अजूनकाही
हे जे मी लिहितोय तो वाचनाच्या प्रवासातला माझा अनुभव आहे. पुस्तकाचे परीक्षण तर अजिबात नाही. त्यातील काही क्षण, फ्रॉस्टच्या काही कविता, थोडं त्याचं आयुष्य, असं जरासं विस्कळीत! फ्रॉस्टच्या कवितेची जातकुळी वेगळी नक्कीच आहे. मला ती भिडली…
रॉबर्ट फ्रॉस्ट हा अमेरिकन कवी. लोकप्रिय आणि तरीही टीकेचा धनी. त्याचा शोध घेत विजय पाडळकर एक पुस्तक लिहीत आहेत, हे खूप पूर्वी समजले होते. त्या वेळी ते स्वत: अमेरिकेत होते. आणि अनेक संदर्भ खूप सहज मिळाले असे एकदा ते म्हणालेसुद्धा होते. ‘कवितेच्या शोधात- रॉबर्ट फ्रॉस्ट - जीवन आणि काव्य’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाल्याचे समजले, पण तसे आकर्षण फारसे वाटले नव्हते. त्याला कारण अर्थात वाचनाच्या माझ्या सवयी. मात्र वाचनालयात अचानक ते पुस्तक दिसले. वाचायला घेतले. मला कवीच्या आयुष्यात फारसा रस नव्हता आणि त्यामुळे ते पुस्तक मी मधूनच वाचायला सुरुवात केली!
स्मिथ हा फ्रॉस्टचा शेजारी एक शेतकरी. त्याच्याशी झालेल्या चर्चेतून त्याला एक कविता सुचली! ‘Mending Wall’ ही ती कविता. ती वाचताना मी एकदम चकित झालो. ‘Something there is that does’nt love a wall’ या तिच्यातील ओळी वाचल्या आणि चक्रावून गेलो. त्यानंतर पाडळकर यांनी उलगडून दाखवलेल्या अर्थ-छटा… सगळेच एका वेगळ्या विचाराने भारलेले वाटले. पुस्तक जरा बाजूला ठेवले आणि त्याचा शोध घ्यावासा वाटला. पण अजूनसुद्धा न गवसलेले असे काही त्यात आहे असे वाटते...
या कवितेत अंगभूत अशी एक कथा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. निवेदक हा एक शेतकरी आहे. विविध कारणाने तो आणि शेजारी एकमेकांना भेटतात. मधली भिंत दुरुस्त करणे, हे एक त्यातील नेहमीचे कारण. अनेक कारणाने ती ढासळत असते. आणि ही दुरुस्ती करण्यास दोन कुटुंबे एकत्र येतात. कवितेच्या निवेदकाला याबद्दल फारसे ममत्व नाही. ‘Good fences make good neighbours’ हे वाक्य मात्र प्रत्येक वेळी त्याला ऐकावे लागे. म्हणजे खरे तर ती एका भागात चालत आलेली म्हण आहे, पूर्वापार चालत आलेली एक समजूत आहे. माणसं अनुभवातून एखादी नियमावली तयार करत असतात. त्यातून एखादी रूढी, परंपरा निर्माण होते. त्याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. रोम शहरातील ‘टर्मिनलिया’ या उत्सवासाठीची प्रथा अशीच चकित करणारी आहे. तिचा भागदेखील असाच वेगळा आहे.
निवेदकाला ही कुंपणाची कल्पना पसंत नाही. कशाला हवी भिंत? ‘माझ्याकडे सफरचंदाची झाडे आहेत, तर तुझ्याकडे पाईनची. ही झाडे काही गोंधळ घालणार नाहीत...’ असे त्याचे म्हणणे. शेजाऱ्याला मात्र त्याचा हा युक्तिवाद पटत नाही. त्याचे आपले एकच वाक्य - ‘Good fences make good neighbours!’ माणसाच्या मनातील तरल संवादच आहेत हे. या सगळ्या प्रसंगाची एक तरल कविता होते हेच मला वेगळे वाटते. पाडळकर ती उलगडताना ‘त्या दोन पात्रांची अवस्था’ आपल्यापुढे ठेवतात. श्रेष्ठ कादंबरीकार ग्रॅहॅम ग्रीनला त्यात अवघड काय दिसले, हे मात्र समजले नाही. त्याच्या या प्रतिक्रियेवर फ्रॉस्ट शांत राहिला. माझ्या मदतीशिवाय तुम्ही ते समजून घ्यावे इतकीच मल्लीनाथी फ्रॉस्टने केली. याचा दुसरा अर्थ म्हणजे समजेल तोपर्यंत वाचत रहा असादेखील होऊ शकतो.
पण ते जाऊ दे. खरी गंमत तर पुढे आहे. भिंत असू नये असे निवेदकाचे मत असले, तरी भिंत बांधण्याच्या प्रक्रियेत मात्र तो सहभाग देतो. कारण त्याला कुठल्यातरी कारणाने का होईना एकत्र येणे महत्त्वाचे वाटते. त्यानिमित्त नवे विचार समजतात आणि त्यातून कवितेसाठी नवे विषय मिळतात. निवेदक आणि कवी फ्रॉस्ट एकाच व्यक्तीत स्वतंत्र नांदतात हे खरे आहे. निर्मिती-प्रक्रियेबद्दल सजग असणे आणि त्याचा एक स्वतंत्र आनंद असतो—आणि तो मिळतो असे फ्रॉस्ट म्हणतो.
हे स्वीकारताना माझी जरा धांदल झाली. आपल्या आयुष्याशी पडताळून पाहताना हे पुस्तकातील विवेचन जरा पुस्तक बाजूला ठेवून बघावे लागले. एखादी परंपरा सांभाळताना आपण कसलेही तत्त्वज्ञान मांडत नाही. पण नंतर विचार करताना एरव्ही आपल्याला विद्रोही म्हणून मिरवण्याची इच्छा असते, हे जाणवते. परंपरेशी जुळवून घेत अनेक जण असे जगत असतील, पण एक नक्की की फ्रोस्ट (किंवा पाडळकर सुद्धा) त्यासाठी एक सुंदर स्पष्टीकरण देतात. हे घडू शकते, अनैसर्गिक असे त्यात काही नाही.
एकाच व्यक्तीत असे विरोधी विचार एकत्र नांदू शकतात. फ्रॉस्ट नक्कीच उत्तम कवी होता. पं. नेहरू यांच्या सुप्रसिद्ध चार ओळीच्या पुढेदेखील तो खूप चालत आलेला आहे… आणि त्याची वाटसुद्धा ‘Less Travelled’ अशीच होती. पाडळकर एके ठिकाणी म्हणतात की, फ्रॉस्टच्या कवितांशी खेळताना आपणसुद्धा आपल्या आयुष्याशी खेळत राहतो. अगदी तोच अनुभव मी घेतला.
फ्रॉस्टच्या कवितेच्या प्रवाहात आपण आपली खेळी खेळत राहतो, हे कदाचित कुणाला पटणार नाही, पण माझ्यापुरते ते खरे आहे. अचानक काही अस्वस्थता येते, अपेक्षाभंगाचे दु:ख होते आणि अचानक एक व्यापक दृष्टी-भानसुद्धा येते. एखाद्या साक्षात्कारा प्रमाणे. आयुष्य प्रकाशमान होते. आणि हे अनुभवताना एक ‘aestheic chain’ एखादा कवी मांडतो, त्या वेळी हा प्रकाश, wood-path आल्हाददायक बनून जातो. स्वर्गाचा विचार करताना पृथ्वीचे प्रेमगीत खुणावते. रॉबर्ट फ्रॉस्ट तिथे उभा असतो.
खरे तर, हे पुस्तक हातात आल्यावर माझी जरा गफलत झाली. कवितेचा शोध घेणारी प्रकरणे मी प्रथम वाचली. आणि त्यानंतर मनात आले मुळातून हा माणूस सुद्धा बघायला हवे. फ्रॉस्टची कविता ही तशी गद्य-फॉर्ममध्येच आहे. पण त्याचे कवितेचे विषय हे त्याच्या जगण्यातले आहेत. टोकाचे अपमान, गरिबी, वडिलांचे बेमुर्वत वागणे, आईची श्रद्धा, घरातील व्यक्ती दुरावणे... हे सगळे त्यांच्या जडण-घडणीतले महत्त्वाचे घटक आहेत. त्याने आयुष्यातील त्याने केलेली स्थलांतरेदेखील त्याच्या कवितेचा हिस्सा आहे. हा सर्व त्याच्या जीवनाबद्दलचा भाग मी नंतर वाचला.
डेरी मुक्कामाचे त्याचे दिवस तर खूपच गुंतागुंतीचे होते. त्याचे आजोबा गेले, आई गेली, आणि दुसरीकडे त्याचे स्वत:चे कुटुंब वाढत होते. पैशाची निकड वाढत होती. नागरी कंपू मध्ये आपल्याला कवी समजले जात नाही, ही जाणीव देखील क्लेशदायक होतीच. पण फ्रॉस्ट कवी होता. स्वत:च्या मुलांना तो एकत्र जमवून संध्याकाळी कविता ऐकवत असे. हे खूप काही आहे. त्याचमुळे लेस्ली ही त्याची मुलगी आणि तिने डायरीत केलेल्या नोंदी हे मोहक प्रकरण निर्माण झाले. अशी एखादी मुलगी घरात असणे हेच एक प्रवाही काव्य असते, ही फ्रॉस्टची धारणा आहे. प्रत्यक्षात पुस्तकात तसे नसेलही, पण फ्रॉस्ट आणि लेस्ली हे प्रकरण (त्यांच्यातील नैसर्गिक नात्याहून निराळे) मनातून खूप भावते. त्यातील कविता जगण्याची त्यांच्या दैनंदिनीतील गंमत ही फ्रॉस्टसाठी एक मोठी ऊर्जा होती, असे वाटते, पटते आणि भावते देखील.
प्रकाशकांकडून आलेल्या स्वीकृतीपत्रानंतर फ्रॉस्टचे पूर्ण घर आनंदात आहे. लेस्लीच्या डायरीत ती लिहिते, ‘आम्हा सर्वाना आनंद झाला याला कारण आमचे आई-वडील आनंदात होते हे आहे.’ पुस्तक प्रकाशित होते, आणि पुढची पुस्तकेसुद्धा प्रकाशकाने घेतली आहेत… या आनंदात फ्रॉस्ट गाफीलपणे प्रकाशकाच्या काही रकमेचा भार स्वत: उचलतो आणि अव्यवहारी कवीची मस्ती वाचकाला कळते. कवीचे पहिले पुस्तक निघते…
‘Home Burrial’ या फ्रॉस्टच्या आणखी एका कवितेबद्दल पाडळकर लिहितात. ही कविता एका मोठ्या विषयाची प्रदीर्घ मांडणी आहे. एकशे सोळा ओळींची ही कविता हा नवरा-बायकोमधील संवाद आहे. खरे तर तो विसंवाद आहे. तसे पाहिले तर, हा एक प्रसंग आहे. त्याचा नेमका मतितार्थ मांडण्याचा प्रयत्न पाडळकर यांनी पुस्तकात केला आहे. हा संवाद हा ‘स्वतंत्रपणे दु:खी असलेल्या’ (!) दोघांचा संवाद आहे. एकत्र जगण्याचा हेतू काय आहे? या प्रश्नालासुद्धा काही अर्थ नाही. प्रवाही जीवनात वाईट प्रसंग आले... ते येतात म्हणून आयुष्यभर दु:ख कुरवाळत बसायचे कारण नसते, हे त्याचे मत. तर पतीचे हे आयुष्यात गुंतून राहणे पत्नीला निष्ठुर, पाषाणहृदयी वाटते. या दोन्ही समजुतीत काय खरे, काय खोटे? खरे तर काहीच नाही. तरीही एखादी मध्यम-मार्गी तडजोड निघावी अशी अपेक्षा बाळगतोच. या अनिवार्यतेवर प्रकाश टाकण्याचे काम फ्रॉस्ट करतो.
त्याच्या या सगळ्या प्रवासाची भेट आपल्याला विजय पाडळकर पुस्तकात करून देतात. साहजिकपणे फ्रॉस्ट च्या अंतर्मनात चाललेले मंथन पाडळकर यांच्या पुस्तकात फ्रॉस्टच्या कवितेसह येते.
आपल्या कवितेच्या आधारे आपल्याला जगता येणे शक्य आहे असे फ्रॉस्टला वाटायला सुरुवात होते. हे त्यांच्या आयुष्यातील आणखी एक वळण होते. लंडन येथे असताना साहित्यविश्वात त्याने आपली मित्रमंडळी जमवायचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वीसुद्धा झाला. Recognition Hunger त्यालासुद्धा होती. अमेरिकेत आपले एक फार्महाऊस असावे, आपण कीर्तीच्या शिखरावर आहोत, अशी स्वप्ने तो पाहू लागला होता.
फ्रॉस्टच्या कवितेत आणि अर्थात चिंतनात येणारी प्रतीके त्याच्या स्वभावावर प्रकाश टाकणारी आहेत. मुळात फ्रॉस्ट नास्तिक, पण आईच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर होताच. आणि असे असून सुद्धा त्याची कविता ही वास्तविक अशीच राहिली. ‘आपण झोका घेऊन उंच जातो, पण पुन्हा आपल्याला खाली यायचे असते, हे उंच जातानाच ठरलेले असते…’ पृथ्वीवर असमाधान आहे, पण त्याचबरोबर प्रेमसुद्धा आहे. त्या सगळ्या गुंतागुंतीवर आणी प्रेमावर फ्रॉस्टचेसुद्धा प्रेम आहे. मला पुन्हा खाली परत यायचे आहे, अशी इच्छा तो व्यक्त करतो.
I would like to get away from Earth a while
And come back to it and begin over
झोक्याचा हा प्रवास त्याला आवडणारा आहे. पुढे तो म्हणतो,
May no fate willfully misunderstand me
And half grant what I wish and snatch me away
Not to return…
फ्रॉस्टबद्दल तसे पूर्वी काही वाचले नव्हते. पं. नेहरू यांच्या टेबलावरील चार ओळी फक्त माहिती होत्या. कित्येक दिवस त्याचा कर्तासुद्धा माहिती नव्हताच. पण कळल्यावरसुद्धा फार काही वेगळे तरंग उमटले नाहीत. एक भारावले पण मात्र नक्की होते. ‘कवितेच्या शोधात- रॉबर्ट फ्रॉस्ट - जीवन आणि काव्य’ या विजय पाडळकर यांच्या पुस्तकानंतर मात्र खूप काही कळले. इतकेच नाही तर, आपल्याकडील कवीचे आयुष्य आणि कविता यांबद्दल मनात एक साहजिक कुतूहल निर्माण झाले. फ्रॉस्टच्या निमित्ताने त्याचे चिंतन, जगण्यातील कैफ, त्याची स्वप्ने याबद्दल एक वेगळाच पट आपल्याला दाखवून जातात हे खरे. कित्येक वेळा कवितेपेक्षासुद्धा अधिक असे खूप काही सापडते. आणि त्यांच्या जगण्याशी आपण आपलं नातं शोधत राहतो!
.............................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment