अजूनकाही
नागपुरात शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी सर्व हिंदूंना दहा मुलांचं ‘टार्गेट’ दिलं आहे. अशा संतती विस्तारानं काय अनर्थ होईल, याचा विचार न करता हे लोक असं कसं बोलू शकतात असं आपल्यापैकी कुणाला वाटू शकेल! पण हे लोक खूप विचारपूर्वक बोलत असतात!! शंकराचार्य हा काही कुणी वेडगळ, पढतमूर्ख मनुष्य नव्हे! तो एका जबाबदार पदावर बसलेला गृहस्थ असतो. त्याचा काही अजेंडा असतो. तो अजेंडा ते पुढेही रेटत असतात, हे समजून घेतलेलं बरं.
पूर्वी अशोक सिंघल हे विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते होते. त्यांनी हिंदूंना पाच मुलांचं ‘टार्गेट’ दिलं होतं. ते ‘टार्गेट’ शंकराचार्यांनी दुप्पट केलं आहे. संततीविस्ताराचा हा अजेंडा शंकराचार्य, साधू, बुवा, महाराज, साध्वी हे सगळे लोक विचारपूर्वक पुढे रेटत असतात. त्यातून त्यांना हिंदूंना संदेश द्यायचा असतो की, तुम्ही अल्पसंख्य होण्याचा धोका आहे. तो धोका मुस्लिमांपासून आहे. त्यांची संख्या वाढतेय, तुमची घटतेय, हा मुद्दा त्यांना हुशारीनं पुढे रेटायचा असतो.
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मैदानात हे सुरू होतं हे महत्त्वाचं. शंकराचार्य आणि तत्सम पदावरचे साधू, संन्याशी लोक भारतात काही भाकड विचार मुद्दाम जिवंत ठेवण्याचा खटाटोप करत असतात. या भाकड विचारांनीच हिंदू धर्माचा सर्वांत जास्त तोटा झालेला आहे.
नागपुरात तीन दिवस साधू संमेलन झालं. त्याचं नाव ‘विराट धर्मसंस्कृती महाकुंभ’ असं होतं. हा तीन दिवसाचा सोहळा भरगच्च कार्यक्रमांनी पार पडला. त्यात परिक्रमा, मातृसंसद यांसारखे उपक्रम होते. देशभरातले साधू त्यात सहभागी झाले होते. धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून हिंदू धर्म वाचवायच्या व्यूहरचना चालू होत्या. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शंकराचार्यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी संततीविस्ताराचं आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांना हे विधान मान्य आहे की नाही याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झाली. सरकार सतत ‘हम दो हमारे दो’चा जयघोष करत संततीनियमनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांना तर एकच कन्या आहे. त्यांनाही हिंदू धर्म वाचवण्यासाठी आणखी नऊ अपत्ये होऊ द्या, असा व्यक्तिगत सल्ला शंकराचार्यांनी दिला नाही हे बरं झालं! अन्यथा मुख्यमंत्र्यांची आणखी फटफजिती झाली असती!! असो.
चित्र - श्रीनिवास आगवणे
मुख्यमंत्री या संततीविस्ताराबद्दल चुकूनही काही बाजूनं वा त्याविरोधात बोलणार नाहीत. ते तेवढे शहाणे नक्कीच आहेत. कारण त्यांना संघ परिवाराची दहा तोंडं माहीत आहेत. त्या दहा तोंडांतून बाहेर पडणारी मुक्ताफळं, इशारे, सल्ले त्यांना लहानपणापासून तोंडपाठ असातील. हे सारं सहन करायचं असतं. यातलं फारच थोडं मनावर घ्यायचं असतं हे मुख्यमंत्र्यांना माहीत असल्यानंच त्यांना यापैकी सोयीचं तेच ऐकू आलं असेल. राजकीय सोयीचं तेवढं ते घेतील, बाकी गंगेला अर्पण करून टाकतील. त्यांच्या राजकारणाची ती गरज आहे. शहाण्या मुख्यमंत्र्यांचा विजय असो!
मुख्यमंत्र्यांना संततीविस्तारासारख्या आवाहनानं काही फरक पडणार नसला तरी हिंदू धर्मियांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली पाहिजे. कारण हे साधू लोक जो विचार, जो अजेंडा जिवंत ठेवतात, तो हिंदू समाजाला मारकच ठरत आला आहे. आजपर्यंत समाजाचा त्याने तोटाच झाला आहे. आठवा, जातीव्यवस्थेबाबत शंकराचार्यांची मतं. समाजात जातीव्यवस्थेच्या विरोधात, अन्यायाविरोधात चळवळी होत असताना हे शंकराचार्य म्हणत असत की, ‘जातीप्रथेविरुद्ध लोक बोलतात, अस्पृश्यता संपवू मागतात. हे धर्मपालन होत नसल्याने दुष्काळ पडतात. भूकंप होतात. रोगराई येते. गप्प राहा. सुखी व्हाल.’ महान शंकराचार्य चिरायू होवो.
महिला मुक्तीची चळवळ सुरू असताना हे साधू सुधारक“महिलांनी त्यांच्या पायरीने राहावं, पायातली चप्पल पायातच बरी, अन्यथा धर्म बुडेल’ अशी हाळी देत होते. महिलांना मंदिर प्रवेशबंदीचं प्रत्येक शंकाराचार्यांनी समर्थनच केलं होतं. तृप्ती देसाई मुर्दाबाद!
अस्पृश्यता, महिला मुक्ती हे विषय शंकराचार्य, साधू यांनी प्रतिष्ठेचे करून धर्म रक्षणाचा आव आणला. पण आज या विषयात समाज खूप पुढे गेला आहे. त्याने हिंदू धर्म काही शंकराचार्य म्हणाले तसा बुडाला नाही. उलट आहे तिथंच आहे. एका अर्थाने शंकराचार्य, साधू या लोकांचे बुरसटलेले विचार हिंदू समाजाने लाथाडले हे बरंच झालं. च्यायला, आपल्या समाजानं धर्मआज्ञा मोडून काय मिळवलं? बरंच काही, पण त्याविषयी नंतर कधीतरी. आता तो विषय नाही.
आता पुन्हा देशात सत्तेच्या आडून साधू, शंकराचार्य त्यांची जुनाट मतं समाजावर लादण्याच्या कुरघोड्या करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून नागपुरातलं संमेलन होतं. सगळ्या साधूंचा उदो उदो!
या संमेलनात संततीविस्ताराची भूमिका मांडणाऱ्या शंकराचार्यांना लेकुरे उदंड झाल्याने लक्ष्मी पळोन जाते, ही स्वामी रामदास यांची मतं माहीत नाहीत असं नाही. रामदासही ब्रह्मचारी होते. त्यांना जे कळालं ते शंकराचार्यांना का कळू नये?
मुळात त्यांना हे कळत नाही या भोळ्या समजुतीत आपण न राहिलेलं बरं. मुख्यमंत्री, साधू, शंकराचार्य या सर्व लोकांना ते स्वत: जे बोलतात, ऐकतात त्याचा अर्थ कळतो. ते तेवढे सुज्ञ नक्कीच आहेत, पण एका व्यापक राजकारणाचा भाग म्हणून हे लोक असे मुद्दे मांडत असतात. गरीब हिंदूंची संख्या ४० टक्के आहे. त्यांना दोन वेळची चूल पेटवायला काय कष्ट करावे लागतात, हे मुख्यमंत्री आणि शंकराचार्यांना नीट कळतं. लोकसंख्या वाढली तर हे गरीब देशोधडीला लागतील, हेही या महान माणसांना चांगलंच माहीत असतं. पण त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा अजेंडा म्हणून ते हे सर्व पुढे रेटतात. मुख्यमंत्री सहन करतात. या सगळ्या अजेंड्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे. संघाचाही जय होवो!
प्रसारमाध्यमांमध्ये टीका होते आहे की, हे लोक संन्याशी आहेत. त्यांना मुलं-बाळं सांभाळायची कशी, किती कष्ट पडतात, याचं ज्ञान नाही. पण हे खोटं आहे. धर्मसत्ता चालवणारे, राजसत्तेवर कुरघोड्या करण्याचे डाव टाकणारे हे शंकराचार्य, साधू लोक खूप धूर्त असतात. त्यांना सामान्य लोकांना कबजात ठेवून धर्माचा गाडा हाकायचा असतो. लोक कबजात ठेवण्यासाठी संततीविस्तार, मुसलमानांची भीती हे अजेंडे ते पुढे रेटतात. ‘धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा, चूड इथे या ढोंगाला लागणार कधी’ या ओळी खूप बोलक्या आहेत. या धूर्तांच्या ढोंगानंच हिंदू धर्माला कमीपणा देण्याचं काम केलं आहे, हे स्वामी विवेकानंदांनी अखेरपर्यंत आपल्याला ओरडून सांगितलं होतं, हे न विसरलेलं बरं!
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment