अजूनकाही
“अल्पसंख्याक समाज हा बहुसंख्याक समाजाचा शत्रू आहे. त्यांच्यापासून बहुसंख्याकांना धोका आहे आणि त्यापासून आम्हीच आपले संरक्षण करू शकतो, हे पटवून देण्यात यशस्वी झाले की, बहुसंख्याकांचे धार्मिक ध्रुवीकरण पथ्यावर पडून, त्यांच्या मतपेढीवर कब्जा मिळवत लोकशाहीत बरेच काही मिळवता येते,” असे गॅरी कास्पारोव्ह या बुद्धिबळपटूचे लोकशाहीबाबतचे निरीक्षण सद्यस्थितीतल्या भारतातील सांप्रदायिक कलहप्रिय मानसिकतेला लागू पडते. २०११च्या जनगणनेनुसार भारतात विविध धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या हिंदू ७९.८ टक्के, इस्लाम १४.२ टक्के, ख्रिस्ती २.३ टक्के, शीख १.७ टक्के अशी आहे. बौद्ध आणि जैन धर्मीयांची संख्या प्रत्येकी एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. असे असताना बहुसंख्याकांना अल्पसंख्याक समुदायापासून धोका असल्याचे सातत्याने सांगितले जाते आहे.
नुकत्याच गाजलेला सोनभद्रमधील ‘नरसंहार’ आणि उन्नावमधील ‘कांड’ यांमध्ये मरणारे ‘हिंदू’ आणि मारणारेही ‘हिंदू’च आहेत. असे असताना भीती मात्र अन्य धर्मीयांकडून असल्याचे सातत्याने सांगितले जाते...
देशात सद्यस्थितीत धार्मिक, सांप्रदायिक आणि वांशिक भेदनीतीचा वापर करून सामाजिक ध्रुवीकरण करण्याची अहमहमिका सुरू आहे. विशेषत: मुस्लीम समुदायाच्या इतिहासपुरुषांच्या नावाने ही भेदनीती रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी हा प्रकार उत्तरेत होत होता, आता तो दक्षिणेकडेही वळला आहे.
नुकतेच कर्नाटकात सत्ताबदलाचे नाट्य संपून दोन दिवस होत नाहीत तेवढ्यात येडियुरप्पा सरकारने येत्या १० नोव्हेंबर रोजी राज्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करू नये, असा फतवा काढला आहे.
टिपू सुलतान क्रूर योद्धा होता आणि त्याने शेकडो हिंदूंची कत्तल केली, असा सांप्रदायिक द्वेष पसरवणारा प्रचार सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर टिपू जयंतीवादाचे राजकीय वळण समजून घेणे गरजेचे आहे. या वादाला असलेली सांप्रदायिक ध्रुवीकरणाची राजकीय किनार दिसल्यावाचून राहत नाही.
अझीम प्रेमजी विश्वविद्यालयात अध्यापन करत असलेल्या चंदन गौडा यांनी २०१६मध्ये ‘द हिंदू’ या दैंनिकात लिहिलेला लेख याबद्दल महत्त्वाचे संदर्भ आपल्यासमोर आणतो. त्यातील एक ठळक बाब म्हणजे- ‘२०१२च्या अखेरीस आताचे कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडून कर्नाटका जनता पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी मुस्लीम मतपेढीचा लाभ होण्यासाठी त्यांनी एका कार्यक्रमात टिपू सुलतान पराक्रमी योद्धा असून त्याच्या वीरश्रीचा आणि तलवारबाजीचा गुणगौरव केला होता.’ त्यानंतर दोन वर्षांनी मातृपक्षात घरवापसी होताच आणि आता नव्याने पुन्हा सत्तेत येताच येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानच्या जयंतीच्या विरोधात फतवा काढला आहे. भारतीय समाजात सांप्रदायिकता हवी त्या वेळेस, हवी त्या पद्धतीने राजकीय हत्यार म्हणून कशी वापरली जाते, हे यावरून लक्षात येते.
कर्नाटकातल्या म्हैसूर राज्याचा प्रमुख म्हणून टिपू सुलतानची १७५०-१७९९ या कालावधीतील कारकीर्द ‘जागतिक कीर्तीचा योद्धा’ म्हणून गणली जाते. युद्धनीतीमध्ये टिपू सुलतान अनेकांसाठी आदर्श आहे. टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्याच्या शोकगाथा स्थानिक लोककलांमधून १८व्या शतकाच्या शेवटी आणि १९व्या शतकातही अनेक वर्षे गायिल्या जात होत्या. कर्नाटकात टिपू सुलतानच्या मृत्यूवर ज्याप्रमाणे शोकगीते गायली गेली, तशी अन्य कुणाही राजाच्या मृत्यूनंतर गायिली गेल्याचे दिसत नाहीत.
१९व्या आणि २०व्या शतकात टिपू सुलतानच्या वीरगाथा सांगणारे हजारो कार्यक्रम राज्यभर झालेले आहेत. इतिहासाच्या अनेक क्रमिक पुस्तकांमधून आणि ‘अमर चित्रकथां’सारख्या लोकप्रिय साहित्यातूनही इंग्रजांसोबत लढणारा एक वीर योद्धा आणि हुतात्मा म्हणून टिपू सुलतानचा गौरव केलेला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १९७०च्या अखेरीस प्रकाशित झालेल्या ‘भारत भारती’ या मालेतील टिपू सुलतानच्या जीवनावर लिहिलेल्या संक्षिप्त कन्नड आत्मचरित्रातदेखील त्याचा देशभक्त आणि वीर योद्धा म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करताना कुठेही नकारात्मक टिपणी केलेली नाही.
अलीकडे मात्र राजकीय हेतू मनात ठेवून दक्षिणपंथी हिंदुत्ववाद्यांकडून टिपू सुलतानचे ‘कट्टर आणि धर्माभिमानी मुसलमान’ असे चित्र रंगवले व निर्माण केले जात आहे. त्यासाठी तत्कालीन म्हैसूर राज्याच्या दक्षिण सीमेलगत असलेल्या कुर्ग प्रांतातील कोडव समुदायाच्या लोकांची हत्या आणि मॅंगलोर परिसरातील कॅथोलिक ख्रिस्ती धर्मीयांचे जबरदस्तीने मुस्लीम धर्मात केलेले धर्मांतर, अशी दोन प्रमुख उदाहरणे दिली जातात.
या प्रतिमानिर्मितीबाबत हॉवर्ड कम्युनिटी कॉलेजच्या मायकेल सोराकोय या इतिहास-संशोधकांनी वेधलेले लक्ष महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मते १८व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात इंग्रजांसमोर टिपू सुलतानने मोठे सामरिक आव्हान उभे केले होते. मुख्य म्हणजे दक्षिणेत इंग्रजांना आवर घालणारा टिपू सुलतान हाच एकमेव योद्धा शिल्लक राहिलेला असताना इंग्रज अधिकारी, लेखक, चित्रकार आणि व्यंगचित्रकार यांनी त्याच्याविषयी सातत्याने मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण करणारे लेखन केले. या लेखनाद्वारे टिपूला मुस्लीम धर्माभिमानी आणि हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणारा, स्थानिक हिंदू आणि ख्रिस्ती लोकांचे सक्तीने धर्मांतर करणारा या भूमिकेत लोकांसमोर ठेवले. असे लेखन करण्यामागे म्हैसूर राज्याचा ताबा घेणे आणि आपले हित साधणे हा इंग्रजांचा कावा होता. त्यात ते यशस्वीही झाले.
मायकेल आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधतात. ते म्हणजे, “या नव्या लेखनप्रचारामुळे इंग्रजांना आपली प्रतिमा सुधारण्याला मदत झाली.” १९व्या शतकात इंग्रजी साहित्यातून टिपूची क्रूर आणि कट्टर धर्माभिमानी अशी प्रतिमा सातत्याने तयार करण्यात आली. इंग्रजांनी निर्माण केलेली हीच प्रतिमा आज दक्षिणपंथियांकडून उचलली जाते आहे आणि गंमत म्हणजे इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ (Devide and Rule) ची री ओढली जात आहे.
चंदन गौडा ‘द हिंदू’मध्ये लिहिलेल्या लेखात आणखी एका अभ्यासकाचा संदर्भ देतात. तो म्हणजे आशियायी इतिहासाच्या ऑस्ट्रेलियन अभ्यासक केट ब्रिटलबॅंक. त्यांनी दक्षिण भारताच्या १९व्या व २०व्या शतकातील इतिहासावर जगन्मान्य संशोधन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘टायगर - दि लाईफ ऑफ टिपू सुलतान’ या पुस्तकाला वैश्विक मान्यता आहे. टिपूवर जे आक्षेप घेतले जातात, त्यावर त्या म्हणतात, ‘म्हैसूर राज्याच्या विस्तारात त्याच्या दक्षिणेला असलेल्या कुर्ग आणि मेंगलोर प्रांताला आपल्या राज्यात सामील करताना १७८० ते १७९९ दरम्यान इंग्रजांविरुद्ध झालेल्या लहान-मोठ्या सततच्या लढायांत स्थानिक लोकांकडून वारंवार इंग्रजांना मदत केली जात असताना राज्यविस्ताराच्या सामरिक नीतीचा भाग म्हणून या प्रांतात प्राबल्य असलेले कोडव आणि ख्रिस्ती लोक युद्धात मारले गेले.’ राज्य विस्तार आणि राज्य करणे हाच राजाचा धर्म असतो. त्याला धार्मिक बाबींशी देणेघेणे असत नाही, हे सोयीस्कररीत्या विसरले जाते. हा आरोप करताना हिंदूंच्या श्रेंगेरी मठावर मराठी हिंदूंनी केलेले आक्रमण आणि मंदिराची लूट मात्र सोयीस्कररीत्या विस्मरणात ढकलली जाते, हे इथे ध्यानात घेणे गरजेचे आहे.
.............................................................................................................................................
हेही लेख पहा
टिपू सुलतान : जमातवादाचा बळी ठरलेला लोकोत्तर इतिहासपुरुष
https://www.aksharnama.com/client/article_detail/1445
टिपू सुलतानची खरी भीती कुणाला? - कलीम अजीम
https://www.aksharnama.com/client/article_detail/1446
‘सल्तनत-ए-खुदादाद’ : धर्मवेड्या, जमातवादी प्रचारास ठोस आव्हान देणारा ग्रंथ - राम पुनयानी
https://www.aksharnama.com/client/article_detail/2040
.............................................................................................................................................
टिपूच्या राजवटीतील प्रशासनाचे व्यवहार प्रामुख्याने तीन भाषांतून होत असत. त्यात पर्शियन, कन्नड आणि मराठी भाषेचा समावेश होता. त्याच्या दरबारातील सर्व महत्त्वाचे मंत्री सवर्ण म्हणजेच ब्राह्मण जातीचे होते. म्हैसूर राजदरबारात वडियार महाराणीला टिपूच्या विरोधात मदत करणारेही होते. टिपू सुलतानने राज्यातल्या अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्याच्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. त्याच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या वडियार राजांच्या परंपरेतला दसरा उत्सव दहा दिवस राजपरिवारातल्या सदस्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत होता. जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा कुठलाही दस्तावेज म्हैसूर राज्याच्या दप्तरी आढळत नाही. टिपू सुलतान धर्माभिमानी असल्याचेही आढळत नाही.
मराठा आणि निजाम यांना टिपू सुलतानने लिहिलेली पत्रे असे दर्शवतात की, इंग्रज हे या भूभागातले नवे शत्रू आहेत आणि भविष्यकाळात इंग्रजी राजवट या प्रदेशाला घातक ठरणार आहे. त्याचे हे राजकीय विचार आणि दूरगामी दृष्टी विचारात घेतल्यास टिपू सुलतान पहिला स्वातंत्र्यसेनानी ठरतो.
युद्ध तंत्रज्ञानातील म्हैसूर राज्याची प्रगती, आधुनिकीकरण आणि तत्कालीन फ्रेंचांनी त्याची घेतलेली दखल आजही कौतुकास्पद आहे. त्याच्या राज्यातील महसुली तंत्र, व्यवस्था आणि केंद्रीकृत नोकरशाही आजही अभ्यासकांत वाखाणली जाते.
टिपू सुलतानच्या वैयक्तिक ग्रंथालयात २००० पेक्षा जास्त ग्रंथसंपदा होती. त्याच्या मृत्यूनंतर या ग्रंथांची रवानगी इंग्लंडच्या ऑक्सफर्ड, केंब्रिज या विद्यापीठांत, कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजात तसेच रॉयल एसियाटिक सोसायटीत करण्यात आली. त्या ग्रंथांच्या विषयांवरून त्याच्या विविध विषयांच्या अभ्यासू वृत्तीच्या समृद्ध जाणीवेचा परिचय होतो.
हे सगळे पाहिल्यानंतर टिपू सुलतानला कशासाठी खलनायक म्हणून रंगवले जात आहे, हे वेगळे सांगायचे गरज नाही!
.............................................................................................................................................
‘हैदर अली, टिपू सुलतान स्थापित सल्तनत-ए-खुदादाद’ या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284
.............................................................................................................................................
आर. एस. खनके
sangmadhyam@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment