‘मी कसा बसा काहीही झालो!’
संकीर्ण - व्यंगनामा
रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
  • ‘मी कसा झालो?’ या अत्र्यांच्या आत्मकथनाचे मुखपृष्ठ आणि ‘मी कसा बसा काहीही झालो!’ या काल्पनिक पुस्तकाचे काल्पनिक मुखपृष्ठ
  • Tue , 13 August 2019
  • संकीर्ण व्यंगनामा आचार्य अत्रे Acharya Atre प्रल्हाद केशव अत्रे Pralhad Keshav Atre रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी Ravindra Laxmikant Tamboli मी कसा झालो? Mee Kasa Jhalo मी कसा बसा काहीही झालो! Mee Kasa Basa Kahihi Jhalo

कै. आचार्य अत्रे यांचा १३ ऑगस्ट १९८९ हा जन्मदिनांक, तर १३ जून १९६९ या दिवशी त्यांचे देहावसान झाले. त्यानंतरचा ५० वर्षांचा कालखंड म्हणजे कैक नव्या सामाजिक प्रतिष्ठा प्रस्थापित होण्याचा कालखंड!

अलीकडील प्रतिष्ठाप्राप्त व्यवसाय तपासले तर त्यात हॉटेल, रिअल इस्टेट, पब, बिअरबार, पेट्रोल पंप, कॅसिनो, लायझनिंग असे अनेक व्यवसाय सापडतात. मुळात संवेदनशील असलेली संस्कारित मंडळीही अशा धंद्यात दिसतात. या लोकांनी ‘मी कसा झालो?’ हे लिहायला हवे किंवा कोणाकडून तरी शब्दांकन करायला हवे. कारण ‘धनाढ्य सर्वत्र पूज्यते’, असा अलीकडील कालखंड चालू आहे. पूर्वी लेखक शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, संपादक ही क्षेत्रे समाजमान्य होती. त्यातील नामवंत कसे घडले असतील याचे कुतूहल समाजात होते. आता मात्र माणूस नावलौकिक प्राप्त केलेला नसला तरी तो कसा धनाढ्य झाला असेल, याचेच कुतूहल अपार वाढले आहे! असो.

‘मी कसा झालो?’ हे आचार्य अत्रे यांचे गाजलेले पुस्तक. ते पुस्तक म्हणजे कै. अत्रे कोणत्या क्षेत्रात कसे नावलौकिक कमावते झाले, याचे त्यांनी केलेले अनुभवकथन म्हणायला हवे. ते पुस्तक वाचल्यापासून आम्हालाही स्वतःचे अनुभवकथन सांगायची ऊर्मी नेहमीच दाटून येते. इतरांचे अनुभवही आम्ही स्वतःचे म्हणून मांडू शकतो, पण ती ऊर्मी आम्ही रोखून ठेवली होती.

आज आचार्य अत्रे हयात नसल्याने ती ऊर्मी वाया जाई. कारण ज्याचे अनुकरण करावे त्यालाच चाहत्यांचे कौतुक असते. अत्रेसाहेब नसल्याने आमचे कौतुक कोणी करणार नसले तरी आम्ही त्यांचे सदैव कट्टर चाहते असल्याचे पाहून ते म्हणाले असते की, गेल्या दहा हजार वर्षांत असा चाहता कोणाचाही झाला नाही!

त्यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रावरून आम्हीही ‘तऱ्हेतऱ्हेचे पाणी’ हे इतरांचेही अनुभव आमचेच म्हणून त्यात समाविष्ट करून आमचे आत्मचरित्र लिहून ठेवले आहे. कै. अत्र्यांसारखे पाच खंड मात्र आम्ही लिहू शकलो नाही. कारण आमचा जन्म मराठवाड्यातील आहे. आमचे बरेचसे आयुष्य तिकडेच गेल्याने आमच्या प्रदेशातील तऱ्हेतऱ्हेच्या नद्या व अनुभवही आटलेलेच आहेत. या कारणाने आमचे आत्मचरित्र केवळ काही पानातच पूर्ण झाले. ते आम्ही पुढे कधीतरी प्रसिद्ध करू.

असेच काही आमच्या परिपूर्ण व अनुभवसंपन्न जीवनाबाबतही आहे. आमचे, ‘मी कसा बसा काहीही झालो!’ हे अनुभवकथनसुद्धा थोडक्यात आटोपणारे असल्याने कै. आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त अत्रेप्रेमी मराठी वाचकांसमोर ते शीर्षक व उपशीर्षकासहित माहितीसाठी ठेवण्याचे औचित्य आम्ही साधत आहोत.

.............................................................................................................................................

मी कुठे झालो?

स्टोनव्हीले या गावाशी साधर्म्य राखणाऱ्या दगडगाव या भविष्यकालीन स्मार्ट सिटीत आम्ही जन्म घेते झालो. हे गाव कुठे आहे याचा शोध घेतला तर ते अमेरिकेपासून केवळ अकरा हजार किलोमीटर्सवर आहे. चाळीस वर्षांपूर्वी आम्ही या गावात अवघे सोळा वर्षे वास्तव्य केले. तेव्हाचे ते स्टोनव्हीले व आजचे स्टोनव्हीले यात काहीही फरक पडला नाही. स्थितप्रज्ञता हा स्थायीभाव इथूनच आमच्या सर्वांगात भिनुन गेला. तेव्हा डासांच्या झुंडीच्या झुंडी तिथल्या गल्लीबोळांतून चावा घेण्याला सज्ज असत. तिथले ते डास मात्र स्वतः निरोगी होते. कोणत्याही संसर्गजन्य जिवाणू, विषाणूंना ते थारा देत नसत. त्यामुळे मलेरिया, डेंगू अशा रोगांची साथ कधीच आमच्या काळात गावात आली नाही. तेव्हाचे हे विकासोन्मुख गाव होते. पथदिवे फोडले गेलेल्या परिस्थितीत तिथे गल्लीबोळातून विद्युत खांब उपलब्ध होते.

शहाबादी फरशीच्या अनेक गल्ल्या व तिथल्या उघड्या नाल्या, त्यात तुंबलेले सांडपाणी, त्याच्यात जलक्रीडा करणारे जळू-चाटु हे जलचर, त्यातून येणारा हायड्रोजन सल्फाईडचा सदैव दुर्गंध या साऱ्या आशियातील समान बाबी बाळगून होते.

कै. अत्रे यांना त्यांच्या सासवड ते पुणे अशा अठरा मैलांचा प्रवास दुस्तर वाटत असे. त्याबद्दल त्यांनी लिहून ठेवलेय की, रस्त्यावरचा दिवे घाट हा कठीण घाट, चंदन टेकडीजवळील भुतं, बाभळबनातील अनुभव यामुळे पुण्याला जाणे अनेकजण टाळत.

आमचेही अनुभव थोडे वेगळे असले तरी आम्ही आमचे जिल्हास्थान नांदेडला जाणे टाळत असू. त्या काळी दगडगावाहून नांदेडला जाण्यासाठी सकाळी आठ वाजता सिटी एक्स्प्रेस नावाची एसटी जात असे. इतर गाड्या तशा ऑर्डीनरी गाड्या म्हणून प्रसिद्ध होत्या.

या गाडीचे आरक्षण केवळ ५० पैशात मिळे. रस्त्यात दोनशे मीटर्स उंचीचा व एका वळणाचा लडिवाळ घाट वगळून तसे त्रासदायक काहीही नव्हते. मात्र तेव्हाचा रस्ता हा महाभारत काळात निर्मिलेला असावा. चुकून नंतर डांबरट क्रांती झाल्याने थोडेफार डांबर फासून तो रस्ता नांदेड दर्शन घडवी. ही पीडा सुसह्य असूनही जेव्हा जेव्हा गावातील छोटी मुलं किंवा युवक तिकीट आरक्षण करून एकटेच प्रवासाला जात, नेमके तेव्हा परिचित वडीलधारे त्याच गाडीत उभ्याने प्रवास करताना आढळत.

विनयाचा अतिरेक असलेला तो काळ असल्याने त्याला जागा देऊन नंदीप्रमाणे आम्हा तिकीटधाऱ्यांना त्याच्या विचारप्रदर्शनाला मान हलवत उभ्याने प्रवास करावा लागे. उभे राहून प्रवास करण्याचा योग्य टाळण्यासाठो आम्ही प्रवासयोग टाळत गेलो. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार’ या सुभाषितावर आम्ही तेव्हा बहिष्कार टाकला. दगडगाव न सोडल्याने, कुठल्याही पंडितांशी मैत्री न झाल्याने आम्ही  सभेत संचार करू शकलो नाही. त्याऐवजी आधी आम्ही घरबशे होऊन गेलो. नंतर गावात भटकत राहिलो. बाजारात, पाणपट्टीवर संचार करत वाढलो. त्यामुळेच, ‘जे काही दिसे गावात, ते असे सर्वश्रेष्ठ जगात,’ अशा ताकदीच्या ओळी आम्हाला सुचू लागल्या आणि आम्ही आधी घरबशे व पुढे ग्रामसंचारी होत होत नंतर कवीही झालो.

.............................................................................................................................................

 मी कवी कसा झालो?

आम्ही आपोआप कवी झाल्याने कवीचे प्राक्तनसुद्धा आम्हाला दैवदत्त प्राप्त झाले. हे प्राक्तन पॅकेजमध्ये असते. यात दीर्घकाळ बेकार राहण्याचा योग असतो, जो आम्हाला प्राप्त झाला. प्रेमभंगाचा शाप यात अतिरिक्त म्हणून स्थायी असतो. तो शाप बेकारीमुळे आम्हाला शापित प्रेमवीर बनवून चडफडत जगवणारा म्हणून फळफळला. ‘समाजातून तिरस्कृत तर घरातून दुर्लक्षित’ ही अवस्थाही वाट्याला आली.

वरील परिस्थिती येण्याचे कारण म्हणजे आम्ही पदवीधर झालो ते १९८६ हे वर्ष. मुबलक सरकारी नोकऱ्या उपलब्ध असण्याच्या काळात तेव्हा शून्याधारीत अर्थसंकल्प नावाची संकल्पना सलग चार वर्षे राबवली गेली. ज्यात नोकऱ्या बंद केल्या गेल्या होत्या. विनानौकरी आम्ही हताश झालो.

हताशावस्था ही कधीही कवी बनवण्यासाठी पूरक असते. ती साक्षात प्रसन्न झाल्याने व ‘ये दुनिया ये महफील मेरे काम की नहीं’, हे गाणे साथीला असल्याने या गाण्यावर प्रेम करता करता आम्ही दुःखी कवी म्हणून लिहिते झालो.

अवतीभवतीचे विश्व तेव्हा आनंदात असल्याने अप्रकाशित कवी म्हणून आम्ही कसेबसे साहित्य प्रांतात इत्यादी इत्यादी या संवर्गातील प्रमुख दुर्लक्षित म्हणून अग्रस्थानी आलो.

.............................................................................................................................................

मी जुगारी कसा झालो?

सदादुर्लक्षित असल्याने कुठे जाऊन आलो, कुठे गिळून आलो हे प्रश्न विचारण्यासाठी घरी कोणालाच तेव्हा वेळ नव्हता. आमच्याकडेही तेव्हा महाशून्याशिवाय काहीही हाती नव्हते.  शून्यापासून सुरुवात करणे हे कधीही इष्ट असते, अशी आमची भूमिका होती. कारण खिशात फुटकी कवडीही नसल्याने व कविमन असल्याने लाखमोलाचे शब्द आपल्याजवळ असल्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आमच्याजवळ ओसंडून वाहत होता.

त्याच मूल्यवान शब्दसामर्थ्याने आम्ही गावात जिथे जिथे मन रमवणाऱ्या रम्मी या बैठ्या खेळाचे आयोजन होत असे, तिथे उदात्त विचार प्रदर्शन करत थांबणे सुरू केले होते. सुरुवातीला आम्ही फुकटे प्रेक्षक म्हणून तिरस्काराचे धनी झालो, मात्र हळूहळू थकलेल्या बैठ्या खेळाडूंचा डाव त्यांच्यावतीने खेळत गेलो.

‘जुगार धार्जिन फुकट्याला’ या उक्तीला सार्थ करणारे नशीब मात्र इथे लाभल्याने, आम्ही खेळायला बसलो की, आमची रम्मी होऊन जाई. हा सगळा पैशावरचा खेळ असल्याने आम्हाला यशस्वी खेळाबद्दल जे कमिशन मिळे, त्यातून आमचे दैनंदिन खर्च समृद्धपणे भागत. समाज अमान्य कृत्य केल्याबद्दल जेव्हा मन खायला उठे, तेव्हा आमचे दुर्लक्षित कविमन जागे होई आणि आम्ही उत्कृष्ट जीवनचिंतन काव्य प्रसवून टाकत असू. रम्मीत मन रमवता रमवता आम्ही रम्मी खेळणे सोडून खेळवण्यात किती फायदा आहे, हे जाणून घेतले.

.............................................................................................................................................

मी क्लबमालक कसा झालो?

छोट्या सुदूर अशा त्या गावात जो कोणी बदलून येई, तो परत आवाक्यातल्या गावी बदलून जाण्यास उत्सुक असे. या कारणाने कायदा व सुव्यवस्था ही तेहतीस कोटी देवानांच सांभाळावी लागे. ‘आम्हा घरी शब्दांचीच रत्ने’ असल्याने त्यांना दैवी वाणीचे रूप देऊन त्यांच्यासाठी आम्ही पोस्टपेड पेमेंटचा मार्ग वापरून गावाच्या चारही दिशांना आरामदायी आसन व्यवस्थेसह व नव्या कोऱ्या पत्यांच्या जोडांसह फॉर्साईडस हा लोकल गेमिंग ब्रँड विकसित केला.

खानपान शुल्क, प्रवेश शुल्क, क्रीडा परवानाशुल्क, आदरातिथ्य शुल्क या ‘जुगारी’मान्य शुल्कांना आकारून केवळ वर्षभरातच आम्ही गावाचे सुप्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व बनून गेलो. तत्कालीन स्थानिक नियंत्रकांना पोस्टपेड बिल वेळेतच अदा करताना नसलेले विलंब शुल्कसुद्धा देऊन त्यांची आम्हावर मर्जी बहाल करवून घेतली.

.............................................................................................................................................

मी मध्यस्थ कसा झालो?

या मर्जीमुळे आमच्याकडे खेळणे म्हणजे सुरक्षित खेळ, ही ख्याती शतक्रोशीत पसरली. या कारणाने आमच्या फोरसाईड्स लोकल क्लबवर गावातील व आजूबाजूच्या तालुक्यातील प्रतिष्ठित अशी राजकीय क्षेत्रातील, व्यापार उद्योगातील कैक मंडळी येऊ जाऊ लागली. त्यातील काही जण लोकप्रतिनिधींचे आप्त तर काहीजण सोयरे व काही काही तर त्यांचे जिवलग कार्यकर्ते असत.

एक तर जुगारी वृत्ती व त्यात स्वस्तुतीची बाधा असलेली मंडळी जेव्हा जिंकत, तेव्हा ते आमच्याशी  मनमोकळेपणाने मुंबई-पुण्याचे त्यांचे कमाईचे अनुभव सांगत. हीच मंडळी हरली की उसने हवे असताना ‘मी कोण आहे हे माहीत आहे ना, तू फक्त काम सांग, नाही झाले तर बापाचे नाव सांगणार नाही!’ ही कठोर प्रतिज्ञा करून टाकत.

दोन्ही परिस्थितीचा फायदा घेत आम्ही आमच्यावर उपकार करणाऱ्या कायदा व सुव्यवस्थकाची आवाक्यातल्या गावी बदली करून देत असू. यात दोन्ही बाजूंनी मध्यस्थ आकार मिळून जाई. विश्वासू म्हणून प्रतिमाही वृद्धिंगत होत असे.

जुगारी म्हणून व नंतर मध्यस्थ म्हणून आम्ही प्रगतिप्राप्त कसे झालो याचे तपशीलवार विवरण सांगणे हे संकेतभंग करणारे ठरेल. या कारणाने आम्ही मौन आहोत.

आमचा मूळ स्वभाव नैतिक असूनही केवळ परिस्थितीमुळे आम्ही कसेबसे काहीही झालो.

.............................................................................................................................................

पन्नास वर्षांपूर्वी अर्थात कै. अत्र्यांच्या काळात अशा व्यवसायांना प्रतिष्ठा नसावी. असली तरी आम्हासारख्या व्यक्तींची नोंद समाज का घेत नाही याचा बोध होत नाही. ‘हर मर्ज की दवा’ म्हणजे बिचौलिया हे सूत्र परभाषिकांना मान्य असते. ‘चापलुसी’ हा सर्वश्रेष्ठ गुण आहे, हे तर खडूसही मान्य करतात. आम्ही कसेबसे काहीही झालो असलो तरी या चापलुसीमुळे मौजमजा, मस्ती करत चंगळवादी म्हणून जगत आहोत.

अलिकडे अलिकडे आम्ही कुठून तरी, कोणाचे तरी नेतृत्व करावे असे ठरवत आहोत. आयाराम-गयाराम बनण्याऐवजी ‘आवोराम’ म्हणून आम्हाला सगळीकडून विचारणा होत आहे. अजूनही आम्ही तसे काही न झाल्याने ते लिहिले नाही.

अत्र्यांच्या जन्मदिनी विचारक्षालन म्हणून हे मनोगत बरेचसे राखून व कोणाचाही नामोल्लेख न करता जाहीररीत्या कबुल केले एवढेच!

.............................................................................................................................................

हेही पहा, वाचा

आचार्य अत्रे : अखेरचा वारसदार

https://www.aksharnama.com/client/article_detail/3378

आपल्या बारा पिढ्यात असे कोणी लिहिले होते काय?

https://www.aksharnama.com/client/article_detail/3379

एक वटवृक्ष उन्मळला आहे; एक युगंधर गेला आहे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3380

जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती

https://www.aksharnama.com/client/article_detail/3381

.............................................................................................................................................

रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या 'थट्टा मस्करी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4971/Thatta-Maskari

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......