अजूनकाही
खून आणि त्यानंतर न्यायालयात त्या संदर्भात उभा राहिलेला खटला या घटनांमध्ये मुळातच एवढं नाट्य असतं की, असे प्रयोग आपल्याला खिळवून ठेवतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशा कथानकांत ‘पुढे काय झालं?’ याबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्कंठा असते. त्यातही जर असा विषय एखाद्या प्रतिभावान नाटककाराच्या हातात सापडला तर त्याच्या कलानिर्मितीत अभिजात मूल्यं आपोआपच येतात. अलीकडेच आरोन सोर्किन (जन्म - १९६१) या अमेरिकन नाटककाराचं ‘अ फ्यू गुड मेन’ हे नाटक बघण्याचा योग आला, तेव्हा हे प्रकर्षानं जाणवलं.
सोर्किन हे अमेरिकेतील महत्त्वाचे नाटककार समजले जातात. त्यांच्या नावावर ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’, ‘द फार्नवर्थ इन्व्हेशन’ वगैरेसारखी नाटकं तर ‘स्पोर्टस नाईट’, ‘द वेस्ट विंग’वगैरेसारख्या दूरदर्शन मालिका आहेत. सोर्किनच्या या नाटकावर आधारित चित्रपट १९९२ साली आला. यात टॉम क्रूझ व जॅक निकल्सन वगैरे दिग्गजांच्या भूमिका होत्या. आदित्य बिर्ला उद्योग समूहातर्फे दरवर्षी ‘आद्यम’तर्फे चांगली नाटकं सादर केली जातात. या उपक्रमाचं हे पाचवं वर्षं. या वर्षाची सुरुवात ‘अ फ्यू गुड मेन’ या नाटकानं झाली आहे. या नाटकाची निर्मिती ‘ड्रॅगन रोझ’तर्फे करण्यात आली आहे.
नाटकाचं कथानक तसं अलीकडचं म्हणजे आधुनिक आहे. कथानकाचं भारतीयीकरण केलेलं नाही. त्यामुळे नाटकात अमेरिका, क्युबा वगैरे सीमारेषा वगैरे उल्लेख येतात, जे त्या भागाचा भूगोल परिचित नसल्यास कळायला जरा वेळ लागतो. तरी मूळ कथावस्तूमध्ये एवढं नाट्य आहे की, हे किरकोळ अडथळे पार करून नाट्यानुभव प्रेक्षकांना भिडतो व अस्वस्थ करतो.
सोर्किननं एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे हे नाटक त्याला त्याच्या बहिणीशी फोनवर बोलताना सुचलं. त्याची बहीण डोब्रा बोस्टन विधी महाविद्यालयातून पदवीधर झाली. तिला अमेरिकन नौसेनेत वकिलाची नोकरी मिळाली. तिने सोर्किनला सांगितलं की, तिला ग्वाटेमाला उपसागराकडे जायचं आहे. तिथं एका नौसैनिकाचा खून झाला असून त्याचा आरोप त्याच्या दोन सहकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या एवढ्याशा घटनेवरून सोर्किनला हे नाटक सुचलं.
कथानक १९८६च्या उन्हाळ्यात घडतं. क्युबाजवळच्या ग्वाटेमाला उपसागरात अमेरिकन नौसेनेचा मोठा तळ आहे. तिथं विल्यम सांतिआगो या नौसैनिकाचा मृत देह सापडतो. त्याचं टक्कल केलेलं असतं, तोंडात बोळा कोंबलेला असतो. हा नैसर्गिक मृत्यू नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे पुढची कारवाई सुरू होते आणि दोन सैनिकांना अटक करण्यात येते. या दोघांना नंतर वॉशिंग्टन डीसीला आणण्यात येतं. न्यायालयाची कारवाई सुरू होते.
या आरोपींसाठी एक तरुण वकील म्हणून लेफ्टनंट डॅनियल कॅफी दिला जातो. जगातील बहुतेक लष्करात ही प्रथा असते. आरोपीच्या बाजूने लढणारे आणि त्याच्या विरोधातील वकील दोघंही सैन्यात अधिकारी असतात. कॅफीला प्रत्यक्ष केस लढण्यापेक्षा न्यायालयातच देवाणघेवाण करून केस सोडवण्यात जास्त रस असतो. कायद्याच्या भाषेत याला ‘प्ली बार्गेनिंग’ म्हणतात. त्याप्रमाणे तो या दोघांसाठी प्रयत्न करण्याच्या विचारात असतो. मात्र हळूहळू त्याच्या लक्षात येतं की, यात काही तरी पाणी मुरतंय. कॅफी वकिली बाण्याप्रमाणे चौकशी सुरू करतो. त्याला जाणवतं की, सांतियागो या तरुण नौसैनिकाला या दोन आरोपींनी मारलं असलं तरी याबद्दलच्या सूचना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून आलेल्या आहेत.
अमेरिकेच्या या लष्करी तळावरील सर्वोच्च सेनाधिकारी म्हणजे कर्नल जेसेप. हा अधिकारी सैन्याची शिस्त, सैन्याचा मान, सैन्याची गौरवशाली परंपरा वगैरेंवर ठाम निष्ठा असलेला. जेव्हा सांतियागो कर्नल जेसेपच्या अपेक्षांना उतरत नाही, तेव्हा जेसेप त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हाताखालच्या अधिकाऱ्यांना ‘कोड रेड’ वापरण्याचे आदेश देतो. ‘कोड रेड’ म्हणजे अमानुष शारिरिक छळ करणं. अमेरिकन सैन्यानं जरी यावर अधिकृतरीत्या बंदी घातलेली असली तरी प्रत्यक्ष अनेक लष्करी तळांवर त्याचा सर्रास वापर होत असतो.
नौसेनेतील ज्येष्ठ अधिकारी हा खटला कॅफीकडे देतात. अपेक्षा हीच असते की, तो नेहमीप्रमाणे काही तरी ‘प्ली बार्गेनिंग’ करेल व खटला चटकन संपवेल. कॅफी सुरुवातीला त्याच दिशेनं प्रयत्न करतो. पण याला खेपेला त्याच्या मदतीला असते नुकतीच नौसेनेत दाखल झालेली लेफ्टनंट जोन गॅलवे. ती कॅफीला सतत टोमणे मारून हैराण करते की, उपलब्ध पुरावे काहीतरी वेगळेच सांगत असताना तू केस संपवण्याच्या मागे का आहेस?
हळूहळू कॅफीसुद्धा नव्या दिशेनं विचार करू लागतो आणि ग्वाटेमाला तळाचे प्रमुख कर्नल कर्नल जेसेप यांना भेटून उलटसुलट प्रश्न विचारून भंडावून सोडतो. कर्नल जेसेप सरळमार्गी लष्करी अधिकारी असतात. त्याच्यासाठी लष्कराची शिस्त वगैरे गोष्टी मानवी हक्क वगैरेंपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. लष्कराच्या मानसन्मानासाठी एखाद्या सांतियागोसारख्या साध्या खलाशाचा जीव गेला तर काय आकाश कोसळलं, अशी त्याची ठाम भूमिका असते. त्याच्या या कबुलीजबाबामुळे कॅफी त्याला वॉशिंग्टन येथील खटल्यात साक्षीसाठी बोलावतो. अमेरिकन लष्करातील कर्नलच्या पदावर असलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला साक्षीसाठी बोलावण्यात कॅफी आणि त्याची टीम केवढा मोठा धोका पत्करत आहेत, याची जाणीव त्यांना न्यायमूर्ती कर्नल रँन्डॉल्फ करून देतात. तरी कॅफी कर्नल जेसेप यांना साक्षीसाठी बोलावण्याचा आग्रह धरतो. अपेक्षेप्रमाणे साक्षीदरम्यान कर्नल जेसेप यांच्या तोंडून सत्य वदवून घेतो की, त्यांच्याच आदेशानुसार सांतियागोला ‘कोड रेड’प्रमाणे वागणूक देण्यात आली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. इथं नाटक संपतं.
पण सुजाण प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न संपत नाहीत. या सर्व प्रकरणात कोणाचं चुकलं? कर्नल जेसेपचं की, त्या दोन सैनिकांचं? हे प्रश्न साधे नाहीत, ते आधुनिक जगाच्या इतिहासात वारंवार उपस्थित होणारे हे प्रश्न आहेत. १९४५ साली हिटलरचा पराभव झाला़. नंतर विजेत्या राष्ट्रांनी पराभूत जर्मन सैन्याधिकाऱ्यांवर खटले भरले. हीच ती गाजलेली ‘न्युरेंबर्ग ट्रायल्स’. जर्मनीतील न्युरेंबर्ग शहरात हे खटले झाले म्हणून त्यांना ‘न्युरेंबर्ग ट्रायल्स’ म्हणतात. जर्मन अधिकाऱ्यांनी ‘लष्करी शिस्तीनुसार आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशांचं पालन केलं’ अशी भूमिका घेतली.
हीच भूमिका या नाटकातले दोन नौसैनिकही घेतात. अशा स्थितीत आम्हाला शिक्षा कशी काय दिली जाते, हा तात्त्विक प्रश्न उभा राहतो, ज्याचं सरळसोट उत्तर नाही. उलटतपासणीत कर्नल जेसेप कॅफीला तुच्छतेनं विचारतोच की, ‘तू इथं बसून जी वटवट करत आहेस ना, ती आमच्यासारखे सैनिक अहोरात्र अमेरिकेच्या सीमांची रक्षा करत असतात, म्हणून! तुला काय कळणार की रात्रभर बंदूक घेऊन पहारा द्यायचा म्हणजे किती ताण असतो! एक बंदुकीची गोळी कोणत्याही दिशेनं येऊ शकते आणि तुझा जीव घेऊ शकते वगैरे.’ अशा समस्यांना हात घालणारं हे नाटक क्षणभरही आपलं लक्ष विचलित होऊ देत नाही.
या नाटकातील काही गोष्टी मात्र पचनी पडत नाहीत. उदाहरणार्थ स्वभावानं खुशालचेंडू असलेला वकील कॅफीत अचानक एवढा मोठा बदल कसा होतो की, तो मनापासून हा खटला लढवण्याचं ठरवतो? हा आक्षेप संंहितेविषयी आहे. तो बाजुुुला ठेवल्यास नादिर खान यांनी दृष्ट लागेल इतका चांगला प्रयोग सादर केला आहे. एवढा मोठा आशय असलेलं आणि एवढी पात्रं असलेल्या नाटकाचं दिग्दर्शन करणं सोपं नाही. पण हे नादीर खान यांनी जुळवून आणलं आहे. अर्थात त्यांना साथ द्यायला उत्तम दर्जाचा नटसंच उपलब्ध होता.
या नाटकातील सर्वच पात्रांनी अप्रतिम अभिनय केला आहे. रजीत कपूर (कर्नल जेसेप), नील भुपलम (लेफ्टनंट कॅफी), ईरा दुबे (लेफ्टनंट जोन गॅलवे), केनी देसाई (न्यायमूर्ती कर्नल रँडॉल्फ) यांचा खास उल्लेख केला पाहिजे. नील भुपलम तर या भूमिकेत चपखल बसला आहे. सुरुवातीचा खुशालचेंडू वकील आणि नंतरचा सत्यासाठी आटापिटा करणारा वकील हे बदल नील यांनी फार सफाईनं सादर केले आहेत. ईरा दुबे यांनी अन्याय न होऊ देणारी तरुण वकील योग्य बेअरींगनं पेश केली आहे. यात दीर्घ काळ लक्षात राहील तो रजित कपूरचा कर्नल जेसेप. ज्या अभंगपणे, अविचलपणे त्यांची सैन्याच्या संस्कारांवर निष्ठा असते, ज्या सहजतेनं व सातत्यानं ते या प्रकरणात आपलं काही चुकलं आहे, हे मान्य करायला तयार होत नाहीत, ते केवळ लाजबाब आहे!
या नाटकातील नेपथ्याचा खास उल्लेख करावा लागेल. जुही गुप्तानं कधी वकिलांचं कार्यालय, तर कधी कर्नल जेसेपचं कार्यालय, तर कधी दोन आरोपींना ठेवलेला तुरुंग वगैरे ठिकाणं एवढ्या बेमालूमपणे उभी केली आहेत की, प्रेक्षक थक्क होतो. काही प्रसंगी त्यांनी फिरत्या रंगमंचाचा उपयोग केला आहे. अस्मित पाठारे यांनी प्रकाशयोजना सांभाळली आहे, तर पार्श्वसंगीताची जबाबदारी कैझाद घेरडा यांच्याकडे होती. या नाटकाचे सहदिग्दर्शक म्हणून आर्घ्या लाहिरी यांचाही खास उल्लेख करावा लागतो. दिग्दर्शक नादीर खान यांनी सर्व नाट्यघटकांकडून उत्तम योगदान मिळवल्यामुळे ‘अ फ्यू गुड मेन’चा प्रयोग उत्तरोत्तर रंगत जातो.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment