अजूनकाही
विल्यम शेक्सपियर (१५६४ ते १६१६) या ब्रिटिश नाटककारानं जवळजवळ ३७ नाटकं लिहिली आहेत. यात ‘ऑथेल्लो’, ‘मॅकबेथ’, ‘हॅम्लेट’ यांसारख्या शोकांतिका आहेत, तशाच ‘अॅज यू लाईक इट’, ‘द टेम्पेस्ट’ वगैरेसारख्या सुखांतिकाही आहेत. ज्या शेक्सपियरनं ‘ज्युलियस सीझर’सारखी राजकीय नाटकं लिहिली, त्यानंच ‘रोमिओ अँड ज्युलिएट’सारखी प्रेमकहाणीसुद्धा लिहिली आहे.
‘रोमिओ अँड ज्युलिएट’ हे नाटक १५९७ साली लिहिल्याची नोंद आहे. हे नाटक इटलीतील वेरोना या शहरातील दोन प्रतिष्ठित कुटुंबांतील स्पर्धेवर आहे. माँटेंग्यू व कापुलेट या दोन कुटुंबांमध्ये अनेक काळापासून रक्तरंजित स्पर्धा असते. वेरोना शहरावर राजपुत्र इस्क्यॅलूसचं राज्य असतं. माँटेग्युचा एकुलता एक मुलगा रोमिओ आणि कापुलेटची १४ वर्षांची एकुलती एक मुलगी ज्युलिएट एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांचं हे कोवळ्या वयातील प्रेम फुलतं ते दोन कुटुंबांच्या भीषण वैराच्या वातावरणात. त्यांचं मीलन शक्य नसतं. शेवटी अशी काही परिस्थिती निर्माण होते की, दोघांना विष पिऊन मरावं लागतं, अशी ही दुःखद कहाणी आहे.
‘रोमिओ अँड ज्युलिएट’ हे एक अजरामर नाटक आहे. या कथानकावर आधारित जगभरात किती सिनेमे झाले असतील, किती नाटकं झाली असतील, याचा हिशेब नाही. हिंदी सिनेसृष्टीनं तर शेक्सपियरची ही कथा कितीतरी वर्षं वापरली आहे. राज कपूरच्या ‘बॉबी’पासून ‘कयामत से कयामत तक’पर्यंत अनेक चित्रपटांची कथा याच नाटकावर आधारित आहे.
हा झाला व्यावसायिक भाग. या नाटकाचे नवनवे अन्वयार्थ काढणंसुद्धा सतत सुरू असतं. फेब्रुवारी २०१६मध्ये मुंबईतील ड्रामा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. मात्र तो मूळ संहितेशी प्रामाणिक होता.
शेक्सपियरची नाटकं सादर करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे मूळ नाटकाची गोष्ट वरवर घ्यायची आणि त्यात आजचा आशय, आजच्या समस्या टाकायच्या. मुंबईस्थित ‘किस्सा कोठी’ या नाट्यसंस्थेनं अलिकडेच ‘रोमिओ रवीदास और ज्युलिएट देवी’ हे हिंदी नाटक सादर केलं. यासाठी शेक्सपीयरच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या नाटकाचा फक्त सांगाडा घेतला आहे. या ताज्या नाटकात ‘जातीव्यवस्था’ केंद्रस्थानी आहे.
हे नाटक बिहार राज्यातील दुमारी नावाच्या खेड्यात घडतं. यातील रोमिओ चांभार, तर ज्युलिएट ठाकूर. परिणामी यात जातीतील संघर्ष येणार हे अपेक्षित असतं. रोमिओजवळ एक घोडी असते, तो तिचं नाव ज्युलिएट असं ठेवतो. त्याच्याबरोबर महाविद्यालयीन शिक्षण घेणारी कौसल्या ही गावातल्या ठाकुराची मुलगी असते. हे दोन घटक समोरासमोर ठेवले की, यातून कोणतं नाट्य आकाराला येईल, याचा अंदाज येतो.
नाटककार शमिष्ठा साहा आणि शुभम सुमित यांनी या नाटकाची बांधणी व मांडणी करताना अगदी अलिकडे घडलेले दोन प्रसंग घेतले आहेत. एक, ३१ मार्च २०१८ रोजी गुजरात राज्यातील एका खेड्यात घडलेला. एका दलित तरुणानं घोडी बाळगली होती. तो तिच्यावर स्वार होऊन गावात फिरत होता, म्हणून संतप्त झालेल्या उच्चवर्णीयांनी त्याला अमानुषपणे मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्या दलित तरुणाचं नाव होतं प्रदीप राठोड. त्याचं वय होतं अवघं २१ वर्षं. फक्त प्रदीप राठोडलाच मृत्यूला सामोरं जावं लागलं नाही, तर त्याची घोडीसुद्धा उच्चवर्णीयांनी मारून टाकली. घोडीवरून बसून गावात ऐटीत फिरणं हा फक्त उच्चवर्णीयांचा खास अधिकार आहे. म्हणून या दलित तरुणाला जिवे मारण्यात आलं.
दुसरी घटना आहे तामिळनाडूतील तिरूप्पुर जिल्ह्यातील. १३ मार्च २०१६ रोजी उदुमालपेट या गावी भरदिवसा शंकर या दलित तरुणाला काही गुंडांनी जिवे मारलं. शंकरबरोबर त्या वेळी असलेली त्याची पत्नी कौसल्या कशीबशी वाचली. शंकरचा गुन्हा काय? तर त्यानं सुमारे आठ महिन्यांपूर्वी कौसल्याशी लग्न केलं होतं. कौसल्या ‘इतर मागासवर्गीयां’पैकी होती. तामिळनाडूच्या राजकीय व सामाजिक जीवनात ‘थेवर’ हे ओबीसी फार प्रभावी आहेत. खालच्या जातीतील मुलाशी लग्न केलं म्हणून कौसल्याच्या आई-वडिलांनी भाडोत्री गुंडांच्या मदतीनं शंकरला मारून टाकलं.
या दोन्ही घटना समोर ठेवून हे नाटक लिहिण्यात आलं आहे. या नाटकाच्या कथानकाची प्रगती ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील कथेप्रमाणे होते. नाटकात दोघं लग्न करून पाटण्याला पळून जातात. पण ठाकूरची माणसं त्यांना शोधून काढतात व मारून टाकतात. सुमारे दोन तास चालणारं हे नाटक या टप्प्यावर संपतं.
या नाटकात घोडी हे महत्त्वाचं पात्र तर आहे, शिवाय सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठेचं प्रतीकही आहे. त्यामुळे दिग्दर्शक शर्मिष्ठा साहानं रंगमंचावर घोडीचं भलं थोरलं कापडी चित्र लावलं व त्याला एक खिडकी दिली. या कापडी चित्राचा व त्यावरील खिडकीचा वापर विंगेसारखा केला तो. प्रदीप राठोड व कौसल्याची कथा घेऊन नाटक उभं करण्याच्या या वेगळ्या प्रयत्नाला दाद द्यावीच लागते. यातील रोमिओच्या भूमिकेत दिलीप पांडे व कौसल्याच्या भूमिकेत प्रियांका चरण आहे. या दोघांनी अभिनयातील सफाई काय असते, हे इतक्या सहजतेनं दाखवलं आहे की बस्स!
या नाटकात दोनच नट आहेत आणि दोघांनी उच्च दर्जाचा अभिनय केला आहे. नाटककारानं सोयीसाठी एक गुलाबी दाढीचा म्हातारा बाबा आणला आहे, ती भूमिका दिलीप पांडे करतो. नाटकात जी छोटी छोटी पात्रं येतात, त्यांच्या भूमिका दिलीप व प्रियांकाच करतात. नेमक्या याच कारणांसाठी दोघांच्या अभिनयक्षमतेचा खास उल्लेख करावा लागतो. अशा नाटकांतील आशय जरी जबरदस्त व सुन्न करणारा असला तरी काही ठिकाणी स्वप्नांचा आधार घ्यावा लागतोच. म्हणून नाटककार द्वयांनी गुलाबी बाबा हे पात्र निर्माण केलं आहे. गुलाबी बाबा अधूनमधून नाटकात प्रकटतो व कथानक पुढे सरकवतो.
या नाटकात बिहारमधील ग्रामीण वास्तव, जातीजातीतील ताणतणाव, राजकारण वगैरे आहे. या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी प्रेमकथा आहे आणि तिचा अटळ भीषण शेवट आहे. हे सर्व माहिती असूनही नाटक पकडून ठेवतं, याचं कारण नाटकाचं सादरीकरण व अत्यंत प्रभावीपणे वापरलेले नाट्यघटक. नाटकभर मागे घोडीचं भलं थोरलं चित्र उभं असतं. नंतर नंतर असं जाणवायला लागतं की, हे मुकं जनावर माणसांमाणसांतील ही भयानक दरी बघून अचंबित होत आहे. नाटकातील वेशभूषा व सेनोग्राफी रीमा के यांची आहे, तर पार्श्वसंगीत अमन नाथ यांचं आहे.
या नाटकांचं दोन घटकांसाठी आकर्षण वाटतं. एक म्हणजे अतिगोड अशा भोजपुरी भाषेतील खटकेबाज संवाद व दुसरं म्हणजे पार्श्वसंगीत. हे दोन घटक लोककलेच्या अंगानं विकसित केलेले आहेत. दिलीप पांडे व प्रियांका चरण दोघंही चांगलं गातात. त्यामुळे नाटकाचा परिणाम धारदार होतो.
या नाटकाच्या संदर्भात फक्त एकच गोष्ट खटकत होती. ती म्हणजे यातील पात्रं, त्यांचे कपडे, नेपथ्य, प्रकाशयोजना वगैरे प्रसन्न वातावरण निर्माण करणारं आहे. हे नाटकाच्या मूळ प्रकृतीशी खटकतं. परिणामी नाटकाचा डोळ्यांत अंजन घालणारा आशय थोडा बोथट होतो की काय, अशी शंका अनेक प्रसंगात येत होती. मात्र बाकी नाटकं उत्तम आहे.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment