अजूनकाही
मराठी साहित्यात आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारे, स्वत:ची स्वतंत्र आणि ठसठशीत नाममुद्रा उमटवणारे लोकशाहीर, कथा-कादंबरीकार, पटकथाकार अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज, १ ऑगस्टपासून होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा एक खास पुनर्मुद्रित लेख...
.............................................................................................................................................
अण्णा भाऊ साठ्यांच्या कथांचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास असे सांगता येईल की, त्या जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या कथा आहेत. आपल्या कथांमध्ये निरनिराळी माणसे त्यांनी रंगवली आहेत. पण सर्वांच्या रक्तांतून एकच लढाऊ ईर्ष्या वाहत आहे. त्या सर्वांना मानाने जगायचे आहे. अंगांत असेल-नसेल तेवढे बळ एकवटून त्यांना आक्रमक वृत्तींशी सामना द्यायचा आहे आणि त्यांत त्यांना जिंकायचेही आहे.
हा त्यांचा गुण डोळ्यात प्रथम भरतो. ती कच खाणारी, हार मानणारी माणसे नाहीत. वार झेलायला त्यांची छाती नेहमीच ताठ्याने उभारलेली आहे. धडक द्यायला मस्तक नेहमीच पुढे झुगारलेले आहे. त्यांच्या कथांमध्ये इथून-तिथून एकच झुंजार मराठबाणा आवेशाने स्फुरताना दिसून येतो. अण्णा भाऊंच्या कथेतल्या माणसांचा पिंड हा असा कणखर आणि टणक आहे. जीवनाच्या सामान्य धडपडीतदेखील मराठ्यांचे हे क्षात्रतेज लोपलेले दिसत नाही. त्या पराक्रमी कथा अण्णा भाऊंनी तितक्याच तेजस्वी भाषेत रंगवल्या आहेत.
मराठी साहित्यात ग्रामीण वाङ्मयाचा एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण असा वर्ग निर्माण झालेला दिसतो. त्यात कर्हाड-सातार्याकडील जीवनाचे चित्रण विपुल प्रमाणात केलेले आढळते. अण्णा भाऊंची कथाही सातारच्या पंचक्रोशीतच वावरत आहे. वारणेच्या खोर्यातच तिचा श्वासोच्छ्वास चालला आहे. त्यांच्या कथांचा जन्म सह्याद्रीच्या त्या ऐतिहासिक दर्याखोर्यातच झाला आहे. पण मराठीतल्या इतर सातारकरांपेक्षा अण्णा भाऊंची तर्हा वेगळी आहे. छत्रपतींच्या घोड्याची सातारच्या मातीत रुजलेली पाऊलखूण आपल्या छातीवर अभिमानाने मिरवणारे अण्णा भाऊ इतरांपेक्षा निराळ्या तेजाने डोळ्यात भरतात. सातारची माणसे इतरांनी पुष्कळ रंगवली आहेत. शब्दांना नुसता आकार देणे सोपे आहे. त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अवघड आहे. तेदेखील काही लेखकांना सहज साधून जाते. पण त्या आत्म्यामागची इतिहासपरंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावता येणे फार अवघड आहे. ते सहसा साधत नाही. पण ते अण्णा भाऊंना जमले आहे. सहज लिहिता लिहिता जमून गेले आहे.
मराठी माणूस रंगवताना त्यांनी त्याच्या मराठा वृत्तीची आठवण सतत जागी ठेवली आहे आणि तिला आलेला विजेचा फुलोरा त्यांच्या कथांतून जागोजागी तळपताना आढळतो. म्हणून देहात प्राण असेतो झगडणार्या मराठी माणसांचे त्यांच्या कथेतले चित्र अविस्मरणीय ठरते, यात शंका नाही. एवढेच नव्हे तर ते मराठी वाचकांचे मराठी मन सुखवणारे ठरले आहे.
‘खुळंवाडी’, ‘विष्णुपंत कुळकर्णी’, ‘रामोशी’, ‘बंडवाला’ आणि ‘मेंढा’ या कथांतून लढाऊ मराठी बाण्याचे दर्शन विशेष चमकदारपणे होते. मंजुळेच्या अब्रूला रेसभरही धक्का लागताच खवळून आनंदराव पाटलाचा हात तोडणारा ‘खुळंवाडी’तला सखुबा खुळा, ‘कुत्र्यासारखं मरुं नका’ असा दुष्काळांत आदेश देऊन मांगांना पाठीशी घालून त्यांच्या चोरीचे समर्थन करणारा बाणेदार ‘विष्णुपंत कुळकर्णी’, जुलमाने घेतलेल्या जमिनीसाठी इमानदाराला टक्कर देणारा ‘बंडवाला’ तात्या मांग, डोंगरे-चव्हाणांच्या वैरापायी पोटचा पोर बळी गेल्यामुळे कुर्हाड घेऊन उठलेला ‘यदु रामोशी’ आणि मेंढ्यांच्या झुंजीतही मानापमानाची लढत देणारा ‘मेंढा’ कथेतला हिंमतबाज लखू माने, या सर्व व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांतून एकच सूत्र वाहते आहे. ही गुमान बसणारी भ्याड माणसे नाहीत. अपमानाने त्यांचे रक्त उसळून उठते. प्रसंगी त्यांतून सूडही पेट घेतो. पण अन्यायाला, आक्रमणाला ठेचून काढल्याशिवाय ती स्वस्थ बसत नाहीत. अशी ही सारी कडवट आणि तिखट माणसे तलवारीच्या लखलखीत पात्यासारखीं चमकतात, त्यांच्या धारेचे भय आणि कौतुक वाटू लागते.
अण्णा भाऊंच्या कथेत असा हा आवेशाचा पीळ करकचून भरलेला आहे, पण त्यांना विनोदाचे वावडे मात्र मुळीच नाही. किंबहुना लढायचे असेल तेव्हा लढणारी पण एरवी हसणारी अशी त्यांच्या कथेतली माणसे आहेत. ‘तीन भाकरी’, ‘पिराजीची भानगड’, ‘शिकार’, ‘कोंबडी चोर’, आणि ‘मरीआईचा गाडा’ या त्यांच्या कथांचा आत्मा संपूर्णतया विनोदी आणि खेळकर आहे. पण त्यांच्या विनोदाची जात काही वेगळीच आहे. दैन्य आणि दारिद्रय यांनी कावलेल्या आणि खंगलेल्या जीवनात जी विसंगती आणि अपूर्णता निर्माण होते, त्यांतच त्यांच्या विनोदाचे बीज रुजले आहे. त्यामुळे वास्तविक ज्या उणिवेचे दु:ख करायचे त्यासाठी कित्येकदा हसायची अथवा ते हसण्यावारी घालवायची पाळी येते. कारण माणसामध्ये ही जी अपूर्णता अथवा विसंगती निर्माण होते, तिला जबाबदार तो नसतो. त्याचे दैन्य वा दारिद्रय असते. पण त्यातही माणसे जी धडपड चालवतात, त्यांतूनच काही विनोद निर्माण होतो. हीदेखील एक प्रकारची जगण्याची ईर्ष्याच म्हणता येईल.
‘पिराजीची भानगड’ व ‘कोंबडी चोर’ या दोन कथा या दृष्टीने विनोदाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून नमूद करता येतील. पहिल्या कथेतला पिराजी काय किंवा दुसर्या कथेतला रामू काय, दोघांच्या हातून गुन्हे घडतात ते पोटाची आग शमवण्यासाठीच. इतरांची फजिती उडवता उडवता कधी कधी त्यांचीही फजिती होते. आपण करतो ते चुकते आहे हे त्यांना समजत नाही असे मात्र नव्हे. पश्चात्तापाने पोळलेला पिराजी म्हणतो, ‘‘आता मला ह्यो गाव नगं! ...म्या लई भानगडी केल्या. अब्रू गेली-कळा गेली, पार पार गेली’’ जे जीवन त्यांनी पत्करले आहे त्याला जबाबदार ते नाहीत, हे अण्णा भाऊ वाचकांना इतक्या नकळत पटवून देतात की, त्यामुळे या उपद्व्यापी प्राण्यांबद्दल कधी अनुकंपा वाटू लागते हे आपल्यालाही समजत नाही. कारुण्य वा हास्य या दोहोंचा उगम एकाच परिस्थितीतून होतो हे सूत्र अण्णा भाऊंना पुरते समजले आहे.
अण्णा भाऊंच्या कथेचे आणखी एक आकर्षक अंग म्हणजे तिची गहिरी भाषा आणि तिच्यातली चित्तहारी वर्णने. त्यांच्या भाषेत मोकळ्या हवेत पोसल्याने येणारा रसरशीतपणा आणि कसदारपणा आहे. त्यांच्या कथेतल्या व्यक्तींइतकीच ती कणखर आणि तेजदार आहे. भाल्याच्या फेकीप्रमाणे त्यांच्या वाक्याची झेप मर्मभेदी व पल्लेदार आहे. ते अर्थानुकूल शब्द वापरतात ते कसे अगदी कोंदणात मोती बसवल्यासारखे.
‘दगडाच्या खिळ्यात उगवणारे झाड जसे वाकडे-तिकडे वर यावे, तद्वत पिराजीचे मन अनंत अडचणींच्या दगडातून वाकडेतिकडे होऊन वर आले होते’, ‘कूडसं पडून तोंडओळख मोडली होती’, ‘प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली’, ‘बगळा बैलाच्या गोचड्या तोडतो, त्यो काय बैलावर उपकार म्हनं नवं, तर आपलं प्वाट भराया पाई’, ‘तो जीव घोटाळेपर्यंत बोले म्हणून लोक त्याला बडबड्या केरु म्हणत’, इत्यादी अनेक वाक्ये अशी पटपटा वेंचून त्यांच्या मराठमोळ्या जिवंत भाषेचे नमुने म्हणून दाखल्यास्तव पुढे करता येतील. ते व्यक्तीचे वा प्रसंगाचे वर्णन करतात तेदेखील अशाच प्रभावी शब्दांत. ‘‘सारे विश्व घेऊन बसलेल्या त्या अंधाराची मूठ आता सैल होत होती. नवे वारे कपारीवरून धावत होते. अठरा भार वनस्पतींचा सुगंध वार्याने पुढे पळत होता. वृक्षराजींच्या मुखावर तजेला आला होता. पूर्वेने लाल प्रकाशाचा मळवट भरला होता. त्यामुळे सर्व जीवजंतू मानवाच्या दृष्टीत एकरूप होत होते. दवबिंदूच्या सिंचनाने न्हाईलेले प्रचंड दगड हत्तीप्रमाणे लोळत असल्याचा भास होत होता आणि दूर सोनेरी पिकांनी नटलेला तळवट धुक्यातून बाहेर निघत होता,’’ हे सह्याद्रीच्या परिसराचे वर्णन एखाद्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यासारखे धावते आणि नयनसुभग वाटते.
अण्णा भाऊंच्या कथांमध्ये नाट्य आहे. जीवनाचे वास्तव नाटक त्यांच्या कथेत अगदी संघर्षाच्या वातावरणात खेळते आहे. त्यांतले संवाद बोलके आणि झणझणीत वाटतात. क्रोध, असूया, सूड, हिंमत इत्यादी प्रखर भावनांचे लखलखते पाणी त्यांच्या संवादांना आगळीच घाट आणते. त्यांच्या कथेतली माणसे ढोंग जाणत नाहीत. ती आपल्या भावना रोखठोकपणे बोलून दाखवितात. जे कृतीने करायचे आहे त्याचाच उच्चार त्यांच्या बोलण्यातून होत असतो.
‘माणसाने जगलं पाहिजे’ असा संदेश देणारी अण्णा भाऊंची अस्सल मराठी बाण्याची कथा मराठी वाचकांना नुसता आनंदच देऊन थांबणार नाही तर त्यांच्या अंगी लढाऊ जोम निर्माण करील, त्यांच्या रक्ताला बंडाची प्रेरणा देईल, यात तिळमात्र शंका वाटत नाही.
.............................................................................................................................................
अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment