अजूनकाही
भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष इतका उथळ बनेल आणि देशालाही उथळपणावरच आणून ठेवेल असं वाटलं नव्हतं. प्रत्येक राजकीय पक्षाची एक विचारधारा असते, तशीच कार्यशैली आणि कार्यसंस्कृतीही असते.
भारतीय जनता पक्षानं गंभीर राजकीय निर्णयाचंही ‘दहीकाला’ पद्धतीनं उत्सवीकरण करण्याचं तंत्र वाजपेयी काळापासूनच अंगिकारलं आहे. तेव्हा जी अणूचाचणी केली गेली, त्याची जाहीरातबाजी, ढोलताशे हे सगळंच बालिश होतं. कारण ती काही पहिलीच चाचणी नव्हती. इंदिरा गांधींनी सर्वांत आधी अणुचाचणी केली होती. कारण अणुचाचणी, अंतरिक्ष मोहिमा यावर जगाची नजर असते. त्याचे राजकीय, भौगोलिक परिणाम होऊ शकतात. कुठलाही देश सशक्त होत असताना जागतिक समूहाची त्यावर करडी नजर असते. या नजरेला खटकणार नाही, पण आपलंही भरणपोषण होईल अशी धोरणं आखावी लागतात. म्हटलं तर ही तारेवरची कसरत असते. पण यालाच ‘आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी’ म्हणतात. पंडित नेहरूंपासून मनमोहनसिंगांपर्यंत सर्व काँग्रेसी नेत्यांनी ही प्रगल्भता दाखवली. भाजपच्या जल्लोषी संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ती अगदीच रूक्ष वाटू शकते.
भारतीय जनता पक्ष ज्या संघपरिवाराच्या मुशीतून जन्मला आहे, तिथंच या उथळ जल्लोषाची बीजं आहेत. संघपरिवार जी हिंदू संस्कृती मानतो, ती पुरोहितशाहीची, व्रतवैकल्यं\सणवार\ उत्सव यांनी भरलेली, भारलेली आहे. त्यामुळे सनई चौघड्यांपासून रांगोळीपर्यंत सर्व साग्रसंगीत केलं की, ‘कार्य’ झालं असं मानणारा हा वर्ग आहे. त्यामुळे श्रीफळ वाढवण्यापासून सर्व गोष्टी मुहूर्तावर करण्याचा प्रघात या कार्यसंस्कृतीत आहे. संघ दावा करतो, त्याप्रमाणे संघात केवळ ब्राह्मण नाही तर सर्वच जातीजमातीचे लोक आहेत. असतीलही. पण हे प्रमाण संघात कमी, भाजपात जास्त! संघात आजही उच्चवर्णीय विशेषत: ब्राह्मणांचं प्राबल्य आहे!
संघाचा राजकीय विचार भाजपच्या माध्यमातून पुढे नेताना संघाचा ब्राह्मणी तोंडवळा बहुजन करण्यात संघाला यश आलं आहे. मात्र या बहुजनांना पुन्हा ब्राह्मणी धर्म\कार्यसंस्कृतीत अडकवण्याचे सफल प्रयोग भाजपमध्ये दिसतात. त्यामुळे संघविचाराप्रमाणे राष्ट्रवादाचा उन्माद पसरवताना भाजपमधला बहुजन कडवा हिंदू होऊन मुस्लीमविरोधी होतो. तेवढाच धार्मिकही होतो. मग सत्यनारायणाच्या पूजेपासून वसूबारसपर्यंत हे ब्राह्मणीकरण घडवलं जातं. म्हणजे एका बाजूला ब्राह्मणातला एक मोठा वर्ग अंधश्रद्धाविरोधी, बुद्धिप्रामाण्यवादी, निरीश्वरवादी, नास्तिक, विज्ञानवादी होत असताना शाहू-फुलेंची परंपरा सांगणारा बहुजन वर्ग मात्र भाजपच्या (आणि शिवसेना) नेतृत्वात टिळेधारी, गंडेधारी, महाराज-शिष्य आणि धार्मिक होताना दिसतो. त्यातूनच दहिहंडी, गणपती उत्सवातलं आक्रमक हिंदुत्व हे वारकरी भक्तीसंप्रदायातलं नसून पुरोहितशाहीतलं आहे, हे त्या भोळसट बहुजनांच्या लक्षात येत नाही. फक्त कधीतरी राजकारणात फटका बसला तर जागच्या जागी गाल चोळत ‘मायला ही बामनं लय हुशार’ असं पुटपुटण्यापलीकडे फार काही करू शकत नाहीत. कारण तोवर ते आपलं नशीब, कार्य, भविष्य हे ग्रह-ताऱ्यांवर अवलंबून आहे, हे मनोमन स्वत:लाच पटवून बसलेले असतात!
हा सर्व पट मांडण्याचं कारण भाजपचा निवडणुकीतला विजय असो किंवा एखादा राजकीय निर्णय असो किंवा घोषणा असो, त्याचे ढोलताशे बडवण्यात हाच वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. त्याला ‘घडलंय’ नक्की काय, याची माहिती फार कमी किंवा नसतेच. पण त्याच्यावर हे बिंबवण्यात आलेलं असतं की, ढोल पिटायची आणि आरोळ्या मारायची वेळ आलेली आहे. यातला अभिनिवेश ‘रामाचा विजय’ यापेक्षा ‘रावणाचं दहन’ याचा जास्त असतो. आणि तो इंजेक्ट केलेला असतो!
कलम ३७० आणि ३५-अ रद्द केल्यानं नेमकं काय काय होणार, हे अमित शहांच्या भाषणांचे व्हिडिओ यू-ट्युबवर पाहून ठरवणाऱ्यांना यावर फक्त ‘चेकाळायचं’ एवढंच माहीत असतं! गंमत म्हणजे संसदेत गृहमंत्रीही आपल्या निर्णयाचं लोकांना किती जल्लोषात स्वागत करावंसं वाटतंय, हे जाणून घेण्यासाठी संध्याकाळी टीव्ही लावा असं सांगत होते!
म्हणजे संसदेत हजर सदस्य, विरोधी पक्ष, ती चर्चा लाईव्ह पाहणारे नागरिक, (खरे) पत्रकार यापेक्षा गृहमंत्र्यांना अर्धवट माहितीवर ढोल बडवणारे उठवळ समर्थक महत्त्वाचे वाटतात. बरं हे सर्व समर्थक ज्या राज्याबद्दल निर्णय घेतलाय, तिथले नाहीतच! हे इतर राज्यातले. कधीतरी हनिमूनला काश्मीरला जायचं स्वप्न बघणारे किंवा अमरनाथ, वैष्णवदेवी भक्तीभावानं करून येणारे. शिकारातून सफर करून बायकोला हौसेनं काश्मिरी पोशाख घालून फोटो काढून घेणारे, वैष्णवदेवीला गंडा मिरवणारे, तिथल्या काठ्या जपून आणणारे, शाली\अक्रोड\बदाम\ केसर आणि शिलाजीत(ही) खरेदी करणारे!
कलम ३७०च्या राजकीय अजेंड्यापासून पूर्ण अनभिज्ञ आणि उजव्या टोळ्यांच्या राष्ट्रवादी प्रचाराला बळी पडून हरेक मुसलमान, काश्मिरी मुसलमान हा पाकिस्तानी समर्थक समजून काश्मीरमधून सुरक्षितपणे पुण्यात गेल्यावर स्थानिक चाणक्यांची पोपटपंची ऐकून ‘भारतमाते’बद्दल मत बनवणारा असा हा वर्ग!
याचा जल्लोष हा सरकारच्या निर्णयाच्या योग्य-अयोग्यतेचा पुरावा मानायचा? का गृहमंत्र्यांना हा सर्व पूर्वनियोजित स्टेज शो याच गॅलरीतल्या प्रेक्षकांसाठीच करायचा होता?
७० वर्षं लोंबकळत असलेला, भारताच्या संवेदनशील सीमावर्ती राज्यातील एक घटनात्मक पेचप्रसंग बनलेला, आंतरराष्ट्रीय समुदायाला आपापल्या राजकीय ईप्सितासाठी सुयोग्य असा भौगोलिक प्रदेश असलेलं हे राज्य. त्याचा निर्णय घेण्यासाठी ज्या पद्धतीचं नेपथ्य रचण्यात आलं, दहशतवादी हल्ल्याची शक्यता दर्शवत अमरनाथ यात्रा गुंडाळण्याचा प्रवेश लिहिला गेला, दोन दिवसांत संपूर्ण राज्य जवळपास लष्करी तळात बदललं गेलं, सर्व संपर्क, दळणवळण, संदेशवहन यंत्रणा बंद केल्या गेल्या. आणि संसदेत बहुमताच्या जोरावर काही तासांत ७० वर्षं अस्तित्वात असलेल्या राज्याचे दोन तुकडे करून, ते दोन्ही तुकडे केंद्रशासित केले गेले. एक तुकडा राजकीय प्रतिनिधित्वाशिवाय नुस्ताच केंद्राच्या अखत्यारित. संसदीय लोकशाहीचे सर्व संविधानिक नियम, संकेत गुंडाळत राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या अधिकाराचा वापर करून जो काही निर्णय त्या राज्यावर, पर्यायानं देशावर लादला, त्याचं उत्तर या उथळ जल्लोषात नि कृतक राष्ट्रवादी आरोळ्यात शोधायचं?
हा उथळ उठवळपणा इतक्या खालच्या स्तरावर की महाराष्ट्र राज्याचा एक कॅबिनेट मंत्री गणपती मिरवणुकीत नाचावा तसा भारताचा ध्वज घेऊन नाचला! एक राज्य संपवलं, केंद्रशासित केलं, यावर दुसऱ्या राज्याचा कॅबिनेट मंत्री नाचतो? हे म्हणजे गवताच्या गंजीतली सुई शोधायला त्या गंजीलाच आग लावण्यासारखं!
ज्यांची मुळंच प्रश्न विचारायचे नाहीत अशा भूमीत रुजलेली, त्यांच्याकडून राजकीय शहाणपण, प्रगल्भपणा आणि संयम यांची अपेक्षा करणं तसं चुकीचंच हे पुन्हा एकदा दिसून आलं. शंभरावर माणसं केवळ रांगेत उभी राहून मेली, त्या नोटबंदीचं समर्थन करणारेच काल पुन्हा ढोल बडवत होते!
याला ‘संमोहन’ म्हणणं फारच चुकीचं ठरेल. कालचा जल्लोष, समाजमाध्यमावरची उन्मादी भाषा, विकृत संदेश पेरणी, हे सर्व मूर्ख, बिनडोकपणाचं आणि संविधानिक लोकशाहीचं राजरोस वस्त्रहरण करणारं. एक वचन आहे- लोकांच्या लायकीप्रमाणे त्यांना सरकार मिळतं! प्रश्न एवढाच आहे, ही अशी ‘नालायकी’ आणखी किती वर्षं आपण सिद्ध करत राहणार?
.............................................................................................................................................
रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vishal Thorat
Thu , 08 August 2019
सर आपण जे विश्लेषण करताय ते खरच आज गरजेचं आणि सत्य परिस्थितीला अनुसरून योग्य आहे आणि आपण आपल्या शिवाजी महाराज शाहू महाराज आंबेडकर महात्मा फुले यांचे विचार विसरत नाही ना याचा पण विचार आपल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेला आला पाहिजे नाहीतर काही सत्ता पिपासू लोक आपल्या सामान्य जनतेला विकून कधी खातील हे पण कळणार नाही. तुमच्या सारख्या विचारवंतांची आता या देशाला गरज आहे.
???? ?????
Thu , 08 August 2019
धन्यवाद, आमची लायकी दाखविल्याबद्दल. उथळपणा हा आमच्या हिंदू संस्कृतीचा भाग झालाय आणि याला भाजपा जबाबदार आहे हे आम्हाला माहितच नव्हते. आम्ही उगाच समाजात होतो की जनतेने भाजपाला समजून उमजून निवडले आहे. पण भारतीय जनता उथळ, थिल्लर आणि इतरांच्या दुख्खात आनंद साजरा करणारी आहे हे देखील आजच कळले. अत्यंत बेजबाबदार आणि थिल्लर विश्लेषण. भारतीय ध्वजावर गाय कापून त्याचे फोटो टाकणारे फुटीरतावादी, जीवे जीवे पाकिस्तान म्हणून घोषणा देणारी मेहबूबा, 40 वर्ष भारतीय करादात्यांचा पैसा खाणारे अब्दुल्ला अगदी सज्जन आणि देवभोळे !!!! तुम्ही जुगाऱ्या सारखे आहात, आताचा डाव जिंकू म्हणत सगळं गमावतात आणि मग .... खरंय कॉंग्रेस सारखा विपक्ष लाभणे हे भाजपाचे आणि भारतीय जनतेचे नशीबच. असेच लिहत राहा.
Sachin Shinde
Wed , 07 August 2019
Agadi Khare bolalat Pan Lokana He kalnar Nahi Karan Tyanchya Dokyat Tevdhi Kalnari Buddhi Pahijena...........