अजूनकाही
सत्तरच्या दशकातले तीन मोठे सितारे राज कपूर, दिलीपकुमार आणि देव आनंद म्हणजे त्यावेळच्या सिंगल स्क्रीनचे बादशहाच! तिघांचे स्वतंत्र व एकत्रित फॅनही होते.
आज या तिघांची आठवण यायचं कारण पूर्णत: वेगळं आहे. आज ना त्यांच्यापैकी कुणाची जयंती वा पुण्यतिथी, ना कसलं स्मरण, ना रेकॉर्ड. पण हे तिघं आणि त्यांचे हे विशिष्ट सिनेमे आठवायचं कारण सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण.
‘मेरा नाम जोकर’, ‘गोपी’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ हे सिनेमे एकाच वेळी वा आसपास लागले. यापैकी ‘मेरा नाम जोकर’ची खूप हवा होती. राज कपूरचा ड्रीम प्रोजेक्ट, रशियन तरुणी, चार तासांचा सिनेमा, दोन इंटरवल वगैरे वगैरे. गाणी गाजत होतीच. त्यामानाने ‘गोपी’ची प्रसिद्धी भव्यदिव्य न राहता नेहमीप्रमाणे दिलीपकुमार हे खणखणीत नाणं ही मोठीच जमेची बाजू. या दोघांच्या तुलनेत देव आनंदचा ‘जॉनी मेरा नाम’ म्हणजे कुपोषित बालकच. त्यामुळे तो स्पर्धेत धरलाच नव्हता कुणी!
पण झाली अशी गडबड की, ‘मेरा नाम जोकर’ पडला (की पाडला ही चर्चा होती). त्याच्या पडेल पाठीवर ‘गोपी’नं मांड ठोकली. तरीही या दोन्ही सिनेमांची तिकिटं न मिळालेले ‘जॉनी मेरा नाम’कडे वळले! आणि काही दिवसांतच चित्र पूर्ण पालटलं! विजय आनंदच्या दिग्दर्शनाची कमाल! देव आनंद, हेमामालिनी, कल्याणजी आनंदजींचं टायटल ट्रॅकसह गाजलेलं संगीत आणि या सर्वांवर चेरी म्हणजे पद्मा खन्नाचा ‘हुस्न के लाखो रंग’ हा कॅब्रे! या कॅब्रेनं तर पडदाच जाळला! आजही इतका कामुक कॅब्रे दुसरा नाही! आणि हा तर सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला!!
या अशा कामगिरींना पुढे ‘डार्क हॉर्स’ म्हणायची पद्धत आली. प्रचलित झाली.
आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. तर सध्या देशात आणि पर्यायानं महाराष्ट्रातही भाजपचं वारं आहे. वादळी वारंच म्हणाना. ते इट क्रिकेट, स्लिप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेटसारखं इट भाजप, स्लिप भाजप, ड्रिंक भाजप अशीच स्थिती आहे.
.............................................................................................................................................
सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवं भान देणाऱ्या मराठीतल्या या पहिल्याच पुस्तकाचं मन:पूर्वक स्वागत - प्रा. संजय तांबट, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
महाराष्ट्रात तसे चार प्रमुख पक्ष- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना. याशिवाय मनसे, सपा, बसपा, शेकाप, नव्याने उदयाला आलेले एमआयएम, वंचित बहुजन आघाडी इ. इ. परंतु प्रमुख चारच. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांची युती. आघाडी आणि युतीत कुठली तरी एक आरपीआय हल्ली असतेच.
२०१४च्या मोदी लाटेनंतरही महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं १५ वर्षांच्या कारभारानंतर बरीच बरी कामगिरी केली. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि विरोधी पक्षांची पडझड सुरू झाली. महाराष्ट्रात तर विरोधी पक्षनेतेच भाजपवासी झाले आणि काँग्रेसला दणका बसला. मुळात विखे पाटलांना पक्षांतरं नवी नाहीत. त्यांचं म्हणजे मी जिथं आहे तो पक्ष! आणि लोकही ते निमूट मान्य करतात. २०१९च्या लोकसभा निवडणूक निकालांनंतर तर टांगा पलटी, घोडे फरार अशी स्थिती झाली. दिल्लीत राहुल गांधींनी राजीनाम्याचा न बदललेला निर्णय ना पक्षाला पुढे घेऊन गेला, ना मागे. देशातला सर्वांत जुना व देशव्यापी पक्ष सध्या निर्नायकी व विनोदाचा विषय झाला आहे. इतर पक्षांचीही साधारण तीच स्थिती. महाराष्ट्र काँग्रेस इंदिरा गांधींच्या काळापासून जी परावलंबी आहे, ती तर आता पाटीपुरती तरी राहते की नाही, अशा स्थितीत आहे.
या अशा निराशाजनक वातावरणात एकटे शरद पवार काय ते लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये फिरताहेत. बाकी सर्वत्र शांतता. काँग्रेसवाले प्रकाश आंबेडकरांचा शर्ट धरून आहेत, तर राष्ट्रवादीला मनसेसाठी आघाडीत पायवाट करून द्यायचीय. पैकी लोकसभेला वंचितनं मतं घेतल्यानं ते तेजीत आहेत, तर मनसेची घडी अजून काही बसत नाही.
अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला धक्का बसला. सचिन अहिर म्हणजे वरळीचे आव्हाड! साहेबांची माया तशीच, वाव तसाच नि वाढही तशीच. आव्हाड वृत्तवाहिन्यांवर वगैरे आरडाओरड करतात, विधानसभा पायऱ्यांवर लक्षवेधी कृती करतात, घोषणा देतात. सचिन अहिरांचा आवाजच येत नाही. वरळीत दहीहंडी असो की गणपती, सेलिब्रेटींची रांग लागते. पण अहिर पती-पत्नी सायलेंट मोडवर असल्यासारखे.
आता आपण पुन्हा सिनेमाच्या मुद्द्याकडे जाऊया. तर सध्या भाजपकडे प्रवेशासाठी इतकी गर्दी वाढलीय की, मध्यंतरी दादा पाटलांनी की महाजनांनी आवाहन केलं की, आता काहींनी सेनेत प्रवेश करा! नाहीतर भाजपला सर्व तिकिटं बाहेरून आलेल्यांनाच द्यावी लागतील! याचा अर्थ भाजप प्रवेश इच्छुकांनी आता अकरावी प्रवेशाप्रमाणे पसंती क्रमांक दोनवर शिवसेना असं लिहावं! भाजपमध्ये सरप्लस होणारे सेनेत पाठवले जाणार! सचिन आहेर हे पहिले सरप्लस तर नव्हेत ना? तसंही वरळी ते भायखळा या भागात भाजप कमी सेना जास्त... काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी, किंचित कम्युनिस्ट. तर अशा प्रकारे शिवसेनेला आता भाजप सरप्लसांसाठी जागा ठेवावी लागणार!
ज्यांना भाजपच्या पहिल्या (मेरा नाम जोकर)-दुसऱ्या (गोपी)ची तिकिटे मिळणार नाहीत, त्यांनी वेळ न दवडता शिवसेनेच्या (जॉनी मेरा नाम)ची तिकिटं काढून टाकावीत! नंतर तीही शिल्लक राहणार नाहीत!
याचाच दुसरा अर्थ असा, पालघर लोकसभेला भाजपनं सेनेला मतदारसंघ तर दिलाच, वर उमेदवार दिला. तो निवडून आणला! तसंच आता भाजप शिवसेनेत कुणी कधी जायचं, कुठून निवडणूक लढवायची हेही ठरवणार! सेनेला ‘हो’ म्हणण्याशिवाय पर्याय नाही. कारण सेनेनं बाणा दाखवत एखादा सरप्लस नाकारला तर भाजप त्याला काँग्रेससह कुठेही पाठवून निवडून आणवू शकतं!
पूर्वी हे शरद पवारांबद्दल बोललं जायचं की, विरोधी पक्षनेतासुद्धा पवारच ठरवतात.
तर या सर्व निवडणूक पूर्व राजकारणात सेनेचा भाव परभारे वाढत चाललाय. आता शिवसेना हीच खऱ्या अर्थानं भाजपची ‘बी टीम’ झालीय. भाजपसाठी सेनेच्या जागाही त्यांच्याच असल्यासारख्या. फक्त युतीधर्म पाळावा म्हणून ते शिवसेनेचे आमदार थेट घेत नाहीत. पण भाजपनं राष्ट्रीय स्तरावर राज्यसभेत जो विलयाचा नवा मंत्र आणलाय, तो महाराष्ट्रात वापरणारच नाहीत असं नाही.
शिवसेनेला भविष्यात ‘अवघा (भगवा) रंग एकचि झाला!’ हे म्हणावं लागणारच नाही, याची खात्री कोण देईल?
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment