महापुरातून आता तरी आम्ही धडा घेणार का?
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
आर. एस. खनके
  • कोल्हापूर-सांगलीत आलेल्या महापुराची काही दृश्यं
  • Tue , 13 August 2019
  • पडघम कोमविप कोल्हापूर Kolhapur सांगली पूर Sangli Flood विदर्भ Vidarbha मराठवाडा Marathwada कोकण Kokan सरकार नैसर्गिक आपत्ती ब्रह्मनाळ Bramhanal

महादेवाच्या मदतीला मोहम्मद धावला

युसुफच्या मदतीला यशवंता धावला

माणसावरलं संकट माणसांनीच सारलं

ना जोतिबानं तारलं, ना अंबाबाईनं तारलं

आज खऱ्या अर्थानं मला माणसातला माणूस घावला

या ओळी कुणाच्या आहेत माहिती नाहीत, पण पूरग्रस्तांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आणि संकीर्ण मनाच्या भेदापलीकडे जाऊन सर्व भेदाभेद अमंगळ जाणून मानव-धर्म सर्वतोपरी महान असल्याचा अनुभवसिद्ध भाव जोपासणाऱ्या नक्कीच आहेत.

माणसाची पारख सुखात नाही, तर दु:खात होत असते. मानवनिर्मित भेद आणि त्यापोटी निपजला जाणारा विद्वेष किती तोकडा नि किती क्षुद्र असतो, याचा प्रत्यय सांगली-कोल्हापुरात आलेल्या महापुरानं समस्त मराठी जनांना दाखवून दिला. कोण आपलं, कोण परकं, कोण दांभिक, कोण दिखावू, कोण मढ्याच्या टाळूवरचं लोणी लाटणारं, हे कुणी कुणाला सांगायची गरजच उरली नाही!

महापुराच्या अस्मानी संकटात ना कुणाचा धर्म, ना कुणाचा पंथ, ना कुणाची जात, ना कुणाचं आराध्य दैवत, ना कुणाचा पक्ष, ना कुणाचा नेता वाचवायला आला! या अस्मानी संकटाच्या प्रसंगी पूरग्रस्तांच्या मदतीला आले ते शेजारी, ज्ञातीतली आणि गावातली केवळ माणसं. जात-धर्म, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, लिंग-भेद याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी माणसात माणूसपण बघितलं आणि माणसाचं कर्तव्य जाणलं, ज्यांनी कर्म हाच धर्म मानला, तेच कामाला आले.

घराघरात, गल्ली-गल्लीत आणि गावा-गावांत धर्म, पंथ आणि पक्षाच्या नावानं एकमेकांची डोकी भडकावून भेदाचा चिखल करणारी जमात, या वेळी मदतीच्या कामात कुठेही दिसली नाही. इतकंच नाही तर ज्याला चांगला ‘गुणी बाळ’ म्हणत होते, त्यानं मात्र वेळेला पुराच्या पाण्यात आपला पायदेखील ओला होऊ दिला नाही. अशा वेळी ज्याला ‘टपोरी’ म्हणत होते, तेच तरुण कामाला आले. शिका आणि कमवाच्या पलीकडेही जगण्याला अर्थ असतो, हे या पुरानं दाखवून दिलं.

एकूणच काय तर चिकणे-चोपडे, धर्म-पंथ सांगणारे अडचणीच्या प्रसंगी कुणाच्याच कामाला येत नाहीत, हे वास्तव या निमित्तानं सर्वांना अनुभवाला आलं. दुर्दैव हेच आहे की, लबाडांचं वास्तव अनुभवातून समजायला फार मोठी किंमत मोजावी लागली!

ब्रह्मनाळची जलसमाधी

या महापुरात कृष्णा आणि येरळा नदीच्या संगमाजवळ असलेल्या ब्रह्मनाळ गावाला पुरानं वेढा दिला. पुराची पातळी वाढतच गेली. घरात थांबणं अशक्य झालं. आपल्याला वाचवायला कुणी येत नाही, असं वाटल्यानं ग्रामस्थांनी नावेच्या मदतीनं सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला असताना बोट उलटली आणि सर्वस्व संपलं. क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्यानं ही बोट उलटली. रविवारपर्यंत त्यातील १७ जणांचे मृत देह सापडले. त्यात एक तान्हुलं बाळ आपल्या आजीच्या उराशी कपड्यानं बांधलेल्या अवस्थेत. आजी आणि बाळ यांचा निपचित पडलेला मृतदेह पोटात गोळा आणणारा. या मायमाउलीनं आपल्या सुनेला काय सांगून हे बाळ महापुराचं पाणी पार करून सुखरूप सांभाळायचं आश्वासन दिलं असेल? तरुण सुनेला बाळ घेऊन जीव वाचवता येणार नाही, असं वाटलं असेल म्हणून आजीनं हे साहस केलं असेल?

२०१५ मध्ये शिरियाच्या समुद्र किनाऱ्यावर एका बालकाचा मृतदेह बेवारस स्थितीत सापडल्यावर (भारतासह) जगभरातील माध्यमांनी इसिसच्या अमानवी कृत्याचा हा परिणाम म्हणून टाहो फोडला होता. मागच्या महिन्यात अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमारेषेवरील रिओ ग्रेनेड नदीत आपल्या लहानग्या मुलीसह बापाचा मृतदेह गाळात तरंगताना पाहून संपूर्ण जग हळहळलं. ब्रह्मनाळच्या एवढ्या मोठ्या जलसमाधीवर मात्र भारतीय माध्यमं हळहळताना दिसली नाहीत. आजीसोबतच्या बाळाचा करुण अंत माध्यमांतून कुणाच्या काळजाला भिडला नाही. हीदेखील एक नित्याची बातमी सरावल्या हातांनी संपादित करून द्यावी, तशी आपल्या माध्यमांतून दिली गेली.

वर्तमानपत्रांतून तर हे दृश्य आलंच नाही. कदाचित मन विषण्ण करणारं चित्र देऊ नये, असंही कुणी म्हणेल. पण मग सिरिया आणि अमेरिकेतल्या चित्रानं आमच्या दर्शकांचं मन विषण्ण होत नव्हतं का? या प्रसंगाची दाहकता माध्यमांनी झाकून टाकली का? कुणाची पाठराखण माध्यमांनी केली? देश-विदेशातले असे प्रसंग तासनतास दाखवताना आपल्या मातीत घडलेल्या प्रसंगाला गिळून टाकण्याची बधिरता आलीय का? मानवी जीवनाचं मूल्यच नसलेला आपला एकूणच समाज बधीर, संवेदनशून्य आहे, हेच यावरून दिसतं.

रात्रंदिन आम्हा निवडणुकीचे डोहाळे

‘रोम जळत असताना रोमन सम्राट निरो फिडेल वाजवत होता’ असं म्हटलं जातं. हे त्या निरोच्या बेपर्वा वर्तनामुळे. आमच्या इथंही असाच प्रकार घडला. फरक इतकाच की, रोममध्ये माणसं आगीनं मरत होती, आमच्या इथं महापुरानं. सांगली-कोल्हापूरच्या प्रलयात माणसं आणि पाळीव पशुधन पाण्यात बुडत असताना आमच्याकडे कारभारी सेल्फीचा आनंद लुटत होते. जल पर्यटनात मश्गुल होते. कुणी बोटीवर सेल्फी काढत होतं, तर कुणी खोटा खोटा बचाव कार्याचा दिखाऊपणा करण्यासाठी रेकॉर्डिंग करत होतं. जसाच्या तसा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून लोकांपर्यंत पोचल्यानं या खोट्या बचाव मोहिमा उघड्या पडल्या. तर इकडे पुण्या-मुंबईत कुणी कार्यकर्त्यांचे आणि पक्षांतराचे मेळावे भरवत होतं!

ज्यांना पुरातही पर्यटन दिसलं आणि निवडणूक तयारीचे मेळावे दिसले, ते निर्ढावलेले आपले नाहीतच. या असंवेदनशील प्रवृत्तीकडे पाहिल्यास एवढंच म्हणावंसं वाटतं की, ‘जे कधीच नव्हते आपले त्याची आस का धरावी?’ ज्यांना सदा सर्वदा निवडणुकांचं रणांगण दिसतं, त्यांना बचाव कार्य दिसेल तरी कसं?

आपत्ती व्यवस्थापन कोलमडलेले

या महापुरानं आपत्ती व्यवस्थापनातील समन्वय किती असमन्वयाचा आहे, हे दाखवून दिलं. पश्चिम घाटावर होणारी अतिवृष्टी पाहता कृष्णा खोऱ्याचं आंतरराज्यीय एकात्मिक पूर आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी दोन्ही राज्यांत परिणामकारक काम करणारा सक्षम आपत्ती व्यवस्थापन कक्ष आवश्यक आहे. पुराच्या पाण्याचं आणि धरणातील पाण्याचा विसर्ग याचं व्यवस्थापन चोख झालं असतं, तर कृष्णा खोऱ्यात ही स्थिती उद्भवली नसती. निदान मालमत्तेपेक्षा जिवितहानी नक्कीच कमी झाली असती.

हवामान खात्यानं पूर्वसूचना देऊनही आणि अतिवृष्टी सुरू असताना कृष्णा खोऱ्यातली धरणं भरून विसर्ग सुरू होईपर्यंत संबंधित विभाग समन्वय का साधू शकले नाहीत? याचाच अर्थ पुराचं आपत्ती व्यवस्थापन चुकल्याचा फटका सांगली-कोल्हापूर परिसराला बसला आहे. लोकांना धोक्याची सूचना देऊन सुरक्षित स्थळी जाण्याची व्यवस्था करता आली असती, परंतु लोकांच्या घरात पाणी शिरल्यानंतरही बचावकार्य पोचवण्यात सरकारी यंत्रणा कमी पडली. प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच सावधपणे केली गेली असती, तर निदान जिवितहानीची वेळ आली नसती.

राज्यातले दोन जिल्हे पाण्याखाली बुडाल्यावर कर्नाटक पाच लाख क्युसेक्सपर्यंत पाणी सोडू शकलं, मग हेच पाणी जलसंचयापूर्वी का नाही सोडलं गेलं, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी सचिव पातळीवरून आणि राजकीय स्तरावरून प्रतिबंधात्मक उपाययोजना का नाही केल्या गेल्या? या प्रश्नांची उत्तरं शोधली तर आमची प्रशासकीय आणि राजकीय सक्रियतेची संस्कृती बिघडली, रसातळाला गेल्याचं दिसतं. परिणामी अस्मानी आणि सुलतानी असं दुहेरी संकट लोकांच्या जिवावर बेतलं, असं म्हणायला पुरेसा वाव आहे. संकटात सापडल्यावर मदत कार्य पोचवण्यापेक्षा संकटच उद्भवणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन राबवण्यात आपण कमी पडलो आहोत.

आता महापूर ओसरल्यानंतर मृत जनावरं, त्यांची सुरक्षित विल्हेवाट आणि साथीच्या आजारापासून पुरग्रस्तांचं संरक्षण करण्याचं आव्हानात्मक काम बाकी आहे.

पुरातून वाचवणारेच खरे तारणहार

एनडीआरएफच्या जवानांनी केलेलं बचाव कार्य वाखाणण्यासारखं आहे. पुराच्या पाण्यातून पूरग्रस्तांची सुटका करताना एनडीआरएफच्या जवानांप्रती एका भगिनीच्या भयभीत मनाचं आणि सुरक्षेच्या भावनेतून आलेल्या कृतज्ञताभावाचं दर्शन एका वाहिनीनं दाखवलं, तेव्हा मदत काय असते आणि त्याची किंमत काय असते, हे आपत्तीत सापडलेल्याशिवाय अन्य कुणीही सांगू शकत नाही. अशा आपत्तीत कर्तव्य हाच धर्म आणि त्यातून पूरग्रस्तांना लाभणारा सुरक्षाभाव हीच खरी सेवा आहे. पीडिताला यासारखी दुसरी मदत नाही. या दृश्यात त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा सुरक्षिततेचा आणि जवानांप्रती निर्माण झालेला कृतज्ञता भाव प्रसंगाचं गांभीर्य तर दाखवतोच, पण त्याचबरोबर आपल्या जवानांबद्दल अभिमानानं छाती भरून आणतो!

.............................................................................................................................................

हेही पहा, वाचा

नैसर्गिक आपत्तींबाबत महाराष्ट्रातील राजकारणी आणि मतदार कमालीचे मागासलेले आहेत!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3546

.............................................................................................................................................

आर. एस. खनके

sangmadhyam@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......