अजूनकाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ‘देशातील हिंदू धर्माला आणि संस्कृतीला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे. मॉब लिंचिंग आणि गो रक्षेच्या नावाखाली अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हिंदू धर्म बदनाम होत आहे.’ भागवतांचे हे म्हणणे काही प्रमाणात खरे असले तरी पूर्णतः खरे नाही. हे जाणून घेण्याकरता आपल्याला मागील काही वर्षांतील घटनांपासून वर्तमान काळातील घटनांकडे थोडे बारकाईने पाहावे लागेल. कारण या घटनांमधूनच हिंदू धर्माला नेमके कोण बदनाम करत आहे, याचे उत्तर मिळते.
२०१४ साली एनडीए सरकार (प्रचलित शब्द ‘मोदी सरकार’!) प्रचंड बहुमत मिळवून सत्तेवर आले. हे सरकार येताच संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि विचार करावयास लावणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत. (यूपीए सरकारच्या काळातदेखील अनेक घटना घडल्या आहेत!)
पुरोगामी विचारांचा वारसा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर (ऑगस्ट २०१३), कॉ. गोविंद पानसरे (फेब्रुवारी २०१५) यांसारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. एवढेच नव्हे तर जवळच्या राज्यातील गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्यादेखील हत्या झाल्या. त्यांची हत्या करणाऱ्या लोकांचा आणि संघटनांचा शोध घेतला जात आहे आणि त्याच्या संशयाची सुई सनातन संस्थेच्या लोकांभोवती फिरत आहे.
या देशात स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे रान करणारे अनेक नेते आणि सैनिक होऊन गेले. महात्मा गांधी हे अग्रभागी असणारे नेते. ज्यांच्या एका हाकेवर संपूर्ण देशातील जनता कोणताही धर्म, पंथ आणि जातीभेद न पाळता रस्त्यावर यायची. या नि:शस्त्र अशा महात्म्याचा नथुराम गोडसेनामक एका माथेफिरूने खून केला. त्याच माथेफिरू माणसाला या देशातील मोठमोठे नेते आणि खासदार ‘देशभक्त’ मानायला पुढे सरसावले आहेत. गांधींच्या विरोधात बोलायला हे लोक मागेपुढे पाहात नाहीत. हे लोक मोदी सरकारमध्ये मोठमोठ्या पदावर आहेत.आणि या सरकारच्या मुख्य संघटनेचे मोहन भागवत हे सरसंघचालक आहेत.
अखलाकची हत्या करण्यात आली, अनेकांना गो रक्षणाच्या नावाखाली मारण्यात आले. हे मारेकरी नेमके कोण आहेत? याची साधी तसदी घेऊन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यास हे सरकार का पाऊल पुढे सरसावत नाही?
नुकतेच गुरुग्राममधील एका युवकाला ‘जय श्रीराम’ म्हणावयास भाग पडण्याकरता मारहाण करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी देशाच्या राजधानीत पुण्यातील नामवंत डॉक्टर अरुण गद्रे यांना रस्त्यावर अडवून ‘जय श्रीराम’ म्हणायला बाध्य केले गेले. उत्तर प्रदेशातील आग्रा या ऐतिहासिक शहरात पूजा पांडे या हिंदू महासभेच्या नेत्यानी सावरकर जयंतीनिमित्त तेथील विद्यार्थिनींना चाकू वाटप केले. भारतीय जनता पक्षाच्या आमदार उषा ठाकूर या नथुराम गोडसेला ‘राष्ट्रवादी’ मानतात. बिहारमध्ये नितीश कुमारांनी इफ्तार पार्टी दिली म्हणून केंद्रीय मंत्री गिरिराजसिंग त्यांच्यावर टीका करतात.
नुकतेच उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये जे बलात्कार आणि हत्या प्रकरण घडले आहे, त्यात आरोपी असणाऱ्या भाजप आमदाराला खासदार साक्षी महाराज कारागृहात भेटायला जातात. कठुआमध्ये एका लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यात मुख्य आरोपी हा मंदिराचा एक पुजारी आहे. वाराणसीमध्ये साधू-संत मुस्लीम मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा विरोध करतात. कोलकातामध्ये ‘जय श्रीराम’ नाही म्हटले म्हणून एका युवकाला रेल्वेतून ढकलण्यात आले. तरबेज अन्सारी नावाच्या युवकाला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्ती करण्यात आली. त्यासाठी त्याला खांबाला बांधून मारण्यात आले. काही दिवसानंतर तो मरण पावला. ठाण्यातील कॅब ड्रायव्हरला रोखून ‘जय श्रीराम’चे नारे देण्यास बाध्य केले गेले. औरंगाबादच्या इम्रान इस्माईल नावाच्या तरुणास ‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी धमकावण्यात आले.
मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांना घाबरून नियाज खान या मुस्लीम अधिकाऱ्याने आपले नाव बदलायचा निर्णय घेतला. हे सर्व प्रकार या धर्मनिरपेक्षता बाळगणाऱ्या देशात घडणे ही चिंतेची बाब आहे. या घटनांची चर्चा आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीतही होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि भविष्यात अशा घटनांवर आळा घालण्यात यावा, यासाठी देशाच्या विभिन्न क्षेत्रांतील ४९ नामवंतांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.
आणि याच पत्रावर प्रतिक्रिया म्हणून सरसंघचालकांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या प्राची यांनी हिंदूंनी मुस्लीम लोकांकडून कावड विकत घेऊ नये, असे वादग्रस्त विधान केले; तर काही दिवसांपूर्वी जबलपूर येथे राहणाऱ्या अमित शुक्ला नामक एका व्यक्तीने झोमॅटो कंपनीच्या मुस्लीम डिलिव्हरी बॉयला त्याच्याकडील जेवण न घेता परत पाठवले. कारण ते श्रावण महिन्यात कोणत्याही गैर हिंदू व्यक्तीच्या हातचे भोजन स्वीकारत नाहीत. हा प्रकार इथेच थांबला नाही, तर एका वृत्तवाहिनीवर चर्चेसाठी गेलेल्या अजय गौतम नामक व्यक्तीने त्या वृत्तवाहिनीवर चर्चा सुरू असताना स्वतःचे डोळे बंद केले. कारण? निवेदक मुस्लीम होता!
मोहन भागवत आणि त्यांचे राजकीय संघटन असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या घटनांकडे जवळपास दुर्लक्ष केलेले दिसत आहे. प्रत्येक सरकारला वाटत असते की, धार्मिक मुद्द्याच्या भानगडीत पडून काहींवर कार्यवाही केल्यास ते आपल्या अंगलट येईल आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांत होईल. म्हणून कुठलाही राजकीय पक्ष या प्रकारा सहसा पडू इच्छित नाही.
मोहन भागवत यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो फार गंभीर आहे. पण तो देशात का उपस्थित झाला? मॉब लिंचिंग, गो रक्षणावरून लोकांच्या हत्या का होत आहेत? याकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलेले दिसून येते. त्यांनी आपल्या स्वयंसेवक असणाऱ्या लोकांना सल्ला देण्यापेक्षा सरकारच्या मोठ्या नेत्यांना किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या घटनावर आळा बसवण्याचा सल्ला द्यायला पाहिजे. परंतु असे होताना दिसून येत नाही.
या देशातील हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून हिंदू संकटात सापडले आहेत, हा एकमात्र संदेश देऊन भीतीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. या देशात बहुसंख्य हिंदू लोक राहतात, ही वास्तविकता आहे. त्याला कुणीच नाकारू शकत नाही. मात्र या बहुसंख्याक लोकांना कोण बदनाम करत आहे आणि ती ताकद कोणत्या लोकांमध्ये आहे, याचा ऊहापोह कुणीच करताना दिसत नाही.
सध्या देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे वारे जोरात वाहत आहेत. याला कुठेतरी थांबवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. कोण कुणाला बदनाम करत आहे हे सांगण्यापेक्षा ती बदनामी होऊ नये म्हणून तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा या धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या देशात धार्मिक दंगली होण्यास वेळ लागणार नाही.
.............................................................................................................................................
रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice
.............................................................................................................................................
लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.
mr.amitindurkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment