणचे कॅलिफोर्निया’ करण्याचे स्वप्नसुद्धा दाखवत नाही. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करत करत तो शून्यावर आणूनच जागतिक तापमानवाढ आटोक्यात आणणे शक्य आहे. ते जागतिक पातळीवर जमले, तर सकल मानवी इतिहासाचे ध्रुव प्रदेशांतील बर्फ हे प्राचीन इतिहासाचे साधन तगेल. या संदर्भात आईन्स्टाईन यांचे एक अवतरण आठवते. ते म्हणतात, ‘विश्वाचा पसारा आणि मानवी मूर्खता अमर्याद आहे. त्यापैकी पहिल्या गोष्टीबाबत माझ्या मनात शंका आहे.’ अर्थाच्या दृष्टीने शंका नसलेली अवतरणातील दुसरी गोष्ट लक्षात ठेवून आपण पुन्हा शिशाकडे वळू या.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासोबत ‘वैरियाचा देवो झाला, म्हणौनी काय दगड घालोनी फोडावा?’ हा महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींचा आदेश तमाम मानव प्रजातीने लक्षात ठेवावा. त्यामुळे अनेक प्राचीन मूर्ती, प्रार्थनास्थळे सत्ता-संपत्ती मिळवण्यासाठी उदध्वस्त केली जाणार नाहीत. वरील ‘शिशाचे पुराण’ असेही दाखवते की मानवी सर्जनशीलतेतून अनेक अगम्य गोष्टी उद्या इतिहासाची साधने ठरू शकतील.

भविष्यात निर्माण होणारी इतिहासाची साधने टिकवली तर आणि तरच चुका करत करत आणि त्या सुधारत सुधारत जास्त योग्य आणि सर्व समावेशक अशा सकल मानव प्रजातीच्या इतिहासाची रचना होईल. त्याशिवाय देश, धर्म, भाषा, कातडीचा रंग भिन्न असूनही आपण मानव आहोत, हे समजून-उमजून पृथ्वीवरील सकल मानवाची भविष्यातील वाटचाल होऊ शकेल.

संदर्भ :

1) ‘Lead pollution recorded in Greenland ice indicates European emissions tracked plagues, wars, and imperial expansion during antiquity’; Joseph R. McConnell, Andrew I. Wilson, Andreas Stohl, Monica M. Arienzo, Nathan J. Chellman, et.al. Proceedings of National Academy of Sciences, Vol 115; no22, 2018. www.pnas.org/cgi/doi/10.1073/pnas.1721818115

2) ‘Pervasive Arctic lead pollution suggests substantial growth in medieval silver production modulated by plague, climate, and conflict’; Joseph R. McConnell, Nathan J. Chellman, et.al; Proceedings of National Academy of Sciences, 2019; www.pnas.org/cgi/doi/10.1073/pnas.1904515116 .

.............................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......