चला, स्वातंत्र्य दिनानिमित्त आईस्क्रीम खाऊ या!
ग्रंथनामा - झलक
रवीश कुमार
  • रवीश कुमार आणि त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मुखपृष्ठ
  • Thu , 15 August 2019
  • ग्रंथनामा झलक रविश कुमार Ravish Kumar द फ्री व्हाइस The Free Voice सुनील तांबे Sunil Tambe

निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकार आणि २०१९चे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉइस’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील तांबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या अनुवादाची नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्तानं या पुस्तकातील हे एक प्रकरण...

.................................................................................................................................................................

१५ ऑगस्ट जवळ येऊ लागला की, अनेक लोक प्रश्न विचारू लागतात, स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाने काय कामगिरी केली. आपण काहीही मिळवलं नाही, अशी काहीशी पोकळपणाची भावना त्यांना ‘पंधरा ऑगस्ट’ निमित्त जाणवू लागते. आपण काय कामगिरी केली वा केली नाही, हा प्रश्न आणि कामगिरीची वाटचाल, जणू अनंतात विरणारा आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तर वर्षांत भारताने लांबचा पल्ला गाठला आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात आपण असलो तरी आपल्याला देशाचा अभिमान वाटू शकतो. आपण म्हणजे भारतातल्या जनतेने या देशाला अभिमानास्पद बनवलं आहे आणि ते कार्य सुरूच राहील. सुधारणेला नेहमीच जागा असते आणि सुधारणेसाठी जे प्रयास भारतातील जनता करते, त्यातून भारतीयत्व सिद्ध होतं. आपण काय यश कमावलं असा प्रश्न विचारण्याऐवजी आपण काय करू शकतो, असं विचारायला सुरुवात केली पाहिजे. आणि मोठ्या कृतींपेक्षा छोट्या छोट्या कामांनी आरंभ करायला हवा.

पण काहीतरी करायची इच्छा वा आकांक्षा ठेवली तर त्यातच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल असं नाही. आपण आपल्यासाठी कोणता मार्ग निवडतो त्यातही ते उत्तर सापडेल. सर्वांना लाभकारक आहेत असा दावा सातत्याने करणाऱ्या आर्थिक, राजकीय व्यवस्थांचं विश्लेषण करणं आपल्याला जमतंय का? लोकशाहीचा आत्माच लुबाडण्याची जी चाहूल लागते आहे, ती आपण ओळखत आहोत का? आर्थिक उन्नतीचा अर्थ स्टॉक मार्केटमधली तेजी नाही, तर प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षितता हा असायला हवा, अशी मागणी आपण करतो का?

विकासाचे अग्रणी मानल्या जाणार्‍या देशांनाही आर्थिक विषमता नष्ट करता आलेली नाही. काळानुरूप तंत्रविज्ञानाने मिळणारी सारी सुखे गोळा करूनही आपल्याला जीवनातील ताण कमी झालेले नाहीत. त्यामुळे सोप्या पळवाटा शोधण्यावर आपलं सर्वांचं जणू एकमत झालं आहे. आपल्याला नवी व्यवस्था शोधायची नाही, हे ठरवून घेतलंय आपण आणि ज्यात अगदी मूठभरांनाच सगळे फायदे मिळतात अशा व्यवस्थेची आपण पाठराखण करतो. आणि एकदा का आपण या निवडक मूठभरांच्या गटात सामील व्हायचा निर्णय घेतला की, आपण त्या दिमाखदार दालनांमध्ये जाण्यासाठी आपल्या क्षमता घासूनपुसून चकचकीत बनवू लागतो.

अनेकदा आपण आर्थिक यशासोबत अध्यात्माची सांगड घालू पाहतो, पण खरे पाहता या दोन्ही वाटा पूर्णतः भिन्न आहेत. उपभोगवादी झाल्याशिवाय आपण आर्थिक प्रगती करू शकत नाही आणि उपभोगवादी असलो तर आध्यात्मिक होऊ शकत नाही. पण आपण अर्थातच दोघांमधला समतोल गाठू शकतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतीय स्वातंत्र्यलढा हा जागतिक इतिहासातील आश्चर्यकारक घटनाक्रम आहे. स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी आपण नव्वद वर्षांपेक्षा अधिक काळ लढत होतो. अनेक समाजांतील आणि धर्मातील लोक- आपसातले झगडे सुरू असतानाही देशनिर्मितीच्या लढ्यात सहभागी झाले होते. आपल्याला हे कळू लागले होते की, स्वतंत्र भारतात वर्गभेदांना थारा असणार नाही, धर्मद्वेषालाही देशात स्थान नसेल, या तत्त्वावर आपला विशेष जोर होता. सहिष्णुता आणि प्रेम ही तत्त्वं आपण महत्त्वाची म्हणून स्वीकारली होती.

स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग काय असावेत यावरही आपण वादविवाद करत होतो आणि आपला असाही प्रयत्न होता की, स्वतंत्र भारतात प्रत्येकाला समता आणि प्रतिष्ठेचं जीवन मिळालं पाहिजे. विसाव्या शतकातील राष्ट्रवादाच्या संदर्भात भारत भौगोलिक आणि राजकीय अस्तित्व सिद्ध करत होता, तेव्हा एकही विषय अस्पर्श नव्हता आणि प्रत्येक प्रश्न विचारला जात होता.

परंतु स्वातंत्र्य आंदोलनात, ज्यात देशासाठी अनेक लोक एकत्र जोडले गेले, सांप्रदायिक दंग्यांचा रोग दूर झाला नाही. दंगे हा ब्रिटिश राजवटीचा वारसा आहे. लाऊड स्पीकरवरून मौलवीने आझान देणं, धार्मिक मिरवणुका- प्रक्षोभक वातावरण करण्याच्या हेतूंनी हिंदूंनी मुसलमानांच्या वस्तीत जाणं किंवा उलट, कोणताही विषय घ्या, त्याचा नीट अभ्यास वा विश्लेषण करा. तुमच्या असं ध्यानी येईल की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत त्यामध्ये सातत्य आहे. या वेडेपणाला असलेली प्रतिक्रिया म्हणून असेल कदाचित पण भगतसिंगाने आपण नास्तिक असल्याचं जाहीर केलं. संपादक आणि वार्ताहर गणेश शंकर विद्यार्थी कानपूरमधील सांप्रदायिक दंगा रोखताना शहीद झाले. एक वा दुसरं कारण देऊन वा विविध प्रकारच्या विषमतांना वेठीस धरून, समाजात दुही माजवणार्‍यांची संख्या आज प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांना जुने हिशेब ताबडतोब चुकते करायचे आहेत. कोणत्याही एका घटनेसाठी संपूर्ण समाजाला जबाबदार धरलं जात. हे दोन्ही बाजूंनी घडतं आणि तिरस्काराच्या राजकारणाची सुरुवात होते.

२०१४ साली उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरावा गावातून एक बातमी आली. स्थानिक मदरशामध्ये हिंदी शिकवणार्‍या बावीस वर्षांच्या एका महिलेने आरोप केला की, गावाच्या मुखियाने तिचं अपहरण केलं, जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सोशल मीडियावर याचे अतिशय आक्रमक पडसाद उमटले आणि संपूर्ण मेरठ काही काळासाठी तणावग्रस्त झालं. त्या प्रकरणाची पोलीस चौकशी अजून चालू आहे. मात्र या प्रसंगाची सबब सांगून मुस्लीम समाजातील कुणाचा तरी खून वा लैंगिक छळाच्या घटनेचं समर्थन करण्यात आलं.

समाजामध्ये द्वेष पसरवणारा गुन्हेगारी कृत्य करतो आणि त्या कृत्याला धर्माभिमानाच्या ‘युद्धाचा’ भाग बनवतो.

संबंधित महिलेच्या दाव्यांबाबत पोलीस तपासात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मेरठमधील ती घटना वादग्रस्त बनली. आणि अनेक प्रश्न उभे राहिले. त्यानंतर द्वेषप्रसारक टोळ्यांनी आपला गाशा गुंडाळला.

या प्रसंगाबाबत गरमागरम चर्चा सुरू होती, त्यावेळी मला अगणित फोन आले. मी हा विषय का घेतला नाही, त्यावर का बोलत नाही, हे जाणून घेण्यासाठी. मला आठवतं की, मी अचंबित झालो होतो, कारण बहुतेक फोन अशा लोकांनी केले होते, ज्यांना या कोणत्याही प्रकरणाच्या धार्मिक बाजूंना उठाव देऊन वेडाचार पसरवायचा होता. एकाही इसमाला फोन करून असं सांगावंसं वाटलं नाही की, हे विषय कपोलकल्पित आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, नपेक्षा याची परिणती समाजात विष पसरण्यात होईल... या लोकांना फोन करून असं का सांगावसं वाटलं नाही की, आपण जगण्याशी संबंधित, जीवनाला भिडणार्‍या प्रश्नांची चर्चा करूया?

आणखी एक बाब, अनेकांनी फोन करून मला धमक्या दिल्या- हा प्रश्न उठवला नाहीत तर परिणामांना तयार राहा. दैवदुर्विलास असा की, याच माणसांनी असं जाहीर केलं होतं की, धर्माच्या मुद्द्यावर ते उदारमतवादी आणि मोठ्या मनाचे आहेत. उदारमतवादी आणि मोठ्या मनाचा माणूस द्वेषपूर्ण कसा बोलतो, धमक्या कशा देतो?

यासंबंधात आपल्याला सामूहिक निर्णय करायला हवा. आलतूफालतू कारणांवरून आपल्याला द्वेष – वास्तविक वा काल्पनिक, पसरवायचा आहे की, नष्ट करायचा आहे? आपण या लोकांना अलग करणं, एकटं पाडणं गरजेचं आहे.

कोणत्याही युक्तिवादाने द्वेषाचं समर्थन करता येतं? न्यायालयात न्याय न मिळाल्याची आपल्या देशात अनेक उदाहरणं आहेत. त्यांचा वापर समाजात विष कालवण्यासाठी करायचा? माध्यमांनी एखाद्या व्यक्तीची वा घटनेची दखल का घेतली नाही, हा प्रश्न अवश्य विचारायला हवा. पण द्वेष कालवण्याच्या उद्देशाने असा प्रश्न विचारायचा?

आपल्याला आपल्या समाजाबद्दल करुणा नसेल तर हिंदू वा बौद्ध वा मुसलमान असण्याचा अर्थ काय, हे आपल्याला कधीही समजणार नाही. करुणेशिवाय कोणीही धार्मिक होऊ शकत नाही. करुणा नसलेला मनुष्य दया आणि धार्मिकतेच्या आवरणाखालचा राक्षस असतो.

.............

पंधरा ऑगस्टची पोकळी जाणवणारे काही लोक मला प्रश्न विचारतात की, त्यांनी स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. कारण त्यांच्या दृष्टीने आपण काहीही कामगिरी केलेली नाही.

मी त्यांना सांगतो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या द्वेषावर वर्चस्व मिळवलं असेल, तुमची सहिष्णुता वाढवली असेल तर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा तुम्हाला हक्क आहे. तुम्हाला दुसर्‍या समाजाचा वा धर्माचा द्वेष नसेल तर तुम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करू शकता. तुम्ही द्वेषाच्या विरोधात आवाज उठवला असेल आणि त्यासाठी युद्ध वा संघर्ष केला असेल तर तुम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की, भगतसिंग तुमच्यासाठी हुतात्मा झाला, खुदीराम बोस तुमच्यासाठी फासावर चढला आणि महात्मा गांधींनी तुमच्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या, तर तुम्ही बेलाशकपणे पंधरा ऑगस्ट साजरा करू शकता.

तुम्ही एखाद्या समाजाचा द्वेष करता तरीही भगतसिंगाच्या हौतात्म्याचा मुकुट डोक्यावर चढवता आणि तुम्ही देशभक्त असल्याची घोषणा करता हे अमान्य आहे, असंही मी त्यांना सांगतो. तुम्ही हे केलं नसेल तर लाखो लोकांनी त्याग करून सांभाळलेलं स्वतंत्र भारताचं स्वप्न तुम्ही जिवंत ठेवलं आहे. स्वातंत्र्य दिन तुमचा आहे.

खूप काही करायचं आहे, अनेक क्षेत्रात काम करायचं आहे. मात्र जिथे काम करायचं आहे, त्या क्षेत्रांचं आपल्याला भान असेल, तर आपण एक दिवस सुट्टी घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करू शकतो. आपण आईसक्रीम खाऊ किंवा गुलाबजाम किंवा दोन जिलब्या. मिठाई खरेदी करून आपल्यापेक्षा कमी सुदैवी लोकांना वाटू शकतो. अनेक पिढ्यांनी स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहून ते सुंदर स्वेटरच्या विणकामासारखं आपल्यापुढे ठेवलं, म्हणून आपल्यामधील भलेपणाच्या आणि योग्य बाबी आकारास आल्या आहेत. या स्वेटरच्या ऊबेमुळेच आपली मनं विशाल आणि उदार होतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा साजरा करण्याचं धैर्य आपल्याला मिळतं.

​​​​​​​.................................................................................................................................................................

रवीश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉईस’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

 

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 15 August 2019

भाग्यश्रीताई, ही शाळेतनं शिकवलं जात नाही कारण चालू शिक्षण मेकॉलेछाप आहे. ते फक्त क्लार्क उत्पन्न करणारं शिक्षण आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


Bhagyashree Bhagwat

Thu , 15 August 2019

अफलातून! 'करुणेशिवाय कोणीही धार्मिक होऊ शकत नाही' - अफलातून. हे शाळेत का शिकवलं जात नाही?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......