अजूनकाही
‘मेड इन इंडिया’, ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ आणि ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ यांसारख्या अतिशय वेगळ्या धाटणीच्या कादंबऱ्या लिहून मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर (वय ६३) यांचे १७ जुलै २०१९ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी दै. देशोन्नती, दै. लोकमत, दै. मी मराठी Live या दैनिकांमध्ये ‘होबासक्या’ हे सदर काही काळ लिहिले. विनोदाच्या माध्यमातून सामाजिक वास्तवांवर भाष्य करणारं हे त्यांचं सदर लोकप्रिय होतं. त्यातील हा एक नमुन्यादाखल लेख…
.............................................................................................................................................
होबासराव - अरे नमस्कारहो तिर्मखभाऊ! तुमी दोन्तीन दिवस मले गावात दिसलेचना? कुठी बाहेरगावी गेल्ते काय?
तिर्मखभाऊ - म्हंज्ये तुमाले मालूमच नाई काय? मी मुंबईले गेल्तोना होबासराव! आपलं गाव आदर्श गाव म्हनून जाहीर झालं ना राजेहो! त त्याचं अवॉर्ड घ्याले गेलो व्होतो मी मुंबईले!
होबासराव - ‘आपलं गाव अन आदर्श गाव? कशी काय भट्टी ज्यमोली तिर्मखभाऊ? कोनाचा लग्गा लावला इचिबहिन?
तिर्मखभाऊ - कोनाचा लग्गा काहाले लावा लागते? ‘अच्छे दिन’ आले की ज्यमते बराबर धतिंग! आता आपल्या गावालेबी ‘अच्छे दिन’ आले असं समजा! अन् तसं पायलं त आहेच आपलं गाव आदर्श! आपल्या गावात येक आदर्श ग्रामपंच्यायत आहे...
होबासराव - ... अन तथी मेंबराईत रोज दळाल भांडनं होत अस्तात! गावकल्यान कमी अन पोटकल्यान जास्तीतजास्त केल्या जाते!
तिर्मखभाऊ - थांबानाहो होबासराव! त आपल्या गावात इलेक्ट्रीकचे लाईट आहेत... ते आपल्याले अंधाराकळून प्रकाशाकळे घेऊन जातात!
होबासराव - ... पन अशे हे लाईट मात्र स्वत:च चाबडुब अंधारात अस्तात! च्याळीसपैकी पस्तीस लाईट खंब्यावरून सदैव गायपच अस्तात! अन उरलेल्या पाचपैकी तीन कधीच लागत नाहीत! फक्त सरपंच्य अन उपसरपंच्याच्या दारातले दोन लाईटच तेवढे प्रकाशमान अस्तात!
तिर्मखभाऊ - थांबानाहो होबासराव! त आपल्या गावात एक आदर्श पानीपुरवठा योजना कार्यान्वित आहे...!
होबासराव - ... मात्र या योजनेचे फलित असे की, मयनोनमयने नळातून फक्त हवाच येते. पानी येतच नाई! टाकीतच पानी नस्ते अन असलं त लोडशेडिंगच्यान पुरवठा होत नाई!
तिर्मखभाऊ - थांबानाहो होबासराव! त आपल्या गावात एक आदर्श समाजमंदिर आहे!
होबासराव - ... जथी बसून गावातले भंटोल पोट्टे दिवसभर जुव्वा खेळत बस्तात! दारवा पेतात, मारामाऱ्या कर्तात...
तिर्मखभाऊ - हैट राजेहो! तुमी मले पुरं बोलुबी देत ना! त आपल्या या आदर्श गावात...
होबासराव - ... देशी दारूचे तीन दुकानं आहेत, अन येक बियरशॉपी आहे! गावाच्या फाट्यावर दोन धाबे आहेत. तथी रोज रात्री लीडराईच्या पार्ट्या झोळल्या जातात...
तिर्मखभाऊ - हैट बुवा! तुमी बोलू नोका राजेहो मंदामंदात! त आपल्या या आदर्श गावात टेलिफोनची सोय आहे!
होबासराव - ... ज्याचा उपयोग फक्त वरलीमटक्याचे आकळे घ्यासाठी होतो!
तिर्मखभाऊ - थांबानाहो होबासराव! त असं आपल्या गावात ज्ये ज्ये म्हनून आहे ते ते सबन आदर्श आहे! मायासारखा आदर्श सरपंच्य आहे का कुठी ऑल इंडियात? तुमीच सांगा बॉ?
होबासराव - ... हे बाकी खरं आहे तिर्मखराव! तुमच्यासारखा ऑलराऊंडर सरपंच्य त बॅट्री लावूनच पाहा लागते! हाऽऽ हाऽऽ हाऽऽ... जाऊ द्या आता ह्या आदर्श गोस्टी तिर्मखराव! अन मले हे सांगा की आज सकाऊन कायची गळबळ चालू व्होती बा तुमच्या बैठकीत? भल्ला गदाल हासाचा आवाज ये अन गप्पाबी निरा जोराजोरात सुरू व्होत्या! कोन्कोन अटारने जमा केले होते इचिबहीन?
तिर्मखभाऊ - सकाऊना? बेज्या मज्या आली होबासराव! ते आपले सभापती भोपंजीराव अन उपसरपंच्य टोपंजीराव मले भेटाले आले व्होते... आपला ग्रुप शेक्रटरीबी व्होता त्याईच्यासंग! मंग काय पाहा लागते! निरा जोर्दार अन डीप डिक्सशन झालं मंग आमचं! यक्दम इंटरनॅशनल लेवलवरच सबन च्यर्च्या झाली! भल्ली इस्टँडर च्यर्च्या झाली होबासराव! तुमी पायज्ये व्होते राज्या सकाऊन!
होबासराव - ऑ? लागे लागे येक्दम इंटरनॅशनल डिस्कशन? काय ऽऽऽ तिर्मखभाऊ? गोस्टी राजेहो इंटरनॅशनल कर्ता... पन तुमाले तुमच्ये लोकल प्रॉब्लेम मात्र दिसत नाहीत!
तिर्मखभाऊ - कोन्ते बुवा? कोन्ते? कोन्ते?
होबासराव - तिर्मखभाऊ! तुमच्या दारासमोरचं गटार... तो कायाशार रेंधा भरेल डायरा, दिस्ते कधी तुमाले? राजेहो त्याच्यात रोज रात्री दोघंतिघंजनतरी पळतात अन व्होलशेल भर्तात! शिवाय मच्छराईनं डच भरेल अस्ते तो डायरा! अन त्याच्यानं तुमच्या घरातल्या कोना ना कोनाले तरी मलेरिया व्होयेलच अस्ते! अस्ते की नाही? त मंग हा डायरा बुजवत ना तुमी?
तिर्मखभाऊ - बुजवू... बुजवू! तो डायराबी बुजवू! मी जरा या हागोनीनं परेशान व्होतो राज्या! नाही त आतालोग बुजोलाच अस्ता तो डायरा! अन आता आपल्यावालाच मुख्यमंत्री असल्याव, शेपळ्ळा डायराच काय पन आता गोसीखुर्दच बुजोतो की नाई पाहा तुमी!
होबासराव - अरे थांबा, थांबा तिर्मखभाऊ! येक मिनिट थांबा बरं!
तिर्मखभाऊ - काऊन बा?
होबासराव - बाहीर गल्लीत कल्ला हुन रायला कायचातरी! आयका बरं जरा काय आहे त ते इचिबहीन!
तिर्मखभाऊ - हावलेक! कल्ला आयकू यिऊन रायला खरी!
होबासराव - हावना! आपली देसाळगंगा त काही उधळली नाई अजून? की गावात मोर्च्याबिर्च्या निंगाला सायाचा?
तिर्मखभाऊ - तसं त काही दिसत नाही बुवा? आता मोर्च्यागिर्च्या अस्ता त मावालं सुपर गायडन्स घेतल्याबिगर निंगाला अस्ता काय राजेहो? मले त मौत चाल्ली दिस्ते कोनाचीतरी!
होबासराव - कायच्यावरून?
तिर्मखभाऊ - तो काय डफळ्याचा अवाज यिऊन रायला!
होबासराव - हावलेक! पन हे मौतीतले लोकं काय बोंबलून रायले इचिबहिन?
तिर्मखभाऊ - थांबा होबासराव! मले आयकू द्या! ज्यबतक देशी, ठर्रा रहेगा, बाबूराव तेरा नाम रहेगा!... अरेलेक! हर्चनबाप्पूचा बाबुराव गेला वाट्टे राजेहो?
होबासराव - कायच्यावरून?
तिर्मखभाऊ - थांबा... थांबा! लोक आनखीन काय काय घोद्दाना दिऊन रायले ते आयकू द्या मले !... बाबू बेवळे आगे बढो, हम तुम्हारे साथ है! नक्की, नक्कीच! बाबुरावच मेला राजेहो!
होबासराव - पन तिर्मखभाऊ! राजेहो मौतीसारखा शिरीयस प्रसंग अन हे पब्लिक अशा हास्यास्पद घोशना काऊन दिऊन रायली इचिबहिन?
तिर्मखभाऊ - त्याचं काय आहे होबासराव? की आपली कंट्री म्हंज्ये ज्यगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे! त्यानं काय झालं की हर हप्त्यात... इन यव्हरी वीक... येक तरी इलेक्शन अस्ते आपल्या गावात! आता याचा परिनाम असा झाला की जोतो सोसायटी, नाही त ग्रामपंचायत, नाही त पंच्यायत समिती, नाही त खरेदीविक्री संघ, नाही त दूधडेरी, नाही त कुक्कुटपालन अशासार्ख्या संस्थाईत घुशाले पायते! त्यानं झालं काय की गावात येकेका घरात दोन्तीन लीडर अन् तीनच्यार सीय कार्यकर्ते तैय्यार व्होयेल आहेत! अन आता इलेक्शनन कोन्तई असो! सोसायटीचं असो की पार पार्लमेंटचं असो... की गावातला यव्हरीबडी घेतेच त्यात उळी! अन आता मजूर त वावरात जातच नाहीत कामाले! इकळे मिरोनुकीत नाही त सभेत घोशना देल्ल्या दिवसभर की पकले नग्गद रोज पाश्शे अन बोनस म्हनून देशी क्वॉर्टर अन बिर्यानीचं पाकीट अस्तेच हाजीर! त्याच्यानं हे अशा घोशनाद्याची तुफान हॅबिटच लागली आपल्या गावातल्या ज्यालेत्याले! आता तुमी जर का आपल्या लावालावीबुढीले सुपारीचं खांड देल्लं नासुकलं खायाले... त ते काय म्हन्ते मालूम आहे? त ते म्हन्ते की... सुपारी खिलानेवाला अमर रहे! त आता या अशा येळ्याईले हे अंत्ययात्रा म्हंज्ये नेहमीची मिरोनुकच वाटत अशीन, येखांद्या इलेक्शनची! त त्याले ते बिच्चारे काय कर्तीन?... ऑ? कुठी गायप झालेत हे होबासराव? कुठी अदृश्य झाले म्हनाव येकायेकी?
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment