प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे ‘Gandhi Before India’ हे गांधीचरित्र २०१३मध्ये सर्वप्रथम इंग्रजीत प्रकाशित झाले. या चरित्रात गांधींच्या १८८३ साली आफ्रिकेला प्रयाण करण्यापर्यंत आणि तिथपासून १९१५ साली भारतात कायमस्वरूपी परतण्यापर्यंतची जीवनकहाणी आहे. गांधींच्या सर्व संकल्पना या काळात तयार झाल्या. त्यामुळे हा काळ गांधीजींच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा काळ मानला जातो. या चरित्रासाठी गुहा यांनी अतिशय मेहनत घेतली. आजवर पाहिलेले न गेलेले दस्तावेज, पत्रे, वर्तमानपत्रं, नियतकालिकं यांचा शोध घेतला. त्यामुळे हे पुस्तक गांधींच्या जडणघडणीचा काळ समजून घेण्यासाठीचा सर्वांत विश्वसनीय दस्तावेज आहे. नुकताच या पुस्तकाचा ‘गांधी : भारतात येण्यापूर्वी’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. शारदा साठे यांनी हा अनुवाद केला असून मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने हे चरित्र प्रकाशित केले आहे. या पुस्तकासाठी गुहा यांनी कसकसा शोध घेतला, त्याची ही हकिकत.
............................................................................................................................................................
‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’च्या पहिल्या १२ खंडांत (जवळजवळ ५,००० छापील पाने) त्यांचे काठियावाड, लंडन, मुंबई आणि दक्षिण आफ्रिकेतील जीवन ग्रथित आहे. या प्रकल्पाचे प्रमुख के. स्वामिनाथन आणि त्यांचे सहप्रमुख सी. एन. पटेल या दोन विद्वान व्यक्तींनी हे १२ खंड संपादित केले आहेत. स्वामिनाथन पूर्वी मद्रासमध्ये इंग्लिशचे प्राध्यापक होते. त्यांनी काही काळ एका वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीचेही संपादन केले होते. पटेलही इंग्लिशचे शिक्षक होते. (अहमदाबादमधील एका महाविद्यालयात. ते गुजराथी भाषक होते.)
मजुकराची मांडणी व त्याचे एकूण संदर्भ तळटिपा देऊन विशद करणे, पूरक संदर्भ आणि परिशिष्टे देणे यांत स्वामिनाथन यांनी लक्ष घातले, तर गुजराथी मजकुराचे भाषांतर पटेलांनी केले. त्यांना आणखी दोन जणांनी मदत केली. एक गांधींचा पुतण्या छगनलाल आणि दुसरे गांधींचीच पडछाया असलेले हेन्री पोलाक. छगनलालने त्याच्याजवळची गांधींची प्रचंड संख्येतील सर्व पत्रे उपलब्ध केली आणि हेन्री पोलाकबरोबर गांधींचे बर्याच वेळा सही नसलेले ‘इंडियन ओपिनियन’मधील लेख ओळखायला मदत केली. हे दोघेही दक्षिण आफ्रिकेतले हे साप्ताहिक काढण्यात जवळून गुंतलेले होते. आता जवळजवळ ५० वर्षे उलटून गेल्यावर त्यांनी त्यातले गांधींचे नेमके लिखाण कोणते, ते अजमावून निश्चित केले आहे.
प्रस्तुत ग्रंथासाठी या पहिल्या १२ खंडांचा भरपूर उपयोग केला आहे, हे ओघाने आलेच. त्याचबरोबर हरमान कालेनबाख, हेन्री आणि मिली पोलाक, अल्बर्ट वेस्ट यांना गांधींनी लिहिलेल्या पत्रांच्या पूरक खंडाचा मी उपयोग केला आहे. त्याचबरोबर इतरांनी गांधींना लिहिलेली पत्रेही या ग्रंथासाठी अतिशय महत्त्वाची होती. या संदर्भांकडे पूर्वी दुर्लक्ष केले गेले, ही गोष्ट चमत्कारिकच म्हणता येईल. राजघाटावरील गांधींच्या स्मृतिस्थळाच्या समोरच्याच बाजूला नॅशनल गांधी म्यूझियम आहे. त्यांच्या लायब्ररीत गांधींच्या पत्रव्यवहाराचे कैक खंड आहेत. ते तारीखवार आहेत. त्यांतील पहिल्या १० खंडांत प्रस्तुत ग्रंथातील काळ येतो. त्यांत प्राणजीवन मेहता, हेन्री पोलाक, जोसेफ डोक, जी. के. गोखले, सी. एफ. अॅण्ड्र्यूज आदि गांधींच्या अत्यंत जवळच्या मित्रांनी गांधींना लिहिलेली पत्रे आहेत. या पत्रांमधून गांधींचे व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध, धार्मिक निष्ठा आणि सामाजिक व राजकीय दृष्टिकोनांवर प्रकाश पडतो.
या गांधी संग्रहालयातील लायब्ररीच्या कपाटात सर्वात खालच्या कप्प्यात हे खंड ठेवलेले आहेत. सरकत्या दरवाजांमुळे ते पटकन दिसत नाहीत. कदाचित त्यामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असावे. या सर्व प्रती आहेत. मूळ पत्रे नॅशनल आर्काइव्जमध्ये ठेवलेली आहेत. त्याचप्रमाणे अहमदाबादच्या साबरमती आश्रमातही आणखी काही दस्तऐवज आणि याच्या प्रती उपलब्ध आहेत. गांधी तिथेच १९१७ पासून १९३० पर्यंत राहिले होते. प्रत्येक दस्तऐवजाला अनुक्रमांक दिलेला आहे.
तिसरा महत्त्वाचा संदर्भ गांधींचे मित्र आणि सहकारी यांचे कागदपत्र. त्यात गांधींबद्दलची एकमेकांना लिहिलेली पत्रे आहेत. त्यात गांधींच्या बहुविध कार्यासंबंधीची मते व्यक्त होतात आणि अतिशय महत्त्वाचा तपशील मिळतो. गांधींबद्दलचे विचार व्यक्त होताना दिसतात. प्रस्तुत ग्रंथात गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कागदपत्रांचा भरपूर वापर केला आहे. ते नवी दिल्लीच्या नॅशनल आर्काइव्जमध्ये उपलब्ध आहेत. हेन्री पोलाकचे कागदपत्र दोन ठिकाणी विभागून आहेत. एक ‘र्होड्स हाऊस लायब्ररी, ऑक्सफर्ड’ येथे आणि दुसरे ‘एशियन अॅण्ड आफ्रिकन कलेक्शन ऑफ द ब्रिटिश लायब्ररी, लंडन’ येथे आहेत. कालेनबाखचे दस्तऐवज इस्त्राएलमधील हायफात होते. पुस्तक पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत ते भारताच्या आर्काइव्जमध्ये आणले गेले आहेत. जोसेफ डोक यांचे कागदपत्र काही प्रमाणात साउथ आफ्रिकन युनियन आर्काइव्ज, जोहान्सबर्ग येथे आहेत, तर काही त्यांच्या मुलाच्या युनिव्हर्सिटीच्या वाचनालयात, प्रिटोरियात आहेत. माझ्या संशोधनात उपयोगी पडलेली इतर काही कागदपत्रे लुई फिशर पेपर्समध्ये आहेत. ते न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीत आहेत. १९१२-१३ची कालेनबाखची एक डायरी अहमदाबादला साबरमती आश्रमात आहे. सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया(भारतसेवक समाज)चे कागदपत्र नेहरू मेमोरियल म्यूझियम आणि नवी दिल्ली लायब्ररी (एम.एम.एल.)मध्ये आहेत. त्यांच्याकडे गांधींचे कागदपत्र प्रचंड प्रमाणावर आहेत.
चौथा प्रमुख संदर्भस्त्रोत आहे तो भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनच्या सरकारच्या आर्काइव्जमध्ये. दक्षिण आफ्रिकेतील वंशद्वेषी धोरणे आणि त्यांवरील लंडन आणि भारतामधल्या प्रतिक्रिया या सर्व इथल्या कागदपत्रांमधून रचल्या जातात. गांधींचे राजकीय शत्रू, क्षुद्र प्रवृत्तीचा एशियाटिक्स संरक्षण अधिकारी, मंत्री महाशय, पंतप्रधान आणि गव्हर्नर जनरल हे सर्व गांधींबद्दल काय लिहीत होते आणि त्यांना कसा प्रतिसाद देत होते, हे समजून घेण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत.
गांधींची नाताळमधील वर्षे कशी होती, हे दाखविणार्या कागदपत्रांच्या नकला (फोटोप्रती) ई. एस. रेड्डी यांनी पीटरमारित्झबर्गच्या पब्लिक आर्काइव्जमधून घेतल्या होत्या. आता त्या नेहरू मेमोरियल म्यूझियम आणि लायब्ररी, नवी दिल्ली इथे आहेत. त्याहीहून अधिक महत्त्वाच्या आठ मायक्रोफिल्म्स नाताळ गव्हर्नमेन्ट हाउसमध्ये आहेत. त्या १९१७ मध्ये त्यांनी मिळवल्या. त्या वेळी तिथल्या अपार्थाइड राजवटीशी भारताचे राजनैतिक संबंध नव्हते. परंतु एका अभ्यासकाने दुसर्या एका अमेरिकन अभ्यासकाचे मन वळवून त्याच्या प्रती नवी दिल्लीला दिल्या. या अमेरिकन अभ्यासकाकडे निधी उपलब्ध होता. या मायक्रोफिल्म्स जवळजवळ १० हजार पानांच्या आहेत आणि ती तर दक्षिण आफ्रिकेतील सामान्य भारतीय कामगारांचे जीवन त्या काळात कसे होते, याचे दर्शन घडविणारी खिडकीच आहे. त्यात एम. के. गांधींची भूमिका काय होती, याचेही आपल्याला दर्शन घडते.
ट्रान्सवाल सरकार आणि साउथ आफ्रिकन युनियनचे कागदपत्र साउथ आफ्रिकेच्या नॅशनल आर्काइव्जमध्ये आहेत. प्रिटोरियामधली ही इमारत अगदीच अनाकर्षक आहे. पण तिथल्या कागदपत्रांच्या मूल्यामुळे बाह्यदर्शनातील कमतरता बाजूला ठेवता येईल. बाहेरून निदान आकर्षक म्हणता येईल अशा नवी दिल्लीमधल्या नॅशनल आर्काइव्जमध्ये मी फॉरेन अॅण्ड पोलिटिकल डिपार्टमेंटचे दस्तऐवज (काठियावाडसाठी) पाहिले. (गांधींच्या हिंद स्वराज पुस्तकावरील बंदी). त्याला पूरक असे काही दस्तऐवज मला मुंबईच्या महाराष्ट्र स्टेट आर्काइव्ज आणि चेन्नईतल्या तामीळनाडू स्टेट आर्काइव्जमध्ये पाहायला मिळाले. दस्तऐवजांचा तिसरा भाग लंडनमध्ये आहे. (१८६९ ते १९१४पर्यंत). लंडन ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. साम्राज्यात बहुतांश दक्षिण आफ्रिका आणि भारताचा समावेश होता. खासकरून वासाहतिक कचेरीमधील दस्तऐवज या प्रकल्पासाठी खूप उपयोगी पडले आहेत. ते यूकेच्या क्यूमधील नॅशनल आर्काइव्जमध्ये आहेत. त्याच प्रमाणे जुन्या इंडिया ऑफिसमधील कागदपत्रही सेंट पॅन्क्रासमधील ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहेत. या दोन्ही ठिकाणी गांधी आणि त्यांच्या संघर्षाविषयीची मौल्यवान माहिती ठेवलेली आहे.
खुद्द प्रो कॉन्सलनी ठेवलेले दस्तऐवज खूपच उपयोगी पडले. ऑक्सफर्डमधील बॉडोलियन लायब्रीमधील लॉर्ड सेलबोर्न, लॉर्ड रिपन व लॉर्ड ग्लॅडस्टनचे लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीतील कागदपत्र उपयोगास आले.
पत्रे, हस्तलिखिते आणि सरकारी कागदपत्रांचे वर्गीकरण साधारणपणे अप्रकाशित प्राथमिक संदर्भ म्हणून होते. त्यानंतर आपण प्रकाशित प्राथमिक संदर्भांकडे वळतो. मी दक्षिण आफ्रिकेच्या लोकसभेतील कितीतरी कागदपत्रे आधार म्हणून उपयोगात आणली आहेत. त्यांत कितीतरी आर्काइव्जमधला पत्रव्यवहार आहे. त्यातही जॉन ख्रिश्चन स्मट्सच्या पत्रव्यवहाराचे प्रकाशित खंड आहेत. त्यांचे संपादन कीथ हॅन्कॉकने आणि जीन व्हान डार पोएलने केले आहे. त्याचप्रमाणे १८९० ते १९१० या काळातील कित्येक सरकारी अहवालही मी विचारात घेतले आहेत. या ग्रंथासाठी आत्यंतिक महत्त्वाचा एक संदर्भ म्हणजे, या तीन देशांत प्रसिद्ध झालेली वृत्तपत्रे हा आहे. पण गांधींच्या आधीच्या चरित्रलेखकांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मी बर्याच मोठ्या प्रमाणात ब्रिटिश वृत्तपत्रांमधून संबंधित बातम्या आणि गांधींबद्दलची टीका-टिप्पणी त्यातून घेतली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील आणि दक्षिण आफ्रिकेतील वृत्तपत्रांमधूनही संदर्भ घेतले आहेत.
अहमदाबादला साबरमती आश्रमात एका गोदरेजच्या कपाटात वृत्तपत्र कात्रणांचे १२ खंड ठेवले आहेत. ती प्रामुख्याने १८९४ ते १९०१ या काळातील कात्रणे आहेत. आणि त्यांत नाताळमधील भारतीय आणि गांधी यांच्याविषयी काय प्रचलित दृष्टिकोन व वृत्ती तेव्हा होत्या, याचा ऊहापोह आहे. ती कात्रणे वेगळी ठेवली आहेत आणि गांधींना आलेली पत्रे व गांधींनी लिहिलेली पत्रे त्यात कालक्रमानुसार अनुक्रमांक देऊन ठेवलेली आहेत. त्यामुळे संदर्भांत मी तोच अनुक्रम दाखवला आहे. (एस. एन. किंवा सिरियल नंबर)
ही कात्रणे कुणी काढली असावीत? मला वाटते की, ती गांधींनी स्वत:च काढली असावीत. ती साबरमती आश्रमात कशी आली? सुप्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ता नारायण देसाईंच्या मते ती छगनलाल गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून परत आणली आहेत. कदाचित असे असावे, की गांधी जेव्हा १९०१मध्ये भारतात परतले तेव्हा नाताळमध्ये ती कात्रणे त्यांनी त्यांच्या मित्राकडे दिली असावीत (पारशी रुस्तमजी?). नंतर ती छगनलाल गांधींनी आपल्या ताब्यात घेतली असावीत. पण हा आपला केवळ एक तर्क आहे. सध्या ती साबरमती आश्रमात आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यातून आपल्याला एक अत्यंत विस्मयचकित करणारे परिप्रेक्ष्य लाभते. नाताळमधील गोर्या लोकांच्या दृष्टिकोनातून गांधी कसे होते ते त्यातून दिसते.
१९०३मध्ये गांधी दक्षिण आफ्रिकेत परत आले आणि त्यांनी इंडियन ओपिनियन सुरू केले. त्यात अत्यंत नियमितपणे इतर नियतकालिकांतील प्रकाशित उतारे दिले जात. समीक्षेचे उतारेही दिले जात. मी त्यांतून माझ्या कथनासाठी मजकूर घेतला आहे. गांधी सर्वंकष पद्धतीने समजूत घ्यायचे असतील तर इंडियन ओपिनियनचा आधार घेणे अपरिहार्य आहे. गांधींचा समाज, त्यांचे संघर्ष आणि कालखंड समजून घेण्यासाठी ते फारच जरुरीचे आहे. १९०३ ते १९१४पर्यंतचे सर्व खंड राष्ट्रीय गांधी संग्रहालयाने सीडी-रॉमवर ठेवले आहेत. मी हे ५०० अंक मोठ्या संगणकावर वाचले. त्यांतील मजकूर आणि त्यामागचा दृष्टिकोन यांमुळे मी सतत विस्मयचकित होत होतो. त्यातूनच मी माझी टिपणे संगणकावरच काढली. माझी टिपणे ४०,००० शब्दांवर गेली होती. पण या ग्रंथात त्यांतील फारच थोडा भाग जागा मिळवू शकला आहे.
साबरमती आश्रमातील कात्रणे आणि इंडियन ओपिनियनमधील मजकूर, मग तो मूळ लेखनातून घेतलेला असो किंवा इतर ठिकाणाहून पुनर्मुद्रित केलेला असो, त्यातून खरोखरच खूप काही समजायला मदत होते. त्याचप्रमाणे ‘आफ्रिकन क्रॉनिकल’चे अंकसुद्धा उपयोगी पडले. ते गांधींचे प्रतिस्पर्धी पी. एस. अय्यरचे वृत्तपत्र होते. ते खंड ब्रिटिश लायब्ररीच्या वृत्तपत्र विभागात लंडनच्या उत्तरेकडे कॉलिन्डेल उपनगरात आहेत.
गांधींच्या जीवनातील कळीचे प्रसंग आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहांसाठी मी ‘दि टाइम्स ऑफ लंडन, दि ट्रान्सवाल लीडर, दि रॅण्ड डेली मेल, दि स्टार ऑफ जोहान्सबर्ग, दि नाताळ अॅडव्हर्टायझर आणि दि मद्रास मेल’ यांचा आधार घेतला आहे. १८९३ ते १९१४पर्यंतच्या नाताळ मर्क्युरीच्या मायक्रोफिल्म्स मला फारच उपयोगी पडल्या. त्या एनएमएमएलमध्ये ठेवल्या आहेत. काही शक्कल लढवूनच त्या तिथे आणल्या गेल्या असाव्यात.
शेवटचा संदर्भ विभाग आहे तो छापील पुस्तके आणि निबंधांचा. मी आवश्यक आणि सयुक्तिक वाटले तसे दुसर्या स्तरावरचे, अलीकडच्या काही दशकांमधले संदर्भ वापरले आहेत. पण त्याचबरोबर मी स्वत: एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकामधली कितीतरी पुस्तके वाचली आहेत, पत्रकेही वाचली आहेत. त्याचप्रमाणे विसाव्या शतकातील पहिल्या दशकामधलीही पुस्तके वाचली आहेत, जेणेकरून मला थेट, कोणताही मसाला न घातलेल्या, ज्यांत गांधींनी भाग घेतला होता, अशा त्या काळातल्या चर्चा समजून घेता येतील.
पुस्तकाच्या उपोद्घातात म्हटल्याप्रमाणे मी या पुस्तकातून गांधींच्या संकलित लेखनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रथमच केवळ गांधी काय म्हणाले आणि त्यांनी काय लिहिले आहे, यावरच विसंबून न राहता इतरही ऐतिहासिक संदर्भ उपयोगात आणले आहेत. उपरोक्त सर्व संदर्भ मी मागच्या काही वर्षांत अनेक वेळा अभ्यासले आहेत. त्यामुळेच तर मी गांधींचे असे सर्वांगसुंदर चित्र रेखाटू शकलो. गांधींनी जुलै १९१४मध्ये दक्षिण आफ्रिका सोडण्यापूर्वीचे सर्वांगसुंदर चित्र!
माझ्या संशोधनाच्या क्रमात मला गांधींची अशी अनेक पत्रे सापडली, जी काही कारणामुळे यापूर्वी प्रकाशित झालेली नव्हती. किंबहुना माहीतही नव्हती. ती सर्व पत्रे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल आर्काइव्ह्जमध्ये आहेत, ब्रिटिश लायब्ररीत आहेत, प्रिटोरियामध्ये सी. एम. डोकच्या दस्तऐवजात आहेत. आणि हायफामध्ये कालेनबाखच्या कागदपत्रांत आहेत आणि न्यूयॉर्क व न्यू दिल्लीमध्ये ई. एस. रेड्डींच्या घरात आहेत. त्यातून अगदी अनपेक्षितरीत्या कठीण काळातील मोक्याच्या क्षणांतून गांधींच्या विविध हेतूंचे दर्शन घडते.
............................................................................................................................................................
'गांधी : भारतात येण्यापूर्वी' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment