अजूनकाही
एव्हाना भारत का हरला, याची अनेक कारणं तुमच्यापर्यंत पोहचली असतील. आणि ती बहुतेक सर्व भारत व न्यूझीलंडमधील सामन्यातली असतील. म्हणजे भारतीय बॅट्समन खराब खेळले, सलामीच्या दोघांना अपयश आलं, रोहित शर्मा आपली छाप या सामन्यात दाखवू शकला नाही, राहुल लवकर बाद झाला, ज्याला ‘शतकांचा बादशहा’ म्हटलं जातं तो विराट कोहलीही लवकर बाद झाला, दिनेश कार्तिकलाही आपली चमक दाखवता आली नाही.
तर न्यूझीलंडनं आपल्यापेक्षा सरस कामगिरी केली. त्यांनी खेळपट्टीचा अचूक फायदा उठवला. अप्रतिम स्विंग बॉल टाकले... ही सर्व कारणं वरवरची आहेत.
गेल्या चार वर्षांचा विचार केला तर चार क्रमांकावर कुणी खेळायचे, हे भारतीय संघ इंग्लंडमध्ये जाईपर्यंत ठरवू शकला नव्हता. २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं अजिंक्य रहाणेला चौथ्या क्रमांकावर खेळवले होते. तो त्या वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळलाही होता. पण त्याच्या धावा भारतीय संघाला विजय मिळवून देण्यास कमी पडल्या. तरीही त्याला संधी मिळायला हवी होती, पण ती पुरेशी देण्यात आली नाही.
त्यानंतर या क्रमांकावर अनेकांना संधी देण्यात आली. कार्तिक, अंबाती रायडू, राहुल, विजय शंकर, धोनी, असे एक दोन नव्हे तर एकूण १३ खेळाडू या चार वर्षांत भारतीय संघाने खेळवून पाहिले. शेवटी अंबाती रायडूला या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू लागली. अंबाती रायडूने गेल्या चार वर्षांत ४० च्यावर सरासरीने धावा काढल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळेल असं वाटत असताना त्याला संघातून काढून टाकण्यात आलं.
अंबाती रायडूला भारतीय संघात का स्थान मिळालं नाही, हा प्रश्नच आहे. त्याचं उत्तर म्हणून विजय शंकर हा थ्री डायमेंशनल खेळाडू आहे, असं उत्तर देण्यात आलं. हे थ्री डायमेंशनल म्हणजे काय, याचं उत्तर मात्र अजून मिळू शकलेलं नाही. विजय शंकरला आपली छाप या वर्ल्ड कपमध्ये पाडता आली नाही.
कार्तिकने बांगलादेश-भारत सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला होता. याशिवाय तो फ्लॉपच होता. केदार जाधवला संधी देण्यात आली, त्याचे मुख्य कारण होते तो बॉलिंग करतो. पण गेल्या वर्षभरात तो चांगली बॅटिंग व बॉलिंग करू शकला नव्हता. तरीही त्याला संधी देण्यात आली.
अजिंक्य रहाणे संघात असावा यासाठी दिलीप वेंगसरकर आग्रही होते. त्याची गरज त्यांनी ओळखली होती. शिवाय अजिंक्य रहाणेने २०१५ नंतर ४१च्या सरासरीने धावा काढल्या होत्या. तो भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधारदेखील आहे. त्याचा कसोटीचा अनुभव भारतीय संघाला या वर्ल्ड कपमध्ये कामी आला असता.
संघ निवड होताना रोहित शर्मा–शिखर धवन हे सलामीला येणार होते. त्यामुळे तिसरा सलामीवीर म्हणून राहुलची निवड योग्य होती. रोहित किंवा धवन या दोघांपैकी जो खेळाडू अपयशी ठरला असता, त्याच्याऐवजी राहुलला संधी देण्यात येईल म्हणून त्याला घेण्यात आले होते.
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच योग्य होता. तिसऱ्या क्रमांकावर संघातला सर्वोत्तम बॅट्समन खेळतो. आणि सध्या तरी विराट सर्वोत्तम आहे. म्हणून तो तिथेच खेळणार होता. कोहली अपयशी झाला असता तरी तो सर्वच सामने खेळणार होता. २०११च्या वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनी हा अंतिम सामन्यापर्यंत बॅटिंगमध्ये अपयशी ठरला होता. म्हणून विराटला पर्याय म्हणून दुसऱ्या खेळाडूची आवश्यकता नव्हती.
आता पुन्हा चार क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न होताच. आणि इथं स्पेशालिस्ट बॅट्समन घेणं आवश्यक होतं. म्हणून रायडू व अजिंक्य रहाणे यांना दोघांनाही संधी देणं आवश्यक होतं. जसे तीन या क्रमांकावर संघातील सर्वोत्तम बॅट्समन खेळतो, तसं एकदिवसीय सामन्यात क्रमांक चार हा सर्वांत महत्त्वाचा असतो. पण त्यासाठी रायडू व अजिंक्य रहाणे या दोघांचीही निवड करण्यात आली नाही.
धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतला घ्यायला हवं होतं. म्हणजे संघ असा असायला हवा होता- रोहित शर्मा, शिखर धवन, राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, धोनी, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप, चहल, भुवनेश्वर, शमी, बुमराह. म्हणजे केदार जाधव, दिनेश कार्तिक व विजय शंकर यांना संधी देण्याची आवश्यकता नव्हती. अजिंक्य रहाणे व रायडूच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा झाला असता.
वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आयपीएलमध्ये जास्त धावा काढू शकला नव्हता. त्या अगोदरच्या मालिकेत धवन व रोहितमध्ये सातत्य अजिबात नव्हतं. त्या दोघांनी वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळ करून दाखवला. मग कशावरून रहाणे व रायडू खेळले नसते? शिवाय त्यांची सरासरीही २०१५ नंतर चांगली होती.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
अर्थात हे झाले वर्ल्ड कपपूर्वीचं. आता वर्ल्ड कपमध्ये काय झालं ते पाहू.
रोहित शर्माने पहिल्याच सामन्यापासून आपला गियर बदलला. त्याने पाच शतकं करण्याचा विक्रम केला. पण यातही त्याला प्रत्येक सामन्यात जीवदान मिळालं. दक्षिण आफ्रिका या संघाबरोबर खेळत असताना त्याने १२२ धावा केल्या. त्याला जीवदान मिळालं पहिल्या धावेवर. पाकिस्तानच्या सामन्यात त्याला जीवदान मिळाले ३२व्या धावेवर. त्याने धावा केल्या १४०. इंग्लंडच्या सामन्यात त्याने धावा केल्या १०२ त्याला. जीवदान मिळाले चौथ्या धावेवर. बांग्लादेशच्या सामन्यात त्याने धावा केल्या १०४. जीवदान मिळाले नवव्या धावेवर. एकमेव अर्धशतक त्याने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध केलं. त्यातही त्याला दुसऱ्या धावेवर जीवदान मिळालं.
ज्या सामन्यात त्याला जीवदान मिळालं नाही, त्यातील त्याची कामगिरी कशी राहिली? १, १८ व १ अशी त्याची कामगिरी राहिली आहे. म्हणजे ज्या सामन्यात तो लवकर बाद झाला, त्या सामन्यात भारताला चांगली सुरुवात मिळू शकलेली नाही. भारतीय संघानं याचा विचार केलेला दिसत नाही.
धवन व रोहित सलामीला तर राहुलला चौथा क्रमांक देण्यात आला. तिथं तो चांगला खेळतही होता. धवन संघाबाहेर गेला, मग रिषभ पंतला संधी मिळाली. राहुल सलामीला आला. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कोण, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.
राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतलाच होता, तर त्याला तिथंच खेळू द्यायला हवं होतं. धवनच्या जागेवर मयांक अग्रवालला संधी द्यायला हवी होती. आणि विजय शंकरच्या जागी रायडूला इंग्लंडमध्ये बोलवायला हवं होतं.
भारत व इंग्लंडच्या सामन्यात भारतानं दोन स्पिनर खेळवले. तिथं इंग्लंडने एक स्पिनर मैदानावर उतरवला. प्लंकेटला संधी देण्यात आली. त्याने ५५ धावा देत तीन बळी मिळवले. अफगाणिस्तानच्या सामन्यात धोनी संथ खेळला म्हणून सचिन तेंडुलकरने त्याच्यावर टीका केली. खरं तर हा सल्ला होता. पण सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरलाच ट्रोल करण्यात आलं.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात धोनीला धावा काढता आल्या नाहीत. अशा वेळेस पुढच्या दोन सामन्यात लिटमस टेस्ट म्हणून त्याला वरच्या क्रमांकावर पाठवायला हवं होतं. पण विराट कोहली धोनी खालीच कसा बेस्ट आहे, याचं शेवटपर्यंत समर्थन करत राहिला. प्रत्यक्षात इंग्लंडमधील खेळपट्या धावांचा पाठलाग करताना डेथ ओव्हरमध्ये संथ होतात. म्हणून धोनी वर खेळायला येणं गरजेचं होतं. पण या गोष्टीचाचा विचार झालेला दिसत नाही. विशेष म्हणजे जेव्हा रोहित शर्मा कर्णधार म्हणून खेळतो, तेव्हा तो महेंद्रसिंग धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यासाठी आग्रही असतो. विराट कोहली मात्र तसं करत असताना दिसत नाही.
भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये बदल करत राहिला. एवढे बदल ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंडने केलेले दिसले नाहीत. इंग्लंडचे खेळाडू जायबंदी झाले तेव्हा आणि खेळपट्टीनुसार त्यांनी बदल केले, भारताला ते जमलं नाही.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
आता थोडं काही वर्षं मागे जाऊ. तेव्हा अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांना ज्या पद्धतीनं त्या पदावरून जावं लागलं, ते निश्चितच निंदनीय होतं. हे घडायला नको होतं. रवी शास्त्री हे प्रशिक्षक भारतीय संघाला का हवे होते की, फक्त विराट कोहलीला हवे होते, याचं उत्तर मिळणं अजूनपर्यंत तरी मिळालेलं नाही आहे. त्यांनी मध्ये एक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या बसमधून उतरत मद्य पितानाचं कृत्य केलं होतं. याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, पण ती झाली नाही.
संघ निवडीपासूनच भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असं वाटत नव्हतं. गेल्या चार वर्षांत रोहित शर्मा व विराट कोहलीवर आपला संघ अवलंबून राहिला. बुमराह, शमी, भुवनेश्वर हे कोणत्याही बॅट्समनला बाद करू शकतात. पण जेव्हा पाटा किंवा सपाट खेळपट्टी असते, तेव्हा त्यांची बॉलिंग कुणीही फोडून काढू शकतं. हे तिघंही चांगले बॉलर्स आहेत, पण जेव्हा खेळपट्टी त्यांना अनुकूल ठरत नाही, तेव्हा त्यांची धुलाई निश्चित असते.
भारतीय संघाच्या बाबतीत सुरुवातीपासून चुका होत गेल्या. त्यात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी म्हणजे कसोटी व एकदिवसीय सामन्यातही चांगली कामगिरी, अशी अपेक्षा ठेवून खेळाडूंची निवड संघात करण्यात आली. एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविड व युवराज सिंगची जागा गेल्या चार-आठ वर्षांत कुणीही घेऊ शकलेलं नाही.
८०-९०च्या स्ट्राईक रेटने खेळणारा, पण सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत खेळणारा बॅट्समन आपल्याला हवा आहे. शेवटच्या १० षटकांत सामन्याचा गिअर बदलणारा बॅट्समन आपल्याला हवा आहे. हे काम बरीच वर्षं युवराज सिंग करायचा. राहुल द्रविड भलेही आजच्या जमान्यानुसार संथ वाटेल, पण दुसरी भिंत आपण एकदिवसीय सामन्यात करू शकलेलो नाही... आणि म्हणूनच आपण हरलो.
भारतीय संघाचे खेळाडू बाद होत गेले की, संथ खेळतात आणि नंतर ते चुकीचा फटका मारून बाद होतात. तोपर्यंत रन रेट आवाक्याबाहेर गेलेला असतो. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे संघ आपल्या संघाच्या विकेट पडत राहिल्या तरी अपेक्षित धावगतीनं धावा काढत राहतात. भारतीय संघ हे या वर्ल्ड कपमध्ये करू शकला नाही.
वर्ल्ड कप आपण सुरुवातीपासून जिंकू असं वाटतच नव्हतं. भारत व इंग्लंड अंतिम सामना होईल असं वाटत होतं, पण या सामन्यात इंग्लंडने भारताला हरवलं असतं. अर्थात या जर-तरला क्रिकेटमध्ये अर्थ नसतो.
असो पराभव झाला, पुन्हा नव्यानं बांधणी करून पुढच्या वर्ल्ड कपच्या तयारीला लागायला हवं.
त्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा!
............................................................................................................................................................
लेखक सागर शिंदे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुधागड या तालुक्यात गाठेमाळ ठाकूरवाडीत कार्यरत आहेत.
sagararjunshinde6664@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment