टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • विराट कोहली, सिद्दरमय्या, स्मार्टफोनवरील महिला, नोटबंदी आणि स्टिव्ह फोर्ब्स
  • Tue , 27 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नोटाबंदी Demonetisation नरेंद्र मोदी Narendra Modi विराट कोहली Virat Kohli सिद्दरमय्या Siddaramaiah

१. एका सर्वेक्षणानुसार आज भारतातल्या अर्ध्याधिक लोकांकडे स्मार्टफोन आहेत. भारतीय पुरुषांच्या तुलनेत महिलाच सर्वाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवतात. महिला ८० टक्के वेळ फेसबुकवर घालवतात, असंही निदर्शनास आलं आहे.

सतत बायकांच्या हातात असतो, म्हणूनच या फोनला 'स्मार्ट' फोन म्हणतात, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झालेलं नाही. शिवाय, फेसबुकच्या नावाचा आणि त्यावरच्या स्त्रियांच्या उपस्थितीचा काहीही अन्योन्य संबंध नाही, हेही स्पष्ट करायला हवं होतं.

……………………………………………

२. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर अर्धा टक्क्यानं खाली येईल, असं भाकीत खुद्द रिझर्व्ह बॅंकेनं केलं असताना ‘फोर्ब्स’ मासिकाचे मुख्य संपादक स्टिव्ह फोर्ब्स यांनी या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली. सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण न करता हा निर्णय घेऊन केंद्र सरकारनं एक प्रकारे लोकांच्या संपत्तीवरच डल्ला मारला आहे, असं ते म्हणाले.

जगातल्या, देशातल्या धनाढ्य, पॉवरफुल व्यक्तींच्या याद्या छापणाऱ्या मासिकाच्या मालक-संपादकपदी एक समाजवादी, फेक्युलर, काँग्रेसी, देशद्रोही (अर्रर्र, हे दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत, नाही का?) व्यक्ती असावी, हे आश्चर्यच! त्यांना भारताची शंभरेक वर्षानंतर निश्चितपणे होणारी नेत्रदीपक प्रगती आतापासूनच साहवत नाहीये असं दिसतंय.

……………………………………………

३. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा 'फोर्ब्ज इंडिया'च्या यादीनुसार देशातील सर्वांत लोकप्रिय व्यक्ती ठरला आहे. विराटने लोकप्रियतेत सलमान खान आणि शाहरुख खान या फिल्मी सिताऱ्यांबरोबर क्रिकेट जगतातील महेंद्रसिंग धोनी आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर या दोन मातब्बर खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.

विराटचं कौतुक आहेच. पण, बातमी वाचल्यानंतर सलमान, शाहरुख, धोनी आणि तेंडुलकर यांचंच अधिक कौतुक वाटतं. सलमान आणि शाहरुख विराटच्या दुप्पट वयाचे आहेत, त्यांनी पदार्पण केलं, त्या आसपास विराटचा जन्म झाला असावा. धोनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि सचिन तर निवृत्त होऊनही बराच काळ लोटला आहे. तरीही ताज्या दमाच्या विराटच्या पिढीलाही या महानुभावांशीच तुलना करावी लागते आहे, हे त्यांचंच यश म्हणावं लागेल ना?

……………………………………………

४. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवसांनी सर्वसामान्यांचा त्रास कमी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ठासून सांगत असले तरी, येणारं नवं वर्षही सर्वसामान्यांसाठी नोटा‘तंगी’चं असणार आहे. ३० डिसेंबरनंतरही बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा कायम राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या म्हणण्याचा नेहमीप्रमाणे विपर्यास करतो आहे बिकाऊ मीडिया. त्रास कमी होईल, असं त्यांनी म्हटलेलं नाहीचै. रांगा लावाव्या लागतील, आपलेच पैसे चोरासारखे भरावे आणि काढावे लागतील, ठिकठिकाणी रोख रकमेवाचून हात आखडेल- हे सगळं होतच राहील आता आणखी दोनेक वर्षं… नव्या वर्षात त्रास कमी होईल तो सवयीमुळे. ५० दिवसांत कशाचीही सवय लागू शकते ना निमूटपणे आज्ञापालन करणाऱ्यांना!

……………………………………………

५. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी मैसूरमध्ये सोबत असलेल्या एका व्यक्तीकडून बुटाच्या लेस बांधून घेतल्यानं वादाचं मोहोळ उठलं आहे. मुख्यमंत्र्यांची चरणसेवा करणारा माणूस कोणी सरकारी कर्मचारी नाही, तर सिद्दरामय्या यांचा नातेवाईक आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयानं दिलं आहे.

सत्ताधीशांचे बूट चाटणाऱ्यांची देशात कुठेही कमतरता नसताना ते बांधून देणाऱ्या माणसावरून गदारोळ करायचं काहीच कारण नाही. अनेक कार्यकर्तेही आपला जन्म नेत्यांच्या चपला उचलण्यासाठीच झालेला आहे, असं समजून वागत असतात; इथं तर मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक आहे. इतक्या पॉवरफुल नातेवाईकासाठी हे काम त्याने भक्तिभावानं केलं, तर त्यात काय बिघडलं?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......