अजूनकाही
या वर्षी औरंगाबादचा श्रावण चार-साडेचार दशकांपूर्वीच्या श्रावणाशी नाळ जोडणारा आहे. मोठी नसली तरी एखादी मध्यम सर, अन्यथा सतत लयबद्ध टपटप पहिल्या आठवड्यात सूर्याच्या गैरहजेरीत अनुभवायला मिळाली. अशा वेळी ‘पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने’ या ओळी हमखास आठवतात आणि लगेच ‘मेघ रडू द्यावा डोळी, सांज हांकारावी थोडी’, ‘तुला पहिले मी नदीच्या किनारी’, ‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते’, ‘हले कांच पात्रातली वेल साधी, निनादून घंटा तशा वाकल्या’, ‘मन सैरभैर होताना, कंदील घरातील घ्यावा’, अशी कवीवर्य ग्रेस यांच्या कवितांची मनात झड लागते. (आजकाल यातल्या बऱ्याच कविता युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्या ऐकतो खूपदा आम्ही!) तर, या अशा मूडमध्ये या आठवड्याचा मजकूर लिहायला बसलो. सोनिया गांधी पुन्हा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष झाल्याचा सकारात्मक भाग कसा असेल, हा विषय मनात होता. तेवढ्यात बातमी आली ती अभिनेत्री विद्या सिन्हाच्या मृत्यूची. तिचं वय ७१ असल्याचं या निमात्तानं पहिल्यांदाच कळलं. त्याचं कारण आमच्या पिढीनं विद्या सिन्हाकडे अभिनेत्री म्हणून बघितलंच नव्हतं...
मन मग १९७० ते ८०च्या काळात गेलं. वैयक्तीक आणि सामाजिक जीवनात आर्थिक मंदी व विलक्षण तणावाचे दिवस होते ते! दोन युद्ध आणि एका महाभयंकर दुष्काळानं सगळं काही कोलमडून पडलेलं होतं. लाल गहू आणि सुकडी वर उदरभरण झालेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील कामगार, कनिष्ठ, मध्यम मध्यमवर्गीयांची पोटं खपाटीला गेलेली होती. सुकडी, लाल गहू, साखर, तेल मिळवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या रांगेत अर्धा दिवस जात होता, तरी पुरेसं हाती येत नव्हतं. बेकारांच्या फौजा वाढलेल्या होत्या.
विशेषत: शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांची तर फारच ससेहोलपट सुरू होती. यातील अर्धा वर्ग उपाशी पोटी झोपत होता, तर अर्धा वर्ग सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी देऊन पोट भरत होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नव्हत्या. कारखान्यांच्या फाटकावरच ‘नो व्हेकन्सी’ अशा पाट्या झळकत होत्या आणि (सरकारी नव्हे!) शासकीय नोकऱ्या तुटपुंज्या होत्या.
जे वाचते होते त्यांच्यासाठी खांडेकर-फडके यांच्या साहित्यातला रोमँटिसिझम कालबाह्य ठरलेला होता. दलित साहित्यातून व्यक्त होणारं जगणं मनात अस्वस्थता आणि डोक्यात अंगार निर्माण करणारं होतं. नारायण सुर्वे, दया पवार, वामन निंबाळकर, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, गंगाधर पानतावणे यांचा ‘अस्मितादर्श’मधून व्यक्त होणारा वेदनेचा हुंकार जीवाची घालमेल करत होता तर इकडे भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, अशोक शहाणे, महेश एलकुंचवार यांच्या लेखनातून जगण्याचं वास्तव, भावनातात्मक गुंतागुंत आणि मोडून पाडणाऱ्या एकत्रित कुटुंब व्यवस्थेतून आलेली घालमेल आणखी वाढवत होता. याच दशकात नंतरच्या काळात आणीबाणी लादली गेली कोंडी आणखी वाढली.
या कोंडीतून वाट काढण्याचा विरंगुळा म्हणून याच दशकात माझी पिढी क्रिकेट आणि हिंदी चित्रपटाकडे वळली. त्यात आश्चर्य काहीच नाही कारण तेव्हा जात, धर्म विसरून समाजाला एकत्रबांधून ठेवण्याचं कामच हिंदी चित्रपट व गाणी आणि (तेव्हा अस्तित्वात असलेल्या कसोटी) क्रिकेटनं केलेलं आहे. ना त्या काळात टीव्ही होता ना सेलफोन ना इंटरनेट; हॉटेलिंगचं फॅड नव्हतं, ना पिझ्झा होता ना पास्ता; हे सगळं नजरेच्या आणि आकलनाच्या टप्प्यातही नव्हतं! चित्रपट हे स्वप्नांची दुनिया होती, ते सगळं खोटं आहे, हे लोकांना चांगलं ठाऊक होतं, पण त्यारंजनात बहुसंख्य समाज रमत होता हे वास्तव होतं.
महिना पंधरा दिवसातून मध्यमवर्गीय घरचा कर्ता पुरुष पत्नीला (आणि असल्यास अपत्यांना) घेऊन बाहेर जात असे, मसाला डोसा किंवा तत्सम आणि एक स्कूप आईसक्रिम खाऊ घालून, एक गजरा घेऊन देऊन एखाद्या चित्रपटाला जाणं ही जगण्याची कमाल चंगळ होती. बहुतेक सर्व नट्या छान-छान दिसणं आणि नायकासोबत बागडत गाणं म्हणण्यासाठी किंवा उसासे टाकण्यासाठी; थोडक्यात बाहुल्या होत्या.
दिलीपकुमार, देवआनंद, राजकपूर यांचा जमाना संपून राजेश खन्ना सुपरस्टार झालेला होता; चिकना-बिकना नसलेला, गुरु कुर्ता वगैरे घालणारा राजेश खन्ना आणि धसमुसळ्या जितेंद्रला स्वत:च्या जागी कल्पून मध्यमवर्गीयांचा मनातल्या मनात रोमान्स आणि अधूनमधून गुंडांचे निर्दालन सुरू असे. या धारणेला १९७२मध्ये छेद दिला तो अमिताभ बच्चननं ‘दिवार’मधून. मनातली अस्वस्थता आणि डोक्यात ठासून भरलेला अंगार अमिताभनं त्या चित्रपटातून असा काही खुंखार व अफलातून व्यक्त केला की, लोक अक्षरश: फिदा झाले. यातली पुढची कडी होती विद्या सिन्हा आणि अमोल पालेकर!
पायात चपला, कधी साधासा अर्ध्या किंवा पूर्ण बाह्यांचा बुशकोट घालणारा, तर कधी बेलबॉटम पॅन्टवर गुरु कुडता घालणारा, तेलानं चोपड्या झालेल्या केसांचा भांग पाडणारा, प्रेयासीकडेप्रेमाचा ‘इजहार’ (कबुली) देण्यास लाजरा-बुजरा असणारा अमोल पालेकर तेव्हा मध्यमवर्गीय तरुणांना भावला तर पाठीवर एक लांब वेणी, काळेशार टपोरे डोळे, अंगांनी किंचित स्थूल (खरं तर गुबगुबीत!), चेहऱ्यावर लोभस हंसू असणारी, कायम साडीत असणारी आणि पदर दोन्ही खांद्यावर घेऊन पडद्यावर वावरणारी विद्या सिन्हा घराघरात पोहोचली. तिचा पडद्यावरचा वावर आणि राहणी इतकी टिपिकल मध्यमवर्गीय होती की, ती अनेकांना प्रेमळ वहिनी किंवा थोरली बहिण वाटली आणि लोकांनी स्वत:च्या बहीण किंवा वहिनीत तिला सामावून घेतलं. तिच्या केसातला गजरा आणि रजनीगंधाची फुलं त्या काळात रोमँटिसिझचं प्रतिक झालेली होती. (मीही त्या काळात माझ्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे माझी वाहिनी-श्यामलला तीन-चार वेळा गजरा आणून दिला होता. नंतर माझ्या बेगमला हे सांगून या वहिनींनं छळलंही आहे!) अमोल पालेकरसोबत ‘रजनीगंधा’तली दीपा आणि ‘छोटीसी बात’मधली प्रभा, संजीवकुमार सोबत ‘पती, पत्नी और वो’मधली, विनोद खन्ना सोबत ‘इन्कार’मधली गीता या विद्या सिन्हाच्या भूमिका आठवा जरा म्हणजे, ती भारतातल्या मध्यमवर्गीयांच्या घरा-घरातली ’आयडॉल’ कशीझालेली होती हे म्हणणं पटेल. त्या काळात ‘फिल्मफेअर’, ‘रसरंग’, ‘चित्ररंग’ अशी काही चित्रपटविषयक नियतकालिकं लोकप्रिय होती. त्या आणि अन्य चित्रपटविषयक नियतकालिकं वाचताना विवाहित विद्या सिन्हानं चित्रपटात काम करण्यासाठी पतीशी पंगा घेतल्याचं समजल्यावर तर विद्या सिन्हा बंडखोरीचंही प्रतीक झाली.
राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आल्यावर म्हणजे १९८४पासून माझं चित्रपट पाहणं हळूहळू कमी होतं गेलं आणि १९९०नंतर २०१४ पर्यंत पूर्ण थांबलंच. राजकारणात असणारं नाट्य, कट-कारस्थानं, खेळ्या-प्रतिखेळ्या, गुंतागुंत हे नाटक आणि चित्रपटांपेक्षा जास्त खऱ्या-खुऱ्या आणि जिवंत (Live) असल्यानं कदाचित हे घडलं असावं. हाती पडणारा चित्रपटविषयक मजकूर मात्र अधूनमधून(च) वाचत होतो. जो वाचत होतो, त्यात विद्या सिन्हाविषयक मजकूर आवर्जून होता. तिचा १९६८सालीच वेंकटेश अय्यर या दक्षिनात्याशी विवाह झाला. नंतर या दाम्पत्याने एक मुलगी दत्तक घेतली. आजारी पतीची सुश्रुषा करण्यासाठी विद्या हैद्राबादला स्थायिक झाली. पतीच्या निधनानंतर ती ऑस्ट्रेलियात गेली. तिकडे तिनं भीमराव साळुंके नावाच्या एका भारतीय डॉक्टरशी दुसरा विवाह केला आणि त्याने केलेल्या हिंसाचाराला कंटाळून घटस्फोट घेतला... वगैरे वगैरे वाचनात आलेलं होतं. पण कुणाच्याच खाजगी आयुष्यात डोकवावं किंवा त्यासंदर्भात गॉसिप करावं हा स्वभाव नसल्यानं त्या माहितीत मला तरी रस नव्हता. शिवाय चित्रपट नावाच्या त्या मार्गापासून खूप लांब आलेलो होतो. मात्र विद्या सिन्हाच्या निधनाची बातमी आल्यावर हे सर्व आठवलं.
आमच्या मध्यमवर्गील पिढीच्या मनातलं एक पिकलं पान विद्या सिन्हाच्या निधनानं गळून पडलं आहे. विद्या सिन्हाच्या चित्रपटातील योगदानाचं मूल्यमापन त्या क्षेत्रातील जाणकार करतीलच. एक मात्र खरं, ‘सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी’ देऊन जगलेल्या आमच्या त्या मध्यमवर्गीयांच्या मनात विद्या सिन्हाचं लोभस हसू कायम लक्षात राहणार आहे.
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment