काश्मीरचे विलीनीकरण म्हणजे काय?
पडघम - देशकारण
डॉ. अविनाश गोडबोले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू-काश्मीरचा नकाशा
  • Thu , 08 August 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee पंडित नेहरू Pandit Nehru काश्मीर Kashmir कलम ३७० Article 370 कलम ३५-अ Article 35A

भारतीय राज्यघटनेतील ३७० व्या कलमातील तरतुदींचा अतिशय चतुराईने वापर करत आणि राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे कलम ३६७ मध्ये बदल करत केंद्र सरकारने आता जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा संपवला आहे. त्याबरोबरच संयुक्त जम्मू-काश्मीर राज्य सरकारचे अस्तित्व संपवून लडाख आणि जम्मू-काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या अध्यादेशानंतर ३५-अ हे विवादास्पद कलमदेखील रद्द झालेले आहे. पण तसे करताना काश्मीरमधील जनता आज आपल्याच घरांत नजरबंद आहे. काश्मीरमध्ये कलम १४४ द्वारे संचारबंदी आहे आणि मोबाईल, इंटरनेट तसेच टेलिफोन सुविधा बंद ठेवल्या आहेत. याचबरोबर अनेक संवेदनशील भागात केबल टीव्हीसुद्धा बंद आहे. असा मोठा बदल एका झटक्यात झाल्यानंतर आता याचे काश्मिरातील अंतर्गत राजकारणात आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणात काय परिणाम दिसून येऊ शकतात, याचा विचार करणे गरजेचे आहे.

कलम ३७० हा भाजपसाठी नेहमीच निवडणुकीचा मुद्दा राहिला आहे. कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेषाधिकार संपवावा ही मागणी भारतीय जनता पार्टी अणि त्याआधी जनसंघ करत आलेले आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जींचे १९५४ चे आंदोलन अणि त्यांचा श्रीनगर कारागृहातील मृत्यू हे या उजव्या विचारसरणीच्या पक्षासाठी संवेदनशील विषय आहेत. मुखर्जींच्या आंदोलनाची ‘एक देश में दो निशान, दो विधान, दो प्रधान नहीं चलेंगे’ ही एक लोकप्रिय घोषणा होती आणि आजही लोकांना आवडते. कलम ३७० असल्यामुळे काश्मीरचे भारतात पूर्णतः विलीनीकरण झालेले नाही आणि ३७० हटवल्याशिवाय होणारही नाही, अशी काहीशी आडमुठी राजकीय भूमिका भाजपने नेहमीच स्वीकारली होती.

त्याचाच परिणाम म्हणून कालच्या घोषणेनंतर देशात उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. म्हणजेच दिल्लीत कागदावर सह्या झाल्या की, विलीनीकरण झालेच, अशी काहीशी हवा निर्माण केली जात आहे. पण यामागेदेखील एक कारण आहे. आणि ते म्हणजे उजव्या विचारसरणीची विलीनीकरण या विषयाची संकुचित भूमिका. म्हणजेच कलम ३७० अस्तित्वात असेल तर कधीतरी काश्मीर भारतापासून वेगळा होणार, या भीतीमुळे कलम ३७० विरोधाचे राजकारण पुढे रेटले जात होते. खरं तर देश तोडण्यासाठी काम करणाऱ्या संघटना अणि व्यक्ती कधीच राज्यघटनेवर अवलंबून नसतात. (किंवा कितीही चांगली घटना आणि सरकारे आली तरीही त्यांचे काम थांबत नाही). पण देशभक्तीच्या राजकारणात तर्कशास्त्राला जागा नसते. कलम ३७० विरोधातली भीती ही याच तर्काच्या अभावामुळे निर्माण झाली होती.

‘कलम ३७० का आले?’ या प्रश्नाचे उत्तर काश्मीरच्या भारताशी विलीनीकरणाच्या करारात आणि काश्मीरच्या विशिष्ट इतिहासात आहेत. काश्मीरला विशेष दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेची सुरुवात १९२०च्या दशकात झाली आणि त्याची मुळे काश्मीरमधील डोगरा-पंडित आणि मुस्लिम या त्रिपक्षीय वादात होती, हे स्पष्ट दिसून येते. पण तेव्हा काश्मिरी पंडित या विशेषाधिकारचे समर्थक होते आणि मुस्लिम जनता याच्या विरोधात होती. ‘पंजाब प्रांतामधील धनाढ्य व्यापारी येऊन काश्मीरचे स्वरूप बदलतील’, या भीतीने या तरतुदी तेव्हा आल्या होत्या आणि पुढे विलीनीकरणानंतर कलम ३७० च्या स्वरूपात नियमित झाल्या होत्या.

विलीनीकरणाची व्यापक व्याख्या काय?

वाजपेयी पंतप्रधान असताना देखील ‘समान नागरी कायदा’, ‘राममंदिर’ आणि ‘कलम ३७०’ हे भाजपचे निवडणुकीचे मुद्दे असायचे. तरीही वाजपेयी यांनी काश्मीर प्रश्नावर चर्चेचाच मार्ग अवलंबला होता.

अमरजितसिंह दुलत यांच्या ‘Kashmir : The Vajpayee Years’ या अतिशय माहिती पूर्ण पुस्तकात वाजपेयी यांनी सामंजस्य अणि संयम दाखवत काश्मीरबरोबर कसा व्यवहार केला याची अनेक उत्तम उदाहरणे देखील आहेत. तेव्हा वाजपेयीप्रणीत त्रिसूत्री ‘इन्सानियत’, ‘झमूरियत’ आणि ‘काश्मीरियत’ (मानवता, शांतता आणि काश्मीरी लोकांच्या भावनांना महत्त्व) या पायावर विकसित झाले होते. काश्मीरसंबंधीचे हे ‘वाजपेयी-सूत्र’ आजही तिथल्या जनतेला आठवते आणि आवडते, कारण त्या काळात दिल्ली श्रीनगरशी मोकळ्या मनाने बोलायची आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेत असे.

नंतरच्या काळात मनमोहन सरकारने वाजपेयींच्या सद्भावनेवर काम न करता अनेक वर्षे वाया घालवली, हा इतिहास तर जगजाहीर आहे. पण त्यानंतर बहुमताने आलेल्या मोदी सरकारने तर ‘वाजपेयी-सूत्रा’कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. संपूर्ण बहुमताने आलेले सरकार अनेक सर्जनशील योजना आणू शकले असते, पण तसे झाले नाही. मोदी सरकारने हुर्रियत कॉन्फरन्सशी चर्चेचे दरवाजे पूर्णतः बंद केले, आणि त्या काळातच बुरहान वाणीच्या पिढीतले नवे अतिरेकी निर्माण झाले. जवळपास १५ वर्षांनंतर एका नव्या पिढीने नव्याने हत्यारे उचलली होती.

काश्मिरी जनतेने हिंसक मार्ग स्वीकारण्यामागची कारणे शोधताना पाकिस्तानला किंवा हुर्रियतला दोष देणे हा नेहमीच सोपा आणि सरधोपट उपाय आहे. काश्मिरी जनतेवर विघटनवादी नेत्यांचा प्रभाव आहे, कारण तिथल्या जनतेच्या मनात दिल्ली सरकारविषयी परकेपणा अणि वैमनस्याची भावना बळावली आहे. दिल्लीतील सरकार तुमचे ऐकत नाही आणि काही वेगळा विचार केला तर ISI हत्या करते (उदा. नामवंत, विचारी पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या) अशा ‘इकडे आग, तिकडे विहीर’ अशा परिस्थितीत काश्मिरी जनता अडकलेली आहे. वाजपेयींना काश्मीर खोऱ्यात अद्यापही आठवले जाते, कारण त्यांनी मोकळ्या मनाने जटील प्रश्न हाताळले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथल्या जनतेला विश्वासात घेतले.

मग ज्यांच्यासाठी आपण नियम बदलतो त्यांना नजरकैदेत बंद, त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळित करुन त्यांचा विश्वास आपण संपादन करू शकतो का? जे नेते तुमच्या सरकारमध्ये सहभागी होते आणि, देशाच्या निवडणुक-प्रक्रियेत सामील होतात त्यांना नजरकैदेत ठेवून कोणाची मने तुम्ही जिंकाल? जे नेते निवडणुका लढतात, तेच जर निर्णयप्रक्रियेच्या बाजूला केले जात असतील तर इतरांनी निवडणुका तरी का लढाव्यात?

विलीनीकरण म्हणजे फक्त भौगौलिक स्वरूपापुरती मर्यादित प्रक्रिया नसून काश्मिरातल्या जनतेला देशाच्या मुख्य स्वरुपात सहभागी करून घेणे, हा या प्रक्रियेचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मात्र आज काश्मिरातील युवकाला मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलुरूमध्ये घर भाड्याने घेणे किती कठीण आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपली राष्ट्रवादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष वर्तन यात किती अंतर आहे हे स्पष्ट होईल. अगदी काही काळापूर्वी लखनौमध्ये विनाकारण मारहाण सहन केलेल्या काश्मिरी गालिचा-विक्रेत्याला भारतविषयी विचारले त्याचे मत विचारले तरी संवेदनशील नागरिकांच्या मूलभूत संकल्पनांना धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दडपशाहीद्वारे तडकाफडकी कायदे बदलून, फटाके फोडत विजयाचा आनंद आपण व्यक्त करू शकतो. मात्र काश्मिरातील नागरिकांची मने जिंकून त्यांना सकारात्मक राजकारणात सहभागी करून घेण्याची जाणीव रुजवणे आज देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अधिक गरजेचे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

.............................................................................................................................................

मूळ लेख https://www.orfonline.org/marathi या पोर्टलवरून साभार. 

.............................................................................................................................................

रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......