अजूनकाही
वर्षे येतात, वर्षे जातात. खाली उरतो तो गतेतिहासाचा पालापाचोळा. वर्ष सरताना आठवणी टिपल्या जातात त्या बहुधा धमाकेदार बॉम्बस्फोटांच्या, हिंसा व द्वेषाच्या नग्न नृत्याच्या. मानवी मनात विधायक परिवर्तन घडविणारे निःशब्द स्फोट ऐकू येण्यासाठीची संवेदनशीलताच कदाचित आपण गमावली असावी. नाहीतर गेली तीन वर्षे पोप फ्रान्सिस हा एकांडा शिलेदार रोमन कॅथॉलिक पंथाच्या बालेकिल्ल्यात बसून जी निःशब्द क्रांती कोट्यवधी अनुयायांच्या मनात घडवत आहे, तिच्याविषयी असे निःशब्द मौन सर्वत्र जाणवले नसते.
प्रत्येक धर्मात परंपरा व परिवर्तन यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष सुरू असतो. तो ऐरणीवर आला की, देश-खंड-जग यांचा इतिहास व भूगोल बदलण्याइतके त्याचे स्वरूप उग्र होते. आज जगभरातील इस्लाममध्ये सुरू असलेला वहाबी विरुद्ध अन्य हा संघर्ष याचेच द्योतक आहे. पण अनेकदा तो संघर्ष केवळ त्या धर्म/संप्रदाय/पंथ यांच्या अनुयायांच्या मनात गतिमान असतो. त्यांच्या धारणा, मूल्ये, श्रद्धा यांच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवण्याची क्षमता त्यात असते. अंतर्मनाच्या विराट प्रदेशात घडणार्या या निःशब्द स्फोटांतून साकार होते एक सांस्कृतिक क्रांती, जिचे महत्त्व कोणत्याही भूप्रदेशावर घडणार्या क्रांतीपेक्षा कमी नसते. पोप फ्रान्सिस आपल्या उक्ती-कृतीतून असे नवे मानस घडवत आहेत.
पोप फ्रान्सिस यांच्या कार्याचे महत्त्व समजण्यासाठी आपल्याला आधी त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी ध्यानात घ्यावी लागेल. हिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचीकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन यांमधील लढ्यास अधिक व्यापक अवकाश मिळाला आहे. (विवेकानंद, गांधी, विनोबा यांनी धर्माची अतिशय वेगळी परिभाषा करूनही हिंदू धर्माचे आदरणीय भाष्यकार म्हणून त्यांचे स्थान अबाधित राहिले, ते बहुदा त्यामुळेच.) त्या तुलनेत ख्रिश्चन धर्माची परिस्थिती खूप वेगळी आहे. निम्म्याहून अधिक पृथ्वीवर राज्य करणाऱ्यांचा हा धर्म नेटिव लोकांना सुसंस्कृत करायची जबाबदारी ईश्वराने आपल्यावर सोपवली आहे असे मानणाऱ्यांचा. चर्चची- धर्माचे नियमन करणाऱ्या संस्थेची - बांधणीही अतिशय चिरेबंदी पद्धतीची. त्यातही त्यातील रोमन कॅथॉलिक पंथ अधिक परंपराप्रिय. श्रेणीबद्ध, चिरेबंदी रचना, उपासनापद्धतीचे ठाशीव स्वरूप व अमर्याद राजकीय सत्ता/राज्याश्रय लाभल्यामुळे आलेला अहंकार यांमुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस चर्चची, विशेषतः रोमन कॅथॉलिक चर्चची प्रतिमा ही स्त्री-पुरुषसमतेची विरोधक, विज्ञानविरोधी, अहंमन्य, आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी अशी होती. तिसरे जग, स्त्रिया, गरीब, समलैंगिक, वंचित इ. समूह चर्चच्या विचारकक्षेत येत नाहीत, असे निदान चर्चबाहेरील लोकांना वाटत होते.
अर्थात या सर्व मुद्द्यांवर पुरोगामी भूमिका घेणारे प्रवाहदेखील चर्चमध्ये अस्तित्त्वात होते, पण पंथांतर्गत संघर्षात परंपरा निःसंशय वरचढ ठरली होती. मात्र पोप फ्रान्सिस यांनी तीन वर्षांपूर्वी पोपपदाची सूत्रे ग्रहण केली आणि कोणाच्या ध्यानीमनी नसताना परिवर्तनाचा झंझावात सुरू झाला. आजही त्याचा जोर ओसरला नाही, उलट परिवर्तनाच्या विविध पैलूंविषयी अधिकाधिक सुस्पष्ट भूमिका घेत, आतापर्यंत झालेल्या बदलांना स्थैर्य देत, साऱ्या जगातील वंचितांशी, परिवर्तन इच्छिणाऱ्या समूहांशी नाते जोडत तो पुढे जातो आहे.
पोप फ्रान्सिस हे लॅटिन अमेरिकेतून निवडले गेलेले पहिलेच पोप होत. पोपचे पद धारण करण्याच्या क्षणापासून त्यांचे वेगळेपण लोकांच्या मनावर ठसू लागले. त्यांनी त्या पदासोबत येणार सारा डामडौल नाकारला. हा व्हॅटिकनच्या बुरुजांवरून अधूनमधून आध्यात्मिक प्रवचने देणारा धर्मगुरू नसून, लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणारा, कोणत्याही प्रश्नावर न्याय्य भूमिका घेण्यास न कचरणारा ‘कर्ता सुधारक’ आहे, हे लवकरच सर्वांना दिसून आले. त्यांनी सर्वप्रथम हात घातला तोच सर्वांत कठीण व नाजूक प्रश्नाला. (सक्तीच्या) ब्रह्मचर्यातून मर्यादातिक्रमण घडते हा जगाचा अनुभव आहे, पण कोणताही धर्म ते मान्य करत नाही. एखाद्या धर्माच्या अधिकारी पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याचे मान्य करणे म्हणजे जणू त्या धर्माची बेअब्रू झाल्याची जाहीर कबुली देणे. म्हणून, अशा बातम्या दडपणे, ‘हा आमच्या धर्माच्या बदनामीचा कावा आहे’ असे म्हणून संबंधित धर्मगुरूला पाठीशी घालणे इ. प्रकार आजवर सर्व धर्मांचे लोक करत आले आणि त्यात निरपराध मुले व स्त्रियांचा हकनाक बळी जात राहिला.
पोप फ्रान्सिस यांनी प्रथमच असे गैरप्रकार चर्चेमध्ये घडल्याची जाहीर कबुली देऊन त्यासाठी संबंधितांची माफी मागितली. त्यापुढे जाऊन असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठीची उपाययोजना त्यांनी जाहीर केली व त्वरित अंमलातही आणली. अशी घटना घडल्यास तिची चौकशी करण्यासाठी त्यांनी सर्व स्तरांवर एक कायमस्वरूपी यंत्रणा तयार केली. सर्व पातळ्यांवरील धर्मोपदेशकांच्या प्रशिक्षणात ‘लैंगिक हिंसा व त्याबद्दलचा चर्चचा दृष्टिकोन’ या विषयाचा समावेश केला. मुख्य म्हणजे अशा सर्व तक्रारींची दखल घेऊन तिची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक पारदर्शक प्रणाली तयार केली आणि त्याची सूत्रे अशा हिंसाचाराची शिकार झालेल्या व त्याविरुद्ध काम करणाऱ्या (survivors of sexual violence) स्त्रियांच्या गटाकडे दिली. या पहिल्यावहिल्या कृतीमुळे पोप फ्रान्सिस यांच्या असामान्य धैर्य, सत्यनिष्ठा व कार्यकुशलता या गुणांचा सर्वांना प्रत्यय आला.
त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. समलैंगिकता, अन्यधर्मीय व ख्रिश्चन यांचे नाते, वसाहतवाद, कम्युनिझम, गरिबी, शोषण, पर्यावरणसंहार, ग्लोबल वॉर्मिंग, गर्भपात, स्त्रियांचे हक्क, स्त्रियांचे धर्मातील स्थान, विस्थापन व निर्वासित, पाप-पुण्य, आस्तिक-नास्तिक, स्वर्ग-नरक ... जगातील असा कोणताही विषय नसेल ज्यावर पोप फ्रान्सिस यांनी बेधडक, स्वच्छ व स्पष्ट भूमिका घेतली नाही. चर्चने निषिद्ध मानलेल्या अनेक गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक केल्या, अप्रवेश्य मानल्या गेलेल्या स्थानांना आवर्जून भेटी दिल्या. उदा. त्यांनी ‘साम्यवादी’ बोलिव्हियाचा दौरा केला. त्यांच्या भाषणानंतर बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष ईव्हो मोराल्स यांनी त्यांना लाकडावर कोरीव काम केलेली एक भेटवस्तू दिली – तिच्यावर कम्युनिझमचे प्रतीक असलेल्या विळा-हातोड्याची प्रतिकृती कोरली होती आणि येशू ख्रिस्त त्यातील हातोड्यावर विसावलेला दाखवला होता.
गेल्या दोन वर्षांत त्यांनी व्हॅटिकनच्या व्यासपीठावर जगभरातील जनआंदोलनांच्या दोन परिषदा आयोजित केल्या, ज्यांत गरीब, जमिनीपासून वंचित झालेले शेतकरी व बेरोजगार यांचा समावेश होता. यांतील दुसऱ्या परिषदेत सन्माननीय वक्ता म्हणून ईव्हो मोराल्स यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या प्रसंगी क्युबातील ख्यातनाम क्रांतिकारक चे गव्हेराचे चित्र असलेले जाकीट मोराल्स यांनी परिधान केले होते. (नागपूरच्या संघकार्यालयात सरसंघचालकांनी किंवा शृंगेरी पीठात शंकराचार्यांनी कन्हैयाकुमारला किंवा एखाद्या जहाल स्त्रीवादी कार्यकर्तीला बोलावून त्यांचे भाषण आयोजित केले आहे, आणि वक्त्याने ‘देवीची पूजा करणाऱ्यांना स्त्रीचा विटाळ कसा काय होतो?’ असे लिहिलेला कुडता घातला आहे, अशी कल्पना करून पाहा.) विविध विषयांवरील पोप फ्रान्सिस यांची काही उद्धरणे खाली देत आहे, त्यावरून रोमन कॅथॉलिक चर्चमधील प्रस्थापितांना किती जबरदस्त धक्का बसला असेल याची कोणालाही कल्पना करता येईल-
“मी तुम्हाला अतिशय दुःखाने हे सांगत आहे: देवाच्या नावाखाली आफ्रिकेतील स्थानिक रहिवाशांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची पापकृत्ये करण्यात आली... मी अतिशय नम्रपणे तुम्हा सगळ्यांसमोर क्षमायाचना करत आहे – केवळ चर्चने केलेल्या अपराधांसाठी नव्हे, तर अमेरिकेचा तथाकथित पाडाव करताना येथील मूळ रहिवाशांच्या विरोधात जे कोणते अत्याचार करण्यात आले असतील, त्यांच्याबद्दलही... ते सर्व पाप होते, अमर्याद पाप!”
“…हा नवा वसाहतवाद विविध चेहऱ्यांनी आपल्यासमोर येतो. कधी तो बड्या कॉर्पोरेशन्स, (आंतरराष्ट्रीय) पत संस्था, ‘मुक्त व्यापारा’चे करार अशी निनावी रूपे घेतो, तर कधी ‘काटकसरीच्या उपायांचे’ रूप घेऊन तो गरिबांचे आणि कामगारांचे खपाटीला गेलेले पोट आणखी कसून बांधतो..(म्हणून) आपण हे निर्भयपणे सांगितले पाहिजे की, आम्हाला परिवर्तन हवे आहे- खरेखुरे परिवर्तन, व्यवस्था बदलणारे परिवर्तन. ज्या व्यवस्थेने कोणत्याही किमतीवर नफा मिळवण्याची मानसिकता निर्माण केली आहे, ज्या व्यवस्थेला लोकांच्या सामाजिक बहिष्काराचे किंवा निसर्गाच्या संहाराचे सोयरसुतक नाही, अशी व्यवस्था आपल्याला बदलायलाच हवी.”
“नम्रता, आत्मशोध व प्रार्थनापूर्वक केलेले चिंतन यांतून आम्हाला काही प्रश्नांचा नवा अर्थ गवसला आहे. चर्च आता असे मानत नाही की, जेथे (पापी) लोकांना यातना दिल्या जातात, असा नरक खरोखर कोठे अस्तित्वात आहे. कारण असा विचार हा परमकारुणिक ईश्वराच्या अमर्याद प्रेमाच्या संकल्पनेशी विसंगत आहे. ईश्वर हा मानवतेचा परीक्षक नसून तिचा मित्र व प्रिय सखा आहे. ईश्वर तुमचा धिक्कार करण्यासाठी नाही तर तुम्हाला मिठीत घेण्यासाठी आतुर आहे. आदम आणि ईव्हच्या गोष्टीप्रमाणे नरक हादेखील कल्पनेचा भाग आहे. नरक म्हणजे काय, तर अशी स्थिती ज्यात आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होऊ शकत नाही, तो ईश्वराशी अखेर एकरूप होणारच आहे, पण जेव्हा तो त्याच्यापासून दुरावतो, एकाकी पडतो, ती स्थिती म्हणजे नरक.”
“भूतकाळात चर्च ज्यांना अनैतिक किंवा पापी समजत असे, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेत असे. आम्ही आता न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून लोकांचा न्यायनिवाडा करणे बंद केले आहे. एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे, आम्ही आमच्या बालकांचा कधीही धिक्कार न करता कायम त्यांच्यावर वात्सल्याचा वर्षाव करतो. आमचे चर्च व्यापक आहे. तिथे भिन्न लैंगिक व समलैंगिक (संबंध ठेवणारे), गर्भपाताचे समर्थक व विरोधी, सर्वांना जागा आहे. येथे पुराणमतवादी व उदारमतवादी दोघांसाठीही अवकाश आहे. अगदी कम्युनिस्टांचेही आम्ही स्वागत करतो व ते आमच्यात सामील झाले आहेत. आम्ही सर्व एकाच देवावर प्रेम करतो व त्याची आराधना करतो.”
“कॅथॉलिक पंथ हा आता आधुनिक व विवेकनिष्ठ धर्म आहे. आम्ही कालानुरूप उत्क्रांत झालो आहोत. आता सर्व प्रकारची असहिष्णुता त्यागण्याची वेळ आली आहे. धर्मातील सत्य हे काळानुसार उत्क्रांत होते, बदलते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अंतिम किंवा पाषाणात खोदून ठेवलेले असे कोणतेही सत्य नसते. अगदी नास्तिक माणूस झाला तरी तो प्रेमाच्या व परोपकाराच्या कृत्यातून देवाच्या अस्तित्वाला मान्यता देतच असतो. आपल्या चांगल्या वर्तणुकीतून तो स्वतःच्या आत्म्याची मुक्ती साधतो व त्याचबरोबर मानवतेच्या मुक्तीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होतो.”
“बायबल हा अतिशय सुंदर ग्रंथ आहे, पण इतर सर्व महान प्राचीन ग्रंथांप्रमाणे त्यातील काही भाग कालबाह्य झाला आहे. त्यातील काही भाग तर असहिष्णुतेला किंवा इतरांचा न्यायनिवाडा करण्यास प्रोत्साहन देतो. हा भाग बायबलमध्ये मागून घुसडण्यात आला आहे हे जाहीर करण्याची वेळ आली आहे. कारण संपूर्ण ग्रंथातून जो प्रेमाचा व सत्याचा संदेश प्रक्षेपित होतो, त्याच्याशी तो पूर्णपणे विसंगत किंवा विरोधी आहे. आम्हाला जे भान आले आहे, त्यानुसार आम्ही लौकरच स्त्रियांना धर्मोपदेशकाच्या विविध पदांवर- कार्डिनल, बिशप, प्रीस्ट – नियुक्त करू. मला अशा वाटते की, भविष्यात पोपचे पदही स्त्री भूषवू शकेल. पुरुषांसाठी उघडा असणारा कोणताही दरवाजा स्त्रियांसाठी बंद राहता कामा नये.”
कॅथॉलिक पंथात इतके आमूलाग्र परिवर्तन इतक्या कमी काळात घडवून आणल्यामुळे त्यांना पंथांतर्गत प्रचंड विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. ते छुपे कम्युनिस्ट आहेत असा प्रचार करण्यात येत आहे. त्यांनी सुचवलेले बदल किती काळ टिकून राहतील? बहुराष्ट्रीय कंपन्या, डोनाल्ड ट्रंपसारखे राजकीय नेते, चर्चमधील पुराणमतवादी या सर्वांच्या एकत्रित विरोधाला व चर्चमधील अंतर्गत राजकारणाला ते किती काळ तोंड देऊ शकतील? असे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत.
गेल्या आठवड्यात जगाला उद्देशून केलेल्या भाषणात पोपनी जगातील सर्व क्षेत्रातील हिंसेचे उच्चाटन करण्याचे आवाहन केले. त्यासाठी कुटुंबांतर्गत हिंसाथोपवणे, शस्त्रस्पर्धेला आळा घालणे, परमाणुअस्त्रे नष्ट करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. विश्वात शांतता नांदायची असेल तर आपल्याला महात्मा गांधी, खान अब्दुल गफार खान, संत तेरेसा व मार्टिनल्युथर किंग (ज्युनियर) यांसारख्या अहिंसेच्या पुजाऱ्यांच्या मार्गाने जावे लागेल असेही ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प हा खरा ख्रिश्चन नव्हे अशी स्पष्ट भूमिका घेणारा, “ख्रिश्चन व्यक्तीसाठी अहिंसा ही केवळ जगण्याची सोयीस्कर पद्धत नव्हे; तिच्या अस्तित्वाचा तो मार्ग आहे”, असे म्हणणारा व तसे जगणारा १२० कोटी अनुयायांचा हा सर्वोच्च नेता हिंसा व द्वेषाने काजळलेल्या कालखंडातील लखलखती मशाल आहे. नववर्षाचे स्वागत करताना ही मशाल अधिकाधिक तेजाने उजळत राहो अशी प्रार्थना आपण करू यात का?
लेखक ‘आजचा सुधारक’ या वैचारिक मासिकाचे संपादक आहेत.
ravindrarp@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment