अजूनकाही
निर्भीड, सत्यान्वेशी आणि नि:पक्षपाती पत्रकार रवीश कुमारला यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका तरुण पत्रकारानं रवीश कुमारला दिलेली ही मानवंदना...
रवीश कुमार ‘Indian Institute Of Mass Communication’चे माजी विद्यार्थी, तर लेखक आजी विद्यार्थी.
.............................................................................................................................................
‘नमष्कार, मैं रविश कुमार...’ हे वाक्य ऐकलं की, त्या संयत आवाजात एक विश्वास जाणवतो आणि चेहऱ्यावरील त्या स्मितहास्यात एक आश्वासकता. रवीश कुमार, हे नाव आहे त्या पत्रकाराचं, जो बिहारमधल्या चंपारण्य जिल्ह्यातील मोतिहारी या छोट्या गावातून आपली स्वप्नं आजमावण्यासाठी दिल्लीच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’मध्ये १९९४ साली दाखल झाला.
आशिया खंडातला नोबेल म्हणून ज्याला ओळखलं जातं असा रॅमन मॅगसेसे पुरस्कार काल रवीश कुमारला जाहीर झाला आणि मलाच जणू पुरस्कार मिळाल्यासारखं वाटू लागलं. या माणसाशी कधी भेटही झालेली नाही, पण याच्याशी आपलं काहीतरी आंतरिक नातं आहे, अशी जाणीव माझ्यासारख्या कित्येक नवख्या पत्रकारांना का व्हावी? मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर रवीश कुमारच्या पत्रकारितेत आहे. शिक्षण, आरोग्य, महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, हिंसाचार या आणि अशा नानाविध प्रश्नांना पुरेपूर माहितीच्या सामग्रीसह थेट विवेकाला साद घालणाऱ्या आपल्या खास शैलीत श्रोत्यांसमोर मांडणारा हा जागल्या पत्रकार आहे!
रवीश कुमारला सुरुवातीला एनडीटीव्हीचं भव्यदिव्य ऑफिस नासाच्या ऑफिससारखं वाटत होतं! इंग्रजी भाषेचा बाऊ त्याच्या डोक्यावर इतका जबरदस्त बसला होता की बस्स! दिल्ली शहर, त्याचे रस्ते, ते उंचपुरे मॉल्स आणि त्या शहराचा तो वेग, त्याला सतत न्यूनगंडानं गिळायला उठायचा. पण तरीही तो मागे वळला नाही. ‘इश्क में शहर होना’ हे जणू त्यानं स्वतःशीचं पक्कं केलं होतं.
मीडिया ‘प्रिंट’पणाची कात टाकून आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नव्यानं दाखल झाला होता पत्रकारितेच्या एका नव्या ग्लॅमरस आणि प्रोफेशनल युगाची ती सुरुवात होती. बी.ए. हिस्ट्री शिकून आयआयएमसीमधून पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातून आपली पत्रकारिता पूर्ण करून रवीश कुमारने अल्प मानधनावर एनडीटीव्ही जॉईन केलं. राजदीप सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे ‘नव्या पत्रकारासाठी संधी आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात.’ त्या त्याला त्यांच्याच नेतृत्वाखाली एनडीटीव्हीमध्ये मिळाल्या. पण शहराचा धाक आधीच मनात बसलेल्या रवीश कुमारचा ऑफिसतील वावर एखाद्या भिजलेल्या उंदरासारखा होता. राजदीप सरदेसाईंचाही धाक असल्यामुळे सुरुवातीला कित्येकदा तो मागच्या दारानेच ये-जा करायचा. ‘तुम यहा रिपोर्टर बनने आये हो, या हिरो बनने? क्या देवानंद जैसे बाल बना रखे है?’ रवीश कुमारने वाढवलेल्या केसांवर राजदीप सरदेसाई ओरडल्याचं तो एका आठवणीत सांगतो.
आपला बिहारी गावंढळ बाज आणि मनातली भीती सोबत घेऊन रवीश कुमार दिल्लीच्या रस्त्यावरून वेगवेगळे नवे विषय शोधून त्यावर ‘रविश की रिपोर्ट’ बनवू लागला. त्याच्या बोलण्यातला बिहारी लहेजा आणि रिपोर्टिंग करताना कुठल्याही वातावरणात आणि परिस्थितीत मिसळून जाण्याचा लाघवीपणा, हा त्याच्या मांडणीचा कणा होता. निवडलेले विषय हे थेट सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याशी निगडित असायचे आणि ते विषय मांडण्यासाठी हसत-खेळत सहज मुद्दे पोहोचवण्याची त्याने वापरलेली पद्धतही तितकीच हटके असायची. कधी तो बिहारी कामगारांच्या ताटात जेवत जेवत त्यांच्यासोबत बोलायचा, तर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या मोर्च्यांत तो तरुणाच्या खांद्यावर हात टाकून सहजतेनं मित्रासारखा संवाद साधायचा. त्याचं असं मिसळणं हा त्याचा ‘प्लस पॉईंट’ होता.
‘रविश की रिपोर्ट’नंतर त्याला रात्री ९ ते १० हा ‘प्राईम टाइम’ स्लॉट मिळाला आणि ‘नमष्कार, में रविश कुमार...’ हे शब्द ऐकण्यासाठी अनेक जागरूक प्रेक्षक त्याची वाट पाहू लागले. चॅनेलवर चार-पाच आणि कधी कधी आठ-नऊ पॅनेलिस्ट बोलवून टीआरपी देणाऱ्या विषयावरील वांझोट्या चर्चांचं तावातावानं चर्वण करण्याच्या ट्रेंडला फाट्यावर मारत रवीश कुमार मात्र मोजक्या चार-पाच लोकांसोबत संयत पद्धतीनं आपल्या चर्चेला हाताळतो. जो विषय निवडलाय त्याच्या सुरुवातीला तो अशा पद्धतीनं साधकबाधक मांडणी करतो की, जेणेकरून श्रोत्यांना त्या विषयाची सगळी पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी. चर्चा सुरू झाल्यावरही इतर चॅनेल्सवर होणारा आरडाओरडा वा गोंधळ रवीश कुमारच्या स्क्रीनवर दिसत नाही! बोलताना असलेलं चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि हलकासा उपरोध वा कोपरखळीनं मुद्दा पोचवण्याची खास शैली हे त्याचं खासं वैशिष्ट्य!
आपल्या ‘प्राईम टाइम’मध्ये सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन उभा राहणारा हा सच्चा पत्रकार सातत्यानं झुंडशाहीला सामोरं जातो. कधी कधी २४ तास सतत येणारे धमक्यांचे फोन, मेल्स, मॅसेजेस आणि ट्रोल्सकडून सोशल मीडियावर होणारा हल्ला, हे सारं पचवून तो आपलं निखळ टवटवीत हास्य घेऊन स्क्रीनवर हजर होतो, तेव्हा माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला आशा वाटते.
‘हां, मुझेभी डर लगता है!’ असं प्रांजळपणे सांगत प्रयत्नपूर्वक त्या भीतीवर मात करत धैर्य एकवटणारा रवीश कुमार ‘डरा हुवा पत्रकार, मरा हुवा लोकतंत्र पैदा करता है’ असं म्हणतो, तेव्हा तो एका अर्थानं जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या चौथ्या खांबाच्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करणारा आशेचा दिवा बनून उजेड पेरू पाहत असतो!
२०१६ मध्ये आपल्या चॅनेलची पूर्ण स्क्रीन काळी करून ‘यहीं आज के टीव्ही की तसविर है’ असं म्हणत आजच्या पत्रकारितेची हरवलेली मूल्यं जगासमोर मांडणारा रवीश कुमार असो वा देशातील प्रश्नांवर न बोलण्यापेक्षा ‘क्या बागों मैं बहार है?’ असा प्रश्न विचारणंच आता फायद्याचं कसं आहे, असं उपरोधिकपणे म्हणणारा रवीश कुमार असो, त्याचा प्रत्येक ‘प्राईम टाइम’ देशातील नागरिकासाठी ‘नागरिक’ म्हणून आकलनाची परिपक्वता निर्माण करतो.
रवीश कुमारची दखल घेताना रॅमन मॅगसेसे पुरस्कार समिती त्याच्या या साऱ्या निडर कर्तृत्वाचा पुढीलप्रमाणे उल्लेख करते- “चर्चेचं संचालन करताना रवीश कुमार शांत, परंतु भेदक असतात. संबंधित विषयाची सांगोपांग माहिती त्यांच्यापाशी असते. ते पाहुण्यांवर कुरघोडी करायला जात नाहीत. आपलं म्हणणं नीट मांडण्याची पुरेशी संधी ते त्यांना देतात. मात्र अत्युच्च अधिकाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला, माध्यमांवर आणि देशातील सार्वजनिक चर्चेच्या स्तरावर टीका करायला ते कचरत नाहीत. यामुळेच या किंवा त्या बाजूच्या माथेफिरू पक्षपाती लोकांकडून त्यांना त्रास आणि धमक्या दिल्या जातात. या साऱ्या संकटांना आणि संतापाला तोंड देत दोषदर्शी आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार अशा माध्यमाचा अवकाश सुरक्षित राखून त्याचा विस्तार करण्याचं आपलं काम रवीश कुमार सातत्यानं करत आहेत. लोकांची सेवा हीच केंद्रस्थानी असलेल्या पत्रकारितेवर त्यांची दृढ श्रद्धा आहे. म्हणून रवीश कुमारनी पत्रकार कुणाला म्हणावं हे अगदी सोप्या शब्दांत थोडक्यात सांगितलंय, ‘तुम्ही लोकांचा आवाज बनला असाल तरच तुम्ही पत्रकार आहात.’
२०१९ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी रवीश कुमार यांची निवड करून विश्वस्त निधीचे संचालक अत्युच्च दर्जाच्या व्यावसायिक, नीतिमान पत्रकारितेशी असलेल्या त्यांच्या अविचल निष्ठेचा; सत्य, स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा यांच्या बाजूनं सतत उभे राहताना त्यांनी दाखवलेल्या नैतिक धैर्याचा आणि ज्यांना आवाज नाही त्यांना सन्मानपूर्ण आणि खणखणीत आवाज देण्यानं, धैर्यानं पण सौम्यपणे सत्तेला सत्य सुनावण्यानेच लोकशाही व्यवस्था प्रगतीपथावर नेण्याच्या आपल्या उदात्त ध्येयाची पूर्ती पत्रकारिता करते. यावरील त्यांच्या विवेकी विश्वासाचा सन्मान करत आहे.”
पुरस्कार मिळाल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना रवीश कुमार म्हणतो, “हा फक्त माझा सन्मान नाही, तर माझ्याकडे आशेनं पाहणाऱ्या त्या सर्वांचा सन्मान आहे. पत्रकार म्हणून जनतेच्या समस्यांना मी मांडू शकतो, असं वाटून मला समस्यांची अनेक पत्रं पाठवून माझ्याकडे विश्वासानं पाहणाऱ्या सर्वांचा हा सन्मान आहे. हे खरंय की, एकेकाळी ऑफिसमध्ये आलेल्या श्रोत्यांच्या चिठ्ठ्यांना वाचून वर्गीकरण करण्याचं काम मला सुरुवातीला देण्यात आलं होतं. तिथपासून ते ‘प्राईम टाइम’ स्लॉट हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. एखादा विषय घेऊन त्याचा संपूर्ण अभ्यास करून फक्त ४० मिनिटांत ४ लोकांसमवेत विषय हाताळणं अवघड असतंच. पण पत्रकारितेतील मूल्यांवरील विश्वासानं ते होत गेलं. सध्या पत्रकारितेत येऊ पाहणारे अनेक तरुण पत्रकार गुणवत्तेनं चांगले आहेत, परंतु प्रस्थापित माध्यमांचे संपादक खूप खराब आहेत. क्षमतेबाबत परिपूर्ण असूनही संधीअभावी अनेक नवे पत्रकार मागे पडतात. मी नव्या पत्रकारांना सांगू इच्छितो की, नोकरी टिकवण्यासाठी आपली पत्रकारिता मारून टाकू नका. त्यातून मुक्त व्हा. जनतेमध्ये विष पेरण्याचं वा टीआरपीसाठी भावनेच्या लाटेवर स्वार होणारे मुद्दे चघळणं, हे आपलं काम नाही.”
सत्य, चिकाटी आणि स्वातंत्र्यासाठी उभं राहण्याचं नैतिक धैर्य रवीश कुमारनं सातत्यानं दाखवलं आहे. ‘व्हॉइस ऑफ या व्हॉइसलेस’ बनलेला हा पत्रकार जेव्हा मॅगसेसे पुरस्कारानं नावाजला जातो, तेव्हा एक आयआयएमसीएन म्हणून हा पुरस्कार मलाच मिळाल्याचा आनंद होतो. कारण पत्रकारितेत उतरू पाहणाऱ्या माझ्यासारख्या आयआयएमसीएनची नाळ ही थेट रविश कुमारशी जोडली गेली आहे. आणि मग स्वतःच्या चेहऱ्यावर तेच स्मितहास्य ठेवून आणि बोलण्यात तोच सयंतपणा ठेवून म्हणावंसं वाटतं, ‘नमष्कार, मैं भी रविश कुमार...’
.............................................................................................................................................
रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice
.............................................................................................................................................
लेखक विनायक होगाडे नवोदित लेखक असून सध्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’मध्ये पत्रकारिता शिकत आहेत.
vinayakshogade@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment