अजूनकाही
‘मेड इन इंडिया’, ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ आणि ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ यांसारख्या अतिशय वेगळ्या धाटणीच्या कादंबऱ्या लिहून मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर (वय ६३) यांचं १७ जुलै २०१९ रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांच्या या तीन अफलातून कादंबऱ्या या तशा आकारानं लघुकादंबऱ्या म्हणाव्यात अशाच आहेत. बोरकरांनी पैशाच्या गरजेपोटी ‘कमिशन रायटिंग’ पुष्कळ केलं. पण त्यांची खरी ओळख राहिली, यापुढेही राहील, ती या कादंबऱ्यांमुळेच. त्या कादंबऱ्यांची ही थोडक्यात ओळख.
.............................................................................................................................................
१) मेड इन इंडिया, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८७
पुरुषोत्तम बोरकर यांची ‘मेड इन इंडिया’ ही पहिली कादंबरी ऐंशीच्या दशकात प्रकाशित झाली. तेव्हा ती तिच्या वेगळेपणामुळे पुष्कळ गाजली. या कादंबरीला राज्य सरकारच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’नं ‘दशकातील सर्वोत्कृष्ट कादंबरी’ म्हणून या कादंबरीचा १९९२मध्ये गौरव केला.
“१९८०च्या दशकातल्या एका जबरदस्त परिणामकारी कादंबरीचा उल्लेखही अनिवार्य आहे. ती म्हणजे पुरुषोत्तम बोरकर यांची ‘मेड इन इंडिया’. खरं तर ‘कोसला’ जिथे संपते, तिथूनच ‘मेड इन इंडिया’ सुरू होते. ‘कोसला’सारखंच आभाळाएवढं ओझं डोक्यावर घेऊन कादंबरीचा नायक विदर्भातल्या आपल्या गावी ‘बरोब्बर खुंटापाशी येऊन’ उभा राहिला आहे. त्याचं गावातलं आयुष्य, बरोबरीनंच दिसत राहणारा निसर्गाचा ऱ्हास, त्याबाबत फार काही करता न आल्याची खंत ही एखाद्या ठसठसत्या जखमेसारखी, वेदनेसारखी पूर्ण कादंबरीभर आपल्याबरोबर राहते. अस्सल वैदर्भीय भाषेत मधून ‘मले समजे ना, की आपल्या लहानपणी वातावरणाचे प्रतिध्वनी होयेले मिठ्ठू, भोर्या, तितर, चिळ्या, कोकीळ, कोयशे कुठी गेले? की येन्ड्रीन संस्कृतीनं नष्ट केलं याईले?’ असे प्रश्न नायकाला कादंबरीबर छळतात. रूढ अर्थाने नाही, तरी रोजच्या जगण्यात ग्रामीण भारत निसर्गापासून कसा तुटत चालला आहे, याचा अस्वस्थ ताळेबंद ही कादंबरी मांडते. अगदी शेवटालाही, आपल्याच कल्पित मरणाचं स्वप्न नायक पाहतो. ते असं : ‘माह्या अनुरेतूनच हिर्वेगार डार्क ग्रीन श्वासोच्छवास अविरत उमटत रहातीन. या आसमंतात. मी असं चक्र होऊन जाईन या सृष्टीचं. या मातीचं.’ ” - संतोष शिंत्रे (पर्यावरण पत्रकार व कथाकार)
२) आमदार निवास रूम नं. १७५६, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९९
‘मेड इन इंडिया’नंतर जवळपास एका तपानं बोरकरांची ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ ही दुसरी कादंबरी प्रकाशित झाली. आमदार निवासातल्या एका खोलीत काय चालतं याविषयीची ही कादंबरीही ‘मेड इन इंडिया’सारखीच भाषा, शैली आणि विषय या निकषांवर अफलातून म्हणावी अशीच आहे.
“पोपटराव हे पात्र केवळ आमदार निवासातच वावरते असे नव्हे, तर ते अखिल भारतीय आणि जागतिक राजकारणाच्या पातळीवरही तितक्याच लीलया संचार करताना आपणास दिसते, भेटते. खरे तर मुळं उखडलेल्या नायकाची, त्याच्या भोवतीच्या तशाच माणसांची ही कहाणी! एक गुदमरलेपण, घुसमट, चक्रव्यूहात अडकल्यानंतरची कोंडीग्रस्तता म्हणजेच हे लेखन! एक्स्पायरी डेट निघून गेलेल्या आणि म्हणूनच जीवनाला कवडीमोल लेखणाऱ्या एका तरुणाचे हे आत्मकथन एक अजबच अनुभव आपल्याला देते. एका थर्डक्लास आयुष्याचे म्हणूनच ते एक फर्स्ट क्लास प्रात्यक्षिक वाटते! दिव्याखालचा अंझार भोगणाऱ्या माणसांची ही गाथा आपणास हसवत हसवत अस्वस्थ करून सोडेल यात शंकाच नाही!” (कादंबरीच्या मलपृष्ठावर मजकूर, ब्लर्ब)
३) १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी, सायन पब्लिकेशन्स, पुणे, २००९
बोरकरांच्या ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये जसं एका दशकाचं अंतर होतं, तसंच दशकभराचं अंतर त्यांच्या ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या तिसऱ्या आणि शेवटच्या कादंबरीमध्येही राहिलं आहे. ‘आमदार निवास रूम नं. १७५६’नंतरची ही बोरकरांची तिसरी कादंबरी. ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या दोन्ही कादंबऱ्या पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनानं प्रकाशित केल्या, तर ही कादंबरी पुण्याच्याच सायन पब्लिकेशन्सनं प्रकाशित केली. २००९ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजच्या महाराष्ट्राचा वेध घेण्याच्या प्रयत्न करते.
“ही कादंबरी म्हणजे २०१९ सालानंतरच्या म्हणजे जवळपास एका तपानंतरच्या महाराष्ट्राचे एक भेदक व्यंगचित्रण. भविष्यातील राजकीय, कला आणि सांस्कृतिक जगावर जळजळीत भाष्य करणारा हा एक विनोदी उपरोधपटच म्हणायला हवा. लेखकाच्या स्वानुभवातून उतरलेले, नावीन्यपूर्ण आणि वाचकाला खिळवून ठेवणारे, वरवर विनोदी वाटणारे पण आतून काळीज कुरतडणारे हे लेखन म्हणजे एक विराट शोकांतिकाच म्हटली पाहिजे. आपल्या भोवतालचे वास्तव एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडत नव्या पिढीला सजग आणि सचेत करणारे हे लेखन म्हणजे या मातीची, या देशाची अफलातून कुंडलीच होय!” - नितीन कोत्तापल्ले (लेखक-प्रकाशक)
‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या कादंबऱ्यांसारखी प्रसिद्धी किंवा चर्चा बोरकरांच्या ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या कादंबरीच्या वाट्याला आली नाही. पण ही कादंबरीही तितकीच वेगळी आणि अफलातून आहे. ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या कादंबऱ्यांना अनेक पुरस्कार मिळाले, तसेच या कादंबऱ्यांचा समावेश विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्येही केला गेला. आकाशवाणीवरून त्यांचं अभिवाचन, सादरीकरणही झालं. ‘मेड इन इंडिया’चं एकपात्री नाट्यलेखन बोरकरांनी केलं. त्याचेही हजाराच्या घरात प्रयोग सादर झाले आहेत.
तर अशा हा बोरकरांच्या तीन वैशिष्ट्यपूर्ण कादंबऱ्या!
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment