अजूनकाही
प्रा. बाळासाहेब लबडे यांची ‘पिपिलिका मुक्तीधाम’ ही कादंबरी लवकरच ग्रंथालीतर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीची ही एक झलक...
............................................................................................................................................................
‘धर्मरक्षक फेसबुकवर आहे. धर्मरक्षकाशी कनेक्ट होण्यासाठी, आजच जॉइन करा,’ या सूचनेचा आदर करून आम्ही चौघींनी एकच अकाउंट ओपन केले. आता आम्हाला हजारो सन्मित्र मिळाले होते. ते सांगत होते- असे करा. तसे करा. शास्त्र असे सांगते. तसे सांगते. आमच्या वाचनात नवनवीन माहिती येत होती. आमच्याच जगण्या-मरणाची काळजी कुणाला तरी होती. ही काही कमी गोष्ट नव्हती. आमच्यासाठी एव्हढे प्रेम ‘जीवन के साथ भी जीवन के बाद भी’एलआयसी सारखे. कितीतरी माणसं काय... काय... जाहिराती करत होती.
सामील व्हा
किंवा
लॉग इन करा
करा तं करा. आम्ही चौघींनी आमची सुंदर प्रेतयात्रा काढली. आमचे आम्ही मृत झालो आहोत. हे घोषित केल्यापासून आमच्या सगळ्या भगिनींना दु:ख झाले. साठ किलोमीटरवरून कितीतरी जनी धावत आल्या. त्यांना भटजीने सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या नात्यातील विलापी बोलवले होते. त्याशिवाय विधी पूर्ण होणार नव्हता. त्यांना देण्यासाठी पैसे कुठून आणावेत हा प्रश्नच होता. आमची तिरडी आम्ही बांधली. त्यावर पेंढा पसरवला. त्यावर झोपण्यापूर्वी एकमेकींना आंघोळ्या घातल्या. धुतरी म्हणाली, ‘लग्नाची तयारी नीट करा’. आम्ही जुनेपाने कपडे चढवले. दातात तुळशीची पाने धरली. मग आम्ही बोहल्यावर चढलो. मग मंगलाष्टके सुरू झाली.
‘रामनाम सत्य है’
‘सत्य बोलो सत्य है’
आम्ही चौघी मेल्या होतो. रस्त्याने आमची प्रेतयात्रा जात असताना काही भगिनी पैसे उधळत होत्या. जिवंतपणी कोणी विचारले नाही आणि आता हा विलाप. पुढचे विधी करायला आमच्याकडे पैसै नव्हतेच. आमचे आम्हीच विधी सुरू केल्याने घोटाळा झाला. गंधवाल्याची एक टीम येऊन आम्हाला शास्त्र शिकवू लागली. मग ते ऐकून आम्ही तसेच करायला लागलो. त्यांचा जळफळाट झाला. ते निघून गेले. ‘अशाने आत्मा भटकेल’ ते म्हणाले. आम्ही म्हणालो ‘तेच तर आम्हाला पहायचंय.’
नंतर आम्ही आचमन करून अमंत्रक प्राणायाम करून, देशकालाचा उच्चार करून “अमुक गोत्राच्या अमुक नावाच्या पित्याची प्रेतत्वापासून सुटका होण्यासाठी और्ध्वदेहिक करितो.” असा संकल्प केल्यावर अपसव्य करून ‘जी भूमि मातृरूपी, विस्तीर्ण, सर्वांस सुखदायी, कुमारी (न नांगरलली) आहे, व जी उदार यजमानास लोकरीसारखी मऊ होते. अशा या भूमीत तू प्रवेश कर. ही भूमी मृत्युदेवतेच्या सान्निध्यापासून तुझे रक्षण करो.’ आम्ही ऋग्वेदातील ऋचा म्हटली. गोत्राच्या नावानं आम्ही चौघींनी बोटं मोडून घेतली.
या मंत्राने भूमीची प्रार्थना केली. नंतर “आकाशात, जलाशयात, उत्पन्न झालेली तसेच पर्वतापासून व वनस्पतीपासून जी उत्पन्न झाली आहेत ही पवित्र जले आम्हांस शुद्ध करोत” असे म्हणून स्थलशुद्धि केली.
“हे पिशाचांनो, येथून लवकर दूर निघून जा; पितरांनी आम्हा प्रेताला ही जागा नेमून दिली आहे. दिवस, रात्र आणि जल - प्रवाह यांनी युक्त असलेली ही जागा यमाने आम्हास दिली आहे. यम आम्हालाच का?” ऋग्वेदातील या मंत्राने खळग्यांतील अगर दुसरे पाण्याने शमीच्या डाहाळीने तीन वेळ उलटी प्रदक्षिणा करत चितेचे प्रोक्षण आम्ही केले. मंत्र प्रत्येक प्रदक्षिणेचे वेळी म्हणला. चितेच्या आत किंवा बाहेर स्थंडिल त्रिकोणाकृती केला यथाविधि क्रव्याद (मांसभक्षक) नावाचा औपासनाग्नि सिद्ध केला, व दर्भाच्या मूलाने चितेचे मध्यभागी यमनामक दहनपतीसाठी, दक्षिण भागी मृत्युनामक दहनपतीसाठी अशा तीन रेघा काढल्या; व त्यांजवर तीन सोन्याचे तुकडे व तीळ ठेवले; आम्ही चौघी हसलो. माहीतगार मुंगीने चिता रचली. नंतर आम्ही चितेवर दर्भ पसरून हरणाचे कातडे, वरच्या अंगास केस करून घातले आणि शव अग्नीच्या उत्तर बाजूने नेऊन ते दक्षिणेस डोके करून चितेवर ठेवले नंतर प्रेताचे तोंडात, दोन्ही नाकपुड्यांत, दोन्ही डोळ्यांत, दोन्ही कानांत अशा सप्तछिद्रांत सोन्याचे तुकडे किंवा त्याचे अभावी तुपाचे थेंब घातले व प्रेतावर तूप लाविलेले तीळ टाकले. नंतर देशकालाचा उच्चार करून ‘प्रेतोपासन करतो’ असा संकल्प केला. व दोन समिधा घेऊन ‘अग्नि, काम, लोक व अनुमती या चार प्रधान देवता व प्रेत यांना प्रेताच्या उरावर आहुती देतो - ’ असे म्हणले.
नंतर “हे अग्नी, ह्या चमसाला म्हणजे सोमवल्लीचा रस पिण्याचे पात्राला तू हालवू नको. हा देवांना व पितरांना प्रिय आहे. देव म्हणजे भुदेव. ज्यांना मरण नाही असे देव या चमसांतून सोमरसाचे पान करतात व आनंद पावतात. ऋग्वेदातील मंत्राने चमसाचे अनुमंत्रण करून अग्नि, काम, लोक व अनुमति यांना तुपाच्या आहुती दिली, व शेवटी प्रेताचे उरावर पाचवी आहुती, “यापासून तू झालास, तुझ्यापासून हा होवो. हा (मृताचे आम्ही नाव आमचेच घेतले) स्वर्गाला जावो.” या मंत्राने दिली.
अशा रीतीने प्रेतोपासन करून प्रेतावर सातूच्या पिठाचे पाच अपूप करून त्यास दधिमिश्रित तूप लावून “हे प्रेता, अग्नीचे ज्वालारूपी कवच गाईच्या चर्माने झाकून टाक, आणि तिच्या पुष्ट झालेल्या मांसाने आच्छादन कर. म्हणजे धैर्यवान्, व आपल्या तेजाने आनंद पावणारा, अभिमानी, व तुला जाळून टाकणारा असा जो अग्नि, तो तुला चोहोकडून बिलगून वेढणार नाही.’’ ऋग्वेदातील या मंत्राने कपाळावर एक व तोंडावर एक याप्रमाणे दोन अपूप घेतले नंतर, ‘अतिद्रव्यसार मेयौ:’ आणि यौतेश्वानौ यम:’ या दोन मंत्रांनी दोन बाहूंवर दोन अपूप दिले व पाचवा उरावर दिला. किती आनंद आणि आनंद आम्हा चौघींना. आम्ही आम्हाला अग्नी दिला. आग पेटली तशा सगळ्या भगिनी निघून गेल्या. विलापभगिनी पैसे न मिळाल्याने जळफळून गेल्या. आमच्या चार कवट्या फटाक्या सारख्या तडातड वाजल्या. धुतरी म्हणाली, लागले एकदाचे जिवाशिवाचे लग्न.
आम्हा चौघींना मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास अनुभवा असं सांगण्यात आले होते. त्या गंधवाल्या माणसाने चिकित्सा कराल तर नरकात जाल अशी भीतीही घातली होती आमचा बराच वाद झाला होता. त्याने आम्हाला नास्तिक ठरवले होते. त्याची जिरवायला का होईना खरं काय म्हणून आम्ही विधीला सुरुवात केली. पुन्हा त्याचं तेच. भटजीशिवाय हे पावन होनार नाही.
दुसऱ्या दिवशी आमच्या चौघींच्या अस्ती सावडल्या. आधीच अंगात काही नव्हते. हाडे ती किती असनार. पांढऱ्या फडक्यात ती भरली. जीव खडे चार बांधले. हा हेच बरं का ते आत्मे आता दगडात होते. आम्ही चौघींनी दहावा घातला. अकरावा घातला. भरपूर भटजी दानासाठी गोळा झाले. आमचे आम्हीच विधी केले. त्यावर त्या गंधवाल्याने आम्हाला बहिष्कृत केले. धर्मशास्त्रानुसार शिक्षा द्यायचे ठरवले. परंतु आम्ही मेलो असल्याची जाणीव झाल्यामुळे त्याचे काही चालले नाही.
बाराव्या दिवशी सपिंडी करणाचा विधी घाटावर जाऊन करायचे ठरवले.
अग्नी देणाऱ्या आम्ही चौघींनी स्नान करून धुतलेले वस्त्र नेसले, प्रेताचे उत्तरीय वस्त्र घेऊन घाटावर गेलो.
अचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार केले. आमच्या प्रेताची प्रेतत्वनिवृत्ती होउन त्यास पितृलोक प्राप्त व्हावा, म्हणून आम्ही प्रेतात्मा, आमचे वडील, अजोबा व पंजोबा. आणि आमच्या मातेच्या नावाचा उच्चार करून, पितामही, प्रपितामही आणि वृद्धापितामही यांच्या समवेत आमच्या प्रित्यर्थ सपिंडीकरण श्राद्ध आम्ही करत आहोत असा संकल्प केला.
यांच्या प्रित्यर्थ बाराव्या दिवशी पार्वण आणि एकोदिष्ट पद्धतीने सपिण्डीकरण श्राद्ध करत आहोत असा संकल्प केला.
नंतर पाण्याच्या भांड्यात यव व काळेतीळ घालून यवोदक तिलोदक केले. त्यानंतर ब्राह्मण सांगतील त्या प्रमाणे विश्वेदेव पूजन, मार्जन, ब्रह्मदंड इत्यादी कृत्य करावे. असे होते मग आम्हीच ब्राह्मण झालो.
देवाच्या स्थानी काल आणि काम नावाच्या विश्वेदेवाला सव्याने निमंत्रण दिले.
पितरस्थानी, अपसव्य करून १) प्रेत, २) प्रेताचे गेलेले वडील, ३) प्रेताचे गेलेले आजोबा व ४) प्रेताचे गेलेले पणजोबा यांना निमंत्रित केले. या सर्वांना बसण्यासाठी दर्भाच्या काडीचे आसन दिले.
काम व काल यांना सव्य करून आवाहन, आसन, अर्घ्य, गंध, पुष्प, धुप, दीप, दान, अच्छादन इत्यादी अर्पण करून त्यांचे पूजन केले. अपसव्य करून प्रेत, प्रेताचे वडील, आजोबा, पंजोबा यांना आसन, उदक, दर्भ, तिलोदक, गंध, पुष्प, धूप, दीप आच्छादन देऊन अर्घ्य दिले. नंतर अमुक प्रेत, त्याचा पिता, आजोबा व पंजोबा यांच्याशी एकरूप होवो असे म्हणून अर्घ्य पात्रातील पाणी एकत्र चौघींनी केले. प्रेतासह वरील सर्वांना अर्पण केले.
चटावर आव्हाहित केलेल्या ब्राह्मणांना भोजन द्यावे, असे होते त्यांनी ते नाकारले. त्यानंतर एकूण चार पिंड दिले. प्रेताचे पिंड सर्वांत मोठा (लांब आकाराचा) केले. सर्व पिंडाचे यथाविधी पूजन करून यथा विधी प्रेताच्या पिंडाचे दर्भाच्या काडीने तीन भाग केले व एक एक भाग क्रमाने तीनही पिंडात मिसळले, असा हा सपिंडीकरण विधी झाला.
येथे हात जोडून प्रार्थना केली की, हे पितरांनो, तुमच्या अन्नाला नमन असो. तुमज्या घृतअमृतादि रसाला नमन असो. तुमच्या बळाला, घोरपराक्रमाला, जीविताला आणि तुमच्यातील सारभूत तत्त्वाला नमन असो. तुम्हाला मी वारंवार नमस्कार करतो. त्या पीतृ लोकातील संपत्ती तुमच्या स्वामीत्वाखाली आणि या मृत्यू लोकातील संपत्ती आमच्या स्वामित्वाखाली राहो. आम्हाला पूर्ण आयुष्य लाभो, हे पितरांनो, आम्हाला इष्ट संपत्ती देऊन तुम्ही जुन्या प्रसिद्ध मार्गाने पितृलोकी जा. आम्हाला वीर मरण द्या.
आमचे दाते समृद्ध होवोत, आमची मुले हुशार, विद्वान होवोत, आमच्या मनात तुमच्याबद्दल अशीच श्रद्धा राहो.
आम्हाला संमृद्धी प्राप्त होवो, आम्हाला दान करण्याची बुद्धी होवो, आमच्या घरी अन्नसंमृद्धि व्हावी, आमच्या घरी अनेक अतिथी व याचक यावेत, त्यांच्या करता आमच्या हातून दानधर्म घडो, आमच्यावर कोणाकडे याचना करण्याची वेळ न येवो.
हे पितरांनो आम्हाला पराक्रमी वीर मरण द्या.
हे पितरांनो, आम्ही चौघी मृत तुमच्याकडे आलेल्या आहोत आम्हाला पितृभाग द्या.
सोमरस न पिणाऱ्या, तसेच ज्यांना यज्ञभाग नाही अशा सर्व देवांना आम्ही अन्न (विकिर) अर्पण करतो. त्यांनाच आयते खाण्याची गरज आहे.
जे संस्कार न होता मेले, आणि ज्या त्यागी अशा कुलस्त्रिया होत्या, त्या सर्वांना हे प्रकिरान्न आम्ही अर्पण करत आहोत.
माझ्या कुलातील गेलेले कुमार आणि कुमारी, गर्भपात झालेले जीव, अशा सर्वांना हे प्रकिरान्न आम्ही अर्पण करत आहोत.
हे स्वधा हविर्दग्ध अग्ने, ज्या प्रेताला अग्नी दिला आहे अशा आणि ज्या प्रेताला अग्नी दिला नाही अशा मृत शरीराला तू स्वतःमध्ये सामावून घे.
अशी प्रार्थना आम्ही केली. आम्ही आमचेच मंत्र म्हटले.
पुजन केलेल्या पिंडांचे पाण्यात विसर्जन केले गायीस काही गायीस दिले.
सप्त मोक्षदायिकांची प्रार्थना करून पिंडाची जागा स्वच्छ केली
सर्व कर्म झाल्यावर, आम्ही केलेल्या प्रेतपित्रादि सपिंडीकरण श्राद्धाने पिता-पितामह-प्रपितामह स्वरूपी जनार्दन वासुदेव परमात्मा प्रसन्न होवो. अशी प्रार्थना केली. बाराव्या दिवसाचा विधी संपला. तेराव्या दिवसाचा विधी झाला. आम्ही परत आमच्या वारूळात आलो.
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment