अजूनकाही
त्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटानं पहाटे जाग आली. अजून तांबडं फुटायचं होतं आणि जानेवारी महिना असल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा होता. त्यामुळे अंथरुणातून उठावंसं वाटत नव्हतं. नेहमीप्रमाणे डोळे उघडे ठेवून दहा-बारा मिनिटं तसाच आळसत पडून राहिलो आणि शेवटी एकदाचा आळस झटकून उठलो. बेसिनपाशी दात घासत असताना शेजारच्या खोलीचं दार थोडंसं उघड दिसलं म्हणून सहज आत डोकावून पाहिलं तर आत बापू पलंगावर चक्क दोन्ही पाय वर, हवेत ताठ ठेवून सर्वांगासन करत होते. पोझ अगदी व्यवस्थित पुस्तकात असते, तशी जमली होती. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच राहिलो. तोपर्यंत आसनं सोडून त्यांनी मला हसून ‘गुड मॉर्निंग’ वगैरे म्हटलं. माझं लक्ष उगाचच माझ्या पोटाकडे गेलं.
बापू म्हणजे प्राध्यापक श्री. द. महाजन. भारतातले एक नावाजलेले वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ. लहानपणी वेल कशी वाढते, हे बघण्यासाठी घराच्या कौलावर जाऊन वेल बोटात पकडून रात्रभर बसणारे. सकाळी त्या वेलीनं त्यांच्या बोटाला मिठी मारलेली आणि मनाला भुरळ पाडलेली. असे हे बापू!
दीड दिवस त्यांच्याबरोबर जंगलात फिरणं म्हणजे अमिताभच्या कोणत्या तरी जबरा फॅननं त्याच्याबरोबर फिल्म सेटवर फिरण्यासारखंच! मीही दीड दिवस माझ्या एका आवडीच्या क्षेत्रातल्या महानायकाबरोबर त्याच्या सेटवर फिरत होतो.
त्याचं झालं असं की, मी आणि माझ्या भावांनी - सार्थक, यश, आणि अथर्व - कुठं तरी जवळपास रानावनात भटकायला, ट्रेकिंगला जायचं ठरवलं होतं. सकाळी लवकर उठून आवरून वगैरे आम्ही सर्व गाडी काढणार इतक्यात मिहिऱ्याचा फोन आला, “अरे बापू कोल्हापूरला येतायत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आंब्याला जायचं म्हणतोय. येणार काय?”
मी गाडी डॉ. आठलेंच्या घराकडं वळवली. डॉ. आठले म्हणजे कोल्हापुरातले एक नावाजलेले डॉक्टर आणि पर्यावरणप्रेमी, निसर्गमित्र. मिहिऱ्या म्हणजेच मिहीर आठले हा त्यांचा नातू आणि माझा लंगोटी दोस्त… तर आमच्या गाडीत मी, माझे तीन भाऊ, मिहिऱ्या आणि त्याचा चुलतभाऊ अर्जुन आणि दादांच्या (डॉ. आठलेंना सर्वजण दादा म्हणतात) गाडीत दादा, नलू काकू (सौ. आठले), शिपुरकर काका, कुलकर्णी काकू आणि राहुल काका म्हणजेच मिहिऱ्याचे बाबा. अशा आम्हा अकरा जणांना घेऊन दोन गाड्या आंब्याचा दिशेनं निघाल्या. बापूंची गाडी मलकापूर मार्गे डायरेक्ट आंब्याला येणार होती.
साधारण दहा-साडेदहाच्या सुमारास आम्ही आंब्यात पोहचलो. बापू आधीच पोहोचले होते. मी बापूंना ‘मी सौरभ नानिवडेकर, मिलिंदचा मुलगा’ वगैरे अशी माझी ओळख सांगत होतो, तर बापूच एकदम मला ‘गेल्या वेळी भेटलोय की आपण! काय म्हणतोय मिल्या’ वगैरे म्हणून त्यांनी माझी अगदी छान विचारपूस केली. वास्तविक आम्ही, आठले, महाजन वगैरे पूर्वी गंगावेशीत एकाच वाड्यात रहायला होतो. त्यामुळे संबंध अगदी जवळचेच. माझे बाबा आणि बापूंचे चिरंजीव डॉ. पराग महाजन हे शाळेत एकाच वर्गात होते. बापूंबरोबर त्यांच्या पत्नी (ज्यांना सर्वजण बाई म्हणतात), त्यांचा स्नुषा स्मिता महाजन आणि आणखी एक परिचित मिरजेच्या डॉ. नीलिमा भावे हे आले होते.
सर्वांचे हाय, हॅलो झाल्यानंतर दादा, बापू, डॉ. कुलकर्णी, शिपुरकर इत्यादी कोल्हापुरातील मान्यवर आणि पर्यावरणप्रेमींनी तयार केलेल्या जंगलाकडे जायचं ठरलं. खरं तर त्या दिवशीचा अंबाभेटीचा उद्देशच तो होता.
दख्खनच्या पठारावरून खाली कोकणात उतरताना वेगवेगळे घाट लागतात- अंबा, आंबोली, फोंडा इत्यादी. त्यातला कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना जो घाट लागतो, तो म्हणजे अंबा घाट. हे नाव पडण्याचं कारण म्हणजे तिथं असलेलं अंबेश्वराचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूनं पसरलेली आणि अजूनही सुस्थितीत असलेली अंबेश्ववर देवराई. सह्यादीच्या डोंगररांगांत पसरलेला हा सगळा परिसर जैवविविधतेनं अतिशय समृद्ध. असंख्य प्रकारचे पक्षी, सरीसृप आणि सस्तन प्राणी या जंगलात आहेत. पावसाळ्याचा एकाच रात्रीत मीच स्वतः पाच वेगवेगळ्या प्रकारचे साप बघितले आहेत आणि इतके की शेवटी कंटाळा आला. गवे वगैरे तर अगदी हमखास दिसणारच. अशा या आंबा जंगलालगतच कोल्हापूरच्या निसर्गप्रेमींनी तयार केलेलं हे एक खाजगी जंगल आहे.
१९८०च्या दरम्यान कोल्हापुरातले निसर्गप्रेमी एकत्र आले. त्यात डॉ. आठले, डॉ. कुलकर्णी, बापू, शिपुरकर, शिरगावकर, डॉ. बेर्डे, डॉ. पुरोहित, जय सामंत, पडळकर, मुजावर, दोशी आदींनी एकत्र येऊन निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी काही तरी करायचं ठरवलं. त्यांचा निसर्गमित्र नावाचा एक ग्रुप तयार झाला आणि वनीकरण हे पहिलं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी हे खाजगी जंगल तयार करायच्या प्रयोगाला सुरुवात केली. सगळ्यांनी मिळून आपल्या जवळची काहीएक रक्कम गोळा करून एक निधी तयार केला आणि १९८४-८५च्या काळात अंबा गावातील जवळ जवळ २० एकर पडीक जमीन विकत घेतली.
पूर्वी तिथं काही भागात भात आणि नाचणी व्हायची. पण बराचसा भाग डोंगराळ आणि खडकाळ असल्यामुळे त्या शेतीला फार काही अर्थ नव्हता. त्या काळी जवळजवळ ९०० ते १००० एकरप्रमाणे ती जमीन मिळाली. मग सुरुवातीला जंगलच तयार करायचं आहे, तर आजूबाजूच्या जंगलातूनच झाडे मुळासकट उपटून आणणं आणि खड्डे करून लावणं हा प्रयोग झाला. हे काम अतिशय कष्टाचं होतं. आणि अशा प्रकारे लावलेली झाडंही फारशी जगली नाहीत. मग कोल्हापुरातून झाडं आणायची आणि लावायची हा प्रयोग झाला.
दर रविवारी पैशाला दहा या पद्धतीनं हजार झाड नेणं आणि लावणं असं सुरू झालं. त्यात चांगलंच यश आलं. अडचण एवढीच होती की, त्या काळी आतासारख्या नर्सऱ्या सगळीकडं नसल्यामुळे जी झाडं मिळायची, ती सामाजिक वनीकरण विभागाकडची. ती सारी युकोलिप्तस (निलगिरी) आणि ऑस्ट्रेलियन सुबाभूळ अशी विदेशी. एकदा लावल्यावर फार काही निगा राखायला लागत नसल्यामुळे आणि कोणतंही जनावर त्याच्या पानांना तोंड लावत नसल्यामुळे वनीकरण म्हटलं की, हीच झाडं असायची.
पण पुढचं एक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हीच झाडं लावली गेली. झालं असं की, दहा-पंधरा वर्षांत झाडं भराभर वाढली आणि त्यांच्या सावलीमुळे गवत वाढायचं कमी झालं. मग जनावर यायची बंद झाली आणि मग हळूहळू आपली जंगली झाडंही तिथं वाढायला लागली. हे चक्र सुरळीत चालू झाल्यावर तिथं नैसर्गिक जंगल तयार झालंय हे लक्षात आल्यावर अलीकडेच म्हणजे २०१०-११च्या सुमारास सर्व विदेशी झाडं तोडली गेली आणि त्याचं लाकूड विकून जो निधी जमा झाला, तो संस्थेच्या कामासाठी वापरण्यात येतोय. दर पावसाळ्यात जायचं आणि झाडांचा बिया, आंब्याचा कोयी वगैरे नुसत्या हातानं इकडेतिकडे विखरून टाकायचा हा क्रम चालू ठेवला गेला. कधीही पाणी नाही की कसलं खत नाही. अशा रीतीनं हे खाजगी जंगल उभं राहिलंय.
तर अशा या खाजगी जंगलात आम्ही बापूंबरोबर फिरत होतो. ८४ वर्षांचे बापू पायवाटही नसलेल्या त्या जंगलात रोज फिरायला येत असल्यासारखं अगदी अतिशय शिताफीनं वाट काढत होते. हातात पानं-फुलं घेऊन त्या वनस्पतीबद्दल अगदी कालिदासचा आणि संस्कृत श्लोकांचा दाखल देत आणि त्याचे औषधी गुणधर्म सांगत माहिती देत होते. ७०-७५च्या पुढची आणि आम्ही तरुण मंडळी सर्व त्यांना कुतूहलानं प्रश्न विचारत त्यांचं ऐकत होतो. नलू काकू तर अगदी जीन्स पॅन्ट, टॉप आणि हॅट घालून आल्या होत्या. मग महिऱ्यानेही लगेच ‘आज्जी, आज स्वॅग लेव्हल 100’ वगैरे म्हणत त्यांचा फोटो काढला.
गुगल कितीही फास्ट, कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती देऊ शकत असलं तरी बापू जेव्हा बॉटनी आणि इकॉलॉजी या विषयावर बोलायला लागतात ना, तेव्हा त्याला काही तोड नसते! म्हणजे वनस्पतीचं पान हातात घेऊन ती वनस्पती कुठली, त्यावर उगवलेली फंगी कुठली, तिला हे नाव कसं पडलं, हे नाव सॅनगंशन करणारी इंटरनॅशनल बॉडी कोणती, इत्यादी सर्व माहिती ते सांगतात. जोडीला संस्कृत श्लोक वगैरे असतातच. आता दुपारचे बारा वाजले तरी सत्तरीपुढचे चिरतरुण उन्हाची पर्वा न करता, तहान-भूक विसरून प्रश्न विचारत त्यांच्या मागून फिरत होते.
या चिरतरुणांमध्ये कुठून येतो एवढा उत्साह? कुठून येते एवढी प्रेरणा? ‘का अगदी पहिल्यापासून निसर्गाचा सानिध्यात रमायची त्यात एकरूप व्हायची आवड असल्यामुळे ते एवढे आनंदी होते?’ आजच्या हायस्पीड जगात ताणतणावामुळे किती तरी लोक आत्महत्या करतात, त्यांना मानसिक विकार जडतात, त्यांना जर कोणी शिकवलं निसर्गात कसं रमायचं तर मला वाटतं, यातल्या बऱ्याचशा गोष्टी कमी होतील. माणूस कितीही यंत्रांसारखा वेळेबरहुकूम काम करत असला तरी तो काही यंत्र नाही. निसर्गाशी पूर्ण संबंध तुटलेल्या आजचा जगात त्याला अशा मानसिक आजारांना समोर जावं लागणारच. माणूस हाही निसर्गाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर मात करत जगण्यापेक्षा त्याचबरोबर (coexistance) जगणं केव्हाही चांगलं! आणि मला तेच या सत्तरीपुढच्या लोकांच्या चिरतारुण्याचं रहस्य वाटतं.
निसर्गमित्रच्या या लोकांनी तयार केलेलं जंगल आता चांगलंच घनदाट झालंय. इतकं की, त्या दिवशी यश आणि सार्थक हे माझे भाऊ वाट चुकून त्या जंगलात हरवले. तासभर शोधूनही सापडले नाहीत. फोनच्या रेंजचा तर काही संबंधच नव्हता. तरी शहाणपणा करून ते शेजारच्या एका डोंगरावर चढले, तिथून संपर्क झाला. त्यांना सरळ आहे तिथून दक्षिणेकडे उतरायला सांगितलं. तिथं ते आम्हाला रस्त्यावर भेटले असते, तर पुढे ते आम्हाला डायरेक्ट हायवेलाच भेटले. इतकं घनदाट झालंय हे जंगल. त्यातून एक नैसर्गिक ओढाही वाहतोय.
दुपारी दोनपर्यंत आम्ही ठरलेल्या रिसॉर्टवर जेवायला गेलो. तिथं तांबड्या-पांढऱ्यावर ताव मारत परत गप्पा रंगल्या. त्यानंतर सगळ्यांनीच थोडा आराम केला. आम्ही मुलं तिथंच लॉनवर पसरलो. बाकी मंडळी आत स्थिरावली. संध्याकाळ होता होता, ‘मग आता पुढचा प्लॅन काय?’ कधी निघायचं? वगैरे चर्चा सुरू झाल्या. त्यात बापूंनी तिथंच मुक्काम करायचं ठरवलं. मग बापू, बाई, स्मिता काकू, नीलिमा काकू, मी आणि मिहिऱ्या असे आम्ही मागे थांबलो आणि बाकीची मंडळी परत कोल्हापूरला रवाना झाली. मग संध्याकाळी अंबा घाटात मस्तपैकी चहा प्यायला गेलो. गाडी वरती एका ठिकाणी लावून सर्व जण चालत गेलो. बापू आणि बाई दोघांच्याही चेहऱ्यावर जराही थकवा दिसत नव्हता. मग परत रिसॉर्टवर येऊन चांगल्या दोन-अडीच तास सर्वांच्या गप्पा रंगल्या. बापूंनी त्यांचे खूप सारे अनुभव सांगितले. त्यांचे चक्रताचे ट्रेक, तिथं त्यांनी बघितलेल्या सॉल्ट रॉकचा अतिशय खोल गुहा, हिमालयीन इकोसिस्टिम, blacked neckd craneचा शोधत डॉ. प्रकाश गोळे, बापू आणि vice admirl आवटी यांचा चमू कसा अरुणाचलला गेला. तिथं चीन सीमेजवळ मॅकमोहन लाईनच्या जवळ कसा एका पक्ष्याचा शोध घेतला गेला. आर्मीनं त्यांना या मोहिमेत कसं सहकार्य केलं, त्यांना कशी खास ट्रीटमेंट दिली. नंतर मोहीम संपता संपता अगदी शेवटच्या दोन दिवसांत पक्षी कसा मिळाला, मग आर्मीनं त्या सर्वांचा कोलकात्याला इस्टर्न कमांड hedqurterमध्ये केलेला सत्कार. ‘माझं वजन अर्धपौंड कमी भरलं म्हणून मला एनसीसीमध्ये प्रवेश मिळाला नाही आणि आज आर्मीतर्फे माझा सत्कार होतोय’ असं बापूंनी सांगितलेलं प्रांजळ मनोगत… अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळच्या जवळजवळ दीड तासाचं संभाषण मी रेकॉर्ड केलं.
मग रात्री जेवण झाल्यावर मी आणि महिऱ्या दोघे जंगलाकडं जाणाऱ्या रस्त्यावर एक सतरंजी अंथरून बऱ्याच वेळा आकाशनिरीक्षण करत बसलो. जानेवारी महिन्यात तिथं जंगलात जराही लाईट पोल्युशन आणि वातावरणात ढग नसल्यामुळे झालेलं माझं ते आकाशदर्शन आत्तपर्यंतचं एक सर्वांत ग्रेट सेशन आहे.
दुसऱ्या दिवशीचा सकाळी मग बापू योगासनं वगैरे करत मला ‘गुड मॉर्निंग’ म्हणाले. चहा वगैरे घेऊन आवरून मग आम्ही सगळे अंबेश्वर देवराई बघायला निघालो. तिथंही अनेक झाडांबद्दल बापूंनी माहिती दिली. त्या समृद्ध अशा देवराईत वाढलेल्या मोठमोठ्या वेली बघताना त्यांनी त्यांच्या येऊ घातलेल्या ‘वेल आणि महावेल’ या पुस्तकाविषयी सांगितलं.
देवराईतून बाहेर पडताना देवराईचा कमानी पाशी थांबून त्यांनी मला त्यांचं ‘निसर्गभान’ हे पुस्तक सही करून भेट दिलं. मला खूपच आनंद झाला. मग आंब्यात हॉटेलमध्ये नाष्टा वगैरे करून आम्ही परत कोल्हापूरकडे निघालो.
पाच आणि दहा दिवसांच्या गणपतीपेक्षा ज्या अस्तिकाकडे दीड दिवसांचा गणपती असतो, तो पूर्ण मन लावून पूर्ण दीड दिवस त्याच्यात गुंतलेला असतो; तसाच निसर्गाला देव मानणारा मी बापूंच्या सानिध्यात दीड दिवस चांगलाच रमलो!
.............................................................................................................................................
हेही पहा, वाचा
नैसर्गिक आपत्तींबाबत महाराष्ट्रातील राजकारणी आणि मतदार कमालीचे मागासलेले आहेत!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3546
............................................................................................................................................
लेखक सौरभ नानिवडेकर व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असून त्यांना वाचन, लेखन, संगीत, चित्रपट, रानावनात फिरणे, आकाशनिरीक्षण, प्राणी, पक्षी इत्यादी अनेक विषयांची आवड आहे.
saurabhawani@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment