अजूनकाही
लोकांनी आपली विनोदबुद्धी वाढवावी, विनोद सहज घ्यावा, मनाला लावून घेऊ नये अथवा नसती प्रतीकं व इतिहास यांचा संबंध जोडू नये, निखळ आनंद घ्यावा, हे म्हटलंय उच्च न्यायालयानं! निमित्त होतं ‘अलिबागहून आला काय?’ या विनोदातून अलिबागच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाला कमी लेखलं जातंय, त्यामुळे या वाक्प्रचारावर बंदी घालावी अशी एक याचिका उच्च न्यायालयात केली होती. ती फेटाळताना न्यायालयानं जनतेला वरील मौलिक सल्ला दिलाय. सध्याच्या समाजमाध्यमांच्या उन्मादी सक्रियेत असा सल्ला म्हणजे फारच झालं!
‘अलिबागहून आला काय?’ किंवा ‘अलिबागहून आलास का’, या न्यायालयानं मुक्त केलेल्या वाक्प्रचाराचा लगेचच वापर करण्याची संधी आम्हाला मिळाली. जेव्हा आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार, ते आदित्य ठाकरे सेनेचे मुख्यमंत्री असतील, अशा बातम्या आल्या तेव्हा. लोकशाहीचा इतका ‘पोरखेळ’ म्हणजे हद्दच झाली!
कोण हे आदित्य ठाकरे? बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव, एवढ्या पुंजीवर ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? आता यात आणखी दोन शक्यता असू शकतात. ऐनवेळी ‘कुणी ठाकरे निवडणूक लढवत नाही’ आणि ‘कुणी ठाकरे संविधानिक पद स्वीकारत नाही’ म्हणत माघार घ्यायची ही एक. आणि दुसरी म्हणजे सेनेत जे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतील त्यांना वेसण घालायची.
ज्या बाळासाहेब ठाकरे यांची उभी हयात नेहरू-गांधी घराणेशाहीवर टीका करण्यात गेली, त्यांनाच शेवटी ‘उद्धव आणि आदित्यला तुमच्या हाती सोपवतोय, त्यांना प्रेम द्या, सांभाळून घ्या’, असं आर्जव करावं लागलं.
.............................................................................................................................................
दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या ‘ओह माय गोडसे’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5010/Oh-My-Godse
.............................................................................................................................................
मुळात राज ठाकरे यांनी नावारूपाला आणलेली ‘अखिल भारतीय विद्यार्थी सेना’ त्यांनी सेना सोडल्यावर आदित्य ठाकरेंवर सोपवली गेली. या सेनेचं स्वत:चं असं नेटवर्क पूर्वीपासून आहे. पण राज ठाकरेंचा ठसा पुसायचा म्हणून ‘युवा सेना’ जन्माला घातली. या युवासेनेचा शुभारंभ नि युवराजांचा राज्याभिषेक त्याच वेळी जाहीर सभेत झाला. तेव्हा बाळासाहेबांची तब्येत ठीक नसायची. आता मनसेत असलेल्या अभिजीत पानसेंनी एक तलवार बाळासाहेबांना दिली. दोन मिनिटं त्यांना कळलंच नाही. काय होतंय, काय करायचंय, मग कुणीतरी कानात सांगितलं. तोवर आदित्य ठाकरे गुडघ्यावर बसले होते. भवानी तलवारच स्वीकारायची होती जणू! बाळासाहेबांनी मग तलवार उपसून दिली वगैरे. पण त्यात यांत्रिकपणाच जास्त होता.
अशा पद्धतीनं राज्याभिषेक झालेले युवानेते मग सर्वत्र दिसू लागले. सेनेत आजवर नसलेली ‘काँग्रेसी पायलागू संस्कृती’ तोवर सुरू झाली. फ्लेक्सवर युवराज झळकू लागले. याबाबतीत त्यांची बरोबरी राहुल गांधी यांच्याशीच होऊ शकते. राहुल गांधींनी मागच्या वर्षभरात जरा बरा अभ्यास केला. तरीही जनतेनं ठोकरले ते ठोकरलंच!
सध्या माध्यमांना दोन पतंगांच्या काटाकाटीत एक पतंग हरला, या पद्धतीच्या बातम्या द्यायच्या असतात. आणि काही स्लॉटही विकायचे असायचे. मीडिया मॅनेजमेंट करणारे मग ‘अ’ ते ‘ज्ञ’ वाहिन्यांवर कुणातरी एकाला नेऊन बसवतात. तसं सध्या आदित्य ठाकरे प्रमोशन चालू आहे. प्रश्न असा पडतो, या माध्यमांच्या संपादकांनाही भान राहत नाही? महाराष्ट्रासारख्या मोठ्या, प्रगत राज्याचा मुख्यमंत्री बनणं किंवा बनवणं म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होणं आहे का? कुणाला तुम्ही अवास्तव प्रसिद्धी देताय? कुणाच्याही शिडात हवा भरताय? त्याची किमान पात्रता तरी तपासा. सैनिक ‘युवराज’ म्हणतात नि कुर्निसात करतात म्हणून १२ कोटी जनताही तेच करेल? विधानसभा काय असते, कामकाज काय असतं, याची कल्पना तरी आहे का?
बाळ ठाकरे नामक एका व्यंगचित्रकारानं मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना स्थापन केली. हजारो-लाखो तरुणांनी उदंड प्रतिसाद देत स्वत:च्या रक्तानं, घामानं सेना वाढवली. त्यांना पुढे खड्यासारखं बाजूला केलं गेलं. तरीही मुंबईसह महाराष्ट्रात आजही अनेक सैनिक असतील, ज्यांनी साहेबांसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. पोलीस चौक्या, तुरुंग नि न्यायालयात हयात घालवली. आज उद्धव काय, आदित्य काय, जी काही सत्ता उपभोगताहेत (राज्यात सध्या, महापालिका २५ वर्षं), त्यामागे अशा अनेक अनाम शिवसैनिकांनी आयुष्य पणाला लावलेलं आहे. आज जे साठी पलीकडचे नेते आहेत, त्यांनी आपली उमेदीची वर्षं संघटनेसाठी दिली आहेत. त्या सर्वांना बाजूला करत ठेवत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार?
एकेकाळची लढावू सेना आता गलितगात्र नि सत्ताग्रस्त झालीय. आता सेनेत ना मावळे उरलेत, ना नेते, ना तो आवाज, ना तो बाणा. चार वर्षं खूप बेडकुळ्या काढून दाखवल्या आणि शेवटी अमित शहासमोर शरणागती पत्करून झाली. याला उद्धव ठाकरे राजकीय खेळी समजत असतील तर मग प्रश्नच मिटला!
मागच्या पाच वर्षांत सेना नेतृत्व इतकं भरकटलंय की, त्यांनाच कळत नसेल आधी काय बोललो, आता काय बोललो. भाजपनं अशी काही कोंडी केलीय की, किती काही गर्जना करू दे सेनेला भाजपच्या तालावरच नाचावं लागेल. आदित्य मुख्यमंत्री होणार या बातमीनं भाजपला चांगलाच विनोद ऐकल्याचं समाधान मिळत असणार. सेनेच्या अशा काही ‘बचकाना’ हरकती चालू आहेत की, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जे मिळेल ते घ्यावं लागेल. अशा पार्श्वभूमीवर काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. उद्धव ठाकरेंना किमान काही फिलर्स मिळत असतील तर त्यांनी आदित्य बाळ व त्याच्या मार्केटिंग टीमला आवर घालावा.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पेंग्विन सांभाळायचं काम नसतं की, ओपन जीममध्ये व्यायाम करायचा नसतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इतकं डेली रुटीन असतं की, स्वतंत्रपणे नाईट लाइफ एन्जॉय करता येत नाही. महाराष्ट्राचा भावी (!) मुख्यमंत्री आवाज फुटलेला नसताना एवढ्या जागा नि तेवढ्या जागा देऊ, असे चिमखडे बोल बोलत नाही.
मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्यांनी आधी पालिकेचा कारभार सुधारावा. माणसं गटारं, नाल्यात पडून मरताहेत, पाणी तुंबतं. झाडं, इमारती पडतात. यावर काय योजना? काय देखरेख? काय सूचना?
पालिकेच्या करोडो रुपयांच्या बजेटवर बसून मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत असतील तर आधी नगरसेवक म्हणून निवडून या. कार्यक्षमता सिद्ध करा. बापजाद्यांच्या मांडीवरचं नेतृत्व नको, असं मोदीच म्हणताहेत. त्यांचं तरी ऐका!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Dilip Chirmuley
Mon , 22 July 2019
This is good comment. Aditya Thakare has not proven himself and wants to become Chief Minister of Maharshtra. What are his qualifications for aspiring to rise above others who have won elections and spent decades in parliaments. Uddhav Thakare and Sharad Pawar are keeping the workers in their parties away from positions of power and promoting their family members. India will really progress when such nepotism stops.