टोनी मॉरिसन : जगभरातील स्त्रियांच्या आणि आफ्रिकन–अमेरिकनांच्या विद्रोहाचा आवाज!
संकीर्ण - श्रद्धांजली
योगिनी सातारकर–पांडे
  • टोनी मॉरिसन (१८ फेब्रुवारी १९३१ - ५ ऑगस्ट २०१९)
  • Wed , 14 August 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली टोनी मॉरिसन Toni Morrison अमेरिकन कादंबरीकार American novelist नोबेल प्राइझ Nobel Prize आफ्रिकन–अमेरिकन लेखक African-American Writer बिलेव्हड Beloved

“O Sugarman done fly away

Sugarman done gone

Sugarman cut across the sky,

Sugarman gone home...”

असं म्हणत आफ्रिकन-अमेरिकन माणसाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा उच्च्चार करणाऱ्या आणि “स्वातंत्र्याचं खरं कार्य हे दुसऱ्याला स्वतंत्र करणं आहे” यावर अढळ विश्वास असणाऱ्या टोनी मॉरिसन यांचं जाणं अतिशय दुःखद आहे.

जगभरातील स्त्रियांच्या आणि आफ्रिकन–अमेरिकन लोक यांच्या वेदनेचा आणि विद्रोहाचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लेखिकेनं आपल्या कादंबऱ्यांतून जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण केलं. ‘द ब्लूएस्ट आय’, ‘बिलव्हेड’, ‘साँग ऑफ सालोमन’, ‘सुला’, ‘टारबेबी’, ‘जाझ’, ‘अ मर्सी’ अशा त्यांच्या एकूण ११ कादंबऱ्या केवळ अमेरिकनच नव्हे तर जगभरातील साहित्यातही अतिशय महत्त्वाच्या आहेत. याशिवाय सात इतर पुस्तकं, दोन नाटकं आणि तीन बालवाचकांसाठीची पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.

आफ्रिकन–अमेरिकन समूहाची मूळं शोधण्याची असोशी, मौखिक परंपरेच्या वारशाचा शोध, आत्मभानाचा प्रवास, स्त्रियांची शारीरिक–मानसिक–सांस्कृतिक वेदना, विद्रोह व भगिनीभाव यांचं वास्तव आणि मर्मभेदी चित्रण टोनी यांनी आपल्या लिखाणातून केलं. वंशभेद आणि गुलामगिरीच्या इतिहासानं एका मोठ्या समूहाची झालेली प्रातिनिधिक ससेहोलपट आणि त्यानंतरचा जगण्याचा अथक संघर्ष त्यांच्या कादंबऱ्या अधोरेखित करतात.

१९३१ मध्ये जन्मलेल्या टोनी या कादंबरीकार, निबंधलेखक, संपादक, शिक्षक आणि प्रिन्स्टन विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून सर्वपरिचित होत्या\आहेत. अत्यंत मानाच्या नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त नॅशनल बुक क्रिटिक सर्कल अवॉर्ड, नॅशनल बुक फौंडेशन अवॉर्ड, अमेरिकेचे प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम असे प्रतिष्ठेचे सन्मान त्यांच्या वाट्याला आले. याशिवाय रॅडम हाऊस या महत्त्वाच्या प्रकाशन संस्थेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला संपादक होण्याची नोंददेखील त्याच्या नावावर आहे.

अशा या व्यक्तिमत्त्वाची जागतिक ओळख ही कादंबरीकार म्हणूनच प्रामुख्यानं असणं आणि देश–वंश–काळ–भाषा यांना ओलांडून त्यांचं लिखाण जगभर मान्यता पावणं हे फारच विलक्षण आहे. हे शक्य झालं ते त्यांचा जगण्याचा मार्ग, लेखनाविषयीची भूमिका, ठामपणा आणि समाजाप्रती असणारी कणव यामुळे.

वयाच्या ३९ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात कवी–लेखकांच्या एका अनौपचारिक भेट-चर्चेमध्ये टोनी यांनी निळे डोळे हवे असणाऱ्या एका कृष्णवर्णीय मुलीची कथा वाचली, जी पुढे ‘द ब्लू एस्ट आय’ (१९७०) या कादंबरीत रूपांतरीत झाली. आणि तिथपासून टोनी यांचा कादंबरीकार म्हणून प्रवास सुरू झाला. बहुचर्चित ठरलेल्या या कादंबरीचं अमेरिकन साहित्यात एक विशेष स्थान आहे. यानंतर स्त्रियांच्या आयुष्याला केंद्रवर्ती ठेवून दोन कृष्णवर्णीय मुलींची मैत्री, बदलत्या काळानुसार त्यातील उतार-चढाव त्यांनी ‘सुला’मधून मांडले. कृष्णवर्णीय स्त्रियांच्या इच्छा, आकांक्षा आणि त्यांना सामोरं जावं लागणारं सामाजिक वास्तव, हा गाभा असणारी ही कादंबरी स्त्रीचं आयुष्य मांडतानाच मानवी आयुष्य आणि नातेसंबंध यातील गुंतागुंतीवर प्रकाश टाकते. उन्मुक्त जीवनाचा ध्यास आणि चाकोरीबद्ध जीवन यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वास्तवाच्या दोन्ही बाजू यातून समोर येतात.

बदलाची आस, अस्थिरता, मानसिक–भावनिक आंदोलनं याबरोबरच जीवनाच्या अपूर्णतेचं सावट आणि समाजाचा वैयक्तिक जीवनातील हस्तक्षेप यांना धरून असणारा स्त्री वेदनेचा आणि विद्रोहाचा धागा ‘साँग ऑफ सालोमन’ (१९७७), ‘टारबेबी’ (१९८१) आणि ‘बिलव्हेड’ (१९८७) यांपासून ते ‘अ मर्सी’ या २००८मध्ये प्रकशित झालेल्या कादंबरीतही वेगवेगळ्या आयामांनी उलगडला आहे.

टोनी यांच्या लिखाणात आफ्रिकन- अमेरिकन स्त्री जीवनाचं आणि समाजजीवनाचं समग्र चित्रण आहे. गुलामी संपून १००हून अधिक वर्षं झाली तरी जगण्याच्या प्रश्नातून सुटका होऊ शकलेली नाही, असा एक मोठा समाज त्यांच्या लिखाणाच्या केंद्रस्थानी आहे. गुलाम म्हणून जगण्याचा जाच संपावा यासाठी पळून जाऊन सुटू पाहणारी स्त्री स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीला मारते, ही अपरिहार्यता सुन्न करणारी आहे. काळानुसार बदलाची चाहूल आहे, परंतु ती फारच वरवरची आणि कृतक आहे, हे फॅशनच्या आहारी गेलेल्या जॅडीनसारखी व्यक्तिरेखा अधोरेखित करते.

‘स्त्रीवादी लेखिका’ हे बिरूद टोनी यांना मान्य नसलं तरीही त्यांचं लिखाण स्त्रीकेंद्रीच आहे. विपरित परिस्थितीत आशावादी असणारा भगिनीभाव त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये प्रकर्षानं जाणवतो. लहानपणाची मैत्री, कालांतरानं भेटल्यावर जोडून घेणं, हे मैत्रीमुळे घडतं, परंतु संबंधांचे अर्थ बदलल्यावरही हाकेला ‘ओ’ देणं आहे. ते एक स्त्री म्हणून भगिनीभावानं जोडून घेतल्यामुळेच. कुटुंब व्यवस्था आणि तीन पिढ्यांतल्या स्त्रिया नात्यांमुळे नव्हे तर भगिनीभावानं एकमेकींशी जोडून घेतात आणि कुटुंब व्यवस्थेचा कणा बनतात हे ‘साँग ऑफ सालोमन’मधलं चित्र आशादायी आणि वेदनेला सकारात्मकतेची किनार देणारं आहे. याशिवाय प्रेरित करण्याचं, कृतीशील पाठिंबा देण्याचं कामं स्त्रिया एकमेकींसाठी करतात.

स्त्री-पुरुष संबंधांचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या टोनी यांनी स्त्रियांच्या अथक परिश्रमाचं, आर्थिक अभावाचं आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागण्याचं टोकदार वास्तव मुखर केलं. हे संबंध भूतकाळातील इतिहासानं तणावपूर्ण आहेत, नात्यातून वजा होण्याचे आहेत, तसेच नात्यातील मर्म उलगडणारेही आहेत. तरीही पुन्हा पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या लेखनात आहेत, ज्या संघर्षातून आयुष्य सुंदर बनवण्याचं स्वप्न पाहतात आणि त्यासाठी झटतात.

आफ्रिकन–अमेरिकन म्हणून जगताना आपली मुळं शोधण्याची धडपड, असोशी आणि आफ्रिकन परंपरेशी घट्ट बांधलेली नाळ हा टोनी यांच्या लेखनाचा विशेष आहे. यात जोडून ठेवणारी, आयुष्याला बळ पुरवणारी गोष्ट म्हणून परंपरा येते. त्यामागे अनेक वर्षांच्या गुलामगिरीचा हृदयद्रावक इतिहास आहे. त्याचप्रमाणे प्राप्त परिस्थितीत न चुकलेला वांशिक संघर्ष आणि उपरेपणाची करून देण्यात येणारी जाणीवही आहे.

हिंसा, नाकारलेपण, अस्तित्वाचा संघर्ष, छुपा आणि उघड वंशवाद, जगण्यासाठी साधनांचा शोध या सगळ्या पार्श्वभूमीवर टोनी यांच्या कादंबऱ्यात लक्षणीय आहे, तो मौखिक परंपरेचा ठाम उच्च्चार. सगळी साधनं हिरावली गेली, विस्थापन आलं, भौगोलिक अंतर वाढलं, निर्बंध आले, स्थलांतर करावं लागलं तरीही आफ्रिकन-अमेरिकन लोकांचं गाणं त्यांच्याजवळ राहिलं, याचं फार प्रत्ययकारी चित्रण अनेक संदर्भांसह त्यांच्या लिखाणात येतं. या मौखिक परंपरेकडे पाहणं हे काही वेळा स्मरणरंजन नाही का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, परंतु आत्महत्या करण्यासाठी वर्षातील एक दिवस ठरवून घ्यावा लागतो किंवा कोणालाही गोळी घालून मारलं गेल्यानंतर संशयाची सुई ही कृष्णवर्णीय म्हणून तुमच्यावर फिरणार असेल, तर अशा वेळी विद्रोहाखेरीज गरज असते ती मानसिक कणखरतेची आणि जोडलं गेलेलं असण्याची, जी या परंपरेतून मिळते.

एक व्यक्ती आणि विशेषतः लेखक म्हणून आपलं उत्तरदायित्व काय असावं, याचं टोनी उत्तम उदाहरण आहेत. कृष्णवर्णीयांचं साहित्य मुख्य प्रवाहामध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘ब्लॅक बुक’ (१९७४) या संपादित पुस्तकातून त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचं जीवन छायाचित्रं, निबंध आणि इतर माध्यमातून मांडलं. ‘कॉन्टेम्पररी  आफ्रिकन लिटरेचर’ (१९७२) हे पुस्तक म्हणजे टोनी यांनी नायजेरियन लेखक वोल सोयंका, चीनुआ अचेबी आणि दक्षिण आफ्रिकी लेखक अॅथोल फुगार्ड यांच्या साहित्याचं केलेलं एकत्रित स्वरूप आहे.

याशिवाय नव्या तरुण आफ्रिकन–अमेरिकन लेखकांना त्यांनी दिलेलं प्रोत्साहन अनुकरणीय आहे. त्यांच्यासारख्या एका प्रस्थापित लेखकानं टोनी केड बाम्बरा, अन्जला डेविस, ह्यू न्यूटन आणि गेल जोन्स या उमेदीनं लिहिणाऱ्या लेखकांना शोधलं आणि जगासमोर आणलं. आपल्या स्वतंत्र लिखाणाव्यतिरिक्त जागतिक कीर्तीचे मुष्टी योद्धे महमद अली यांचं आत्मचरित्र आणि हेन्री डोम्स या लेखकाच्या अकाली अपघाती मृत्यूनंतर त्याची कादंबरी व कविता यांचं लेखन–प्रकाशन त्यांच्या नावावर असणं ही त्यांच्यातील लेखक व माणूस म्हणून असणाऱ्या उत्तरदायित्वाची साक्ष आहे.

यामुळेच माया एन्जलो आणि अ‍ॅलिस वॉकर यांच्यासह बारा प्रसिद्ध लेखिकांना टोनी यांना नोबेल प्राइझ (१९९३) मिळाल्यावरही अमेरिकेनं त्यांची फारशी दखल न घेणं योग्य वाटलं नाही. त्याबाबत त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये एक खुलं पत्र लिहून १९८८मध्ये जाहीर खंत व्यक्त केली होती. याचा परिणाम म्हणून पुलित्झर पुरस्कार आणि सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानावरचा त्यांचा हक्क त्यांना मिळाला. आपल्या पूर्वसुरींशी, समकालिनांशी आणि नवोदितांशी इतकं प्रामाणिकपणे आणि सहृदयतेनं जोडून घेणं, ही टोनी यांच्या व्यक्तिमत्त्वाची झळाळती बाजू आहे.  

एक लेखिका म्हणून वास्तवातील वेदनादायी सत्याचा शोध घेताना टोनी यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि लिखाणात निर्धार, करारीपणा आणि कणव यांचं एक वेगळंच मिश्रण आहे. त्यांच्या साहित्यानं स्वातंत्र्यासाठीच्या आशेला एक नवी ऊर्जा दिली आणि लोकांना संघर्षाभिमुख होण्यास प्रेरित केलं. त्यांच्या कादंबरीतील पात्रांचा संघर्ष व्यक्तिगत न राहता तो समष्टीचा होतो हे विलक्षण आहे. पिळवटून टाकणाऱ्या परिस्थितीतही विद्रोहाचा आवाज विझत नाही आणि आत्मभानाचा प्रवास निराशावादी वा दैववादी होत नाही, तर आयुष्याला सामोरं जाताना तो अधिकाधिक प्रयत्नवादी होत जातो. यामुळेच टोनी मॉरिसन यांचं साहित्य हा असा ठेवा आहे,  जो नैतिक बळाची गरज असणाऱ्या काळात कसोटीच्या प्रत्येक क्षणी देश–भाषा–वंश यांची सीमा ओलांडून सर्वांसाठी  प्रेरक ठरेल.

.............................................................................................................................................

टॉनी मॉरिसन यांच्या ‘‌Beloved’ या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘बिलेव्हड’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. आशा दामले यांनी केलेला हा अनुवाद पद्मगंधी प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5017/Beloved

.............................................................................................................................................

लेखिका डॉ. योगिनी सातारकर–पांडे या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड इथं इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत.

yoginisatarkarpande@rediffmail.com

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......