अजूनकाही
१९५२ मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीतील बैलगाडी, भोंगे, सायकल तसेच फलक यांच्या साहाय्याने केलेला निवडणूक प्रचार ते आता एकविसाव्या शतकात सोशल मीडियाच्या आधारे अत्याधुनिक प्रचाराचा झंझावात असा प्रवास टिपणारे छोटेखानी परंतु महत्त्वाचे असे चित्रण दूरचित्रवाणी पत्रकार सोनाली शिंदे लिखित ‘पॉलिक्लिक’ या पुस्तकात आहे. या पुस्तकात आजच्या माध्यमयुगातील महत्त्वाच्या बदलांचे छोटेखानी, परंतु माध्यम प्रतिनिधींच्या ‘फर्स्ट हँड’ साक्ष असणाऱ्या प्रचितीचे टिपण आहे.
या पुस्तकाची सुरुवात होते ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेने... त्यावेळची दिल्लीतील विज्ञानभवनमधील उत्कंठा आणि पत्रकारांची लगबग सुंदररीत्या उतरली आहे. माध्यम तंत्रज्ञानाच्या प्रवासात ‘मोबाईल पत्रकारिता रिव्हॉल्युशन’ म्हणजेच ‘मोजो (MoJo) रिव्हॉल्युशन’ ही आता हळूहळू स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबद्दल लेखिकेने टिपलेला महत्त्वाचा बदल म्हणजे आधी वृत्तवाहिनीसाठी बातमीदार, कॅमेरा, लाईट, ट्रायपॉड, ओबी व्हॅन व त्याचे तंत्रज्ञ असे मोठे युनिट लागायचे. मध्यंतरीच्या काळात ‘लाईव्ह युनिट’ आले आणि आता त्या सर्वांवर कडी केली ‘मोजो’ने! हा फक्त तंत्रज्ञानातील बदल नाही तर माध्यम व्यवसायात काम करणाऱ्या कुशल आणि गतिमान लोकांसाठी ही एक नवीन जीवनशैली आहे. याची काही वैयक्तिक अनुभवातून आलेली उदाहरणे, या पुस्तकात आलेली आहेत.
उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये माध्यमे ही आपल्या अवयवांचे विस्तारित अंग कसे होऊन बसते, याबद्दल मार्शल मॅक्लुहन या माध्यम अभ्यासकाने मांडलेला सिद्धान्त त्यातील ठिसूळपणामुळे कालबाह्य झाला असला तरी त्या सिद्धान्तातील मूलतत्त्व आजही अंशतः कायम आहे. पहिल्या निवडणुकीचे काही तपशील, तसेच जगभर व भारतात मतदानाचा हक्क मिळवण्याच्या संघर्षाचे उल्लेखसुद्धा यानिमित्ताने पुढे येतात.
१९५२ ते २०१४ पर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांतील राजकीय प्रचाराची मुख्य साधने आणि प्रयोग कोणते होते, याचे एक चांगले लघु-संकलन या पुस्तकात आहे. यामध्ये व्यंगचित्रे, दूरचित्रवाणी मालिका आणि राजकीय कॅम्पेन्स ते अलीकडच्या फेसबुक लाईव्हचीही नोंद आहे. १९९१ नंतर भारतामध्ये सॅटेलाईट टीव्हीचे युग अवतरले. याची सुरुवात कशी झाली आणि मराठी माध्यमविश्वात या वाहिन्यांचा प्रवास कसा झाला, याचा धावत आढावा घेतला आहे. ‘अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण’ हा कदाचित लेखिकेचा आवडता विषय वाटतो. प्रत्येक प्रकरणामध्ये याचे संदर्भ मिळतात.
या पुस्तकाच्या पहिल्या भागात लोकशाहीचा उत्सव माध्यमांतील बदलांच्या अनुषंगाने टिपण्याचा प्रयत्न केला आहे, तर पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये सोशल मीडियाने नेतृत्व केलेली अलीकडच्या काळातील आंदोलने (अण्णा हजारे, निर्भया) ही त्याबद्दलच्या काही घटनांच्या संदर्भात मांडली आहेत.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘मोदी ब्रँड’ या विषयाला स्पर्श केला आहे. राजकीय व निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा ब्रँड कसा घडवला जातो. हे वाचताना लेखक Philip K. Dick यांचे एक वाक्य उद्धृत केले आहे. त्याचा उल्लेख करायला हवा - “Today we live in a society in which spurious realities are manufactured by the media, by governments, by big corporations, by religious groups...so what is real?” या वाक्याचा असा अर्थ होतो की, “आज आपण अशा समाजात राहत आहोत जेथे सरकार, माध्यमे, धार्मिक संस्था आणि मोठे बहुराष्ट्रीय उद्योग हे सर्व बनावट, नकली वास्तवाचा आभास निर्माण करत आहेत. ‘Post-Truth’ (सत्योत्तरी सत्य) या संदर्भात या मुद्द्याबद्दल अधिक विस्ताराने चर्चा केली जाऊ शकली असती, परंतु या चर्चेचा अभाव काही या पुस्तकातील उणीव वाटत नाही.
पुस्तकातील विभाग तीन, ‘सोशल मीडियाचे विश्वरुप दर्शन’ हा त्यामानाने अलीकडच्या काळातील काही ऐतिहासिक घटनांची नोंद घेणारा आहे. यामध्ये सोशल मीडियाने पश्चिम आशियामध्ये सत्तांतर घडवून आणलेली अरब क्रांती (अरब स्प्रिंग), अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा ते वर्तमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या स्थित्यंतर झालेल्या प्रवासामध्ये सोशल मीडियाची काय भूमिका राहिली आहे, याचा धावता आढावा घेतला गेला आहे.
शेवटचे प्रकरण ‘मत तुमचं, मेंदू कुणाचा?’ हे पुस्तकाचे उपशीर्षक बनले आहे. या प्रकरणात २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर घडलेल्या काही रंजक, पण महत्त्वाच्या चर्चांची नोंद आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या मनातील निर्णय आणि आपले मानसिक कल यांचे मापन करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान उदयास आले आहे आणि त्यातील सुप्त धोक्यांकडे इशारा करण्यात आलेला आहे.
हे पुस्तक का महत्त्वाचे आहे, हे लेखिकेचेच पुस्तकाच्या ब्लर्बवरील वाक्य सांगून व्यक्त करावेसे वाटते - ‘सोशल मीडियाच्या या तीव्र कोलाहलात ज्यांना स्वतःचा आवाज हरवू द्यायचा नाही आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका सोडायची नाही, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.’
‘पॉलिक्लिक’ या पुस्तकामध्ये ‘केम्ब्रिज अनॅलिटीका’ या ब्रिटिश माध्यम व तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संदर्भात ‘मत तुमचे, मेंदू कुणाचा’ असा प्रश्न विचारला गेला आहे. ही संकल्पना नागरिकांच्या आणि ग्राहकांबद्दलच्या विविध माहितीचा राजकीय आणि व्यापारी कारणासाठी कसा वापर केला जातो याकडे दिशानिर्देश करतात.
‘पॉलिक्लिक’ या पुस्तकामध्ये पत्रकारितेच्या दुर्बिणीतून भारताच्या बदलत गेलेल्या आणि बदलत चाललेल्या राजकीय संवाद संस्कृती-शैलीचे कवडसे टिपण्याचा सुंदर प्रयत्न आहे. हे प्रयत्न सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये योगदान करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पत्रकारितेच्या अलीकडच्या काळातील अनेक प्रेरणादायक, ध्येययवादी अशा कर्तृत्ववान कहाण्यांचे साक्षीदार आहेत. राजकीय संज्ञापन (Political Communication) या राज्यशास्त्र आणि संज्ञापन-पत्रकारिता या दोन विद्याशाखांच्या संयुक्त अशी ही एक नवीन अभ्यासशाखा आहे. या विषयांवर अधिकाधिक पुस्तके येणे गरजेचे आहे, हे या पुस्तकाच्या निमित्ताने जाणवते.
राजकारण, संस्कृती, समाजकारण याबद्दल सतत सजग असलेले कार्यकर्ते आणि माध्यम क्षेत्रातील सक्रिय पत्रकार, संपादकीय चमूतील लेखक यांच्यात अधिक सहकार्याने राजकीय संवादप्रक्रियेवर प्रकाश टाकणारी पुढील संशोधनात्मक पुस्तके लिहिली जातील, अशी आशा या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.
पुस्तकाच्या शेवटी विविध माध्यम संस्थांचा उल्लेख आणि काही मोजक्या पुस्तकांची, लेखांची यादी संदर्भ म्हणून दिलली आहे. ती उपयुक्त आहे.
...........................................................................................................................................
'पॉलिक्लिक' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5011/Policlick
...........................................................................................................................................
लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.
creativityindian@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment