‘हॉब्स अँड शॉ’ : रंजक, मात्र विस्मरणीय प्रकारात मोडणारा चित्रपट 
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘हॉब्स अँड शॉ’मधील एक प्रसंग
  • Sat , 03 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie फास्ट अँड फ्युरिअस Fast & Furious हॉब्स अँड शॉ Hobbs & Shaw

‘फास्ट अँड फ्युरिअस’ मालिका काही जगप्रसिद्ध चित्रपट मालिकांपैकी एक आहे. ‘हॉब्स अँड शॉ’ म्हणजे याच एव्हाना आठ चित्रपट येऊन गेलेल्या चित्रपट मालिकेतील दोन पात्रांवर आधारित असलेला स्वतंत्र चित्रपट आहे. नावीन्य हरवून बसलेल्या या ‘फास्ट अँड फ्युरिअस’ फ्रँचाइजमधील हे नवीन प्रकरणही ‘रंजक, मात्र विस्मरणीय’ या शब्दांना जागणारं आहे. अर्थात जशी सलमान खानच्या चित्रपटांकडून काहीतरी अविस्मरणीय पाहण्याची अपेक्षा ठेवत नसतो, तसंच काहीसं या फ्रँचाइजबाबतीत असल्याने ही काही विशेष तक्रार असू शकत नाही. त्यामुळे हे मुख्य प्रवाहातील चित्रपट रंजक आहेत, इतकं कौतुकही पुरेसं ठरतं. 

हॅटी (व्हेनेसा कर्बी) ही ब्रिटिश गुप्तचर संस्था ‘एमआय ६’मधील एजंट एका महत्त्वाच्या कामगिरीच्या मध्यात असताना चित्रपटाला सुरुवात होते. तिला आणि तिच्या टीमला ‘स्नोफ्लेक’ नामक एक व्हायरस दुष्ट लोकांपासून वाचवत सुरक्षित ठिकाणी पोचवायचा असतो. ‘इटिऑन’ ही कुरापती दहशतवादी संघटना हा व्हायरस हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहे. तिचा सर्वेसर्वा अज्ञात असला तरी ब्रिक्स्टन (इड्रिस एल्बा) हा पूर्वाश्रमीचा शॉचा सहकारी आता इटिऑनच्या सायबर-जेनेटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभेद्य बनला आहे. तोच इटिऑनसाठी काम करत हा व्हायरस हस्तगत करू पाहतोय. परिणामी त्याच्यापासून व्हायरस वाचवण्यासाठी हॅटी तो व्हायरस स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करते. मात्र, सरकारी यंत्रणा आणि माध्यमांवर नियंत्रण असलेली इटिऑन सगळ्या प्रकरणात तीच दोषी असल्याचं चित्र तयार करते. साहजिकच तिला पकडणं नि जगाला वाचवणं याची जबाबदारी काही कारणानं हॉब्स आणि शॉ या जोडगोळीवर येऊन पडते. 

लूक हॉब्स (ड्वेन जॉन्सन) आणि डेकर्ड शॉ (जेसन स्टेथम) ही चित्रपटाला त्याचं शीर्षक मिळवून देणारी पात्रं यापूर्वीच्या ‘फास्ट अँड फ्युरिअस’पटांमध्ये एकमेकांसमोर उभी ठाकलेली आहेत. अर्थातच आता जगाचा अंत जवळ आला असल्याने जगाला वाचवण्यासाठी आपल्या या एकमेकांशी अजिबातच न पटणाऱ्या नायकांनी आपले वैयक्तिक रुसवे-फुगवे बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं आहे, या मूलभूत कथानकावर चित्रपटाच्या कथानकाचा डोलारा उभा राहतो. त्यातही पुन्हा हॅटी शॉची बहीण असल्याचं कळतं. ज्यामुळे ‘फास्ट अँड फ्युरिअस’पटांतील मूलभूत संकल्पनांपैकी एक असलेली, कुटुंब ही संकल्पनाही इथे समाविष्ट केली जाते. जगाला वाचवणं आणि कुटुंबाची विस्कटलेली घडी सुरळीत करणं अशी दुहेरी कामगिरी आपल्या नायकांना करावी लागते. 

या बऱ्याच मूलभूत आणि काहीशा रटाळ कथानकापलीकडे जाऊन काहीतरी उल्लेखनीय करण्याइतपत वाव क्रिस मॉर्गन-ड्र्यू पीअर्स यांच्या पटकथेत नसला तरी दिग्दर्शक डेव्हिड लीच दिलेल्या कथेच्या परिणामाला अधिक उंचावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पूर्वाश्रमीचा स्टंटमॅन आणि आता ‘अ‍ॅटॉमिक ब्लॉंड’सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेला डेव्हिड लीच पूर्वार्धात ‘हॉब्स अँड शॉ’ला रंजक आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यात नक्कीच यशस्वी होतो. लीच यापूर्वी ‘जॉन विक’ (२०१४) या चित्रपटाचा (तसं श्रेय न दिला गेलेला) दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथे पूर्वार्धात ‘जॉन विक’ अधिक ‘द हिटमॅन्स बॉडीगार्ड’ (२०१७) असा संमिश्र स्वरूपाचा, चांगल्या अर्थाने उल्लेख करावासा चित्रपटाचा अ‍ॅक्शन-कॉमेडीचा सूर सदर दिग्दर्शकाच्या प्रयत्नांचं यशस्वी रूप मानता येतो. मुख्यत्वे तो ड्वेन जॉन्सन आणि जेसन स्टेथम या सर्वस्वी भिन्न अभिव्यक्ती असलेल्या अभिनेत्यांना (आणि पात्रांनाही) एका दृश्यचौकटीत कसा आणतो, यामध्ये चित्रपटातील विनोदाचं यश दडलेलं आहे. बाकी या दोघांच्या या चित्रपटात व्हेनेसा कर्बीला फारसा वाव नाहीच. अगदी खलभूमिकेतील इड्रिस एल्बादेखील लिखाणाच्या स्तरावर अपरिणामकारक आहे. 

उत्तरार्धात मात्र चित्रपटाची ही न्यूनतम पातळीवरील कल्पकता हरवून जाते. आणि त्याची जागा ‘फास्ट अँड फ्युरिअस’ फ्रँचाइजच्या चाहत्यांना आवडेलशी अतर्क्य मारधाड घेते. सुरुवातीला कधीतरी ही पात्रं टोलेजंग इमारतीवरून उड्या मारताना दिसतात. किंवा उत्तरार्धात जॉन्सन हाताने साखळी ओढत हेलिकॉप्टर जमिनीनजीक ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. चित्रपटात उत्तरार्धात या धाटणीचं बरंच काही घडत राहतं. दिग्दर्शक लीच सदर चित्रपट मालिकेच्या नावाला आणि चित्रपट निर्मिती संस्था तसेच प्रेक्षकांच्या अपेक्षांना जागत कार चेसेस, नायक-खलनायकांच्या हाणामाऱ्या समोर आणतो. पण आधी उल्लेख केलेला अॅक्शन-कॉमेडीचा सूर हरवलेला असतो. आता फक्त आणि फक्त अतर्क्य अ‍ॅक्शन बाकी असते. 

असं असलं तरी तो या रटाळ उत्तरार्धापेक्षा चित्रपटाचा पूर्वार्ध किती वेगळा, नेटका नि रंजक बनवतो हे पहाण्यासारखं आहे. छायाचित्रकार जोनाथन सेलासोबत मिळून तो काही अ‍ॅक्शन दृश्यं कुशलतेनं समोर उभी करतो. तर त्याचा आणखी एक कोलॅबरेटर, संगीतकार टायलर बेट्स या दृश्यांना पूरक अशी सांगीतिक जोड देऊ करतो. 

दिग्दर्शक डेव्हिड लीच चित्रपटाला फार तर सुसह्य बनवतो. मात्र, सदर चित्रपट मालिकेची वैशिष्टयं (?) म्हणावीत अशी अतर्क्य दृश्यं नि कथाबीजं असलेली पटकथा चित्रपटाला रटाळ बनवते. ज्यामुळे शेवटी चित्रपट रंजक, मात्र विस्मरणीय प्रकारात मोडणारा ठरतो. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख