अजूनकाही
रवीश कुमारला पत्रकार म्हणणे हे त्याचे संकुचितपणे केलेले वर्णन ठरेल. सर्व पदव्या आणि विशेषणांच्या पलीकडे तो जीवनाच्या गोष्टी सांगणारा एक आधुनिक कथाकार वाटतो. रवीशने १९ वर्षांपूर्वी बातमीदारी करायला सुरुवात केली आणि अगदी सुरुवातीपासून त्याने हे ओळखले की दूरचित्रवाणी (टीव्ही) हे आशयसूत्रांचे (narratives) माध्यम आहे. सामान्य माणसाला आपल्या वाटाव्यात अशा बातम्या त्याने शोधल्या. त्यामुळेच त्याने बातमीला एका गोष्टीच्या स्वरूपात - ज्यामध्ये प्रारंभ, मध्य आणि शेवट आहे - अशा कथांच्या रूपात रचण्यास सुरुवात केली. ही गोष्ट प्रत्येक प्रेक्षकाला आपली वाटते, यातच त्याने त्याचे शो पाहणाऱ्या सर्व नागरिकांशी नाते गुंफले. नेहमी शोध घेत राहण्याची ऊर्मी आणि सत्याचे समर्थन, वकिली करण्याचा त्याचा ध्यास कदाचित त्याच्या यशाचे रहस्य असेल. तेच कदाचित आज त्याला जाहीर झालेल्या ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारामागचे कारण असेल.
दूरचित्रवाणीमधील वेळ किंवा संवाद हा एकरेषीय असतो, तो फक्त एकाच दिशेने वाहतो. आता हा अगदी सामान्य बुद्धीला साजेसा तर्क वाटेल, परंतु आपल्याला नेहमी अनुभवास येणारी ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा आपण काही वाचतो, तेव्हा आपल्याला काही शब्द, ओळी किंवा संपूर्ण परिच्छेद गाळून पुढे उडी मारण्याची मुभा असते. तसेच जे आपल्याला समजले नाही, ते मागे जाऊन परत वाचण्याची सोय असते. खरं तर हे म्हणजे काळाचा पुनःप्रत्यय येण्यासारखे आहे. परंतु ताजी बातमी ही वर्तमानात थेट उलगडत असते. तिचा भूतकाळात जाऊन वाचण्याच्या अनुभवासारखा पुनःप्रत्यय घेता येत नाही. समजा तुमची पकड मध्येच सैल झाली तर प्रेक्षक तुमच्याकडे फिरकतसुद्धा नाही. दूरचित्रवाणीच्या माध्यमाचे हे वास्तव आहे.
रवीश कुमारने याचे महत्त्व ओळखून एक अनोखी आणि कदाचित एकमेव अशी शैली विकसित केली, ज्यामध्ये जशी जशी बातमी किंवा त्यातील खरी घटना उलगडत जाते, तसे तो प्रेक्षकांना त्यात खेचत जातो. लाखो करोडो लोक व्यावहारिकदृष्ट्या निरक्षर असणाऱ्या आपल्या देशामध्ये, त्या प्रकारच्या लोकांना पटकन ध्यानात येणाऱ्या अशा आशयसूत्र शैलीने सांगितलेली बातमीची गोष्ट सहज लक्षात राहते, हेसुद्धा त्याच्या शैलीचे एक वैशिष्ट्य आहे. सर्व महान कादंबरीकार आणि चित्रपट दिग्दर्शक यांच्या कलेमध्ये असणारी कथाकाराची सर्व तंत्रे आणि युक्त्या, रवीश कुमारच्या दृश्यात्मक आणि भाषाशास्त्रीय शैलीमध्ये विरघळून जातात. उच्च दर्जाच्या कलात्मक भाषेतून तो रस्त्यावरील फेरीवाल्याच्या बोलीभाषेत अलगदपणे केव्हा जाऊन पोचतो, ते कळतसुद्धा नाही.
पण फक्त एक कुशल व प्रसिद्ध कथाकार म्हणून मान्यता मिळाल्यामुळे रविश कुमार श्रेष्ठ म्हणून सिद्ध होत नाही. पत्रकारितेची स्व-प्रतिमा ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आजही कायम आहे. सरकार, शासनाच्या संस्था, अर्थव्यवस्था, राजकारणी नेतेमंडळी आणि समाजातील उच्चभ्रू गट यांच्याकडून माहिती काढून घेऊन लोकांपर्यंत दूरवर पोचवणे, हे पत्रकारितेचे काम आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे का हे तपासण्यासाठी नागरिकांना माहितीचे अस्त्र पुरवणे हे वृत्तमाध्यमांचे काम असते. सत्य सांगण्याची जी पद्धत असते, ती निष्पक्ष आणि संतुलित असावी, अशी पत्रकारांची धारणा असते. पारंपरिक पद्धतीनुसार बातमीच्या दोन्ही बाजूना समान महत्त्व देणे असा संकेत आहे.
.............................................................................................................................................
रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice
.............................................................................................................................................
रवीश कुमारने जाणीवपूर्वक या प्रस्थापित शहाणपणाचा (Conventional Wisdom)चा त्याग केला. आपल्या समाजातील ज्या लोकांना स्वतःचा आवाज नाही अशा बहुसंख्य निनावी लोकांची कथा सांगण्याची त्याची इच्छा होती. यामध्ये बांधकाम कामगार होते; बेघर, विधवा महिला होत्या; शाळेतील मिड-डे-मिल (मध्यान्न भोजन)ची वाट बघणारी मुले होती; खाटीक होते; मेणबत्त्या आणि पाव बनवणारे लघु-व्यावसायिक होते. पण त्यांची काहीतरी ओळख असावी अशी रवीश कुमारची भावना होती. दररोजच्या जीवनातील संघर्ष असलेले ते एक स्वतंत्र नागरिकसुद्धा आहेत.
प्रसारमाध्यमांत येणाऱ्या संसदेतील नवीन विधेयकाच्या हेडलाईन इतकेच या निनावी लोकांचे दैनंदिन संघर्ष आपल्या लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहेत. या अदृश्य लोकांना आपल्या दैनंदिन अनुभवांमध्ये, जाणिवांमध्ये प्रतिमांच्या रूपात पोचवण्याचा निर्णय रवीश कुमारने घेतला. रवीश कुमारला हे माहिती आहे की, या लोकांच्या जीवनकथा ‘संतुलित बातमीदारी’च्या अंगाने सांगता येणार नाहीत, कारण या कथेचे नायक हे सत्तेच्या मोजमापाच्या खिजगणतीमध्येसुद्धा कुठेच बसत नाहीत. शक्तिहीन लोकांचे सत्य हे त्यांना संपूर्णपणे निष्कलंक असा धैर्यवान आवाज दिल्याशिवाय त्यांची एकपक्षीय मानवी बाजू मांडता येत नाही.
दूरचित्रवाणीवरील पत्रकारांमध्ये रवीश कुमारला वेगळी ओळख देणारा आणखी एक ठळक धागा आहे. संशोधन क्षेत्रातील नवनवीन निष्कर्षांचा तो सतत धांडोळा घेत असतो. तो दररोज अवघड संशोधनपर लेखन वाचत असतो. हे काम तो फक्त स्वतःचे त्या विषयातील ज्ञान वाढवण्यासाठी करत नाही, तर ते ज्ञान तो सामान्य लोकांपर्यंत त्यांना समजणाऱ्या सोप्या भाषेत पोचवतो. तसेच त्यांना माहितीने समृद्ध करण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. हे इतके महत्त्वाचे काम सध्या भारतीय दूरचित्रवाणीवर कोणीच करत नाही. नवीन संकल्पनांवर झालेले संशोधन हे तुमची जगाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी विकसित करते. सर्वमान्य समजुती आणि जुने पूर्वग्रह हे बऱ्याच वेळा नवीन संशोधनातून खोडले जातात. पण बंदिस्त शैक्षणिक अशा वातावरणामध्ये या संशोधनाची एक तांत्रिक भाषा विकसित झालेली असते, ज्यामुळे अशिक्षित तर सोडाच, त्या क्षेत्राचे प्रशिक्षण नसलेल्या कुणालाही ती भाषा कळत नाही. नवीन संशोधनाला बहुसंख्य लोकांपर्यंत नेऊन, त्याला लोकप्रिय करून रवीश कुमार एका अर्थाने प्रस्थापित शहाणपणामध्ये आलेल्या क्षुल्लक व्यर्थतेच्या भावनेशी झगडा मांडत असतो.
रवीश कुमार त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या महत्त्वाच्या कालखंडात, भारतीय दूरचित्रवाणी प्रेक्षकांसाठी एक महानायक आहे. त्याच्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्याच्या चाहत्यांच्या गराड्याशिवाय वावरणे कठीण आहे, ज्यामध्ये त्याच्याबरोबर सेल्फी घेणाऱ्यांची झुंबड उडते. पण बरीच वर्षे रवीश कुमारचे सहकारी (आणि स्पर्धक) त्याला गांभीर्याने घेत नव्हते. ते रविशला ‘ऑफ-बीट’ पत्रकार समजायचे, ज्याला मोठ्या बातमीचा (हार्ड न्यूज)ची समज नाही किंवा त्याला सुगावा लागू शकत नाही, असे ते म्हणायचे. राजकीय सत्तानाट्य कसे पुढे जाते हेच फक्त बातमीच्या लायकीचे आहे, अशी श्रद्धा असणाऱ्या त्या पत्रकारांना रवीश कुमार ‘ल्युटेन्स पत्रकार’ म्हणायचा.
तरीसुद्धा सत्तेमध्ये असणाऱ्या शक्तिशाली लोकांना तथाकथित राजकीय पत्रकारांची कधीच चिंता नव्हती. खरं तर रवीश कुमारने केलेल्या ‘ऑफ बीट’ (हटके, सर्वांपेक्षा वेगळी) बातमीदारीने त्यांना बैचैन केले. समाजाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सत्ता कपटीपणे कशी शिरते, याचा पर्दाफाश करून त्याने खरे तर या सत्तास्थानी असलेल्या लोकांच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवले. सरकारबद्दल असमाधानी असणाऱ्या आणि सत्ताधारी नेत्यांबद्दल मनात असंतोष असणाऱ्या लोकांच्या गळ्यातील तो ताईत बनला. २०११ ते २०१४ च्या दरम्यान जेव्हा रवीश कुमार संयुक्त पुरोगामी आघाडीचे म्हणजेच युपीए सरकारच्या एकेक महत्त्वाच्या विकासयोजना कशा गावपातळीवर अपयशी होत आहेत, याचा आलेख मांडत होता, त्या काळाबद्दल हे विशेष सांगावेसे वाटते.
यूपीए सरकार गेल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. ज्या लोकांनी रवीश कुमारची सोशल मीडियावर तोंड फाटेपर्यंत स्तुती केली, त्याच लोकांनी त्याला ‘देशद्रोही’ ठरवले, कारण आता तो नव्या सरकारला प्रश्न विचारू लागला. क्रूर व निर्दय पद्धतीने झालेल्या ट्रोलिंगने याची सुरुवात झाली. त्याची परिणीती पुढे शिवीगाळ व आरोप करणारे फोन कॉल्स आणि त्याचेच रूपांतर पुढे त्याला व त्याच्या कुटुंबियांना राजरोस खुनाच्या धमक्या देण्यापर्यंत झाली.
या प्रकारच्या दबावापुढे कोणीही झुकलं असतं. आपली भूमिका सौम्य केली असती किंवा प्रकाशझोतामधून दूर गेलं असतं. पण रवीश कुमार झुकला नाही. ‘आली अंगावर तर घे शिंगावर’ या म्हणीप्रमाणे त्याने सगळ्यांचा सामना केला आणि त्याच्या ‘प्राईम टाईम’ शोवर त्याने विरोधाचा, मतभेदाचा, प्रतिकाराचा व निर्भय अभिव्यक्तीचा विचारमंच म्हणून काम करणे चालू ठेवले. आज फरक एवढाच झालाय की, तो आता एकाकी आवाज बनलाय. इतर सगळीकडे दूरचित्रवाणी आता राज्यव्यवस्थेच्या सत्तेचा एक विस्तारित अवयव बनला आहे. आजच्या संकटाच्या काळात रवीश कुमारने संघर्ष आणि अवज्ञाच्या गोष्टी सांगणे थांबवले नाही. आजच्या काळात तो शक्तिहीन, दुर्बलांचे हत्यार बनला आहे.
.............................................................................................................................................
रवीश कुमारबद्दल बोलताना एनडीटीव्हीचे संपादक, संचालक प्रणव व राधिका रॉय म्हणतात -
“रवीशसारखा निर्भय पत्रकार होण्यासाठी असामान्य धैर्य लागते. त्याची पत्रकारिता ही त्याच्यामध्ये असलेल्या दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीप्रमाणे अढळ आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही की, रवीशला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. तरीसुद्धा सर्व प्रकारचे अडथळे पार करून रवीश आपले काम करत आहे.
रवीश फक्त एक पत्रकार नाही तर तो एक महान माणुसकी असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्या वाटेला आलेल्या मानसन्मानामुळे तो बदलला नाही. तो कमालीचा आपल्या मुळांशी घट्ट नाते जोडून आहे.
२५ वर्षांपूर्वी जेव्हा त्याने आमच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा जसा तो प्रामाणिक, उत्सुक, प्रश्न विचारणारा, स्वातंत्र्याची फिकीर करणारा आणि न्यायाचे स्वप्न पाहणारा होता, तसा आजही आहे.
त्याची पत्रकारिता ही परिवर्तनाला साद घालणारी आहे. लाखो लोकांच्या जीवनातील स्पंदने टिपणारी त्याची बातमीदारी आहे. हे सगळे अगदी त्याने मनापासून केले आहे. त्याच्याभोवती एक जबरदस्त काम करणारी जी टीम आहे, त्या सर्वांचे कौतुक करण्याची आज ही वेळ आहे. आज आम्ही सर्व जण उभे राहून त्याच्या कामाचे उर भरून कौतुक करत आहोत. रवीश NDTV च्या मूलभूत मूल्यांचे पालन करतो. तुम्हाला सत्य सांगण्यासाठी ओरडावे लागत नाही. आम्हाला त्याचा इतका अभिमान वाटतो की, इतरांनी त्याचा धडा घ्यावा असे आम्हाला वाटते.”
.............................................................................................................................................
लेखक औनिंद्यो चक्रवर्ती हे एनडीटीव्ही हिंदी आणि बिझनेस न्यूज चॅनेलचे माजी वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक आहेत. सध्या ते ‘एनडीटीव्ही इंडिया’ ‘सिंपल समाचार’ हा कार्यक्रम सादर करतात. त्यांचा हा मूळ इंग्रजी लेख एनडीटीव्हीच्या पोर्टलवर २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.............................................................................................................................................
मराठी अनुवाद - राहुल माने
creativityindian@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment