‘सोशल मीडिया’वरील अदभुत जगाची रंजक, रोचक सफर घडवणारे पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल माने
  • ‘सोशल मीडिया’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 09 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस सोशल मीडिया Social Media योगेश बोराटे Yogesh Borate

माध्यम अभ्यासक व शिक्षक योगेश बोराटे लिखित ‘सोशल मीडिया’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. दैनिक ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांनी इंटरनेट व ई-कॉमर्स युगातील विविध संकल्पनांबद्दल प्रस्तावनेमध्ये केलेली चर्चा आपली मनोभूमिका तयार करते. पुस्तकाची दुसरी प्रस्तावना लिहिताना सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्राध्यापक संजय तांबट म्हणतात की, ‘रिअल टाइम संवाद, मुक्त अभिव्यक्ती आणि सृजनाच्या अनंत शक्यता यांचा पट मांडतानाच सोशल मीडिया व्यासपीठांवर धूसर झालेली खाजगी-सार्वजनिक अभिव्यक्तीमधील सीमारेषा, संपादनाच्या प्रक्रियेअभावी त्यातील आशयाच्या सत्यासत्यतेविषयी निर्माण होणाऱ्या शंकांची चर्चा करणारे हे पुस्तक सोशल मीडियाबद्दल नवी दृष्टी-नवं भान देणारं आहे.”

‘#सोशल मीडिया’ या पहिल्या प्रकरणात विविध पद्धतीचा माध्यम-आशय निर्माण करण्यासाठी आजच्या काळात तांत्रिक, व्यावसायिक आणि साहित्यिक मूल्यांना अधिक महत्त्व कसे दिले जाऊ लागले आहे, यावर सखोल चर्चा केली आहे. या प्रकरणात २०१८-१९ पर्यंत जगभरात इंटरनेट आणि सोशल मीडिया नेटवर्क्स आणि त्यांचे ग्राहक (युजर्स) यांच्या वाढीवर आकडेवारीसह प्रकाश टाकला आहे. या माहितीच्या जोडीला मोबाइलधारक, सोशल मीडियावरील वापरली जाणारी भाषा, लोक सोशल मीडियावर घालवत असलेला वेळ (व त्याबरोबर केल्या जाणाऱ्या कमेंट्स) याबद्दल रोचक माहिती आहे.

‘सोशल मीडिया’ म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी या प्रकरणात या संकल्पनेच्या खोलात जाण्याचा अभिनंदनीय प्रयत्न आहे. या प्रकरणातील आंतरक्रिया (इंटरॅक्टिव्हिटी), सुविधा (अॅप्लिकेशन्स), आभासी समाज (व्हर्च्युअल रिअॅलिटी), सुधारणा (अपडेट्स) अशा काही संकल्पनांचा उल्लेख करायला हवा.

प्रेक्षक, श्रोते, वाचक यांचा आधुनिक माध्यम जगातील एक संयुक्त असा गट असलेल्या ग्राहकांनी निर्माण केलेला आशय (युजर जनरेटेड कंटेंट) सोशल मीडियाच्या विविध वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने समजावून दिलेला आहे. संवाद माध्यम क्षेत्रातील संशोधनामधून आलेल्या या सर्व संकल्पना महत्त्वाची संदर्भचौकट पुरवतात. यासाठी कॅप्लन आणि हैनलैन या संशोधकांनी विकसित केलेली ‘आशय समृद्धता व आभासी जगातील अस्तित्व यांचे प्रमाण’ विरुद्ध ‘स्वतःचे सादरीकरण व स्वतःहून माहिती देण्याचे प्रमाण’ या संकल्पनांचा तुलनात्मक तक्ता सोशल मीडियाची तर्कशुद्ध संरचना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. पारंपरिक माध्यमांपेक्षा सोशल मीडियाचे असलेले वेगळेपण, त्याचे वर्गीकरण तसेच त्याचे व्यक्तिगत पातळीवर होणारे फायदे, याबद्दलच्या उपयुक्त व सोप्या भाषेतील मजकुरामुळे आपल्याला या माध्यमाचा विस्तार समजून घ्यायला मदत होते. 

१९९० नंतर एकीकडे जगामध्ये आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली, तर दुसरीकडे तंत्रज्ञान, त्यातही माहिती तंत्रज्ञानाच्या जागतिक विस्ताराची आणि विकासाचीही सुरुवात झाली. सोशल मीडियाचा विकास हा या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या समांतर होता. त्या अनुषंगाने जगभरात आणि मर्यादित अर्थाने भारतामध्ये संगणक साक्षरता आणि हळूहळू इंटरनेट साक्षरता बाळसे धरू लागली होती. त्या टप्प्यापासून अगदी प्राथमिक अवस्थेतील सोशल मीडियाच्या प्रयोगापासून ते आजच्या अतिप्रगत व सर्वव्यापी अशा महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्या बनलेल्या सोशल मीडिया, यांची कालसुसंगत ऐतिहासिक सफर घडवून आणण्याचा प्रयत्न ‘वुई, द व्हर्च्युअल इंडियन्स...’ या प्रकरणात केला आहे.

‘सिक्स डिग्रीज डॉट कॉम’ (sixdegrees.com/), ‘फ्रेंडस्टर’, ‘हाय ५’ (hi5.com/), ‘ऑर्कुट’ (०rkut), ‘फेसबुक’ (facebook.com), ‘मायस्पेस’ (myspace.com), ‘लिंक्डइन’ (linkedin.com), ‘युट्युब’ (youtube.com), ‘ट्विटर’ (tweeter.com), ‘इन्स्टाग्राम’ (instagram.com) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा उदय आणि विकास कोणत्या वैशिष्ट्यांसह झाला याची उपयुक्त माहिती या प्रकरणात आहे.

सोशल मीडियाचा सामाजिक चळवळींसाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. त्या दृष्टिकोनातून सोशल मीडियाच्या शक्तिस्थानांचा येथे वेध घेतला आहे. पर्यटन, पर्यावरण संवर्धन या व अशा अनेक विशिष्ट क्षेत्रांचा अभ्यास, तसेच इतर अनेक समान उद्देश समोर ठेवून अनेक सोशल मीडिया ग्रुप्स आपल्या चळवळी सुरू करत आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या चळवळीत अधिकाधिक लोकांचा सहभाग निश्चित करणाऱ्या त्यांच्या मोहिमेची पुनर्व्याख्या करत आहेत.

यापुढील तिसरे (फेसबुकवरचे जग) आणि चौथे प्रकरण (ट्विटर आणि इन्स्टा...यहाँ सबकुछ ट्रेंडिंग है भाई!) यांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे काम कसे चालते, ग्राहक (युजर्स) यातील विविध फीचर्सचा वापर करून या माध्यमांचा कार्यक्षमतेने कसा वापर करू शकतात, याबद्दल तपशिलवार माहिती दिली आहे.

उदा. ‘फेसबुकवरचे जग’मध्ये वैयक्तिक प्रोफाइल, प्रायव्हसी (खाजगी) सेटिंग, ग्रुप आणि पेजेस (पब्लिक, क्लोज्ड, सिक्रेट ग्रुप), हे सर्व तपशील या सोशल मीडियावरच्या आशयनिर्मितीच्या संदर्भाने उपयुक्त ‘तांत्रिक टिप्स’ देतात. सोशल मीडियावरील लेखनासाठीची भाषा आणि (वैयक्तिक) विषय, विषय/घटनांतील नावीन्य (नव्याची नवलाई), आशयाद्वारे कृती चालना, गुंतवून ठेवणारे प्रश्न, समर्पक छायाचित्रे, व्हिडिओचा वापर, हॅशटॅगची उपयुक्तता, पोस्टची लांबी आणि पोस्ट करण्याची वेळ, पोस्टमधील सातत्य, प्रतिसाद या विविध बाबींचा बारकाव्यांसह आढावा घेतला आहे.

‘ट्विटर (microblogging) आणि इन्स्टाग्राम...’ या प्रकरणात या दोन्ही माध्यमांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. मागील प्रकरणाप्रमाणेच यामध्ये सुद्धा ट्विटर हॅन्डल आणि ट्विट, ट्विटर लिस्ट, पिन ट्विट, ट्रेंडिंग टॉपिक, व्हेरीफाईड (अधिकृत) अकाउंट, डायरेकट मेसेज, रिट्विट आणि एम्बेडेड ट्विट यांबद्दल माहिती आहे. त्याचप्रमाणे ट्विटरसाठी आशयनिर्मिती करण्यासाठी ज्या मर्यादाकक्षेत काम करणे आवश्यक आहे, त्याबद्दलची चर्चा आहे. ट्विटर माध्यम वापरण्यासाठी काही प्रसिद्धीभान साक्षरता आवश्यक आहे. त्याबद्दल प्रोफाइल, पाठीराखे (फॉलोअर्स), शब्दबंबाळ लेखनाची मर्यादा, आशयामधील वैविध्य, कन्टेन्ट क्युरेशन (आशय प्रदर्शन), हॅशटॅगचा वापर, प्रतिसाद (रिप्लाय) या ट्विटरच्या मूलभूत संकल्पनांची माहिती दिली आहे.  

याचप्रमाणे इंस्टाग्रामबद्दल होम टॅब, एक्सप्लोरर टॅब, कॅमेरा टॅब, ऍक्टिव्हिटी टॅब, प्रोफाइल टॅब, इंस्टाग्राम एक्सप्लोरर, व्हिडिओसाठी पर्याय अशा सुविधांबद्दल संक्षिप्त माहिती दिली आहे. इंस्टाग्रामच्या आशयनिर्मितीसाठी योगदान देणारे इंस्टाग्रामचे अकाउंट, छायाचित्रांचा ताजेपणा, हॅशटॅगचा वापर, प्रतिसादातील आंतरक्रिया या मुद्द्यांचा वेध त्यातील प्रक्रियेच्या अंगाने घेतला आहे.

‘ब्लॉगिंगची दुनिया’ आणि ‘यू-ट्युबवरची दुनियादारी’ या पाचव्या प्रकरणामध्ये या माध्यम प्लॅटफॉर्मचे वेगळेपण टिपताना लेखक म्हणतात - “सोशल मीडियाच्या इतर व्यासपीठांवर अपेक्षित नसलेली आशयांमधील प्रदीर्घता या दोन्ही व्यासपीठाच्या वापरकर्त्यांसाठी अनपेक्षित ठरत नाही. परंतु या दोन्ही व्यासपीठांवर (ब्लॉग आणि यू-ट्यूब) प्रदीर्घ आणि गंभीर आशयाची निर्मिती हे या व्यासपीठाचे वेगळेपण म्हणूनही विचारात घेतले जाते.”

ब्लॉगबद्दलच्या प्रकरणात ब्लॉगिंग प्रक्रियेचे मूलभूत घटक कोणकोणते आहेत, त्यावर प्राथमिक माहिती आहे. पुढे ब्लॉगिंगसाठी आवश्यक तांत्रिक माहिती विस्ताराने सांगताना लेखक कन्टेन्ट मॅनेंजमेंट सिस्टीम (CMS), की-वर्ड्स, सर्च इंजिन्स आणि सर्च इंजिन्स ऑप्टिमायजेशन, गुगलबॉट याविषयी त्यांच्या कार्यप्रणालीसह विस्तृत माहिती पुरवतात. ब्लॉगसाठी आवश्यक आशयनिर्मितीमधील महत्त्वाचे कळीचे मुद्दे समजावून सांगताना ‘गोष्ट सांगा, संवाद वाढवा’, ‘शब्दमर्यादा’, ‘चंकीग’, ‘की-वर्ड्सचा जाणीवपूर्वक वापर’, ‘आशय प्रकारातील वैविध्य’, ‘मोबाईलवर ब्लॉगचा वापर’ आणि ‘प्रतिसादाची आकडेवारी’ या मुद्द्यांबद्दल उपयोगी पडू शकतील अशा टिप्स दिल्या आहेत.

याच प्रकरणामध्ये ब्लॉग-पोस्ट किती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, याचे ढोबळ वर्गीकरण करून प्रकार सांगितले आहेत. यात उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये एखादी गोष्ट कशी करावी याची ‘कृती सांगणारी पोस्ट’, एखाद्या विषयाची ‘अधिक माहिती देणारी पोस्ट’, ‘चर्चेमध्ये असलेल्या विषयावर सविस्तर माहितीची पोस्ट’, ‘व्यक्तिचित्रण’, ‘यशोगाथांचे चित्रण’, ‘सर्वसमावेशक मांडणी’, ‘वैयक्तिक अनुभव (डायरी)’, ‘ससंदर्भ लेखन’, ‘लेखमाला’, ‘माहितीचित्र (इन्फोग्राफिक)’ आणि ‘जाहिरातवजा लेखन (प्रमोशन)’ यांचा समावेश होतो.

यू-ट्यूब संबंधित प्रकरणामध्ये यू-ट्यूब आणि यू-ट्यूब चॅनेलची तोंडओळख तसेच त्यातील सुविधा आणि कार्यप्रणाली समजावून सांगण्यात आलेली आहेत. यामध्ये प्लेलिस्ट, फिचर्ड व्हिडीओ, सब्स्क्रिप्शन या सुविधा प्रामुख्याने सांगितल्या आहेत.

यू-ट्यूबसाठी आशयनिर्मिती करताना युजर्स (दर्शक) यांना आपापल्या आशय स्थलांतरची मुभा (शेअरॅबिलिटी) तसेच सहज सोपी उपलब्धता, आकलनातील सुलभता, लोकप्रिय लोकांना सहभागी करून घेण्याचे प्रयोग, दर्शकांबरोबरील संवाद, दर्शकांना सहभागी होण्याची संधी, सातत्य आणि स्पष्टता या सर्वांची थोडक्यात मांडणी केली आहे. या प्रकरणात यू-ट्यूबचे दर्जेदार चित्रीकरण करण्यासाठीचे बरेचशे बारकावे त्यांच्या तांत्रिक तपशिलासह दिलेले आहेत. या तांत्रिक बाबींमध्ये दृश्य, ध्वनीमुद्रण योजना, प्रकाश योजना, कॅमेरा, चित्रीकरण, व्हिडीओ एडिटिंग आणि त्यांचे जतन याचे अद्ययावत माहितीच्या आधारे विश्लेषण केले आहे.

शेवटच्या प्रकरणामध्ये सोशल मीडिया आणि व्यावसायिक जग यांच्यातील संबंधाचा आढावा घेतला आहे. व्यावसायिक जगामध्ये वैयक्तिक पातळीवर तसेच संस्थात्मक पातळीवर नियोजनबद्ध आणि कार्यक्षम पद्धतीने सोशल मीडिया वापरण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी आणि त्यावरून अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी तसेच अधिक कल्पक आशयनिर्मितीसाठी सोशल मीडिया धोरणांची गरज असते यावर हे प्रकरण भर देते. परंतु हे सर्व करण्याआधी सोशल मीडियावरून संवाद वापरण्यामागचे मूळ कारण शोधणे, अपेक्षित लक्ष्यगट (target audience), लक्षात ठेवणे, सुयोग्य व्यासपीठ निवडणे, प्रभावी आशयाची निर्मिती हे सुद्धा कळीचे मुद्दे ठरतात, अशी भावना लेखकाने व्यक्त केली आहे.

याच्या पुढील पायरी म्हणजे सोशल मीडिया वापरासंबंधी धोरणांच्या उपयुक्ततेचा फेरआढावा. आपल्या सोशल मीडिया संवादाला प्रतिसाद कसा मिळत आहे याची चाचपणी करणे, त्यावर सतत लक्ष ठेवणे आणि इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा यात समावेश होतो. याच पद्धतीने व्यावसायिक कारणांसाठी ट्विटर, इंस्टाग्राम व यू-ट्यूब या समाज माध्यमांचा कसा प्रभावशाली वापर केला जाऊ शकतो याच्या विविध शक्यतांचा धांडोळा या प्रकरणातील पुढील भागात घेतला गेला आहे.

या पुस्तकात प्रस्तावनेमध्ये ‘प्रेडिक्टिव्ह अनॅलिटीक्स’ (विश्लेषणसूचक माहिती संकलन) या संकल्पनेचा उल्लेख आला आहे. ही संकल्पना नागरिकांच्या आणि ग्राहकांबद्दलच्या विविध माहितीचा राजकीय आणि व्यापारी कारणासाठी कसा वापर केला जातो, याकडे दिशानिर्देश करतात.

थोडक्यात ‘सोशल मीडिया’ या पुस्तकात पारंपरिक प्रसारमाध्यमांच्या पलीकडे जाऊन माध्यम-तंत्रज्ञानाच्या विस्तारणाऱ्या कक्षांना त्याच्या उपयुक्ततेनुसार समजावून सांगण्याचा चांगला प्रयत्न आहे. आपल्याकडे माध्यम साक्षरता कमी आहेच, पण त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ही आहे की, माध्यम प्रतिनिधींचे कौशल्य विकास-निर्मिती याकडे तितकेसे लक्ष दिले गेलेले नाही. विविध जिल्ह्यातील पत्रकार संघांनी आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पत्रकार संघ आणि विद्यापीठ स्तरावरील प्रशिक्षण-संशोधन विभाग यात संयुक्तपणे काम करू शकतात.   

...........................................................................................................................................

‘सोशल मीडिया’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4986/Social-Media

...........................................................................................................................................

लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.

creativityindian@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......