अजूनकाही
मराठी साहित्यात आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारे, स्वत:ची स्वतंत्र आणि ठसठशीत नाममुद्रा उमटवणारे लोकशाहीर, कथा-कादंबरीकार, पटकथाकार अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज, १ ऑगस्टपासून होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा एक खास पुनर्मुद्रित लेख...
.............................................................................................................................................
शाहीर अण्णा भाऊ साठे गेले. प्रथम विश्वासच बसला नाही. पण शेवटी सत्य ठरले ते. अण्णा भाऊ गेले. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला ललामभूत करून गेले. त्यांनी मराठी लोककलेचा मंच विश्वासानं गाजवून त्याला आज लौकिकाला चढविला. पोवाडा, लावणी, लोकनाट्य (वग) याच नव्हे तर लघुकथा, सहा कादंबर्यातही त्यांनी दिग्विजय गाजवला.
तसे शाहीर का कमी प्रसविले मराठी माऊलीने? अण्णा भाऊंचे वैशिष्ट्य काय हे अजून बुद्धिजीवी वर्गापर्यंत पोचले नसले तरी अवघ्या महाराष्ट्रातील सामान्यांचा समाज अण्णा भाऊंचे पोवाडे, लावण्या नि वग यांनी प्रथम प्रभावित झाला. मी प्रथम त्यांना ओळखले ‘पोवाडेकार शाहीर’ म्हणून. तसे पाहता आद्य शाहीर अगीनदास-तुळसीदासापासून, सगनभाऊ तो आजच्या अनेक शाहिरांपर्यंत पोवाडेकार झाले. मग अण्णा भाऊंनी यात वेगळेपण ते काय दाखवलं? मला या थोड्या लेखात ते मांडता येणार नाही, पण शाहिरी जीवन हा महाराष्ट्रानं दिलेला अमोल नजराणा अण्णा भाऊंनी सार्थकी लावला.
पोवाड्यातून नुसती वर्णनं करून वाडवडिलानी केलेल्या कहाण्या पद्यरूप ऐकवणे हे शाहिराचे काम नाही तर -
‘‘शाहिरानं जनमनसागरात सर्वभर संचारून नव्हे तर त्याच्या तळाचा ठाव घेऊन, त्यात चाललेल्या भावनोद्रेकांचा आविष्कार आपल्या लेखणीच्या लालित्यपूर्ण ढंगाने व्यक्त करून, अथवा जनमानस हेलावूनच नव्हे तर त्या सागराच्या कणाकणाला ऊब देऊन, त्याच्या लाटावर पण आरूढ होऊन गगनालाही गवसणी घालावी. तोच मराठी शाहीर.’’
ही उक्ती सार्थ करणारे अण्णा भाऊ हे एकमेव शाहीर होते. ‘पोवाडा’ हे नवकाव्य नाही. या नवकाव्याचा तर आमच्याकडे खेड्यात थोडीशी ‘किल्ली’ देताच कुठंही प्रसव होतो. हे आमच्यातल्या भल्याभल्यांना ठाऊक नाही. त्यामुळे आज नवकाव्य म्हणून काही प्रसवल गेलं की, आमच्यातल्या काही बुद्रुकांना त्याचा वेगळाच साक्षात्कार होतो. त्यांच्या दृष्टीने ‘पोवाडा’ म्हणजे काहीच नाही, पण ‘पोवाडा’ हे काव्य सहजसाध्य नाही. त्यातही कमीअधिक असतं. खरा ‘पोवाडा’ तसा बैठकीशिवाय, अभ्यासाशिवाय, चिंतनाशिवाय जमत नाही. त्याचीही एक लय आहे. तंद्री आहे. पण तेवढंच नाही तर त्या शाहिराची प्रतिभा व त्याचा मर्दानीपणाही पण त्यात आहे. बाणा पण आहे.
अण्णा भाऊंजवळ हे सर्व तर होतंच पण अन्यायाची चीडही होती. गुलामगिरीविरुद्ध लढण्याची खुमखुमी होती. दु:ख-दैन्य, दारिद्रय यांचा नाश करू इच्छिणार्या शुद्धरूप गोळ्यांचं कोठारच्या कोठार होतं आणि त्यांच्या मानवतावादाच्या तलवारीला समाजवादाची शास्त्रीय पद्धतीनं चढवलेली धार होती. म्हणून त्यांचा ‘पोवाडा’ जनमानसात नुसता ‘रवंथ’ करण्यासाठी जात नसे तर ठिणग्या-ठिणग्यांनी रान उठवत असे.
त्यांच्या मानवतावादाला समाजवादाची शास्त्रशुद्ध धार होती, म्हणूनच जन्माला येताच, डोळे किलकिले करून जगाकडे बघताच, स्पेनमधील फ्रँकोच्या फॅसिझमविरोधी स्पॅनिश जनतेचा लढा, हा मानवी न्याय्य हक्कासाठी सनातन गुलामगिरीच्या विरुद्ध चाललेला लढा, असा त्या काळच्या नवतरुण अण्णा भाऊ नामे कामगाराला वाटला व त्याने ‘स्पेनच्या स्वातंत्र्यलढ्याचा पोवाडा’ लिहिला. अण्णा भाऊ हे हाडाचे कम्युनिस्ट. अन् कम्युनिस्ट कवी म्हटला की, त्याची कला सर्वथैव प्रचारकी, त्यात ‘खरे काव्य नसलेली’ असा शिक्का त्या काव्याचं वाचन, परिशीलन न करताही दिला जातो. पण उत्तम कला प्रचारकी असतेच नि उत्तम प्रचार हा कलात्मकच असतो, हे सत्य आहे.
त्या दृष्टीने पूर्वीच्या शाहिरांचे पोवाडे व शाहीर अण्णा भाऊंचे पोवाडे अभ्यासणे योग्य होईल. पण त्यामुळे आपली मते चुकीची होती असा शिक्का मिळेल म्हणून काही शहाणे विद्वान विचार करणार नाहीत. पण हा तोकडेपणा आता महाराष्ट्रात बराच कमी झाला आहे. म्हणूनच एके काळचा अवमानित, उपेक्षित कलावंत आज ‘शाहीर अण्णा भाऊ साठे’ हे नाव घेऊन उच्चभ्रू समाजापुढे मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठामार्फत जाऊन कित्येकदा पोहोचला तर कित्येकदा, त्यानं आपल्या दलित समाजाच्या कर्मकहाण्या सांगून, त्यांच्याकडून मानाचे पानही मिळविले. पण त्यांच्या शाहिरी प्रतिभेची अजूनपर्यंत कधीच पावती त्यांना मिळाली नव्हती, हे खरे.
खरं म्हणजे अलीकडं मनाच्या चोचलेपुरवणीला थोड्या विशिष्ट अशा समाज विभागात भाव आला असला तरी पोवाडा ही कलासुद्धा मराठी साहित्याला भूषवणारी एक कला मराठी साहित्याचाच एक विभाग आहे, ही जाणीव अजून मराठी साहित्यात काडीमात्रही रुजली गेली नाही. इतकेच नव्हे तर तिच्याविषयी साधी दखलही मराठी साहित्यात घेतली जात नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
तसे पाहता, पोवाड्याच्या कलेला ‘वर’पर्यंत पोचवणारी मंडळी काही कमी समर्थ नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बाजी प्रभूचा पोवाडा सिंहगडचा पोवाडा या पोवाड्यातील काही ओळी - ‘प्रेमे आणी सिंहगडाचा पोवाडा गाजी’ अजूनही तळपणार्या महाराष्ट्राच्या कंठात झळाळत आहेत, पण सावरकरांच्या पोवाड्याकडं कुणी साहित्य म्हणून पाहिलंय का? त्यानंतर आलेले कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर मुचाटे... कधी मराठी साहित्याने त्यांची दखल घेतलीच नाही, तर शाहीर अण्णा भाऊंच्या पोवाड्याची दखल कोण घेणार? हेच मराठी शाहिरीचे दु:ख अण्णा भाऊ गेले पण मला हे कटुसत्य प्रकर्षाने जाणवले.
‘बापसे बेटा सवाई’ असे अण्णा भाऊंनी या क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवून आपली स्वत:ची अशी मराठी पोवाड्यात त्यांनी भर घातली. वेगळेपणा दाखवला. पूर्वीच्या शाहिराच्या चालीत तोच तोपणा असायचा. त्यामुळे रसपरिपोष होत नसे. अण्णा भाऊंनी हा दोष आपल्या पोवाड्यातून साफ काढून टाकला.
पोवाडा हा सर्वांगाने विचारपूर्वक पण कलात्मकतेने रचावा लागतो. त्यात पावलोपावली सौंदर्यहानीचे धोके असतात, हे अण्णा भाऊ पूर्ण समजून होते. म्हणून त्यांच्या पोवाड्यात सौंदर्याचे ताजमहाल पदोपदी ऐकणाराला दिसून येतात. आता हेच पाहा ना! महाराष्ट्राचे वर्णन का मराठीत थोड्याथोडक्या कवीनी केले आहे? समर्थ रामदास, टेकाडे, गडकरी, माधव ज्युलियन, आदी सर्वांनी, अन् अलीकडे महाराष्ट्र देश रंगवायला प्रयत्न अनेकांनी केला. पण अण्णा भाऊंचा महाराष्ट्र पाहायचा तर त्यांचा हा पोवाडा रसिकांनी मुद्दाम डोळ्याखालून घालावा. अण्णा भाऊ सह्यगिरीवर उभारून प्रथमच पाय रोवून गर्जतात. ते म्हणतात -
मराठी मायभू आमुची । मराठी भाषिकांची । संत महंताची । ज्ञानवंतांना जन्म देणार । नव रत्नांचे दिव्य भांडार । समर धीर घेति जिथे अवतार । जी जी जी.
शौर्याची अजरामर महति । आजही नांदती । सह्य चलावरति । मावळा दख्खनचा राहणार । स्वाभिमानार्थ जिणे जगणार । मराठा मानी आणि दिलदार । जी जी जी.
अन् आता पहा -
सह्याद्रि पसरला जिथे शेषसमगिरी जी
दौलत घेउनी सत्तावीस गड शिरी जी
भेसूर कड्यावर बुरुज पहारेकरी जी
ताड माड सागाची झाडं त्याच्या शेजारी जी
कळकीचे बेट आकाशास झुकांड्या मारी जी
करवंदि बाभळ आणि बोरी
चिल्लार, कठीण काटेरी
खाली सुपीक शेती जमीन काजळा परी जी
महाराष्ट्राची शेतसरी
सुवर्ण आणि भुईवरी
कापूस, ऊस, गूळ, भेंडी, तूर, तीळ, हवरी
कारळा फुले गोजिरी उधळून महाराष्ट्रावरी
राळ्याचे लोंब पुढे लवून मुजरा करी जी ।
हे नि यापुढचे वर्णन मराठी काव्यमंदिराला अवकळा आणील काय? पुढे अण्णा भाऊ उठून इतिहासात जातात व म्हणतात -
घनघोर महाराष्ट्राची । ज्ञानेश्वरांची ।
गर्जना झाली ॥ संस्कृत भाषेची भिंत ।
करुनि आघात । त्यांनी फोडिली ॥
ती काय मराठी बोली । बाहेर काढिली ।
स्वैर षोडिली ॥ अज्ञाना, दील-दलिता ।
भगवद्गीता । त्यांनी वदविली ॥
दांभिकांशी अति दुर्दमनीय लढा त्यांनी दिधला ॥
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥
अन्यायावरी मात करोनी त्यांनी त्या समया ॥
अमुची मराठी आम्हा शिकविली परतुन बोलाया ॥
तो संत राणा हो श्रेष्ठ ।
साहुनि कष्ट दंडण्या दुष्ट या अवनीवर अवतरला ।
भूषवून महाराष्ट्राला तो वंद्य झाला जगताला ।
दिले उघडूनि ज्ञानाचे कोठारची आम्हाला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥
संत ज्ञानेश्वरांचं जीवनकार्य इतक्या सोप्या भाषेत सांगून, त्यांतील सौंदर्यस्थळांचा विकास साधीत साधीत, ज्ञानेश्वरांच्या कार्याची महती गाऊन, तिला महाराष्ट्राच्या परंपरेला जुंपून, आपल्या वाढत्या सामाजिक जाणिवांबरोबर महाराष्ट्रप्रेमाचा डंका ते वाजवतात. अण्णा भाऊ निघतात पुढे. श्री शिवरायांचे दर्शन घडवतात अन् त्यांनी घडविलेला इतिहास किती चित्रमय पद्धतीने, नवकाव्यात्मक धुंदीने रंगवतात तेही पाहण्यासारखे आहे. ते म्हणतात (चित्राबरोबर धावणारी चालही अति मनोवेधक आहे)
मेघापरि हाक देते झाले शिवाजी ।
मग उठे तानाजी । बहिर्जी नि येसाजी ।
हंबीरराव आणि बाजी । मालुसरे आले
सूर्याजी हो मावळे मर्द रणगाजी जी जी जी
पुढं काय होतं? (गुलामगिरीविषयी जाण येताच)
करवंदी पार झिंगलेली ।
ऐकून हाक हर्षली ॥
दरडीने जांभई दिली ।
कळकीने मान डुलविली ॥
किल्ल्याने धाप टाकिली ।
बुरुजाने बाहू उभविली ॥
त्या भयाण जाळीखाली ।
तलवार चमकू लागली ॥
(चाल बदल) राखाया महाराष्ट्रा ।
उठे मरहट्टा । रण करण्याला ॥
भुईकोट किल्ल्याच्या तटा ।
मारुती रट्टा पाडू लागला ॥
पट्टा घेऊन रोखिल्या वाटा ।
वैर्याचा पिट्टा । त्याने पाडीला ॥
पुन: पुन: अण्णा भाऊ पालुपद घेतात-परंपरेचं
रणधुमाळीमध्ये हेटकरी रक्ताने न्हालेला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥
तसेच महाराष्ट्रात इंग्रजांचं आगमन बघायचंय? पहा -
एके दिवशी अरबी सागर ।
होऊन स्थिर । होता झोपला ॥
आणि त्याच्या उशाशेजारी ।
मराठा गडकरी । होता बैसला ॥
तोफेस घालुनी गोळा ।
लावुनी डोळा । पहारा करण्याला ॥
त्या शांत मध्यरात्रीला ।
करायला हल्ला इंग्रज आला ॥
शेवटी इंग्रजांची डर्बी नौका पालथी होते. मग अण्णा भाऊ म्हणतात -
किति मुंडकी तुटली त्यावेळी
पाण्यात प्रेते बुडाली
आणि लाटांवरती टोपडी तरंगु लागली ॥
रक्ताची लाली दर्याला रंगीन आली ॥
पराजया मग पदरी घेऊन क्षणभर दम घ्याया ॥
गोर्यानी गाठली मुंबई जखमा बांधाया ॥ जी ॥
आंग्र्याच्या आरमारा नदीपती मार्ग देता झाला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥
तीच परंपरा गात अण्णा भाऊ बेचाळीसच्या सातार्यात जातात-
बंदूक ठासून बसे शेतकरी तेली तांबोळी ।
गुलामगिरी होळी पेटवून मग मारी गोळी ॥
नांगर सोडुनी कुळव सोडूनी मोहही सर्वाचा ।
मालक होऊन मिरवू लागला तो महाराष्ट्राचा ॥
(चाल) त्याने ग्रामराज्ये स्थापिली ।
नाकी बसविली । सातार्यास पहिली ॥
अशक्य आज असलेले । ते शेतकर्यांना दिसले ।
त्यांनी शक्य करून दाविले ॥
शेतकर्यांचा साहाय्यक वाली सह्याद्री झाला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥
अण्णा भाऊंवर लिहायचं? काय लिहायचं? ते आले गटारीतून, अक्षरश: अनंत दु:खे भोगून, कोळशाच्या पाट्या वाहून, कुणाची मुलं सांभाळून, कुणाची कुत्री सांभाळून, कधी कसली तर कधी कसली बोझी वाहून ‘दारिद्रय, दारिद्रय’ असा आवाज सदा घुमवणार्या मोरबाग गिरणीच्या डाफर खात्यातून... अनंत दु:खे साहूनही त्यांच्या साहित्यात, काव्यात, व्यक्तीत गुरफटलेले, त्या व्यक्तिमत्त्वाचे स्तोम माजवून चोचले करून घेणारे-आपल्या दु:खाचा बाऊ करून आपल्या नसलेल्या जखमा वेशीवर धूत बसल्याचे ढोंग करणारे अण्णा भाऊ, मला कधीच दिसले नाहीत. अभ्यास अभ्यास ध्यास घेऊन समाजाभिमुख होऊन, सामाजिक जुलूम, अन्याय यांच्याशी आपल्या समर्थ अन् मर्द लेखणीने कलापूर्ण झुंज देणारे अण्णा भाऊ मला आयुष्यभर मिळाले. त्यांनी खूप प्रेम दिले. आम्ही दोघेही समकालीन उशाला उसं लावून एका ताटातली अर्धी भाकर खाल्ली. आमच्या उभयतात कधी एखाद्या काळ्या ढगाचा पुंजका येऊन जायचाही. पण गंगायमुनेगत आम्हा दोघांना, अडाणी-अशिक्षितांना-कम्युनिस्ट पार्टीनं घडवलं होतं, माणूस बनवलं होतं. ही कृतज्ञता आमच्यात नसेल तर आम्ही प्रत्यक्ष आईशीही कृतघ्न राहू असे आम्हाला वाटत होतं. आमच्यातल्या साम्राज्यवाद-विरोधाला त्यामुळेच धार आली. वर्गीय जाणीव आली-व्यक्तीचा बडेजाव मेला होता. म्हणूनच अण्णा भाऊ, लेखणीची तोफ करून, दिव्यात तेल नसेल तर सार्वजनिक बत्तीखाली बसून, कलेद्वारे समाजक्रांतीचे पोवाडे लिहीत होते, आपल्या सहकार्यांच्या हाती देत होते, देशात, विश्वात होणार्या उलथापालथीकडं ड्युटीवरच्या सैनिकाप्रमाणे एकेकाळी डोळ्यात तेल घालून पाहत होते.
त्यांनी लिहिलेला बंगालचा पोवाडा व माझे बंगालवरचे कवन घेऊन ‘बंगाल कलापथका’बरोबर महाराष्ट्रभर हिंडलो. त्यांचा बंगाल दुष्काळाचा पोवाडा इतका गाजला की, विनय रॉय यांनी मराठी पोवाड्याच्याच चालीवर त्याचे भाषांतर करून कलकत्त्याला रेकॉर्ड केला व त्याच्यावर बंगालच्या उड्या पडत असलेल्या मी पाहिल्या. पंजाब, दिल्ली दंग्याचा पोवाडा व त्यातील सौंदर्यस्थळे व त्यातील हाक आग अन् विशाल मानवतेचे शाहीर अण्णा भाऊ, तो पोवाडा वाचल्याशिवाय कळणार नाहीत. तेवढा वाव आज नाही.
पोवाड्याच्या कलेला वेगळी बैठक देणारे अण्णा भाऊ, पोवाडा सौंदर्यपूर्ण उभा करणारे अण्णा भाऊ, पोवाड्याद्वारे जनजागृती साधून-जनशिक्षण करून जनतेच्या हातून पराक्रम घडवून आणणारे अण्णा भाऊ व्यक्तिजीवनात अतीव दु:खी होते, सर्व सर्व प्रकारे. तरीही त्यांनी आपल्या व्यक्तिगत दु:खाचं स्तोम माजविले नाही. पण त्यांच्या ‘पोवाडा कलेला’ महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात (तिचाच सच्चा पुत्र असून) स्थान नाही. यामुळे ते फार फार होरपळून जात. ही उपेक्षा त्यांना जन्मभर जाणवली. असे म्हणून मला कुणाला दुखवायचे नाही. पण अण्णा भाऊ आता गेले आहेत. आता तरी त्यांच्या होरपळणुकीची दखल घ्यावी, एवढेच.
.............................................................................................................................................
अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment