भारताची राज्यघटना ‘हिंदूराष्ट्रा’च्या स्वप्नाने झपाटलेल्यांसाठी मोठी डोकेदुखीच होऊन बसली आहे!
ग्रंथनामा - झलक
तीस्ता सेटलवाड
  • ‘संविधानाचा ‘जागल्या’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 26 July 2019
  • ग्रंथनामा झलक तीस्ता सेटलवाड Teesta Setalvad संविधानाचा जागल्या Foot Soldier of the Constitution

लढावू पत्रकार आणि धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या ‘Foot Soldier of the Constitution’ या इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद ‘संविधानाचा ‘जागल्या’ या नावाने नुकताच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद हिरा जनार्दन यांनी केला आहे. या अनुवादातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

मुस्लीमविरोधी भावनेचा जो उद्रेक आपण १९९० साली पाहिला, तो काही अकस्मात उफाळून आलेला नव्हता. १९८०नंतरच्या काळात ही भावना लोकांच्या मनात अगदी पद्धतशीरपणे रुजवण्यात आली. ते काम रा. स्व. संघ व विश्‍व हिंदू परिषदेने केले होते. खोट्यानाट्या, संतापजनक कहाण्या रचल्या आणि मध्यमवर्गीय हिंदू व हिंदू कामगार वर्गातील काही घटकांच्या मनात हे द्वेषाचे सुरुंग पेरून पुढील विध्वंसाची सुनियोजित पायाभरणी करून ठेवली. या कहाण्यांमध्ये खोजा व बोहरी मुसलमानांनाही लक्ष्य करण्यात आले होते. तसे पाहता राज्यातील मुसलमानांमध्ये यांची टक्केवारी शंभरात दहा इतकी नाममात्र होती. तरी व्यापारउदिमातले त्यांचे यश अगदी डोळ्यांत भरण्याइतके ठसठशीत. कुठल्याही सामाजिक वातावरणात कोणताही आविर्भाव न ठेवता जुळवून घेणारी त्यांची हळुवार वृत्ती हा विश्‍व हिंदू परिषद व रा. स्व. संघाचा मोठा पोटदुखीचा विषय होता. त्यामुळे खोजा व बोहरी समाजाबद्दलचे सामाजिक व राजकीय वैर पोसण्यासाठी त्यांनी कमर कसली. मुसलमानविरोधी भावना वाढीस लागण्याचे हे एवढेच स्पष्टीकरण पुरेसे नसले तरी जातीय भावना भडकावण्यासाठी त्या वेळी हे एक महत्त्वाचे चलनी नाणे हिंदुत्ववाद्यांनी वापरले.

१९९३ साली आम्ही (जावेद व मी) ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’ नावाचे मासिक सुरू केले. त्याच्या एप्रिल २००२च्या अंकात मी एक कहाणी छापली होती. त्या महिन्याची ती ‘मुखपृष्ठ-कथा’ होती. तिचे शीर्षक होते, ‘फेस टू फेस विथ फॅसिझम’ (हुकूमशाहीशी डोळे भिडवताना). वरील सांस्कृतिक वळणाचे अधिक तपशीलवार स्पष्टीकरण तीत केले होते. सत्तेच्या दुरुपयोगाच्या बारीकसारीक नोंदी केल्या होत्या. त्यानुषंगाने लोकप्रतिनिधी व रा. स्व. संघ आणि विहिंपतील मस्तवाल ठग यांच्या हातमिळवणीवर प्रकाशझोत टाकला होता. त्या लेखातील हा एक छोटासा उतारा...

‘अहमदाबाद महापालिकेने बर्‍याच बिगरहिंदू सुट्ट्या रद्द करून टाकल्या आहेत. गेल्या वर्षी ख्रिश्‍चन समाजाने जोरदार विरोध केल्यामुळे महापालिकेला ‘गुड फ्रायडे’ची सुट्टी पुन्हा सुरू करणे भाग पडले. मात्र रमजान ईद असो की बकरी-ईद, अहमदाबाद शहरात शाळांना सुट्टी नसते. नेमक्या त्या दिवसांत विश्‍वभारती, नवजीवन, कर्मशीला, जे.पी. हायस्कूल, बी.आर. सोमाणी, प्रकाश हायस्कूल अशा किती तरी शाळांमध्ये परीक्षा चालू असतात. त्यामुळे ह्या शाळांमधील मुसलमान मुलांना परीक्षेला हजर रहावेच लागते. परीक्षेच्या कारणास्तव मुसलमान शिक्षकांनाही सुट्टी मंजूर केली जात नाही. पर्यवेक्षणाकरिता उपस्थित राहण्याची त्यांच्यावर सक्ती करण्यात येते. व्ही. आर. सोमाणी व भक्तवल्लभ शाळांमध्ये पंचाण्णव टक्के विद्यार्थी मुसलमान आहेत; परंतु शिक्षक व संस्थाचालक हिंदू आहेत. येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भुलवण्याचे एक वेगळेच तंत्र शोधून काढले आहे. ईदच्या दिवशी हे शिक्षक विद्यार्थ्यांना काहीही शिकवत नाहीत. ‘शाळेत आज शिकवले जाणार नाही’ हे प्रलोभन म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेली एक प्रकारची लाचच नव्हे काय?

यंदा १७ मार्चला ‘बकरी ईद’ होती. रा. स्व. संघ, विहिंप व भाजपच्या पलटणींनी मुस्लीम अल्पसंख्याकांना डिवचण्यासाठी तिचा बरोब्बर उपयोग करून घेतला. ‘गोवंश-संरक्षण कायद्या’च्या समर्थनार्थ जाणीवपूर्वक व जोरदार प्रचार केला. हा प्रकार तेथे पहिल्यांदाच घडत होता असे नाही. गेल्या दोन वर्षांपासून हे असे चालू आहे; परंतु या वेळी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांनी संयुक्तपणे आवाहनाचे निवेदन जारी केले की, ‘समस्त नागरिकांनी ‘कायद्यातील तरतुदींचे’ पालन करण्याची खबरदारी घ्यावी.’ तर दुसरीकडे विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते पुढाकार घेऊन ‘पोलिसांच्या खबऱ्या’ची भूमिका पार पाडत होते.

‘कायद्याचे यत्किंचितही उल्लंघन झाले तर, ते प्रकरण सर्वस्वी पोलीसच हाताळतील’ असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते, परंतु ‘आम्हीच सरकार’च्या थाटात विहिंपच्या कार्यकर्त्यांनी करायची ती मनमानी केलीच. कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन निघालेल्या मुसलमानांवर ह्यांनीच परस्पर नाकेबंदी लादली. मारहाण करायलाही मागेपुढे पाहिले नाही. १५ मार्च रोजी विहिंप स्वयंसेवकांनी एका मुसलमान तरुणावर लाठ्या-तलवारींनिशी हल्ला केला. सुदैव म्हणून तो बचावला; पण दुसरा तरुण - यासीन मोहम्मद विहिंप टोळीच्या तलवार-चाकूहल्ल्यात ठार झाला. काय अपराध होता त्याचा? तर स्कूटरने चाललेल्या यासीनच्या मागे त्याचा गडी गवताचा भारा घेऊन बसला होता. त्यांना अडवून त्यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात यासीन जागच्या जागी गतप्राण झाला. घटनास्थळी पोलीसही होते; पण जे चाललंय ते निमूटपणे पाहत होते. डोळ्यांसमोर चाललेली कत्तल थांबवायला ते तसूमात्र पुढे आले नाहीत. त्यामुळे परिसरातले मुसलमान खवळले. दर्यापूर येथे हिंदू-मुसलमान मोठ्या संख्येने समोरासमोर येऊन उभे राहिले. जातीय तणावाने उग्र स्वरूप धारण केले. यासीनचा खून होत असताना राजेंद्र व्यास हा विहिंप कार्यकर्ता तिथे जातीने उपस्थित होता.

गोरक्षकांचे हे लोण आज सबंध भारतभर पसरले आहे. जरा स्पष्टच बोलायचे तर २०१४ पासून आपण गोरक्षक नव्हे तर गौतालिबान्यांच्या युगात प्रवेश केला आहे. त्याची सुरुवात गुजरात राज्याने १६ वर्षांपूर्वीच करून ठेवली आहे. नियोजनपूर्वक सावज टिपणार्‍या हिंसक कारवाया गौतालिबान्यांनी जिथे यशस्वीरीत्या केल्या तेच हे गुजरात! आपली प्रसारमाध्यमं तरी आता जिवंत राहिलीत काय? भांडवलदारांच्या मुठीत त्यांचे भयंकर व्यापारीकरण झाले आहे. घटनेच्या तळाशी दडलेल्या वास्तवाचा शोध घ्यायला त्यांच्यापाशी वेळ आहे कुठे? जेव्हा या क्षेत्रात आम्ही नवखे होतो तेव्हा येथील दिग्गज पत्रकारांनी आम्हाला प्रशिक्षित केले. ‘विशेष पत्रकारिता म्हणजे नेमके काय?’ तर वस्तुस्थितीचा सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. गतकाळातल्या तत्सम घटनांच्या स्वरूपाचा शोध घ्यावा लागतो. त्यानंतर तुमच्या अनुभवाने लाभलेल्या दृष्टिकोनाच्या आधाराने वर्तमानाची चिकित्सा करावी लागते. यातला ‘विशेष-पत्रकारिता’ असे म्हणतात. आज माध्यमांचा गजबजाट झाला आहे; पण सुजाण पत्रकारितेला तिथे वाव नाही. म्हणूनच ज्यांनी आपल्या हिंसक उन्मादातली ताकद अजमावण्यासाठी गुजरातची निवड केली; दादरी, लाटेहर, उना इ. ठिकाणी हालहाल करून माणसांचा जीव घेतला, क्रौयाची परिसीमा गाठून मानवतेचा गळा घोटला, त्यांच्या मनोवृत्तीची जडणघडण नेमकी कशी व कुठे झाली, ह्याचा वेध घ्यायला त्यांच्यापाशी वेळ नाही. आज जे काही दिसते आहे, ते फारच अस्वस्थ करणारे आहे. गुजरातमध्ये रुजलेल्या या भीषण, बेडर, विषारी संस्कृतीने सबंध देशालाच विळखा घातला आहे.

रा. स्व. संघ व विश्व हिंदू परिषद ह्यांनी हिंदू राष्ट्र उभारणीचा विडा उचलला आहे. त्या दृष्टीने गुजरातची भूमी नेहमीच सुपीक होती व आजही आहे १९६६ साली ’गुरू’ म. स. गोळवलकर यांचे ‘विचारगुच्छ’ (Bunch of Thoughts) हे पुस्तक प्रकाशित झाले. या प्रकल्पाची रूपरेषा आता तर हे पुस्तक रा. स्व. संघाच्या संकेतस्थळावर अगदी राजरोस व नि:शुल्क उपलब्ध करण्यात आलेले आहे. या पुस्तकात देशाची घटना लिहिणाऱ्या व कायद्यांची रचना करणाऱ्या घटनासमिती सदस्यांना उद्देशून गोळवलकर म्हणतात की,

‘‘परिपूर्ण असे प्राचीन हिंदू राष्ट्र इथे आधीपासूनच अस्तित्वात होते, याचा ‘त्यांना’ विसर पडला आहे. हिंदूंबरोबर इथे अनेकविध जमातींचेही वास्तव्य होते. त्यात ज्यू व पारशांसारख्या पाहुण्या जमाती होत्या, तशाच ख्रिश्‍चन व मुसलमानांसारख्या आक्रमक जमातीही होत्या. आता हे सर्व जण एकाच भूमीवर एका समान शत्रूच्या अमलाखाली केवळ अपघाताने रहिवासले म्हणून काय झाले? ‘अशा सगळ्या अगडपगड गटांना भूमिपुत्र का म्हणायचे’ असा प्रश्‍न ‘त्यांना’ कधी पडलाच नाही.’’ घटनाकारांना असा औपरोधिक टोला हाणून गोळवलकरांनी पुढे सावधगिरीचा इशारा दिला आहे- ‘‘आपण हिंदू आहोत. आपल्याला मानवी बंधुत्व, आत्म्याचे सर्वव्यापित्व आदी आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा महान वारसा लाभलेला आहे; परंतु ‘या मंडळींनी’ रचलेल्या ‘हिंदू राष्ट्रवाद’ व तत्सम ‘जातीयवादी’, ‘मध्ययुगीन’, ‘प्रतिगामी’ अशा संकल्पनांच्या खोड्यात अडकून आपण स्वत:ला संकुचित करता कामा नये. या मंडळींनी आपल्याला पुरते मूर्ख बनवले आहे. ज्यांचा हिंदुत्वावर विश्‍वास आहे, त्यांनी या मंडळींचा डाव लक्षात घेऊन तो उधळून लावला पाहिजे. ‘आपले’ राष्ट्रीयत्व हे प्राचीन सत्य आहे व ते आपल्याला प्रस्थापित केलेच पाहिजे. ‘हिंदू’ हाच भारताचा ‘राष्ट्रीय’ समाज आहे, ह्याविषयी आपण नि:शंक असले पाहिजे. आपल्या महान संस्थापकांनी (डॉ. हेडगेवार) ‘राष्ट्रीय’ हा शब्द आपल्या संघटनेचे नाव ठरवताना ‘राष्ट्रीय’ हा शब्द स्वीकारून त्याचा स्पष्टपणे पुनरुच्चार केला आहे. आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वरूपात ठामपणे उभे रहावेच लागेल. ‘आम्ही हिंदू आमचे राष्ट्र सन्मान व वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवू आणि तो आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे’, हे आपले म्हणणे निर्धारपूर्वक ठासून मांडावेच लागेल.’’

भारताची राज्यघटना (कॉन्स्टिट्यूशन) ही ‘हिंदूराष्ट्रा’च्या स्वप्नाने झपाटलेल्यांसाठी मोठी डोकेदुखीच होऊन बसली आहे. रा. स्व. संघाच्या कार्यक्रम पत्रिकेतील या ‘हिंदू हक्का’च्या तगाद्याने गुजरातमध्ये १९८० सालापासून डोके वर काढले. पुढे १९९५ साली त्यांच्याच पाठबळावर तेथे भाजपचे सरकार सत्तेवर आले. मग काय! तेथील शासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या कारभारात बेधडकपणे व दांडगाईने हिंदुत्ववाद्यांची प्रचंड ढवळाढवळ सुरू झाली. कहर म्हणजे त्यांनी शहराच्या अंतर्भागाचे स्वरचित नकाशे बनवून वस्त्यांची जातिनिहाय बेटे अधोरेखित केली आहेत. जिथे पूर्वी आनंद-उत्साह-समरसतेचे वातावरण होते, तिथे अन्येतर धर्मीयांच्या वस्त्या व निखळ हिंदू वस्त्यांभोवती काल्पनिक कुंपणे उभी करण्यात आली आहेत. त्यांच्या या नवीन सीमारेषांनी अन्य धर्मीयांना बाहेर काढून हिंदू वस्त्यांची साफसफाई करण्याचा चंग बांधला आहे. ह्या भेदभाव मोहिमेत न्यायालयेदेखील सहभागी झाली आहेत. तिथेही कडवट स्पर्धेचे दर्शन घडते आहे. राज्यात मुस्लिमांचे प्रमाण आहे दहा टक्के, तरीही त्यांच्या वस्त्याच नव्हे तर त्यांच्या अस्तित्वावरच बहिष्कार लादण्यात आला आहे. विचित्र कोंडीत करकचून आवळलेल्या अवस्थेत हा समाज काळ कंठत आहे. आपल्याच देशातल्या एका राज्यातले हे भीषण वास्तव अन्य राज्यांमधील भारतीयांना अद्याप हादरवू शकले नाही याचे वैषम्य वाटते. शेजारच्या माणसाचा श्वास कोंडला जातोय, तो गुदमरतोय हे पाहून आपले काळीज हलत कसे नाही? इतकी बधिर कशी झालीयत आपली मने? उलट हे असल्या बहिष्काराचे लोण आता पश्चिम भारतात झपाट्याने पसरते आहे हे वास्तव अतिशय भीषण व गंभीर आहे. भारतीय मुस्लीम मनांनी जणू हे ‘बंधकत्व’ निमूटपणे पत्करायचे ठरवले आहे. ‘बहिष्कृत तर बहिष्कृत! टिकून राहण्यासाठी ते अनुकूल व योग्यच आहे’, अशी तडजोड मनोमन करून ते मोकळे झाले आहेत. अशाही परिस्थितीत अद्याप तरी या भावनेच्या आहारी न गेलेले बरेचसे मुसलमान आहेत, हे नशीबच म्हणायचे!

त्या वेळी मी ‘बिझनेस इंडिया’त होते. दोन वेगवेगळ्या घटनांचे वार्तांकन करत असताना हे नवे वास्तव, माझ्यासमोर येऊन ठाकले होते; खर्‍या अर्थाने उमजत होते. अहमदाबादमधील नारंगपुरा आता झपाट्याने कात टाकतोय. आज इथे मुसलमान कुटुंब म्हणजे डोळ्यातला सल होऊन राहिलाय! त्या वेळी जुने शहर सोडून ह्या गजबजाटात, धावपळीच्या विभागात मुसलमान कुटुंबे कशी काय येऊन राहिली असतील? भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय, हे जर त्यांना तेव्हा कळले असते तर?...

१९९१ साली जेव्हा हिंसाचार शिगेला पोहोचला होता, तेव्हाची ही घटना. ‘शेख’ कुटुंबात ती व्यक्ती तेल व नैसर्गिक वायू महामंडळात (ओ.एन.जी.सी.) नोकरीला होती. त्या दिवशी तो दुसर्‍या मजल्यावरील सज्जात (बाल्कनी) उभा असताना काही हिंदू बायकांनी मिळून त्याला खाली ढकलून दिले. तत्काळ गतप्राण झाला. चिरडणार्‍या त्याच्या देहाने आकांत केला की, ‘मुसलमानांनो, तुम्हाला इथे थारा नाही.’ त्यानंतर अगदी अलीकडे २०१६च्या जुलैमध्ये नागपूर येथे श्रोत्यांनी खच्चून भरलेल्या सभागृहात भाषण करीत असताना हा प्रसंग मी सांगितला. भाषण संपता क्षणी ‘टाइम्स’चा वार्ताहर माझ्यापाशी आला. त्याचे नाव शिशिर आर्य. अक्षरश: थरथर कापत होता. म्हणाला, ‘‘थोडं बोलायचंय् तुमच्याशी.’’ त्या प्रचंड गर्दीत काही क्षण अक्षरश: खेचून घेत आम्ही एकमेकांशी बोललो. शिशिर म्हणाला, ‘‘तुम्ही सांगितलेला प्रसंग नारंगपुरात घडत असताना मी तिथेच होतो. तेव्हा मी दहावीत होतो, सोळा वर्षे वयाचा...’’ त्याने समक्ष पाहिलेला व मला माहीत नसलेला वरील घटनेचा उत्तरार्ध त्याच्या तोंडून ऐकल्यावर मी सुन्न झाले. शरीराबरोबर मनही बधिर झाले. इतक्या क्रूरपणे शेखला ठार करणाऱ्या त्या बायका ‘वीरांगना’ ठरल्या. दसऱ्याआधी नवरात्रात गरब्याच्या कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. बोलण्यासारखे काही राहिलेच नव्हते. गुजरातमध्ये हिंदू श्रद्धेची धिम्या पावलांनी क्रौयाकडे वाटचाल सुरू झाली होती आणि इकडे माझ्या आठवणींच्या गाथेवरून मी शेवटचा हात फिरवत असल्याचे पाहून माझे संपादक नाराज झाले होते.

त्या काळात आणखी बरेच काही घडत होते. विश्‍व हिंदू परिषदेने बनवलेल्या शहराच्या न काशांचे वाटप सुरू होते. त्यात त्यांनी त्यांच्या ‘स्वर्भूमीचा’ प्रदेश दाखविलेला होता. जुने शहर हिरव्या तर नवे शहर भगव्या रंगात रंगविले होते. ‘भगव्या शहराने हिरवे शहर गिळंकृत करावे, म्हणजेच हिंदूंनी मुसलमानांची हकालपट्टी करावी’ असे त्या नकाशात सूचित करण्यात आले होते; किंबहुना तसा आग्रहच होता. आंतरधर्मीय विवाहितांवरही मोठी संक्रांत आली होती. अशा जोडप्यांना हिंदुत्ववादी हुकूमशहांनी आपल्या क्रौयाचे दर्शन घडवले. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहित मंडळी नवे शहर सोडून सुरक्षित अशा गरीब मुस्लीम वस्तीत राहण्यासाठी निघून गेले होते.

जुने अहमदाबाद आज स्थावर मालमत्तेची मुख्य बाजारपेठ बनली आहे. गुजराता अखेर ‘गुजरातीच’ असल्याने व्यवसाय-धंद्याच्या एकूण एक नाड्या त्यांच्याच हातात एकवटलेल्या आहेत. ‘परंपरा’ आणि ‘वारसा’ या दिखाऊपणाच्या बाबी बनल्यामुळे जुन्या हवेल्या आता चमकदार व दिमाखदार दिसू लागल्या आहेत. गायकवाड हवेलीतील गुन्हे-अन्वेषण कार्यालयसुद्धा चकचकीत व बर्‍यापैकी हवेशीर बनले आहे. हंऽ! आता वास्तू बाहेरून कितीही उजळ दिसत असली तरी पाठीमागे दडलेल्या गडद अंधार्‍या खोल्यांमध्ये ज्या भयंकर गोष्टी घडत असतात, त्याची खंत कशाला करायची? ‘चौकशी’च्या नावाखाली त्या इमारतीत माझ्या आयुष्याचे आतापर्यंत किती तरी तास खर्च झाले आहेत!

१९९३चा ऑगस्ट उजाडतो. मुख्य प्रसारमाध्यमांना जावेद व मी अगदी नकोसे झालो. हिंसक जातीय दंग्यांची पार्श्‍वभूमी व परिणामांची सांगोपांग समीक्षा करणार्‍या आमच्या बातम्यांना त्यांनी सरळ केराची टोपली दाखविली. दंगलीच्या काळात उसळलेल्या हिंसाचाराच्या बातम्या छापण्यावर निर्बंध आल्याचे दिसत होते. जातीय हिंसाचार कसा उफाळून आला व त्यामुळे केवढा संहार झाला, याचा खुलासा करणारे संदर्भ छापायला परवानगी दिली जात नव्हती. न्यायाचा पाठपुरावा करायचा तर घटनेचा डोळस मागोवा घ्यावाच लागतो, परंतु माध्यमांपाशी नेमके त्यालाच स्थान नव्हते. कुणाकडे (दृक्माध्यम) वेळ नव्हता, तर कुणाकडे (वृत्तपत्र) जागेची चणचण होती! त्या सुमारास जावेद ‘संडे ऑब्झर्वर’चा सहसंपादक, तर मी ‘बिझनेस इंडिया’ची वरिष्ठ बातमीदार होते. आम्ही दोघांनीही आपापल्या नोकर्‍यांचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच आमच्या ‘सबरंग कम्युनिकेशन्स’ची स्थापना झाली. संस्थेचे ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’ नावाचे मासिकही आम्ही सुरू केले. वाचकांनी मासिकाची चांगली दखल घेतली. ‘कॉम्बॅट’ नियमितपणे सुरू झाले तरी इतर माध्यमांमधील आमची पूरक भूमिका दुर्लक्षित करावी अशी नव्हती.

१९९५च्या फेब्रुवारीत ‘कॉम्बॅट’मध्ये आम्ही त्या वेळी सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याची मुलाखत छापली होती. ती मुलाखत त्या अंकाची मुखपृष्ठ कथा होती. मुलाखतीत त्या अधिकार्‍याने म्हटले होते की, ‘‘ज्या वेळी एखादी दंगल चोवीस तासांपेक्षा जास्त काळ लांबते तेव्हा हमखास समजावे की, ‘दंगल शासन-पुरस्कृत’ आहे.’’ हे विधान ‘टाइम्स ऑफ इंडिया’सकट चौतीस वृत्तपत्रांनी उचलले आणि संक्षिप्त स्वरूपात छापले. त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव होते ‘विभूतीनारायण राय’. त्या काळातल्या उच्च न्यायालयाच्या एका निकालानेही मोठा संभ्रम निर्माण केला. भारतीय मुसलमानांविषयीची ठाकऱ्यांची भडकावू भाषणे व ‘सामना’तील जळजळीत लिखाणाला चक्क दोषमुक्त ठरवण्यात आले. त्यानिमित्ताने घटनातज्ज्ञ एच. एम. सिरवईंनी ‘कॉम्बॅट’साठी एक खास लेख लिहिला. त्यात त्या लाजिरवाण्या निर्णयाची अतिशय कडक शब्दांत निर्भर्त्सना केली. ‘गुन्हा व शिक्षा’ (क्राइम अँड पनिशमेंट) या शीर्षकाचा तो लेख जानेवारी १९९५च्या अंकात आम्ही प्रसिद्ध केला. अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

१९९२-९३ साली ‘कॉम्बॅट’ सुरू झाले. त्याबरोबर माझ्या गुजरातकडच्या फेर्‍यांमध्येही वाढ झाली. गुजरातमधले सामूहिक हत्याकांड प्रत्यक्षात २००२ साली घडलेले असले तरी त्याच्या किती तरी आधीच जातीय राजकारण शिजत होते व त्या त्या वेळी त्यानुषंगाने आम्ही ‘कॉम्बॅट’साठी पाच मुखपृष्ठकथा केल्या होत्या. त्या पाचही कथा म्हणजे विश्लेषणात्मक वार्तापत्रे होती. त्या संदर्भातले संशोधन व त्यांचे लेखनही मीच केले होते. त्यानिमित्ताने माहिती पुरवणारे अनेक दुवे मला लाभले, अगदी थेट गुजरात पोलीसदलांतूनही! त्यामुळेच तर पुढे २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रात घडलेल्या दुर्दैवी घटनेमागील वास्तव व विश्वासार्ह नोंदी आम्हाला उपलब्ध झाल्या. त्या पाच लेखांच्या नुसत्या शीर्षकांवरूनही आम्ही करत असलेल्या कामाचे स्वरूप व पद्धतीची साधारण कल्पना यावी.

१. ‘हिंदू राष्ट्रात तुमचे स्वागत असो!’ (वेलकम टू हिंदू राष्ट्र), ऑगस्ट १९९८

२. ‘धर्मांतरे’ (कन्व्हर्जन्स), जानेवारी १९९९

३. ‘पाठ्यपुस्तके दृष्टिकोन दूषित कसा करतात?’ (हाऊ टेक्स्टबुक्स टीच प्रेज्युडाइस), ऑक्टो. १९९९

४. ‘हुकूमशाहीशी सामना’ (फेस टू फेस), एप्रिल २००२

५. ‘हा सूर्य हा जयद्रथ’ (स्प्लिट वाइड ओपन), फेब्रुवारी २००१

पाचव्या लेखात भुजच्या भूकंपानंतरच्या वास्तवावर प्रकाश टाकला होता. भूकंपपीडितांना निधीचे वाटप करताना सरकारी अधिकारी जातिधर्माच्या आधारावर भेदभाव करीत होते, ह्याचे साधार विवेचन त्या लेखात केले होते. त्या काळातील माझ्या बातमीदारीची ही एक छोटीशी झलक - ‘हजाराम - अजरक कलेचा वारसा लाभलेला एक रंगारी. नक्षीकाम व रंगांबद्दलची उपजत आवड व जाण असलेला. ‘अजरक - छपाईचे’ तंत्र अवगत करण्याच्या ओढीने हजाराम भुजपासून ५४ कि.मी. अंतरावरील धमाडकातील स्थानिक खत्रीकडे गेला. त्याच वेळी भुजमध्ये झालेल्या भूकंपाने त्याला पोरके केले. कुटुंबातली पाचही माणसे गेली व तो एकटा उरला. तिकडे थर, कारखाना, कुटुंब सारे काही उद्ध्वस्त झाले. तरीही तो स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो आहे.

अशी दीडशे कुटुंबे आहेत. तपशिलातला फरक सोडल्यास त्या सगळ्यांची कहाणी सारखीच! भूकंपाचा तडाखा बसण्याच्या दोन वर्षे आधी कुचमधील भुजसह अन्य किती तरी गावांना दुष्काळाने ग्रासले होते. ते दु:ख अद्याप ओसरले नव्हते. ज्यांना अन्नधान्य खरेदी करणे ठाऊकही नव्हते, त्यांच्यावर नेमकी तीच वेळ आली होती.

आता तर भुज पूर्णत: दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेय. ते उपसायला मोठमोठ्या यंत्रांची गरज आहे; पण सरकारने त्याची व्यवस्था केलेली नाही. वास्तविक आज ‘धमाडका’ आंतरराष्ट्रीय नकाशावर आहे. इथल्या सिद्धहस्त अजरक कारागिरांनी परिसराला प्रसिद्धी व वैभव मिळवून दिले. त्यांचे खरे तर आभारच मानायला हवेत. आभार सोडा, त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पहायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे.’

तिसर्‍या क्रमांकाच्या लेखाचा विषय शालेय शिक्षण व पाठ्यपुस्तकांशी संबंधित होता. त्यासाठी गुजरातमधील सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला होता, अगदी बारकाईने! त्यालाच आम्ही ‘खोज’ हे नाव दिले. ते वर्ष होते १९९९. ते संशोधन ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’मध्ये प्रसिद्ध केले. मुलांची मने दूषित करण्याचे काम पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून कसे केले जाते ते, ‘हा सूर्य हा  जयद्रथ’ न्यायाने दाखवून दिले. दिशाभूल करणारा इतिहास अर्थात वस्तुनिष्ठ इतिहासाची गळचेपी करणारे परिच्छेदच्या परिच्छेद ह्या पुस्तकांमध्ये टाकण्यात आले होते. भेदभावजन्य विभाजनवादाचा विखार पसरविण्याची जबरदस्त ताकद त्या माहितीत होती. परिणामत: पुस्तकांचे व त्यातील आक्षेपार्ह परिच्छेदांचे परीक्षण करण्यासाठी ‘संसदीय समिती’ नियुक्त करण्याची पाळी संसदेवर आली.

त्यातून काय साध्य झाले? तर तोच विकृत इतिहास पुढे पंधरा वर्षे अभ्यासक्रमात जसाच्या तसा राहिला. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ‘सहमत’ने लगेचच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यात मी माझा प्रबंध सादर करून ‘शाळांमध्ये शिकविला जाणारा इतिहास आणि गरज भासताक्षणी झुंडीने येऊन कार्यवाही करण्यास सज्ज असलेले कट्टर धर्माभिमानी’ यांच्यामध्ये असलेल्या संबंधांची कारणे व परिणामांचे विश्‍लेषण केले होते. आजच्या घडीला सदर आक्षेपार्ह पुस्तके बाद करण्यात आलेली असली तरी त्यांची जागा दीनानाथ बत्रांच्या पुस्तकांनी पटकावली आहे. राज्यातील ४२००० शाळांमध्ये ‘अनिवार्य वाचन’ विभागात बत्रांच्या पुस्तकांची वर्णी लागलेली आहे. मोदी दिल्लीतील सत्तास्थानी येताच २०१४ नंतरच्या अभ्यासक्रमात ही पुस्तके ‘अनिवार्य’ होऊन बसली. आधीच्या आक्षेपार्ह पुस्तकांपेक्षा बत्रांची ही पुस्तके कैकपटींनी भयावह आहेत इतके सांगितले तरी पुरे!

त्या सर्व ‘गोष्टीं’चा मागोवा घेतानाचा माझा प्रवास खरोखर तणावग्रस्त व आव्हानांनी भरलेला होता. माझ्या संकल्पना व विचार निश्‍चित रूप धारण करत असताना एका प्रश्‍नाने माझा चांगलाच पिच्छा पुरविला. या सगळ्या विपरीतांसाठी ‘गुजरातच कसे काय सापडले?’ त्याचे उत्तर शोधताना अनेकविध विचारांनी मला जणू गराडाच घातला. गांधींचा वारसा गाडून टाकण्यासाठी सरसावलेल्या ‘हिंदूराष्ट्र प्रकल्पाशी’ याचा काही संबंध असेल का? त्या वेळी गांधींना ठार करण्याचे पहिले चार प्रयत्न फसले तरी अखेर ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांनी जे साधायचे ते साधले... खरेच का त्यांना गांधी नकोसे झाले होते?

नक्की काय नष्ट करायचे होते त्यांना? कशाचा जीव घ्यायला आसुसले होते ते? असे वाटते की, गांधींच्या गुजरातमधील कारकीर्दीच्या आरंभी इथे रुजलेल्या ‘अहिंसा’ तत्त्वज्ञानाचा काटा काढायचा असावा त्यांना. ‘संसदीय राज्यपद्धती भिकार असून तिचा त्याग करण्याची गरज आहे, असे हिंदुत्वाच्या पाशवी व हिंसक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते वारंवार व अगदी उघडपणे बोलून दाखवीत. बहुधा म्हणूनच की काय, ज्या मातीत गांधी जन्मले व लहानाचे मोठे झाले, त्याच भूमीची त्यांनी सर्वप्रथम निवड केली असावी. मग वाटते, अत्यंत बेमुर्वतखोरपणे घटनेशी चाललेला हा खेळ आधुनिक भारताला पाहवला तरी कसा? आणि त्या खेळाबरोबर देशाने कसे काय जुळवून घेतले असेल? अहमदाबाद व एकूणच गुजरातमधून मिळत असलेल्या घातक संकेतांकडे कशामुळे एवढे दुर्लक्ष झाले असेल?

.................................................................................................................................................................

तीस्ता सेटलवाड यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4895/Sanwidhanchya-Jaglya

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 28 July 2019

तिस्ताबाई, हिंदुराष्ट्र आणण्यासाठी घटना अडसर नाहीये. तुमच्यासारखे भ्रष्ट खरी अडचण आहेत. १. तुम्हांस जंगजंग पछाडूनही मोदींवर २००२ च्या गुजरात दंगलींचा साधा खटला दाखल करता आला नाही. भारतीय न्यायव्यवस्था तुम्ही तुमची जणू खाजगी बटीक असल्याप्रमाणे वापरलीत. २. तुम्ही गुलमर्ग सोसायटीच्या मुस्लिम सदस्यांना मदत म्हणून विदेशातनं आलेले पैसे हडपले आहेत. त्याबाबत गुलमर्ग सोसायटीच्या सदस्यांनी तुमच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. ३. बेस्ट बेकरी हत्याकांडातनं वाचलेल्या जहिरा शेख या महिलेस खोटीनाटी आश्वासनं देऊन तुम्ही फसवलंत. तुम्ही तिला कोर्टात खोटं प्रतिज्ञापत्र दाखल करायला लावलंत. हा दखलपात्र अपराध असल्याने जहिराने एका वर्षासाठी तुरुंगवासही भोगला आहे. तुम्ही तिच्या दु:खांवर डागण्या दिल्यात. तिचे शिव्याशाप तुम्हाला भोवणार, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. तुम्ही गिधाड आहात. असो. सध्यातरी तुमची ही ३ पापं चटकन आठवली ती लिहिली. ही यादी बरीच लांब आहे. तुमच्यावर फुटक्या कवडीइतकाही विश्वास ठेवता येणार नाही. आपला नम्र, -गामा पैलवान


Sachin Shinde

Fri , 26 July 2019

Khup Chan........... Aajachya Paristithivar Yogyaveli Pustak Aanlyabaddle Khup Khup Aabhari Aahe


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......