२०१६ या वर्षाने हतबल केलं असं असं की...
सदर - मागोवा २०१६चा
नितिन भरत वाघ
  • अफझल गुरूविषयीचं निदर्शन आणि जेएनयूतील एक पोस्टर
  • Wed , 28 December 2016
  • मागोवा २०१६चा मराठा मोर्चे Maratha Kranti Morcha देशद्रोही Deshadrohi नोएटीक सायन्सेस Noetic sciences डॅन ब्राऊन Dan Brown द दा विंची कोड The Da Vinci Code हिप्नॉटिझम Hypnotism

अजून तीन दिवसांनी २०१६ हे वर्ष संपेल. इतकं विलक्षण वर्ष जाणत्या झाल्याच्या वयापासून कोणतंच नव्हतं. वैयक्तिक जीवनातही आणि सामाजिक जीवनातही. हे वर्ष असं होतं ज्याने प्रत्येक कळत्या व्यक्तीला समाजचक्रात सामील व्हायला भाग पाडलं. दैनंदिन जगण्यातून बाहेर काय चाललंय याची दखल घेण्यासाठी या वर्षाने भाग पाडलं. विशेषत: उत्तरार्ध. अनेक कारणांनी २०१६ लक्षात राहील. मराठा मोर्चे असतील किंवा इतर अनेक मोर्चे, त्यावर कळसाध्याय नोटाबंदीने गाठला. गेली दोन वर्षं सगळा देश विविध कारणांनी घुसळून निघत आहे. बहुतांश नकारात्मक घटनांनी. कुणालाही अस्वस्थ करतील अशा घटना, व्यक्तीपेक्षा समूह केंद्रित होत जाणारं जीवन, ज्याला ‘सम्यक समष्टी’ म्हणतात त्याचा कुठेही माग नाही. गेल्या वर्षात कोणतीही गोष्ट प्रतिक्रियावादी होण्यात शेवटाला जाणारी ठरली. समाजाचा त्यातील समूह जाणिवेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेप खाजगी जीवनात वाढून व्यक्तीच्या विचार प्रक्रियेला मारक ठरून, विचारांवरही आक्रमण करू लागल्याचं प्रमाण याच वर्षात वाढलं. स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणजे ‘देशद्रोह’, एखाद्या व्यक्तीला, विचारांना विरोध म्हणजे ‘देशद्रोह’ सरसकट म्हटल्या जाऊ लागलेलं हे वर्ष. तीव्र उतारावर मोठ्या ट्रकचा ब्रेक फेल व्हावा आणि ती बेलगाम अंदाधुंद धावावी अशी देशाची अवस्था झालेली आहे. तीव्र मौनातला आकांत अनुभवावा असं हे वर्ष. येणाऱ्या काळात अस्वस्थता आणि अराजकाचा पाया ठरेल असं हे वर्ष होतं.

या सगळ्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर वैचारिक घुसळण, देवाणघेवाण झाली. अनेक संकल्पना, विचार, धारणा केंद्रस्थानी आल्या, ज्या मुक्त आणि स्वतंत्र समाजासाठी खचितच योग्य ठरणाऱ्या नाहीत. इतक्या घटनांची मालिका एकामागून एक घडत गेली की, त्या विचारात नर्व्हस ब्रेक डाऊन व्हावा. महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं तर सर्वत्र अनामिक दहशत व भीती पसरली आणि कुणाकडेही या भीतीचं कारण नव्हतं. याची सुरुवात कोपर्डी प्रकरणापासून झाली. त्यात एक भीषण गोष्ट अधोरेखित झाली. ती म्हणजे बलात्कारालाही जात असते. ज्याची सुरुवात खरं तर दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातून झाली होती. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराकडे जातीय अस्मितेनं बघणं फक्त भारतातच घडू शकतं, हे सिद्ध झालं!  या प्रकरणातून जात हा घटक समाजाच्या आणि जगण्याच्या केंद्रस्थानी आला. देश, राज्य व माणूस यापेक्षा ‘जात’ हा घटक वरचढ ठरला.

समाजाचं कधी झालं नसेल असं ध्रुवीकरण या वर्षात घडलं. राज्यभरात जो गोंधळ माजलेला होता, तो सावरण्याची जबाबदारी ज्यांची होती, त्यांनी तो गोंधळ वाढू देण्याचं, त्यासाठी हवा देण्याचंच काम केलं.

विचारात आणि समाजात एक सरळ धारदार उभा छेद देऊन राष्ट्र आणि एकसंघ समाज म्हणून टिकून राहण्याचं आव्हान या वर्षानं बहाल केलं. हे जे काही होतंय, घडतंय ते का घडतंय याची कारणीमीमांसा समजण्याच्या पलीकडे गेलेली दिसून आली. जेव्हा या कैफातून किंवा हिप्नॉटिझममधून सगळे बाहेर येतील तेव्हा काय आढळणार आहे, याचा विचार सध्यातरी कोणाला करायचा नाही. अॅट्रॉसिटीच्या कायद्यावरून झालेल्या ‘रणात’ आपण किती भयभयीत समाजात जगतो, तेही स्पष्ट झालं. ज्यांच्या सुरक्षेसाठी तो कायदा आहे, तेही भयभयीत आणि ज्यांच्यावर वचक बसावा म्हणून तो कायदा केलाय तेही भयभयीत! एकमेकांना घाबरणाऱ्या अत्यंत विस्कळीत आणि मनोरुग्ण समाजात आपण राहतो, याचं भान या निमित्तानं आलं.  

एखाद्या सिनेमाची पटकथा लिहिलेली असावी, असा हा सर्व घटनाक्रम अगदी ठरवून दिल्यासारखा पार पडत होता. हे असं का घडतं? इतक्या नियोजित पद्धतीन, विवेक नावाच्या माणसाची विचारशक्तीवर अशी कुलुपं कशी लावता येतात, याचा राहून राहून विचार येत होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर? मास हिस्टेरिया असतो, पण तो नशा केल्यावर येणाऱ्या कैफाच्या काळ जेवढा असतो तितकाच असतो. पण सलग महिनोन महिने जेव्हा न थकता हा हिस्टेरिया कायम राहतो, तेव्हा खूप काळजी करण्यासारखं आहे! पण हे कोणालाही जाणवत नाही, या विचारांनी मती सुन्न व्हायला लागते.

या सगळ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत घडणाऱ्या घटना, त्यांचा क्रम आणि त्यानंतर तिथल्या निष्पाप लोकांचं जगणं नरकमय होणं, हे भयकंपाची चाहूल देणारं वाटायला लागतं. शिवाजी विद्यापीठात मध्यपूर्वेतील विशेषतः सिरियातील नव्वदीनंतरच्या कवितेविषयी बोलायचं होतं. त्यासाठी तयारी करताना अनेक गोष्टी समजल्या. जी काही तथाकथित ‘अरब स्प्रिंग’ म्हणून क्रांती घडली तिचं साध्य काय तर ‘इस्लामिक स्टेट’सारख्या आतंकवादी संघटनेचा उत्कर्ष आणि सामान्य माणसाचं उद्ध्वस्त होणं! केवळ आजतरी त्या बदलाची परिणती विनाश आणि विनाश हीच दिसून येतेय. असे अचानक उठाव कसे होतात आणि सगळ्या समाजाचे मेंदू कसे नियंत्रित करता येतात, हा हतबल करणारा प्रश्न हे सगळं वाचत असताना समोर येत होता. इतक्या गर्दीत बोटावर मोजण्या इतके तरी लोक असतील ना, जे स्थिर विचार करू शकतील. ज्यांचे मेंदू कुठल्याही प्रकारच्या हिप्नॉटिझमच्या बाहेर टिकून राहिले आहेत? त्यांचा आवाज दडपून टाकण्याचं सामर्थ्य कुणाच्या बळावर मिळवलं जातं?

‘नोएटीक (Noetic) सायन्सेस’ नावाची एक मानसशास्त्राची नवीन शोध शाखा विस्तारित होतेय. या शाखेत विचार, आकलन, भावना या मानवी मनाशी निगडीत गोष्टींचं संशोधन केलं जातं. त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे- “Noetic sciences are explorations into the nature and potentials of consciousness using multiple ways of knowing – including intuition, feeling, reason, and the senses. Noetic sciences explore the ‘inner cosmos’ of the mind (consciousness, soul, spirit) and how it relates to the ‘outer cosmos’ of the physical world.” जगात प्रत्येक ज्ञात गोष्टीला एक वस्तुमान असतं, तसंच वस्तुमान विचारांना, आकलनालाही असतं, अशी कल्पना या शास्त्रात केली जाते. आणि एकत्रितपणे या विचारांचं किंवा आकलनाचं संकलन करता येऊ शकतं. या संकलित केलेल्या विचार किंवा आकलनाच्या वस्तुमानाला भौतिक स्वरूप प्राप्त होतं. ज्याप्रमाणे अणूशास्त्राने अणूच्या विघटनातून अणूबॉम्बचा शोध लावला, त्याचप्रमाणे विचाराच्या संकलनातून प्राप्त वस्तुमानाचं विघटन करून विशिष्ट विचारांचा, आकलनाचा, दृष्टिकोनाचा मेंदू बधीर करणारा, विचारशक्ती बाधित करू शकेल असं काही द्रव किंवा वायू स्वरूप संशोधित करून तो ‘विचार’ ‘व्हायरल’ करून सोयीस्कर अशी ‘लाट’ किंवा ‘क्रांती’ करणं शक्य होईल, असाही अभ्यास ‘नोएटीक सायन्सेस’मध्ये केला जातो.

त्याचा वापर करून कुठलाही ट्रेंड सेट करता येणं, अनेक गोष्टी चलनात आणता येणं, अशा ‘लाटा’ निर्माण करता येतात. भांडवलदारी आणि मुक्त अर्थव्यवस्था अशाच व्यवस्थेच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी असते. (हे सगळं अगदी तर्कहीन, बेसलेस वैदिक विज्ञानाच्या दाव्यांसारखं पुराणोक्त वाटतंय ना, मलाही तसंच वाटतंय!), परंतु जर गेल्या चार-पाच वर्षांत घडलेल्या जागतिक घडामोडी तपासून बघितल्या तर यातील तार्किकता लक्षात येईल.

खनिज तेलाचे साठे सापडून अचानक अमेरिका स्वयंपूर्ण होते आणि ज्या देशात खनिज संपत्तीचे अधिकाधिक साठे आहेत, पण अमेरिकाधार्जिणे नाहीत त्यांच्यात उठाव व्हायला सुरुवात होते, कुठल्याही ठोस कारणाशिवाय! मध्यपूर्वेतील अनेक देशात हुकूमशाही किंवा लष्करशाही होती- आहे, पण ते अगदी जुलमी होते किंवा जनता हाल हाल होऊन मरत होती, अशी परिस्थिती बहुतेक कधीही नव्हती. कारण मध्यपूर्वेत कामासाठी भारतातूनही अनेक लोक जात होते, अजूनही जातात.

तर मग असं अचानक काय घडलं की, तेथील जनतेला जाणवावं आपण मुक्त व्हायला हवं. पण कोणापासून आणि कसं, हे त्यांना माहीत नव्हतं आणि ते मुक्त होण्याच्या ‘विचाराच्या’ सापळ्यात अडकले. त्यांना कळलंही नाही त्यांच्यासोबत काय झालं! भूलीच्या इंजेक्शनानंतर जशी जाग येते, तशी जाग त्यांना आली तेव्हा, आपल्याच घरातून परागंदा व्हायची वेळ त्यांच्यावर आली आहे असं त्यांना दिसलं!

‘नोएटीक सायन्सेस’मधून प्राप्त शोधांचा वापर कुणाला हास्यास्पदही वाटू शकतो, तो तसा वाटावाही, परंतु डोनाल्ड ट्रम्पचा विजय या विचारावर काबू मिळवू शकणाऱ्या शास्त्राचा असू शकत नाही, हे कोणी ठामपणे म्हणू शकेल? ट्रम्पसारख्या भांडवलदारी विचारांच्या, भ्रष्टाचाराचा काळाकुट्ट इतिहास असणाऱ्या माणसाचा विजय सर्वसामान्य जनतेमुळे होतो, हे सहजी पचनी पडणारं नाही. हिलरी क्लिंटनचे केवळ खाजगी ईमेल आयडी वरून पाठवलेले काही ईमेल उघड झाले म्हणून पारडं फिरवतील अशी दूधखुळी जनता अमेरिकेतली नाही. ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पचा ‘विचार’ व्हायरल झाला, ते विस्मयकारक होतं. त्याच्या जोडीला एखाद्या देशात, समाजात विशिष्ट प्रकारची वातावरण निर्मिती करून देणाऱ्या मोठमोठ्या व्यवस्थापन संस्था कार्यरत आहेत. आपल्या व्यवस्थापन क्षमतेच्या आधारावर या संस्था आपल्या क्लायंटच्या गरजेनुसार एखादी ‘हवा’, ‘लाट’ किंवा परिस्थिती निर्माण करून देऊ शकतात.

डॅन ब्राऊन या प्रसिद्ध अमेरिकी लेखकाच्या ‘द लॉस्ट सिम्बॉल’ आणि ‘इन्फर्नो’ या दोन कादंबऱ्यांमध्ये ‘नोएटीक सायन्सेस’चं आणि वातावरण निर्मिती करणाऱ्या व्यवस्थापन संस्थांचं वर्णन व माहिती दिलेली आहे. त्याने संदर्भही दिलेले आहेत. डॅन ब्राऊन जे काही लिहितो ते केवळ फिक्शन म्हणून मी तरी सोडून देत नाही. त्याच्या ‘एंजल्स अँड डेमन्स’मधील CERN मधील लार्ज हायड्रोन कोलायडर प्रकल्पाचं वर्णन, हिग्ज-बोसॉन कणाचं वर्णन त्याने खूप आधी लिहिलं होतं. जेव्हा कुणाला फारसं या प्रकल्पाविषयी माहितीही नव्हती. थोडक्यात तो पुरेसं संशोधन करून लिहितो. त्याच्या लेखनातील दाव्यांबाबतची सत्यता पडताळून बघता येऊ शकते.

उदाहरणादाखल सांगतो. हे कुणाला विषयांतर झाल्यासारखे वाटेल, काही गोष्टी अशाच काल्पनिक शोध म्हणून सोडून देता येत नाहीत. कारण त्या दूरगामी परिणाम करणाऱ्या असतात. डॅन ब्राऊनच्या ‘द दा विंची कोड’मध्ये ‘प्रायोरी ऑफ सायन’ (Priori of Sion) या सिक्रेट सोसायटीची माहिती आलेली आहे. ज्याचे ग्रँड मास्टर सर आयझॅक न्यूटन, लिओनार्दो दा विंची, बोत्तिचेली, व्हिक्टर ह्युगो आदी होते असा दावा केला आहे. जे पॅगन (मुख्यत: जे येशूला मानत नाहीत किंवा सैतानाची पूजा करतात त्यांना ‘पॅगन’ म्हणतात.) होते आणि स्त्री तत्त्वाची पूजा करणारे होते. व्हिक्टर ह्युगो या सिक्रेट सोसायटीचा सदस्य होता किंवा नाही याचा पडताळा आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकात घेऊ शकतो. ते पुस्तक, त्यातला लेख ‘द दा विंची कोड’ ही कादंबरी प्रसिद्ध व्हायच्या खूप आधी प्रकाशित झाले होते. ते पुस्तक आहे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं ‘शारदीय चंद्रकळा’. व्हिक्टर ह्युगोवरील लेखात त्यांनी ह्युगोच्या प्रार्थनेचं आणि पूजेचं वर्णन केलेलं आहे. ते वाचताना अक्षरशः भारावून जातो वाचक.

हे सगळे सांगण्याचा मुद्दा एवढाच की, काही गोष्टी केवळ कल्पना म्हणून सोडून देता येत नाहीत. मला हे लिहिताना स्पष्ट जाणवतंय की, हा म्हणजे सूतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार आहे. पण तरीही हे तथ्य नजरेआड करून चालणार नाही की, सूत अस्तित्वात आहे. वास्तव अनेक प्रकारांनी सामोरं येत असतं. जर कोणी ते एका वेगळया माध्यमातून समोर आणत असेल तर त्याच्याकडे थोडं चिकित्सकपणे बघून सावध व्हायचं असतं. सावध होण्यासाठीच हे सगळं मांडण्याचा प्रयत्न आहे.

अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्यापासून सर्वसामान्य लोक अनभिज्ञ असतात. या संशोधनाचा एक टक्का भाग जरी सत्य असला तरी ते मानव प्रजातीसाठी किती भयानक आहे! विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने थेट माणसांना नियंत्रित करायचं, त्यांना हे कळूही न देता की ते नियंत्रित होतायत. त्यामुळे आता जे काही जगभर, देशात, राज्यात घडतंय ते सर्व निरोगीपणे घडतंय का? अशा कुठल्या अतिक्रमणाचे आपण शिकार आहोत हे न कळण्याइतपत अंधारात लोक आहेत का?

जेव्हा समाजमाध्यमांसारखी माध्यमं लोकांच्या हातात आहेत, त्या काळात जिथं व्यक्ती अधिकाधिक सूज्ञ व्हावा अशी अपेक्षा आहे तिथं माणसं किती रोबोटिक होतायंत? जगण्या-मरण्याशी निगडीत असलेल्या प्रश्नांवरसुद्धा एकत्रित येऊन आवाज उठवू शकत नाहीत, अशी कोणती मजबुरी आहे. हे नेमकं काय आहे, या आणि अशा गोंधळात सरत्या वर्षानं ठेवलं. हा सर्व गुंता सोडवता सोडवता मती कुंठीत झाली, शेवटी तो नादच सोडून द्यावा लागला. वास्तव काय आहे, हा ‘मॅट्रिक्स’ सिनेमातला प्रश्न आणि त्यातील नायकाला मिळालेलं उत्तर, आजही गोंधळात टाकतं आणि भवताल भासात्मक वाटायला लागतो. हारुकी मुराकामीसारखा लेखक म्हणतो, ‘जादुई वास्तव असं काही नसतं, ते फक्त एखाद्याचं त्याचं स्वत:च असं वास्तव असतं.’ याचा अर्थ काय लावायचा?

मध्यपूर्वेतील परिस्थितीत आणि आज आपल्या अवतीभवती जे काही चाललंय, त्यात काय वेगळं आहे? तिथं जी स्थिती आहे तशीच कमी-अधिक आपल्या देशातही आहे. काश्मीर असो, नक्षलवाद्यांचा प्रश्न असो किंवा अतिपूर्वेतील राज्यांमध्ये घडणारा रक्तपात असो, काय फरक आहे, या सर्वांत? सूक्ष्म पातळीवर या प्रश्नांनी फार छळलं. आपण कुणाच्या तरी कट- कारस्थानाचे बळी होतोय आणि ते समजूनपण येत नाही. आपण अगदी ‘इनसेन’सारखं का वागतोय, ते लक्षात येत नाही. भारतात तर या सगळ्या क्रियेला पार समजण्याच्या पलीकडे कितीतरी कंगोरे आहेत. प्रत्येक जण असं युद्ध लढतोय, ज्यातील शत्रू तर त्याला दिसतच नाहीयेत, पण हेसुद्धा माहीत नाहीये की आपण एकतर्फी लढल्या जाणाऱ्या युद्धात लढतोय. प्रश्न इतके एकात एक गुंतून अमिबासारखे झालेत, एक वेगळा केला की त्यातून अजून दोन प्रश्न निर्माण होतात.

२०१६ या वर्षानं जितकं हतबल केलं, तितकं कोणत्याच वर्षाने केलं नाही. सर्वसामान्यांपासून ते उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व लोकांपर्यत या वर्षानं थेट प्रश्न उभे केले आहेत. या वर्षाची नोंद कायम इतिहासात घेतली जाईल, इतकी व्यवस्था या वर्षाने निश्चितच केली आहे.

अतार्किक घडणाऱ्या घटनांच्या कारणांची मीमांसा ही अतार्किक विचारांनीच करायची असते, तीच योग्य पद्धत आहे असं मला वाटतं. हे सारं समष्टीवर, एक समाज घटक म्हणून जाणवलेलं चित्रं म्हणून मांडलं आहे.

 

लेखक  कादंबरीकार व समीक्षक आहेत.

nitinbharatwagh@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......