मराठी साहित्यात आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारे, स्वत:ची स्वतंत्र आणि ठसठशीत नाममुद्रा उमटवणारे लोकशाहीर, कथा-कादंबरीकार, पटकथाकार अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज, १ ऑगस्टपासून होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा एक खास लेख...
.............................................................................................................................................
“मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडविल, पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच आणि मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे.” - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“हे जग, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून, दलितांच्या व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे.”
- अण्णा भाऊ साठे
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व प्रबोधनाच्या परिवर्तनवादी चळवळीचा फुले-आंबेडकरानंतरचा सच्चा जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे ते म्हणजे अण्णा भाऊ साठे. फुले-आंबेडकरी व मार्क्सवादी विश्लेषण पद्धती आपल्या साहित्यातून मांडणारा क्रांतिकारी वास्तवदर्शी कार्यकर्ता, लेखक, नाटककार, साहित्यिक म्हणजे अण्णा भाऊ होय. सच्चा मार्क्सवादी व सच्चा आंबेडकरवादी अशी ओळख अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून व विचारांतून संपूर्ण महाराष्ट्राला करून दिलेली होती. अण्णा भाऊंचा वैचारिक प्रवास हा मार्क्सवादाकडून आंबेडकरवादाकडे झालेला आहे. म्हणून ते जात-वर्ग जाणिवा समजून घेऊन त्या आपल्या साहित्यलेखनातून जगासमोर मांडणारे क्रांतिकारी साहित्यिक होते.
संघर्ष करणारी माणसं लढणारी असतात. प्रतिकाराचे दुसरे नाव म्हणजे संघर्ष होय. आपले अधिकार, मानवी हक्क व आपणावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करावयाचा असेल तर संघर्ष करावाच लागतो. या वरील वास्तवाला अनुसरून अण्णा भाऊंचे संपूर्ण आयुष्य संघर्षात व ते मांडण्यात गेले. अण्णा भाऊंच्या आयुष्याची सुरुवात संघर्षाने झालेली आहे. वाटेगाव ते मॉस्को व महात्मा फुले, मार्क्सपासून आंबेडकरापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच होय.
अण्णा भाऊंचा जन्म ज्या सातारा-सांगली-वाटेगाव परिसरात झाला त्या भागात अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतलेला होता. त्यात क्रांतिवीर नाना पाटील, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, फकिरा अशा कितीतरी क्रांतिकाराकांनी परसत्तेविरुद्ध संघर्ष केलेला होता. राजकीय बंड निर्माण करून ते स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढले होते. वाटेगाव भागात बेर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली ‘भारत छोडो’ आंदोलनात ज्या अनेक तरुणांनी भाग घेतला, त्यात अण्णा भाऊ होते. म्हणून ते लपून हिंडू लागले. त्यामुळे ते मुंबईला गेले आणि त्यांच्या आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला.
एखाद्या व्यक्तिकडून एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या व्यक्तीची सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक पार्श्वभूमी व त्या पार्श्वभूमीचे त्या व्यक्तीवरील परिणाम याच्यावर अवलंबून असतो. अभावग्रस्त, अन्यायग्रस्त माणसे ही विषमताविरोधी विचारसरणीच्या आकर्षणाकडे वळू शकतात, म्हणून अण्णा भाऊंना भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने येणारे काम आणि त्या कामाचे महत्त्व सांगणारे मार्क्सवादी तत्त्वज्ञान याचा त्यांना परिचय झाला आणि त्यातूनच ते मार्क्सवादाकडे वळले.
मार्क्सवाद त्यांना त्यांच्या भौतिक मुक्तीचा एकमेव मार्ग वाटला. म्हणून ते निष्ठेने मार्क्सवादी तत्त्वज्ञान समजावून घेऊ लागले. मार्क्सवादी आकर्षणामुळे त्यांना जात जाणिवेबरोबरच वर्गजाणीवही होऊ लागली. जात आणि वर्ग जाणिवा हेच अण्णा भाऊंच्या साहित्याचे प्रयोजन बनले. शेवटी या दोन्ही जाणिवा मानवी प्रतिष्ठा व मानवमुक्तीचा संदेश देतात. मार्क्सवादाची ओळख सर्वप्रथम अण्णा भाऊंना रेठरे यात्रेत क्रांतीसिंह नाना पाटलांच्या भाषणाने झालेली होती. तेव्हापासून ते मुंबईतील मोरबाग व कोहिनूर मिलमध्ये कामगार म्हणून काम करत असताना मार्क्सवादाची जास्त जवळीक आली.
मार्क्सवादाची ओळख होण्यापूर्वी अण्णा भाऊंना जातीयतेचे चटके त्यांच्या जन्मापासून व ते ज्या जातीत जन्माला आले त्या मांग जातीमुळे त्यांनी सोसलेले व भोगलेले होते. हिंदू धर्म व जातीव्यवस्थेच्या स्तरीकरणाचा परिणाम म्हणून त्यांचा जन्म मातंग या अस्पृश्य गणलेल्या जातीत झालेला होता. म्हणून त्यांना अस्पृश्यता, जातीयता, दारिद्रय, अपमान, अवहेलना भोगाव्या लागल्या. कम्युनिस्ट चळवळीत काम करत असतानाही त्यांना वर्गजाणीव झाली होतीच, पण जातीयता ही कामगारातही असते. कामगार हा केवळ एक वर्ग नसून कामगारांचीही एक जात असते, याचा त्यांना अनुभव मोरगाबच्या गिरणीत काम करत असताना आला. जेव्हा त्यांची नेमणूक त्रासनखाण्यात झाली, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना तुटलेले धागे पुन्हा जोडावे लागत होते व धागे तोंडातली थुकी लावून जोडावे लागत होते. परंतु तेथील कामगारांना अण्णा भाऊंची जात माहीत झाली आणि मांगाच्या थुंकीने बाटलेल्या धाग्याला आम्ही हात लावणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली आणि अण्णा भाऊंनी तेथील काम सोडले.
इथे डॉ. बाबासाहेबांच्या त्या वाक्याची आठवण होते. ते म्हणतात, “भारतात कामगारांचे विभाजन वर्गात झालेले नसून कामाच्या विभाजनाबरोबरच कामगारांचेही विभाजन झालेले असते.” महात्मा फुले, मुक्ता साळवे यांच्यापासून आलेली जात-वर्ग जाणीव अण्णा भाऊंना कळलेली होती. हीच जाणीव त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडून सामाजिक आंदोलनाची रूपरेषा निर्माण केली. समाज परिवर्तनासाठी त्यांनी साहित्य हे माध्यम निवडले. जे माध्यम प्रस्थापित तत्कालीन साहित्यिक प्रयोजनापेक्षा निश्चितच वेगळे होते.
ज्या महात्मा फुल्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जात-वर्ग जाणिवा मांडल्या व त्या प्रकाशात आणल्या त्याच साहित्यिक साधनाचा वा माध्यमाचा वापर अण्णा भाऊंनी केला. अण्णा भाऊंच्या साहित्याबद्दल प्र.के. अत्रे यांनी फार मार्मिक सार सांगितलेले आहे. ते म्हणतात- ‘‘अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे ‘जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांचे साहित्य’ ”.
अण्णा भाऊंचा मुळातच साहित्यिक पिंड होता, पण तत्कालीन साहित्य निकषानुसार अण्णा भाऊंचे साहित्य हे साहित्य मानले जात नव्हते. तरी पण भोगलेलं व सोसलेलं आयुष्य त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल, कळेल या भाषेतून लिहिले. म्हणून ते रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांचे वाक्य उद्धृत करतात, “जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही, जनता त्या साहित्यिकाची कदर जनता करत नाही.”
अण्णा भाऊंनी विविध साहित्यप्रकार हाताळलेले आहेत. ३५ कादंबऱ्या, ८ पटकथा, १५ स्फुट कथा, एक प्रवासवर्णन, ३ नाटके, १२ उपहासात्मक लेख, १४ लोकनाट्ये, १० पोवाडे ही एवढी मोठी साहित्यसंपदा अण्णा भाऊंनी लिहिली. त्या काळात ना.सी. फडके, वि.स. खांडेकर व ग. त्र्यं. माडखोलकर या मराठी साहित्यिकांचे मोठे नाव होते. त्या वेळी एक वाद चालू होता ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’. अण्णा भाऊंनी ‘जीवनासाठी कला’ या अनुषंगाने आपली साहित्यसंपदा निर्माण केली. तसेच समाजातील वंचित, दीन दलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा-वेदना आणि वंचितता आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचा, कथेचा, नाटकाचा, लोकनाट्याचा विषय हा समाजातल्या तळाचा बंडखोर व्यक्ती होता. तो सन्मानासाठी जगण्यासाठी धडपडत होता. म्हणून तो प्रमुख पात्र/प्रमुख भूमिका (protagonist) सांभाळत होता. अण्णा भाऊंनी वगनाट्याला क्रांतीनाट्याचा साज दिला. या लोकनाट्याद्वारे त्यांनी कामगारांच्या श्रमाचा पुरस्कार करणारे आणि जमीनदाराच्या शोषणाचा धिक्कार करणारे तत्त्वज्ञान मांडले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अण्णा भाऊंनी ‘लालबावटा कलापथक’ (१९४२) व ‘इप्टा’ यांच्या माध्यमातून वर्गशोषण म्हणजेच जमीनदार, सावकार यांच्या शोषणाचे जाहीर प्रगटन केले. हे सर्व कार्य करत असताना त्यांना शाहीर अमरशेख, द.ना. गव्हाणकर, कॉ. मोरे, उषा मोरे, राधो कदम, तसेच इप्टाचे बलराज साहनी, कैफ आजमी, ए.के. हंगल, सुबोध मुखर्जी अशा अनेक कलावंतांच्या साहाय्याने कम्युनिस्ट पक्षातर्फे वर्गशोषणाची जाणीव निर्माण करून दिली.
इतर कुठल्याही अस्सल मार्क्सवादी लेखकाप्रमाणे अण्णा भाऊंची कलाही समानता प्रस्थापित करणे आणि पिळवणूक, अन्याय यांचा अंत करणे हे उद्दिष्ट साधणारे सामाजिक बदलाचे एक साधन आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यातील सर्व व्यक्तिरेखा या अन्यायाविरुद्ध लढतात. तसेच त्यांच्या कथात दलितेतर व्यक्तीसुद्धा सामाजिक न्यायाच्या भूमिका घेताना दिसतात. उदा. विष्णूपंत कुलकर्णी (खुळंवाडी). अण्णा भाऊंच्या साहित्याबद्दल डॉ.एस.एस. भोसले असे म्हणतात की, ‘फुले-आंबेडकरांचा वारसा घेऊन उभे राहिलेले, मराठी साहित्य संस्कृतीची परंपरा नाकारणारे अण्णा भाऊ हे पहिले दलित बंडखोर लेखक आहेत.’
‘युगांतर’ साप्ताहिकात १९६९ला नारायण सुर्वे अण्णा भाऊंबद्दल लिहितात, ‘विषय आणि अनुभव यासंदर्भात मराठी कथेची क्षितिजे पददलितांचे जणू ते साहित्यातील प्रवक्ते बनले... उपेक्षितांचे, पददलितांचे व विकल्या जाणाऱ्या माणसांच्या जीवनाला त्यांच्याइतके जवळून कुठल्याही लेखकाने स्पर्श केलेला नाही.’
अण्णा भाऊंच्या लेखन प्रेरणेला मार्क्सवादी पक्षाचा फार मोठा हातभार होता. अण्णा भाऊंवर अलेक्सी मॅक्झिम गॉर्की यांच्या ‘समाजवादी वास्तववाद’ (Social realism)चा फार प्रभाव होता. ‘कोणत्याही कलावंताच्या कलेची समीक्षा करत असताना आपण त्यांचे सामाजिक संदर्भ टाळू शकत नाही व टाळायचे नसतात.’ अण्णा भाऊ जात-वर्गीय हितसंबंधाच्या पूर्णतया विरोधी आहेत. प्रखर बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचार यांच्या वौचारिक साधनेवर भाऊंचा वाङ्मयीन दृष्टिकोन उभा आहे.’ अण्णा भाऊ हे सामाजिक बांधिलकी मानणारे साहित्यिक होते. त्यांच्या मते, साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रचंड शस्त्र आहे अशी त्यांची स्वच्छ भूमिका होती. अण्णा भाऊंच्या मूळ लेखनाच्या प्रेरणा या कम्युनिस्ट चळवळीत नसून त्या अंगभूत होत्या. ‘त्यांच्या साहित्यात उपेक्षितांच्या अंतरंगातील लढाऊपणा, बंडखोरपणा, क्रांतिकारकता, हटवादी वृत्ती, अहंकारी मने, करारी वृत्ती इत्यादी जीवनस्पर्शी चित्रण दिसून येते.’ ‘फकिरा’ ही कादंबरी उपेक्षित दीनदलितांच्या स्वातंत्र्यलढ्याचा वाङ्मयीन ठेवा होय.’
अण्णा भाऊ केवळ विषमतेचे आणि दारिद्रयाचे दर्शन घडवून थांबत नाहीत ते म्हणतात, ‘जग बदल घालूनि घाव, सांगून गेले मला भिमराव’. कार्ल मार्क्स व बाबासाहेब आंबेडकर यांच्या वौचारिक प्रेरणेतून व महात्मा फुले यांच्या समाजपरिवर्तनाच्या कृतिशील नेतृत्वातून अण्णांनी आपला जीवनाशय स्वीकारला. अण्णाभाऊंनी आपल्या स्व-निर्मित साहित्याबरोबरच दोस्तोव्हस्की या जगप्रसिद्ध रशियन लेखकाच्या ‘Crime and punishment’चे मराठी भाषांतर ‘देव जागा आहे’ याचे परीक्षण केले.
अण्णा भाऊंनी आपल्या वैयक्तिक आयुष्याची पर्वा न करता लिहित राहिले. ते आपल्या पत्नी कोंडाबाईंना म्हणत असत, ‘अंग... जगात फक्तच आपलं दु:ख नाई. कितीतरी गरीब माणसं तडफडून मरत्यात... लई माणसं तुप-रोटी खात्यात. त्यांचेकडे मुबलक पौका असतो. आन आपल्यासारखी माणसं आयुष्यभर टाका रगडत जगल्यात- मी का वंगाळ काम करत न्हाई मार्क्स-लेनिन ह्या महात्म्यांनी सांगून ठेवलेलं हाय...’ यावरून अण्णा भाऊंबद्दलची ओढ लक्षात येते.
अण्णा भाऊंनी आपल्या वैयक्तिक सुखाकडे दुर्लक्ष केले होते. त्यांनी त्यांच्या साहित्य व कार्यातून कामगारांच्या समस्या, भांडवलदारांचे शोषण, सावकार, जमीनदार यांचा जुलूम, गरीबाची चाललेली पिळवणूक, छळवणूक विषय मांडलेले होते. कुटुंबाचा विचार आणि जगातल्या गरिबांचा विचार यांचे द्वंद्व यामुळे त्यांच्या मनात वादळ उठायचं. यामुळे अण्णा भाऊंची वौफल्यग्रस्तता वाढत जात होती. फक्त त्यांच्यासोबत होता मॅक्झिम गॉर्कीचा फोटो, मार्क्सचे तत्त्वज्ञान, गरिबांबाबतची कणव, शोषित पीडित जनतेचा कळवळा, श्रमिक-कामगारांचे लढे आणि परिवर्तनाचा विचार याशिवाय अण्णा भाऊंजवळ दुसरं काही नव्हतं. अण्णा भाऊंनी फुले-शाहू-आंबेडकर व मार्क्सचा वारसा साहित्याच्या माध्यमातून पुढे नेला.
अण्णा भाऊंनी ‘लालबावटा’ कलापथकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र शाहिरीच्या माध्यमातून पिंजून काढला. तसेच त्यांनी कम्युनिस्ट विचारधारा असलेली मासिके ‘लोकयुद्ध’, ‘लोकसाहित्य’ आणि ‘युगांतर’ या साप्ताहिकासाठी वार्ताहर म्हणून काम करत असताना मार्क्सचा क्रांतीविचार सर्वसामान्य लोकांत पसरवला. लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी लोकनाट्य, लावण्या, पोवाडे असे वाङ्मय प्रकार हाताळले. ‘अकलेची गोष्ट’, ‘शेटजीचं इलेक्शन’ इत्यादींद्वारे कार्ल मार्क्सच्या इतिहासाच्या उत्क्रांतीची संकल्पना समजावून सांगणे व सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमधील कामगारांचे स्थान त्यांच्या मनावर ठसवणे हा या लोकनाट्याचा मुख्य उद्देश होता. तसेच कम्युनिस्ट पक्षाची धोरणे व कार्यक्रम यांचे सकारात्मक व अनुकूल असे चित्र लोकांपुढे प्रस्तुत करणे हे होते.
अण्णा भाऊंच्या लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून विदर्भ व खानदेश कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. काँग्रेस पक्षाने देशभर उत्सवाचे कार्यक्रम सादर केले. परंतु अण्णा मात्र उदास झाले होते. ते विचार कत होते, देश स्वातंत्र्य झाला म्हणजे काय झाले? स्वातंत्र्य कुणाला मिळाले शेठजींना, भटजींना, भांडवलदारांना, कारखानदारांना, अधिकाऱ्यांना की गरीब जनतेला? या देशातील गरीब जनतेला स्वातंत्र्य मिळाले काय? दलित समाज बंधमुक्त झाला काय? गरीब दलित, शेतकरी, कष्टकरी जनतेचे राज्य येईल का? जे स्वातंत्र्य करोडे भुकेकंगाल जनतेचा विचार करत नसेल ते स्वातंत्र्य काय कामाचे? १६ ऑगस्टला चिरागनगरमधील कामगाराला एकत्र करून मुंबईच्या कचेरीवर मोर्चा काढला तेव्हा उपस्थित जनतेतून आवाज आला, घ्इन्कलाब जिंदाबाद ! लाल सलाम जिंदाबाद ...! जनता अमर रहे, गरीबों का राज आना चाहिए... इस देश की जनता भूखी है। ये आजादी झुठी है। ये आजादी झुठी ...’ दिवसेंदिवस लालबावटाची प्रसिद्धी वाढतच होती. यासंदर्भातले पुढारी वीर वामनराव जोशी असे म्हणतात की, ‘अण्णाभाऊ, शाहीर अमरशेख या कलावंतांनी क्रांतीच्या कार्यात प्राण ओतला आहे.’ लालबावटा पार्टीने बंद केल्यानंतर अण्णा भाऊंनी स्वत:च लिहिलेले ‘पंजाबचा दंगा’, ‘लोकमंत्री’, ‘कलंत्री’, ‘खापऱ्या चोर’, ‘देशभक्त घोटाळे’ इत्यादी लोकनाट्ये व पोवाडे लोकप्रिय झाले. मोरारजी देसाई यांनी ‘लोकमंत्री’ या लोकनाट्याच्या प्रयोगावर बंदी घातली. तेव्हा अण्णा भाऊ भूमिगत होऊन कार्यक्रम सादर करत.
अतिशय जिद्दीने अण्णा भाऊंनी प्रबोधनाची परंपरा कायम ठेवली. दरम्यानच्या काळात १९५६ ला महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. कम्युनिस्ट पार्टी या लढ्यात संपूर्ण ताकदीनिशी उतरली. लालबावट्याचे पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचे पार्टीने ठरवले आणि दत्ता गव्हाणकर व अण्णा भाऊंनी पुन्हा कलापथकाची बांधणी केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कलापथकाच्या कार्यक्रमात सुरुवात केली. अण्णा भाऊंच्या कलापथकांनी ‘माझी मुंबई’ हे लोकनाट्य तयार केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात उभी करण्यात अण्णा भाऊ व त्यांच्या कलापथकाचा सिंहाचा वाटा होता. अण्णा भाऊंच्या कलापथकावर बंदी घालण्यात येऊन अण्णांना अमरावतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले आणि तिथे त्यांनी ‘माझी मौना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ ही प्रसिद्ध लावणी तयार केली. १९५८ च्या निवडणुकीत पुन्हा प्रचाराचे कार्य अण्णाभाऊंनी सुरू ठेवले. संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णा भाऊंनी मोलाची कामगिरी बजावली.
अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून ‘रडण्यासाठी जगू नका तर जगण्यासाठी लढा’ असा संदेश दिला. आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र अण्णा भाऊ मार्क्सवादाकडून आंबेडकरवादाकडे वळले याचा अर्थ त्यांनी मार्क्सवाद सोडला असा नसून या दोन्ही विचारसरणीची खरी गरज या देशातील जात-वर्ग समस्या सोडवण्यासाठी आहे, या निष्कर्षाप्रत ते येतात. म्हणून तर त्यांनी आपली ‘फकिरा’ कादंबरी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यात फुल्यांची व्यापक दृष्टी, शाहू महाराजांची सामाजिक जाणीव आणि आंबेडकरांचा स्वाभिमान दिसून येतो.
अण्णा भाऊ हे जात आणि वर्ग या दोघांचेही बळी असल्यामुळे त्यांनी आपल्या वाङ्मयात जात आणि वर्गलढा या दोन्हीचाही समाचार घेतलेला आहे. अण्णा भाऊ हे एक व्यक्ती म्हणून मोठे नाहीत पण ते एक क्रांतिकारक, परिवर्तनवादी विचारवंत म्हणून मोठे आहेत. विशेषत: १९५६ नंतरचे अण्णा भाऊंचे साहित्य हे परिवर्तनवादी व प्रबोधनवादी आहे. अण्णा भाऊ १९४६ पासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आंदोलनाने प्रभावित झाले होते. त्यांनी त्यांच्या एका वगातही लिहिले होते. अण्णा भाऊ मार्क्सवादी विचारांनी झपाटलेले होते, हे निर्विवाद सत्य असले तरी त्यांनी मार्क्सवादाची चिकित्सा भारतीय समाजव्यवस्थेच्या सदंर्भात करणे सुरू केलेले होते. मार्क्सवाद जगाचा अभ्यास करताना कामगारांच्या शोषणाचा, त्यांच्या पिळवणुकीचा विचार मांडतो. परंतु भारतीय दलितवर्ग हा दारिद्रय आणि आर्थिक शोषणाचा बळी आहे. तसा तो तेथील मनुवादी जातीय समाजरचनेने निर्माण केलेल्या सामाजिक शोषणाचा बळी आहे. याचे भान अण्णा भाऊंना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्यांनी, सामाजिक समतेसाठी सुरू असलेल्या वर्णअंताच्या विचारांनी प्रभावित केले होते.
मार्क्सने कामगारांच्या हातात क्रांतीच्या मशाली दिल्या, तर डॉ. आंबेडकरांनी दलितांना आंदोलनकारी केले. अण्णा भाऊ ज्या प्रगत साहित्य सभेचे सदस्य होते, त्यात आंबेडकरी साहित्यिक मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत व सहवासात होते. त्यात नारायण सुर्वे, वसंत बापट, विंदा. करंदीकर, राजा ढाले, दया पवार, केशव मेश्राम, बाबुराव बागूल, सदा कऱ्हाडे, अर्जुन डांगळे इत्यादी. शाहीर विठ्ठल उमप हे तर आयुष्यभर आंबेडकरी शाहिरीशी जुळून राहिले. अण्णा भाऊंनी लिहिलेल्या ‘सापळा’, ‘उपकाराची फेड’ व ‘वळण’ या कादंबऱ्या आंबेडकरी विचाराने प्रभावित होऊन लिहिलेल्या आहेत. फुल्यांचा व डॉ. बाबासाहेबांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं. अण्णा भाऊंच्या साहित्यात सत्य व असत्य या प्रवृत्तीचा संघर्ष दिसून येतो.
अण्णा भाऊ जे जगले, भोगले त्यातून त्यांना कळालेला जीवनसंघर्ष, जात-वर्ग वास्तव यांना जगासमोर मांडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे आंदोलन व मार्क्सवादी विचारातील समता, न्याय व शोषणमुक्त समाज हा वैचारिक वारसा येणाऱ्या पिढीला देता यावा म्हणून स्वत:च्या वौयक्तिक आयुष्याला, कुटुंबाला तिलांजली देऊन साहित्य निर्माण केले. हे साहित्य तत्कालीन असलेल्या सर्व साहित्य प्रकाराच्या विरोधी व विद्रोही होते. प्रस्थापित सर्व साहित्याच्या चौकटीलाच त्यांनी आव्हान दिले. त्यांच्या साहित्याचे एकूणच प्रयोजन होते, सामान्यातल्या सामान्य माणसाला क्रांतीप्रवण करणे व या देशातील जात-वर्गाला मूठमाती देणे. म्हणून ते आयुष्याच्या शेवटी मार्क्सवादाला आंबेडकरी विचारांची जोड देतात. भारतात वर्गाचा प्रश्न हा जातीतून मुक्त झाल्याशिवाय सुटू शकत नाही. त्यासाठी वर्गाच्या पूर्वी जातअंतासाठी संघर्ष आवश्यक आहे. पण तत्कालीन व्यवस्थेत मार्क्सवादी व आंबेडकरवादी यांनी त्यांना पूर्ण स्वीकारले नाही. तसेच अण्णा भाऊंना त्यांच्या अनुयायांनी व्यक्ती व नेता म्हणून स्वीकारले, पण त्यांच्या विचारांचा वारसा मात्र स्वीकारला नाही. मात्र अण्णा भाऊ मार्क्सवादी-आंबेडकरवादी साहित्य परंपरेतील एक सच्चे, निष्ठावंत अनुयायी, कार्यकर्ता, शाहीर होते.
.................................................................................................................................................................
अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.................................................................................................................................................................
लेखक विश्वांभर धर्मा गायकवाड शिवाजी महाविद्यालय, उदगीर (जि. लातूर) इथं राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
vishwambar10@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 01 August 2019
विश्वांबर धर्मा गायकवाड , अण्णाभाऊंची ओळख आवडली. विशेषत: हे वाक्य फार महत्त्वाचं वाटलं : >> अण्णा भाऊंच्या मूळ लेखनाच्या प्रेरणा या कम्युनिस्ट चळवळीत नसून त्या अंगभूत होत्या.<< लेख वाचून एकंदरीत असं वाटतं की अण्णाभाऊ उगीच मार्क्सलेनिन वगैरेंच्या नादी लागले. मात्र त्यांच्याकडे त्या वेळेस पर्याय फारसे नव्हते हेही तितकंच खरं. तुम्ही लेखात लिहिलंय की अण्णाभाऊ त्यांच्या बायकोला म्हणायचे की : >> ‘अंग... जगात फक्तच आपलं दु:ख नाई. कितीतरी गरीब माणसं तडफडून मरत्यात... लई माणसं तुप-रोटी खात्यात. त्यांचेकडे मुबलक पौका असतो. आन आपल्यासारखी माणसं आयुष्यभर टाका रगडत जगल्यात- मी का वंगाळ काम करत न्हाई मार्क्स-लेनिन ह्या महात्म्यांनी सांगून ठेवलेलं हाय...’ << . आता असं बघा की लेनिनने दुष्काळ पाडून गरीब लोकांना भुकेने तडफडत ठेवून ठार मारलं. अशाच एक नव्हे तर दोन भीषण दुष्काळांतनं कम्युनिस्ट सत्ता रशियात स्थिर झाली. हा भयानक अंतर्विरोध आहे. तो अण्णाभाऊंना वेळच्या वेळी लक्षांत आलेला दिसतोय. अगदीच अन्नान्न दशा झाली नाही. किमान पोटापुरतं तरी मिळालं. सांगायचा मुद्दा असा की कम्युनिस्टांच्या नादी न लागणंच श्रेयस्कर. अण्णाभाऊ थोडक्यात बचावले. असो. आजून वीसबावीस वर्षं (म्हणजे सन १९९१ पर्यंत) जगले असते तर कम्युनिझमची लक्तरं लोंबतांना दिसली असती. आपला नम्र, -गामा पैलवान