अजूनकाही
बंडखोर लेखक, संपादक, ‘दलित पँथर’चे एक संस्थापक, ‘दलित साहित्याचे एक शिलेदार’, ‘लिटल मॅगझिन चळवळीचे एक शिलेदार’ आणि सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या अनेक तरुणांचे ‘हिरो’ असलेल्या राजा ढाले यांचं १६ जुलै २०१९ रोजी वयाच्या ७८व्या वर्षी मुंबईत निधन झालं. ढाले म्हणजे मूर्तीमंत ‘बंडखोरी’. ढाले म्हणायचे, ‘बंडखोरी ही सापेक्ष गोष्ट आहे. मी पहिली बंडखोरी नेमकी कधी केली ते सांगता येणार नाही.’ त्यांचा जन्म (३० सप्टेंबर १९४०) आणि बालपण सांगलीजवळच्या नांद्रे या गावी गेलं. १९४६ साली ते मुंबईला आले. त्यानंतरचं त्यांचं संबंध आयुष्य मुंबईत गेलं. याच शहरात त्यांची जडणघडण झाली. आणि त्यांच्यातली बंडखोरीही फुलारत गेली. तारुण्यात बंडखोरपणाची धमक सगळ्यांच्याच अंगात असते. तशी ती ढाले यांच्याही होती. चित्रकला, कविता यांची त्यांना लहाणपणापासूनच आवड होती. त्यामुळे ते साहित्याकडे वळले. त्यातून महाविद्यालयीन जीवनात त्यांना चंद्रकांत खोत, गुरुनाथ धुरी, तुलसी परब असे ‘बंडखोर’ मित्र मिळाले.
ढाले ज्या सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत होते, ते तेव्हा साहित्याचं भांडारच होतं. ढालेंबरोबर चि. त्र्यं. खानोलकर होते. ते ढालेंपेक्षा अकरा वर्षांनी मोठे होते. पण मुंबईला उशिरा आले होते आणि नोकरी करत शिकत होते. रमेश तेंडुलकर हे ढाले-खानोलकर यांचे शिक्षक होते.
याच काळात ढाले यांचा चंद्रकांत खोत, केशव मेश्राम, वसंत सावंत, वसंत सोपारकर, माधव अत्रे, सुधीर नांदगावकर यांच्याशी संपर्क आला. साठच्या दशकात ते लिटल मॅगझिनच्या चळवळीत सहभागी झाले. तिथे त्यांची भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, मधू दंडवते, वृंदावन दंडवते, अरुण कोलटकर यांच्याशी ओळख झाली. ढाले ज्या साहित्यिकांमध्ये रमत होते, ते सगळे ‘बंडखोर’च होते. अशोक शहाणे यांच्या ‘मनोहर’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मराठी साहित्यावर क्ष-किरण’ या लेखाची त्या काळात खूप चर्चा झाली. त्याचा ढाले यांच्यावरही प्रभाव पडला. या लेखामुळे माझ्यातला ‘बंडखोर’ जागा झाला, असं ते म्हणत.
‘सत्यकथेची सत्यकथा’
ढाळे यांनी ‘सत्यकथा’चे ३४ वर्षांचे अंक वाचून त्यावर ‘येरू’ या अनियतकालिकात ‘सत्यकथेची सत्यकथा’ हा लेख लिहून या मासिकातलं साहित्य कसं रद्दी आहे, असं बेधडकपणे लिहून टाकलं. या लेखामुळे ढाले पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. हे ढोंग नव्हतं. तो एक प्रस्थापित साहित्याविरुद्धचा संताप होता. त्याविरोधातली ‘बंडखोरी’ होती.
दलित पँथर
१९६८मध्ये अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या झाली. त्यातून तिथं ‘ब्लॅक पँथर’ ही तरुणांची चळवळ उभी राहिली. १९७२च्या सुमारास पेरुमल कमिशनचा अहवाल जाहीर झाला. त्यात देशभरातील अॅट्रॉसिटीच्या प्रकरणांची माहिती आणि आकडेवारी होती. त्यावरून दलित तरुणांमध्ये अस्वस्थता पसरली. हे दलित पँथरचं तात्कालिक भारतीय कारण होतं. ‘दलित पँथर’ ही चळवळ राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार यांनी सुरू केली. (अर्थात मूळ कल्पना माझी होती, पण स्थापनेच्या दिवशी मी बाहेरगावी असल्यानं मला त्याचं श्रेय मिळालं नाही किंवा मिळू दिलं गेलं नाही, असा ढाले यांचा दावा होता. यावरून ढसाळ-ढाले यांच्यात बरेच वाद झाले. त्यांनी परस्परविरोधी पुस्तकंही लिहिली!) १९७४मध्ये वरळीची दंगल झाली. तेव्हा ‘दलित पँथर’ प्रसिद्धीला आली. १९७०च्या दशकात बावड्यात गवई या दलिताचे डोळे काढण्यात आले. तेव्हा फॉर्मात असणाऱ्या ‘दलित पँथर’नं आकाशपाताळ एक केलं होतं.
दुर्गा भागवतांवर सडकून टीका
नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’ (१९७२) या कवितासंग्रहाचं प्रकाशन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात होतं. या कार्यक्रमाला दुर्गा भागवत, सदा कऱ्हाडे, नारायण आठवले आणि विजय तेंडुलकर यांना ढसाळ यांनी निमंत्रित केलं होतं. मात्र ऐनवेळी तेंडुलकर आले नाहीत. त्यामुळे ढसाळ यांनी ढाले यांना बोलायला सांगितलं. त्या भाषणात ढालेंनी दुर्गा भागवतांवर सडकून टीका केली. उदा. त्यांना लोकसाहित्यातलं आणि कवितेतलं काही कळत नाही वगैरे. वेश्याव्यवसायाबाबतच्या दुर्गाबाईंच्या विधानावर ढाले यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून तर दुर्गाबाईंना व्यासपीठावरच रडू कोसळलं.
‘काळा स्वातंत्र्यदिन’
१९७२साली भारताला स्वातंत्र्य मिळून २५ वर्षं होत होती. त्यानिमित्तानं अनिल अवचट यांनी राजा ढाले यांना ‘साधना’ साप्ताहिकासाठी एक लिहायला सांगितलं. लेखातला एकही शब्द कापायचा नाही, या अटीवर ढाले लेख लिहायला तयार झाले. नुकतीच महाराष्ट्रातील एका खेड्यात एका दलित तरुणीवर बलात्कारासारखी दुर्दैवी घटना घडली होती. त्याचं निमित्त करून ‘काळा स्वातंत्र्यदिन’ असा खळबळजनक लेख लिहून ढालेंनी महाराष्ट्रात हलकल्लोळ माजवला. ‘साधना’च्या समाजवादी गोटातही त्यावर बराच वाद झाला. ‘साधना’चे तत्कालिन संपादक यदुनाथ थत्ते त्यावेळी बाहेरगावी होते. अनिल अवचट साधनाचे काम पाहत होते. त्यांनी हा लेख तरुणाचे बंडखोर विचार म्हणून जाणीवपूर्वक छापला होता. अर्थात या लेखावरून नंतर ‘साधना’वर मोर्चे निघाले. पोलीस केसही झाली. साधना व ढाले यांनाही न्यायालयात दंडही भरावा लागला.
रिडल्स मोर्चा
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित केलं जात होतं. १९८७ साली या चरित्रखंडात ‘रिडल्स इन हिंदुइझम’ हे डॉ. आंबेडकरांचं पुस्तक प्रकाशित केलं जात होतं. ते प्रकाशित होण्यापूर्वीच दै. ‘लोकसत्ता’चे तत्कालिन संपादक माधव गडकरी यांनी या पुस्तकात राम व कृष्ण यांची बदनामी केलेली आहे, अशा स्वरूपाचा लेख लोकसत्तामध्ये लिहिला. त्याविरोधात दुर्गा भागवत उभ्या राहिल्या. त्यांनी लोकसत्तामध्ये लेख लिहून आंबेडकरांवर टीका केली. त्याला राजा ढाले, अरुण कांबळे, रुपा कुलकर्णी-बोधी, नामदेव ढसाळ, कुमार सप्तर्षी यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान आंबेडकरांच्या या पुस्तकावर बंदी आणावी किंवा तो भाग त्यांच्या चरित्रखंडातून वगळावा, अशी मागणी शिवसेनेनं केली. त्याला विरोध करण्यासाठी २३ नोव्हेंबर १९८७ रोजी बोरीबंदरपासून मंत्रालयापर्यंत रिडल्स मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये १० लाख दलितांचा समावेश होता, असं सांगितलं जातं. ही आकडेवारी कमी-जास्त असू शकते. पण ‘दलित पँथर’, ढसाळ-ढाले यांची ऐंशीच्या दशकात काय ताकद होती, हे यातून दिसून येतं.
‘दलित पँथर’ ते राजकीय प्रवेश
‘दलित पँथर’ ही संघटना लवकरच फुटली. मग तिच्या संस्थापकांवरून ढसाळ-ढाले-ज.वि. पवार यांच्यात बराच काळ आरोप-प्रत्यारोप होत राहिले. वस्तुस्थिती अशी होती की, या संघटनेत आलेले लोक हे तेव्हा परिस्थितीच्या रेट्यामुळे आलेले होते आणि काहीतरी करायला पाहिजे या अस्वस्थतेतून. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलाही गंभीर विचार नव्हता. परिणामी पाचेक वर्षांत ढाले या चळवळीतून बाहेर पडले. दलित पँथर ही सामाजिक संघटना आहे की राजकीय संघटना, यावर ढाले म्हणत ती सामाजिक संघटनाच होती. ढसाळ यांनी तिला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. दलितांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात संघर्ष करणं एवढाच या चळवळीचा हेतू होता. दलित ऐक्य हा तिचा अजेंडा नव्हता. पण नंतरच्या काळात हा उद्देश या चळवळीला चिकटवला गेला.
दलित पँथरमधले ढाले यांचे सहकारी वेगवेगळ्या राजकीय पक्षात गेले, तेव्हा ढालेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षात सामील झाले. या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. या पक्षाकडून त्यांनी दोनदा लोकसभेची निवडणूकही लढवली. १९९९ मध्ये त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. २००४मध्येही त्यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातून पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली. तेव्हाही त्यांचा पराभव झाला.
लिटल मॅगझिन आणि दलित साहित्य
ढाले साठनंतर महाराष्ट्रात उदयाला आलेल्या लिटल मॅगझिन आणि दलित साहित्य या दोन्ही चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव. मराठी साहित्याच्या इतिहासाला या चळवळींनी जो उभा-आडवा छेद दिला, तो कुणालाही नाकारता येणार नाही, येऊ शकत नाही. ‘सत्यकथेची सत्यकथा’ आणि ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हे ढाले यांचे दोन लेख लिटल मॅगझिन आणि दलित साहित्य यांच्या बंडखोर परंपरेचा वारसा सांगणारे होते. ढाले यांनी ‘आता’, ‘तापसी’, ‘येरू’, ‘चक्रवर्ती’, ‘जातक’, ‘विद्रोह’ अशी अनियतकालिकं संपादित केली. त्यातही लेखन केलं. कथा, कविता, लेख, संपादनं असं ढालेंनी वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे. त्यातील निवडक लेखांचा संग्रह १९९०मध्ये ज. वि. पवार यांनी ‘अस्तित्वाच्या रेषा’ या नावानं संपादित केला. ‘अरुण कोलटकरांची ‘गच्ची’ : एक निरुपण’ ही त्यांची छोटी पुस्तिका हे बहुधा बाजारात उपलब्ध असलेलं ढालेंचं एकमेव लेखन असावं. ढाले यांचं बरंच लेखन अजूनही अप्रकाशित आहे. काही वर्षांपूर्वी ‘खेळ’ या अनियतकालिकाचा २३वा अंक ‘राजा ढाले विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात आला होता. तो संग्राह्य आणि मोलाचा आहे.
ध्वज घेऊन उभे असणारे लोक म्हणजे ‘ढाले’!
‘खेळ’च्या या विशेषांकात ढाले यांची एक मुलाखत आहे. त्यात त्यांनी त्यांच्या ‘ढाले’ या आडनावाची उत्पत्ती सांगितली आहे. प्राचीन काळी गडकिल्ल्यांची अहोरात्र राखण करणारे आणि युद्धात भला मोठा फडकणारा झेंडा घेऊन उभे असलेले लोक म्हणजे ‘ढाले’. झेंडा कुठल्याही परिस्थितीत खाली पडू न देणं हे त्यांचं काम. एक घायाळ झाला की, दुसरा त्याची जागा घेत असे. ढाले घराण्याचा हा लौकिक राजा ढाले यांनीही आयुष्यभर सांभाळला. त्यांनी सत्याची आयुष्यभर पाठराखण केली आणि बंडखोरपणाचा खांद्यावर घेतलेला झेंडा शेवटपर्यंत खाली पडू दिला नाही.
आता ढालेंची परंपरा कोण चालवणार? चालणार तरी का? असे आणि यांसारखे प्रश्न तूर्त फिजूल आहेत. तूर्तास ढाले यांना नीट समजून घेणं हेच अधिक श्रेयस्कर आहे!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment