अजूनकाही
१.
‘बलवंत वाचनालय’ ९९ वर्षं पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करणार, ही बातमी वाचली आणि वयाचे किती उन्हाळे पावसाळे उलटून गेले ते जाणवलं! कारण बलवंत वाचनालयाशी असलेली नाळ माझ्या बाल आणि तरुण वयातली आहे.
१९६६ सालच्या एका थंडीतल्या संध्याकाळी आम्ही औरंगाबादला आलो. एवढं मोठं गाव पहिल्यांदाच बघितलं म्हणून काहीसा बुजून गेलेलो होतो. अण्णा म्हणजे माझे वडील उद्योग खात्यात नोकरी करत होते. दोन दिवसांनी अण्णा कार्यालयातून घरी आले. चहा झाल्यावर म्हणाले ‘चल, आपण बलवंतमध्ये जाऊ’. मला काहीच कळलं नाही, पण सायकलवर बसायला मिळणार या अप्रुपापोटी त्यांच्यासोबत गेलो.
झाडाच्या सावलीत विसावलेल्या, आत जाणाऱ्या वाटेवर फुलांच्या कुंड्या शिस्तबद्ध मांडलेल्या, एका टुमदार इमारतीच्या समोर त्यांनी सायकल लावली. सायकल चालवताना विजारीला लावलेले गोल चिमटे काढून सायकलला अडकवले. आत गेलो तर खूप पुस्तकं होती आणि एका हॉलमध्ये जरा उंच असणाऱ्या उतरत्या टेबलावर वृत्तपत्रे लावलेली अनेक लोक शांतपणे वाचत होते. अण्णाही वाचनात गुंगले.
थोड्या वेळानं त्या शांततेला कंटाळूनच मी बहुदा परत जाण्याचा तगादा लावला असावा. अण्णांनी मला व्हरांड्यात आणून सोडलं आणि सांगितलं, ‘खेळ इथं तू, मी आलोच’. मग रस्त्यावरची वर्दळ बघण्यात मी गुंगून गेलो. रस्ता म्हणजे पायी जाणारी माणसं आणि बैलगाड्या एवढंच मला माहिती होतं. शिस्तीत पायी जाणारी टिपटॉप कपडे घातलेली माणसं, ये-जा करणारे सायकलस्वार, टांगे आणि क्वचित जाणारी एखादी मोटार अशी वर्दळ म्हणजे शहरातला रस्ता, हे औरंगाबादला आल्यावरच कळलं. ते बघण्यात मी गुंगून गेलो.
नंतर असं आठवड्यातून चार-पाच वेळा घडू लागलं. त्या इमारतीत मीही सराईतपणे वावरू लागलो. बलवंत वाचनालयाशी माझ्या झालेल्या पहिल्या ओळखीची अशी लख्ख आठवण आजही माझ्या स्मरणात आहे!
हळूहळू बलवंतमधे मीही वाचायला लागलो. विशेषत: रविवारच्या पुरवण्यांत बालकांसाठी येणाऱ्या मजकुराची गोडी अण्णांनी लावली. हळूहळू मी क्रीडा वगैरे करत मुख्य दैनिकांकडे वळलो. साप्ताहिक ‘स्वराज्य’ पहिल्यांदा इथेच वाचलं. त्यातल्या कथा जाम आवडत. एक कथा तर अजूनही अंधुक आठवते- एसटीच्या एका चालकाला बस चालवतानाच हृदयविकाराचा त्रास होतो, पण त्याही स्थितीत तो बस इप्सित स्थळी पोहोचवतो आणि मगच स्टिअरिंग व्हिलवर कोलमडून प्राण सोडतो, अशी त्याच्या कामावरील अविचल निष्ठेची ती कथा होती.
मग वेळ मिळेल तसं बलवंतमध्ये जाऊन, काही कळो अथवा न कळो वाचण्याचं वेडच मला लागलं.
दैनिक ‘मराठवाडा’चा पहिला अंक मी बलवंतमधेच वाचला. लोकसत्ता, मराठा, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकांची ओळखही इथलीच. इलस्ट्रेटेड वीकली, माधुरी, श्री, अमृत, विचित्र विश्व अशा अनेकांचीही जान-पहेचान इथलीच. या वाचनानं माझी भाषा विकसित होत गेली. अजूनही आठवतं- या वाचनानं शाळेत माझं मराठी इतर मुलांच्या तुलनेत चांगलं असायचं. मराठी साहित्य संस्थांच्या व्यवहारात आता एक बडं प्रस्थ असलेले डॉ. दादा गोरे आम्हाला विज्ञानवर्धिनी शाळेत मराठी शिकवत असत. मला त्यांच्या विषयात पन्नासपैकी कायम ४०-४२ गुण मिळत आणि त्याचं कौतुक दादा गोरे यांना असे. मी दररोज बलवंतमध्ये जातो, असं मी त्यांना मोठ्या ऐटीत सांगितलं होतं!
आमच्या घराला वाचनाचा संस्कार आणि छंदही होता. ते आम्हा भावंडांचं संचित आहे. वडिलांचा भर मराठी-इंग्रजी-उर्दू वृत्तपत्रं, साप्ताहिकं आणि मासिकांवर असायचा. माई म्हणजे माझी आई मात्र पुस्तकं वाचत असे. ती कामात असली की, अनेकदा वाचून दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर असे. माईची शिक्षा म्हणजे पाण्याच्या पितळेच्या पिंपात उभं करून पाठांतर करायला लावणं अशी असे.
बलवंत वाचनालयानं माझ्या या वाचनाच्या सवयीत भरच घातली. पुढे बलवंत वाचनालय निर्मितीची गरज का निर्माण झाली, त्यातून केवळ वाचन नाही तर देशभक्तीचाही संस्कार कसा रुजवला गेला, आ. कृ. वाघमारे यांचं हे वाचनालय उभारण्यातलं योगदान समजलं. अर्थात माझी पिढी तो काळ ओलांडून खूप नंतर जन्माला आलेली. आमच्यावरच्या वाचन संस्काराला फुलवण्यात बलवंत आणि पुढे तशा अनेक वाचनालयांचा मोठा हातभार लागलेला आहे. त्या अर्थानं माझ्यासारख्या अनेकांसाठी बलवंतसारखी वाचनालयं संस्कारालयसुद्धा आहेत. नोकरी मिळत नसल्याच्या निराश मूडमधेही हेच बलवंत वाचनालय माझ्यासाठी झुळूक असायची. वाचण्यात गढून गेलो की, ती निराशा लांब पळून जात असे.
वाचनाच्या याच ओढीतून पुढे मी सरस्वती भुवन महाविद्यालयात उन्हाळ्यात होणारा ग्रंथालय शास्त्राचा दीड महिन्यांचा कोर्स केला. नंतर पदवी मिळवल्यावर ग्रंथालय शास्त्रात पुढचं शिक्षण घेतलं. याही काळात बलवंत वाचनालयानं मला आधार दिला. पण, दोन वेळा संधी मिळूनही मी शासकीय सेवेत ग्रंथपाल झालो नाही, तर पत्रकारितेत शिरलो आणि स्थिरावलोही.
१९७८ साली पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं आणि बलवंतशी असलेला संपर्क तुटला. मध्यंतरी औरंगाबादला बदलून आलो, तेव्हा म्हणजे २०००मध्ये केव्हा तरी बलवंत वाचनालयात एकदा गेलो तर समोरचा रस्ता, इमारतीपासून सर्वच वातावरण, तिथले कर्मचारी परके भासले. आता म्हणजे २०१५ पासून औरंगाबादला स्थायिक झाल्यापासून अधूनमधून पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी त्या परिसरात गेलो, पण आत मात्र जाण्याची इच्छा झाली नाही, इतका जास्त परकेपणा दाटून आलेला. तरी ती तेव्हाची टुमदार इमारत मनात आणि माझ्या वाचन वेडाला खतपाणी घालणारा बलवंतचा संस्कार अजूनही कायम आहे!
बलवंत वाचनालयाची माझ्या मनातली ‘ती’ वास्तू. छायाचित्र सौजन्य- आशा कोरान्ने
२.
आपल्याकडे संस्कृती आणि सांस्कृतिक संचिताविषयी आत्मीयतेचं भान निर्माण करणारं शिक्षण कोणत्याच स्तरावर दिलं गेलं नाही. काही अपवाद वगळता तसा संस्कार घराघरातूनही व्यापक प्रमाणावर झालेला नाही आणि अजूनही होत नाही. त्यामुळे आपल्याकडे साहित्य, कला, संस्कृतीबद्दल बहुसंख्य लोकांत अनास्थाच आहे. काहींना तर ते सर्व तुच्छच वाटतं. युरोप, अमेरिकेत फिरताना हे आणि त्यांचं ते जतन केलेलं गतवैभव, त्याविषयी असणारी त्यांची आत्मीयतेची भावना बघताना मनात सल दाटून येत असे. सांस्कृतिक, ऐतिहासिक मोल असलेल्या इमारती आपल्याला कायमच स्वत:च्या प्रेमकथा कोरण्याची जागा किंवा खूप मोठी गर्दी करून पर्यटन नावाचा सोपस्कार उरकण्याचे स्थळ झालेल्या आहेत. (आता सेल्फी पॉईंट झालेल्या आहेत.) अशा वास्तूंचा व्यावसायिकांनी तर बाजारच कसा मांडलेला आहे, याचा शिसारी आणणारा अनुभव पदोपदी येतो. मग ते मंदिर असो की ताजमहाल की औरंगाबादचा बीबी का मकबरा किंवा दिल्लीतला लाल किल्ला म्हणा की दौलताबादचा किल्ला की कोणत्याही लेण्या! ग्रंथालयंही याला अपवाद नाहीत.
एशियाटिक लायब्ररीसारखे अत्यंत मोजके अपवाद वगळता बहुतेक ग्रंथालयं गेल्या ४०-५० वर्षांनंतर, आज किमान सुस्थितीत असणं तर सोडाच, गतवैभव गमावलेल्या आणि मोडकळीस आलेल्या, उसासे टाकणाऱ्या वास्तू झालेल्या आहेत... वाचन-संस्कृती लोप पावली किंवा वाचन-संस्कृतीचा संकोच झाला असा टाहो मी कधीच फोडणार नाही तरी, आपल्याकडील ग्रंथालये आणि तत्सम वास्तूंची अवस्था भग्नावस्थेकडे प्रवास करू लागलेली आहे, यात कोणतीच शंका नाही.
मला वाटतं याची एकूण कारणे चार आहेत-
एक - बहुसंख्य लोकांना वाचनासाठी ग्रंथालयात जाण्याची गरज हळूहळू कमी झाली. कारण क्रयशक्ती वाढल्यानं पुस्तकं खरेदी करण्याकडेलोकांचा कल झुकला, हे मी स्वानुभवानं सांगतो. मासिक उत्पन्न हजाराच्या घरात गेल्यापासून म्हणजे साधारण १९८२-८३ नंतर माझी ग्रंथालयात जाऊन बसण्याची सवय कमी होत गेली आणि हवी ती पुस्तकं खरेदी करण्याकडे कल वाढला. (औरंगाबादचे आमचे ‘स्वामी’ श्याम देशपांडे आणि नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राचे राजाभाऊ कुळकर्णी यांनी तर हप्तेवारीनं मराठी विश्वकोशासह हवी ती पुस्तकं दिली!) उत्पन्नात आणखी वाढ होत गेल्यावर घर खर्च भागल्यावर आणि अत्यावश्यक तेवढी अन्य खरेदी झाल्यावर धनसंचय करण्यापेक्षा किंवा ते धन कुठे तरी गुंतवून ठेऊन वाढवण्यापेक्षा पुस्तक खरेदीचा वेगही वाढत गेला. माझ्या मित्र परिवारातील जवळ जवळ प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. आजवर माझी पुस्तकांची खरेदी कमीत कमी १० हजारांवर आहे आणि त्यातली दोन एक हजार तरी पुस्तके मी भेट म्हणून किंवा कुणाला तरी गरज वाटते त्याला दिलेली आहेत.
आज प्रथमच सांगतो, अमर हबीब या मित्रानं अंबाजोगाईत काव्यसंग्रहाचे ग्रंथालय करायचं ठरल्यावर माझ्याकडचे सुमारे ४०० कवितासंग्रह तेव्हा नागपूरहून पाठवले. पण ते असो.
दोन - आपल्या राज्यकर्त्यांची म्हणजे तमाम लोकप्रतिनिधींची सांस्कृतिक समज खुजी आहे. साहित्य (यात वाचन-संस्कृतीला उत्तेजन देणं म्हणजे ग्रंथालयंही आली), संगीत (याला ऑर्केस्ट्रा अपवाद!), मूर्तीकला, चित्रकला याबद्द लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कळकळ वाटत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना भांडारकरवर हल्ला करण्यात थोरपण वाटतं. दर वर्षी मराठी साहित्य संमेलनाला मदत केली की, आपली जबाबदारी संपली अशी सत्ताधाऱ्यांची उथळ समज आहे. न वाचणारेही लोक या आर्थिक मदतीवरून नाहक वाद घालत बसतात.
थोडक्यात सरकार आणि समाज अशा दोन्ही पातळीवर या संदर्भात उदासीनता आणि खुजेपणाही आहे. खरं तर, प्रत्येक राज्य सरकारनं वर्षाला २००-३०० कोटी रुपयांचा निधी सर्वच प्रकारच्या साहित्य आणि कलाप्रवाहातील उपक्रमांसाठी कृतज्ञतेची भावना म्हणून राखून ठेवला पाहिजे, अशी माझी भूमिका कायमच राहिलेली आहे.
तीन - जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आणि माहितीचे मायाजाल म्हणजे इंटरनेट आल्यावर कुठे जाऊन माहिती जमा करावी, नोंदी काढव्यात, त्यासाठी चार पुस्तकं वाचावीत, डिक्शनरी उघडून शब्दांचे अर्थ शोधावेत, अशी गरजच उरलेली नाही. चालता-बोलता एका बोटानं केलेल्या एका क्लिकवर माणूस वृत्तपत्र वाचतो, त्याला सर्व माहिती, पुस्तकं, संगीत... हवं ते उपलब्ध झालेलं आहे. हे ज्ञान नसून केवळ माहिती आहे हे त्यालाही ठाऊक असतं, पण त्याची गरजच तेवढी असते. माहितीकडून ज्ञानाकडे लोकांना वळवण्यात आपण फारसे यशस्वीच झालेलो नाहीयेत. वाढत्या उत्पन्नातून चैन करणं बहुसंख्य लोकांना जितकं गरजेचं वाटतंय तितकं घरात वर्षाला पाच-पन्नास पुस्तकांची खरेदी करावी, चार चित्र लावावीत, अवीट संगीत संग्रही ठेवावं असं वाटत नाही.
चार - या सर्व पार्श्वभूमीवर जे बदल करायला आणि ते करवून घेण्यात आपल्याकडच्या ग्रंथालयासारख्या उपक्रमांना पूर्ण अपयश आलं. ते करवून घेण्याची निकड भासणारं भान, ज्ञान आणि पात्रता असणारं व्यवस्थापनही सर्वांना लाभलेलं नाही, ही देखील आणखी एक बाजू आहेच. डिजिटायझेशनच्या वेगाशी वाचकांनी जुळवून घेतलं आणि दुनिया त्याच्या मुठीत आणलेली असताना सरकारच्या अनुदानावर जगण्याची ग्रंथालयांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांची भिस्त वाढतच गेली.
आपल्यात म्हणजे समाजात काळानुरुप बदल झाले. तसे बदल अपरिहार्यही असतात. पण ते सर्वच बदल आपली संस्कृती आणि संचित जोपासण्याला पूरक ठरणारे झालेले नाहीत. सांस्कृतिक भान विकसित करण्यात हे बदल फार काही पूरक ठरले आहेत, असंही म्हणताच येणार नाही.
बलवंत वाचनालयाचा शतकाच्या दिशेनं सुरू झालेला प्रवास संस्कृती आणि संचित जोपासण्यास आपल्याला प्रवृत्त करो, आपल्यातलं सांस्कृतिक भान प्रबळ करो, याच सदिच्छा....
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
dhaygude ganesh
Wed , 25 December 2019
मस्त