अजूनकाही
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेली असताना शरद पवार यांचा अपवाद वगळता विरोधी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरल्याचे चित्र नाही. प्रकृती ठीक नसताना आणि याही वयात शरद पवार यांच्यात राजकारण करण्याची असणारी ऊर्मी आणि सतत भटकंती करण्याची त्यांच्यात असणारी ऊर्जा विस्मयचकित करणारी आहे. एखादी घटना म्हणा की कोणाचाही प्रतिवाद करायचा असेल तर एखादा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांत प्रतिक्रिया अपलोड करावी किंवा एखादा ई-मेल माध्यमांना पाठवून दिला की, विरोधी म्हणा की सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची सामाजिक बांधिलकी संपली असल्याच्या सध्याच्या जमान्यातही शरद पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असतात, लोकांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने निराश न होता (किंवा पराभवाचे ते नैराश्य चेहऱ्यावर न दखवता) शरद पवार लगेच दुष्काळग्रस्तांच्या सांत्वनासाठी धावले; चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून बेघर झालेल्या आपद्ग्रस्तांना भेटायला जाणारे शरद पवार हेच राज्यातले एकमेव ज्येष्ठ नेते होते. भेटायला गेलेल्या लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची चिकाटी अजूनही कायम आहे. तरुणांच्या बैठकीत तर तर साडेतीन-चार तास एकाच जागी बसून त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे शरद पवार हे कदाचित राज्यातील एकमेव नेते असावेत.
देशाप्रमाणेच काँग्रेसची राज्यातील अवस्था अत्यंत वाईट्ट आहे. (अशा वेळी विलासराव देशमुख यांची उणीव कटाक्षाने जाणवते.) लोकसभा निवडणुकीत राज्यातून विजयी झालेले काँग्रेसचे बाळू धानोरकर हे एकमेव खासदार मूळचे शिवसेनेचे आहेत आणि त्यांनी केवळ लोकसभा निवडणूक लढवायला मिळावी म्हणूनच सेनेचा त्याग करत असून माझ्या निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याप्रती कायम राहतील असे सांगितले होते. विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदही काँग्रेसने शिवसेनेतून आलेल्या आणि नारायण राणे यांच्याप्रती निष्ठा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांचा आवाकाही राज्यस्तरीय नाही. म्हणजेच या दोघांकडून काँग्रेसला फार काही संजीवनी मिळण्याची अपेक्षा बाळगणे व्यर्थच आहे.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे एक आश्वासक नाव काँग्रेसकडे नक्कीच होतं आणि आणि आहेही, पण लोकसभा निवडणुकीतील दोन सलग पराभव पदरी असल्याने शिंदे यांचं नाव काही प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे आणण्याचं धाडस काँग्रेसला झालं नसावं. खरं तर, पक्ष महाराष्ट्रात पुन्हा उभा करण्याचं कठीण आव्हान सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत: पुढे येऊन स्वीकारायला हवं होतं, पण प्रदीर्घ काळ दिल्लीच्या राजकारणात वावरल्याने शिंदे यांनाही राज्यात परतण्यात फारसं स्वारस्य नसावं आणि राज्याचा अध्यक्ष किती पांगळा असतो, हे दिल्लीत राहून चांगलं ठाऊक असल्यानंही (फार दगदग न करण्याचा त्यांचा एकूण स्वभाव लक्षात घेता) सुशीलकुमार शिंदे यांनी त्यात फारशी रुची दाखवली नसावी, असं म्हणायलाही जागा आहे.
पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे आणखी काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत. प्रशासक म्हणून पृथ्वीराज चव्हाण चांगले आहेत, वाचतात आणि लोकांशी चांगलं वागतात वगैरे म्हणजे सुसंस्कृत आहेत, पण मुख्यमंत्रीपद मिळालं तरी राज्याचं नेतृत्व चालून येत नाहीत. त्यासाठी २४ तास राजकारण करावं लागतं, लोकसंपर्क अफाट असावाच लागतो आणि ऐकून घेण्याची क्षमता मोठी लागते. या गुणांचा अभाव असल्यानं मुख्यमंत्री म्हणून शरद पवार आणि राष्ट्रवादीला वेसण घालण्यावर जास्तच लक्ष दिल्यानं आणि पुणे-मुंबईच्या बाहेर नियमित वावर न ठेवल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्यस्तरीय नेतृत्वावर मर्यादा आल्या आहेत. शंकरराव चव्हाण यांची मोठी पुण्याई पाठिशी असूनही अशोक चव्हाण यांचं नेतृत्व राज्यभर पसरू शकलं नाही. अशोक चव्हाण यांनी सुरुवात तर चांगली केलेली होती, पण नेतृत्वाची मुळं राज्यभर पसरण्याच्या नेमक्या काळातच ‘आदर्श’ पाठोपाठ ‘पेड न्यूज’ कांड घडलं आणि अशोक चव्हाण न्यायालयाच्या चक्रात अडकले. ‘सुशेगात’ राहण्याचा, म्हणजे अंगाला फार काही लावून न घेण्याचा स्वभावही आड आला असावा असंही म्हणता येईल. आता तर अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यापुरते उरले आहेत.
या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रं आलेली आहेत. बाळासाहेब थोरात मितभाषी, शांत आणि संयमी आहेत. त्यांच्या नावे कोणताही वाद जमा नाही. विखे कुटुंबाशी असणारं राजकीय वैर वगळता त्यांचे पक्षात किंवा पक्षाबाहेरही दुष्मनही फारसे नाहीत, शिवाय ते सुसंस्कृत आहेत. (तीन वर्षांपूर्वी आमची पहिली भेट संगमनेरला झाली. तेव्हा त्यांनी ‘तुमचं ग्रेस नावाचं गारुड’ हे पुस्तक काही मला मिळालं नाही, अशी खंत व्यक्त करतानाच ग्रेस यांची ‘तुला पहिले मी नदीच्या किनारी...’ ही कविताही म्हणून दाखवली होती!), पण प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करतानाच पक्षश्रेष्ठीनी पाच कार्यकारी अध्यक्ष देऊन बाळासाहेब थोरात यांचे पंख बांधून ठेवलेले आहेत.
आधीच काँग्रेसमध्ये अनेक बेरके आणि बिलंदर नेते आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं आहेत. त्यांचे गट-उपगट-उपउपगट आहेत. त्यांच्यात ईर्ष्या आणि महत्त्वाकांक्षा आहेत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सततच्या पराभवाने काँग्रेसला प्रचंड मरगळ आलेली आहे. त्यातच एका कार्यकारी अध्यक्षासह काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची वदंता आहे. या सर्वांवर बाळासाहेब थोरात कशी मात करणार, काँग्रेसला नवसंजीवनी कधी देणार आणि निवडणुकीच्या रिंगणात लढवण्यासाठी तयार आणि सक्षम कधी करणार, हे एक न उलगडणारं कोडं आहे.
तिकडे राष्ट्रवादीच्या गोटातही फारसा काही उत्साह नाही. नेतृत्व म्हणून या पक्षातही एकुणातच आनंदीआनंद आहे. स्वत:शिवाय नेतृत्वाची दुसरी फळी उभारण्यात शरद पवार यशस्वी ठरलेले नाहीत, असं म्हणण्यापेक्षा त्यांनी ती तयार होऊ देण्यात मनापासून स्वारस्य दाखवलं नाही, असं जे म्हटलं जातं त्यात तथ्य असल्याचं दिसतं. वारसदार म्हणून राज्यात त्यांनी ना ठामपणे कधी कन्येला समोर केलं किंवा पुतण्याला नेतृत्वासाठी स्पष्ट उत्तेजन दिलं, ना कधी आर.आर. पाटील, जयंत पाटील किंवा अन्य कुणाला पुरेशी ताकद आणि निर्णय स्वातंत्र्य दिलं.
छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या कारभाराच्या चौकशीच्या आदेशांवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून स्वाक्षऱ्या स्वबळावर केल्या असतील यावर कोण विश्वास ठेवेल? शरद पवार पवार यांनी पक्षातल्या काही नेत्यांना कधी महत्त्व दिलं आणि नंतर त्यांचं महत्त्व अनाकलनीयपणे कमीही केलं. या विधानाच्या पुष्ठ्यर्थ पदमसिंह पाटील, कमलकिशोर कदम, दत्ता मेघे, डॉ. माधव किन्हाळकर, बबनराव पाचपुते, दिग्विजय खानविलकर, लक्ष्मणराव ढोबळे आणि सूर्यकांता पाटील, अशी अलिकडच्या काळातील अनेकांची नावं घेता येतील. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कायमच शरद पवार नावाचा एकखांबी तंबू राहिला. त्यातच एक विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकीत झालेल्या सलग पराभवामुळे पक्षात आलेली मरगळ कार्यकर्त्यांच्या बोलण्यात जाणवते.
हे त्रांगडं इथंच संपत नाही, ही शृंखला लांब आहे. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय स्वबळावर सर्व २८८ जागा लढवू शकत नाही. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या बहुजन वंचित आघाडीनं या दोन्ही काँग्रेसच्या मतांवर हक्क सांगितलेला असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसची इच्छा वंचित आघाडी सोबत जाण्याची आहे, पण प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार चालत नाहीत. प्रकाश आंबेडकर अधून-मधून नियमितपणे शरद पवार यांच्यावर तोफा डागत असतात. शरद पवार मात्र सौजन्य म्हणा की धोरण म्हणून प्रकाश आंबेडकर यांचा प्रतिवाद करत नाहीत.
काँग्रेसला प्रकाश आंबेडकर चालतात, पण ओवेसी नको आहेत. राष्ट्रवादीच्या मनात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आघाडी करण्याची मनीषा असल्याची चर्चा आहे (त्यात तथ्य नसावंच असंही नाही) पण, काँग्रेसला राज ठाकरे यांचं स्वाभाविक वावडे आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समान पातळीवर आघाडी करण्याऐवजी काँग्रेसला केवळ चाळीस जागांचा तुकडा टाकला आहे. विरोधी पक्षातील त्रांगड्याचे असे अनेक पैलू आहेत.
.............................................................................................................................................
दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या ‘ओह माय गोडसे’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5010/Oh-My-Godse
.............................................................................................................................................
मोठी राजकीय क्षमता आणि झेप घेण्याची ऊर्मी असूनही राज ठाकरे हे एक राजकीय कोडं बनलेलं आहे, ही या त्रांगड्याची आणखी एक बाजू आहे. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत असं म्हटलं जातं, पण त्यांच्यात सातत्य का नाही याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवता त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तुफानी प्रचार केला, पण कुणालाच पाठिंबा न देण्याच जागतिक कीर्तीचा अचाटपणा का केला आणि पक्षाचं नुकसान का करून घेतलं हेही एक कोडंच आहे. ‘दाखव रे तो व्हिडिओ’ या त्यांच्या गाजलेल्या मोहिमेची भाजपनं कथित पोलखोल केली, पण भाजपचं ते म्हणणं खरं की खोटं यांबद्दल राज यांनी मौनच बाळगलं. लोकसभा निवडणुकीतील या मोहिमेचा त्यांना विधानसभा निवडणुकीत फायदा होणार की तोटा, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे एवढे मौनात का गेले हेही एक कोडंच आहे. या सर्व कोड्यांची उत्तरं राज यांच्याकडेच आहेत, पण ते त्यावर काहीही बोलत नाहीत, हेही नेहमीप्रमाणे कोडं आहे!
एका निर्णायक टप्प्यावर असलेली राज्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचं राजकारण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोघांभोवती फिरू शकतं. पण सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची क्षमता प्रकाश आंबेडकर यांच्यात नाही, हे स्पष्टच आहे. प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांना वगळून किंवा त्यांना सोबत घेतल्यावर राज्यात भाजप-सेनेला समर्थ पर्याय उभा करण्याचा राजकीय आवाका व क्षमता, ऊर्मी आणि प्रतिमा केवळ शरद पवार यांच्यातच आहे. अशी अस्थिर परिस्थिती हाताळण्यात ते वाकबगार आहेत, याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. थोडक्यात काय तर, १९८०च्या दशकात गाजलेल्या एका जाहिरातीतील ‘ओन्ली विमल’ या ‘कॅचलाईन’प्रमाणे सध्या तरी महाराष्ट्रात सेना-भाजपच्या विरोधात ‘ओन्ली शरद पवार’ अशी स्थिती आहे!
सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व विरोधी पक्ष शरद पवार यांचं नेतृत्व एकमुखानं मान्य करून आगामी विधानसभा निवडणूक एकजुटीनं लढवतात का, या प्रश्नाचे उत्तर आज तरी मिळण्याची शक्यता धुसरच दिसते आहे. कारण प्रत्यक्ष रणधुमाळी अजून सुरू व्हायची आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे विधानसभेच्या २३० ते २४० जागा जिंकण्याच्या वल्गना भाजपकडून सुरू आहेत. विरोधी पक्षात एकी झाली नाही तर २८८ पैकी ३८८ जागा मिळण्याचीही स्वप्नं भाजप-सेना युतीला पडू शकतात, कारण मुंगेरीलालच्या स्वप्नांना आपण कसं काय रोखू शकतो?
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Saurabh Gaikwad
Tue , 23 July 2019
अप्रतिम लेख!!!