तिथं वैनतेय होता. ते आवाज तिथूनच येत होते. कारण वैनतेयच ते काढत होता.
ग्रंथनामा - झलक
प्रतिक पुरी
  • ‘वैनतेय : एक गरुड योद्धा’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 12 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक वैनतेय : एक गरुड योद्धा Vaintey - Ek Garud Yoddha प्रतिक पुरी Pratik Puri

‘वैनतेय : एक गरुड योद्धा’ ही प्रतिक पुरी या तरुण कादंबरीकाराची नवी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. वैनतेय! अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा! एक गरुड योद्धा! मनुष्य आणि सुवर्ण-गरुडांचे गुणधर्म असणाऱ्या वैनतेयच्या आयुष्यात पावलोपावली संकटं येतात. सर्पविश्वातील सर्प आणि कापालिक गुरू शतचंडी तर त्याच्या जीवावर उठतात. एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंतचा हा प्रवास विलक्षण आहे, थक्क करणारा आहे. सर्प आणि गरुड-मानवांमधील प्राचीन संघर्षाची ही अदभुत कथा आहे. डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालेल्या या कादंबरीतला हा संपादित अंश...

............................................................................................................................................................

त्या रात्री अनेक लोक चिंताग्रस्त होते. त्याची वरवरची कारणं वेगवेगळी असली तरी आतील कारण मात्र एकच होतं, वैनतेय. आपल्या लाडक्या बोक्याची रक्तबंबाळ अवस्था पाहून ताईजी एकीकडे रडत होती, तर दुसरीकडे तिच्या रागाचा पाराही सारखा वाढतच होता. पण त्यांचा सारा राग मुलांवर होता. वैनतेयवर नाही. त्यांना वाटत होतं की, या मुलांनीच जाणुनबुजून आपल्या बोक्याला वाचवलं नाही कुत्र्यांच्या तावडीतून. हेच कारण सांगितलं होतं डीमरू आणि बंटीनं त्यांना. ताईजीलाही ते पटलं होतं. या मागे वैनतेय असेल अशी शंकाही त्यांच्या मनात फिरकली नाही.

डीमरूच्या हातावरची सूज अजूनही उतरली नव्हती. त्यामुळे चंदू आणखीनच काळजीत पडला होता. या लहानशा पोरामध्ये एवढी ताकद आली तरी कुठून? डीमरू तर आश्रमातला सर्वांत धट्टाकट्टा पोरगा होता. मारामारीत त्याच्यापुढे कोणी टिकायचा नाही. तोच आता वेदनेनं कळवळत होता. कोणामुळे तर या चार वर्षाच्या कारट्यामुळे. चंदूचा विश्वासच बसत नव्हता. आपल्या खोलीत अदिती आणि पीया एकमेकींचा हात धरून घाबरल्या नजरेनं वैनतेयकडे बघत होत्या. तो त्याच्या गरुडासोबत जेवत होता. समोर मांसाचे कच्चे तुकडे पसरले होते. दोघींनाही त्याचं हे खाणं पाहून कमालीची किळस येत होती.

वैनतेयचं पोट भरताच त्यानं मस्तपैकी एक ढेकर दिली. गरुडाकडे बघून खुदकन हसला. त्याचं ते हसणं पाहिल्यावर तो गरुड समाधानानं उडून गेला. वैनतेयला आता झोप येत होती. खोलीत एका बाजूला तो जमिनीवरच झोपी गेला. मागील काही रात्रींपासून त्यानं बिछान्यावर झोपणं बंद केलं होतं. थंडीची त्याला तशीही कधी परवा नव्हतीच. तो मजेत झोपला होता.

त्यानंतर पीयादेखील झोपी गेली. पण अदिती मात्र अद्याप जागीच होती. तिला अपेक्षा होती की, आजतरी ते नक्कीच घडणार आहे. गेल्या काही रात्री ती त्याच प्रतीक्षेत वैनतेयच्या खोलीत जागी राहायची. शिवाय तिच्या मनात एक कुतूहलही होतं. ती जात्याच हुशार मुलगी होती. वैनतेयबाबत ज्या गोष्टी घडल्या, त्या तिनं जवळून पाहिल्या होत्या. आपल्या मनात त्यावर तिचा सारखा विचार सुरू होता. काही गोष्टी तिला कळल्या होत्या पण काही नाही. पण ज्या समजल्या होत्या त्यांचाही अर्थ किंवा कारण तिला कळत नव्हतं. पण ती धाडशी मुलगी होती. काहीही करून वैनतेयचं रहस्य जाणून घ्यायचंच असा निश्चय तिनं कधीचाच केला होता. आज रात्रीही ती त्यासाठीच जागणार होती. पण तिनं ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही, चंदूलाही नाही.

..जमीन दूर-दूर जात होती... आणि त्यावरील प्रत्येक गोष्ट आता आपला आकार बदलत लहान होत होती... डोंगर छोटे होत होते... झाडा-झुडूपांचीही तीच स्थिती होती... बर्फानं झाकल्या गेलेली पर्वतांची शिखरं मात्र आता मोठी होत होती... हवेचे जबरदस्त तडाखे बसत होते... पोटात विलक्षण गुदगूल्या होत होत्या..त्यानं ओरडायचा प्रयत्न केला... तो ओरडलाही पण त्याचा आवाजच ऐकू आला नाही... त्याला स्वतःलाही... कारण हवेच्या रोंगाटात त्याचा आवाज कुठल्याकुठे नाहीसा झाला होता... त्याच्या पाठीवरचा आणि पोटावरचा दबाव आता वाढत होता... अचानक त्याचा वर जाण्याचा वेग भयानक गतीनं वाढला... आतापर्यंत दिसलेल्या सर्व गोष्टी आता मागे पडल्या... हवेत विरघळून नाहीशा होऊ लागल्या... डोळ्यांना आता हवेच्या थापडा सहन होत नव्हत्या... त्यानं डोळे बंद केले... आणि त्याच वेळी त्याला जाणवलं की तो तरंगतोय... खरंच तरंगतोय... पण कसं... त्याला तर तरंगता येत नव्हतं... मग हे कसं काय घडतंय... की मी खाली पडतोय... क्राँ...क्राँ....

अदिती कितीतरी वेळ जागी होती. ती प्रेमानं वैनतेयकडे बघत होती. त्याच्या ओठांवर हसू होतं. तीही हसली. विशाल राज आणि मेघाची तिला अस्पष्ट अशी आठवण होती. ती चांगली आठवण होती. तिचे डोळे अचानक भरून आले. वैनतेयसाठी... तिच्यासाठी... सर्वच मुलांसाठी... लहान असूनही या सर्वांवर अकालीच मोठं होण्याची वेळ आली होती... आणि आयुष्याच्या सर्व काळ्या, अवघड गोष्टींना सामोरं जाण्याचीही. तिनं आपले डोळे बंद केले.

निद्रा देवीनं ही संधी हातची घालवली नाही. आतापर्यंत अदितीनं कसोशीनं झोपेला आपल्यापासून दूर ठेवलं होतं. पण आता ती आपसूकच तिच्या तावडीत सापडली. तिचे मिटलेले डोळे पुन्हा कितीतरी वेळ उघडलेच नाही. आणि मग काहीतरी घडलं. एक आवाज तिच्या कानात जाऊन आदळला. आणि मग तिच्या मेंदूवर. क्राँ... क्राँ...

गरुडाचा आवाज... इथं खोलीत... तो परत आलाय बहुतेक... तिनं डोळे उघडले. पण खोलीत कोणीच नव्हतं. आवाज तर अजूनही येत होता. पण कुठून? तिनं आपली नजर फिरवली आणि एका जागी ती थांबली... नव्हे अडकून पडली. तिथं वैनतेय होता. ते आवाज तिथूनच येत होते. कारण वैनतेयच ते काढत होता. त्याच वेळी तडफडतही होता.

वैनतेय... अदिती धावतच त्याच्याकडे गेली आणि अचानक थांबली. पुढे जायला तिचे पाय तयार होत नव्हते आणि तिचं मनही. तिच्या तोंडातून किंचाळण्याचा आवाजही बाहेर पडायला तयार नव्हता. तिचे डोळे समोरचं दृष्य पाहून पापण्या फडकावण्याचं विसरून गेले होते. काय पाहिलं तिनं...

वैनतेय पालीच्या तुटलेल्या शेपटासारखा जमिनीवर तडफडत होता. ओरडत होता. वेडावाकडा होत होता. त्याचे हात-पाय हवेत इकडे-तिकडे उसळत होते. आणि मग अदितीला ते दिसलं... वैनतेयच्या हातांवर छोटे-छोटे सोनेरी पिसं उगू लागले... पूर्ण हात त्या पिसांनी आच्छादला गेला. मग पाठीमागून काही तरी बाहेर येऊ लागलं. ते पंख होते. त्यांचा आकार वाढू लागला. दोन मोठे सोनेरी पंख. एखाद्या गरुडासारखे.

अदितीला विश्वास होत नव्हता. पण अजून बरंच काही पाहायचं बाकी होतं. वैनतेयचे पाय आता दुमडले जात होते. त्यावरही आता सोनेरी पिसांची लव वाढत होती. त्याच्या पायाची बोटं वाकडी होऊ लागली होती. नखांचा आकार वाढत होता आणि त्यांना टोकं येतं होती. थोड्याच वेळात त्याचे पाय गरुडाच्या पायांसारखे बनले.

वैनतेयचा चेहरा आता सामान्य झाला होता. पण त्याच्या डोळ्यांतून अजून पाणी येत होतं. त्याचा श्वास वेगात सुरू होता. आणि मग तो हळूहळू शांत झाला. त्याचं शरीर पुन्हा मानवी होऊ लागलं. अदिती स्तब्धपणे सारं काही बघत होती. तिच्या मनात आणि ओठांत एकच गोष्ट होती.

....हे खरं आहे... हे खरं आहे...

आणि ती धाडकन खाली कोसळली.

............................................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4909/Vaintey---Ek-Garud-Yoddha

............................................................................................................................................................

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......