अजूनकाही
भारताचा माजी क्रिकेट कर्णधार, ‘द वॉल’ आणि ‘अंडर १९’ क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय) ने सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy, NCA)च्या प्रमुखपदी निवड केली आहे. त्यामुळे द्रविड आता या अकादमीद्वारे युवा खेळाडूंना, प्रशिक्षकांना मार्गदर्शन करणे, त्यांच्याकडून सराव करून घेणे इत्यादी भूमिका पार पाडणार आहे. ‘अंडर १९’ आणि ‘अंडर २३’ या संघांच्या विकासातही त्याचा सहभाग असणार आहे. राष्ट्रीय महिला व पुरुष संघासोबतही तो काम करणार आहे. पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विजय शंकर या सध्या भारतीय संघात असलेल्या क्रिकेटपटूंची कारकीर्द घडवण्यात द्रविडचा मोठा वाटा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या भारतीय क्रिकेट संघाने ‘अंडर १९’खालील विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्या राहुल द्रविडच्या कारकिर्दीला दिलेला हा उजाळा...
............................................................................................................................................................
सचिन तेंडुलकर किल्ला असेल तर, राहुल द्रविड अभेद्य किल्ल्याची तटबंदी आहे.
भारतीय खेळपट्टीवर सर्वच दादा असतात, पण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या तेजतर्रार आणि वळत्या खेळफट्यांवरचा खरा दादा राहुल असतो.
दिवाळीला उटणं लावून आंघोळ करावी आणि त्याचा आनंद घ्यावा, तसा आनंद तो ऐडलेडवरच्या त्याच्या खेळीने आपल्याला होतो.
हजार फटाक्यांची लड एका क्षणात संपून जावी आणि तिचा धुमधडाका सर्वांनी अनुभवावा, तशा त्याच्या २२ बॉलमध्ये ५० धावा असतात.
मुलतानचा सुलतान असू दे, त्याच्यासारखी आक्रमकता त्याच्याकडे नसू दे, दादासारखी दादागिरी नसू दे, सचिनसारखा क्लासही नसूदे, लक्ष्मणसारखी नजाकतही नसूदे.
तरीसुद्धा त्याचा संयम त्याला इतरांपेक्षा वेगळा करतो. भिन्न करतो.
आणि तो संयमी महामेरू आहे, हे त्याचे वेगळेपण तो सिद्ध करतो.
बँकेच्या लाईनमध्ये तास–दोन तास उभा राहायला आम्ही कंटाळणारे, तिथं हा दोन-दोन दिवस उभा राहतो. तेही उसळत्या खेळपट्टीवर.
असा हा राहुल द्रविड त्याची अनेक गुण–वैशिषष्ट्यं आपल्याला सांगता येतील. तो ११ जानेवारी १९७३ला जन्मला इंदौरला. कन्नडबरोबर तो मराठी खूप चांगलं बोलतो.
अंडर - १५, अंडर– १७ आणि अंडर–१९ असा तो खेळला.
पुढे रणजीत त्याची निवड झाली. आपल्या सातव्या सामन्यात ८२ धावा केल्यावर त्याची निवड झाली ती इंग्लंड दौऱ्यावर.
तिथं पहिली कसोटी त्याला खेळता आली नाही. पण दुसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाली. त्याचं सोनं त्यानं केलं. पण त्या सामन्यात आणखी एक खेळाडू आपली पहिलीच कसोटी खेळत होता, तो म्हणजे सौरभ गांगुली. दादानं त्या सामन्यात शतक केलं.
त्यात राहुलची सातव्या क्रमांकावरून केलेली ९५ धावांची खेळी झाकोळली गेली.
आणि इथूनच सुरुवात झाली. पुढे अनेक खेळ्या करूनही त्याला तुलनेनं कमीच क्रेडिट मिळालं.
त्याच सिरीजमध्ये त्यानं पुन्हा एकदा ट्रेंट ब्रिजवर ८० धावांची सुंदर खेळी साकारली.
या दोन खेळीनं तो उत्तम कसोटी खेळाडू आहे, हे शिक्कामोर्तब झालं नाही.
अजून त्याला त्यासाठी परीक्षा द्यायची होती.
शिवाय सौरव गांगुलीचं कौतुक जरा जास्तच झालं.
उगवत्या सूर्याला व पहिल्या क्रमांकावर येणाऱ्याचं कौतुक आपल्याकडे जास्तच होतं नेहमी.
भारतात अफ्रिकेविरुद्ध खेळताना अहमदाबादला पहिल्यांदा त्याचं प्रमोशन झालं ते तिसऱ्या क्रमांकावर, पण त्या सिरीजमध्ये तो अपयशी ठरला. पण सर्वांत जास्त धावा त्याच्याच होत्या, १७५.
पुढे भारत आफ्रिका दोऱ्यावर गेला.
तिथं जे घडलं, ते लाजवाब होतं. व्हाय राहुल ग्रेट, हे तिथं सर्वांना कळलं.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
आफ्रिकेच्या ३९५ धावांपुढे भारतीय संघ बाद झाला, फक्त ६६ वर. त्यात दुहेरी आकडा गाठला फक्त द्रविडनं, तोही फक्त २६.
दुसऱ्या कसोटीत फक्त १२ धावा. पूर्ण अपयश . संघ खचला होताच आणि राहुलही खचला होता.
पण ‘डर के आगे जित होती है।’ एखाद-दुसऱ्या पायरीवर अपयश आलं म्हणून काय झालं!
राहुल तयार होता तिसऱ्या कसोटीसाठी, सामना डर्बनला होता उसळत्या आणि प्रचंड स्विंग मिळणाऱ्या खेळपट्टीवर. बॉल एका मागून अंगाखांद्यावर आदळत होते.
डोनाल्ड आग ओकत होता, बॉल स्विंगच काय, पण त्या दिवशी भारतीय बॅट्समनला बॉल कळतच नव्हते. त्या पिचवर राहुलने डोनाल्डला सिक्स ठोकला आणि मग चौकार. डोनाल्डने राहुलला अक्षरशः शिव्या घातल्या. ‘Really is this easy game?’, असं तो त्याला जाता जाता म्हणाला.
राहुलने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. असं हे त्याचं वागणं पहिल्यांदाच व शेवटचंच घडलं. त्या इनिग्समध्ये त्यानं १४८ धावा केल्या. आणि दुसऱ्या डावात ८१.
‘सामनावीर’ म्हणून त्याला घोषित करण्यात आलं.
आणि इथंच त्याच्या चिवटपणाची ओळख क्रिकेट जगताला झाली.
पुढे तो सर्वच क्रमांकावर खेळला. पण अजून त्याचा लाडका तिसरा क्रमांक त्याला मिळाला नव्हता.
एकदिवसीय सामन्यात त्याला जरा उशिराच घेतलं गेलं. पहिल्या सामन्यात त्याला फक्त चार धावा करता आल्या.
पण १९९९च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन तोच ठरला.
२००३च्या वर्ल्डकपमध्ये त्याला किपरिंगही करावी लागली. त्याने संघाच्या भल्यासाठी तेही केलं.
सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय बॅट्समनमध्ये तो होता, पण २००३चा वर्ल्डकप म्हटलं की, चर्चा होते- सचिन, सेहवाग, आणि दादाची. राहुलची चर्चा होतच नाही. त्याच्या किपरिंगमुळे भारतीय संघ एक खेळाडू जास्त खेळू शकला. त्याचा परिणाम भारत फायनलला पोहचला.
पण इथंही तो झाकोळला गेला.
२००७ला तर तो कॅप्टन असताना भारतीय संघाला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला.
राहुल व त्याची कॅप्टनशिप पूर्ण अपयशी ठरली. त्याच्यावर सडकून टीका झाली.
२०११चा वर्ल्डकप त्याला खेळताही आला नाही.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
दरम्यान त्यानं एक दिवसीय सामन्यातल्या १०,००० धावा पूर्ण केल्या.
भारत पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता, तिथं त्यानं २७० धावा केल्या.
पण पुढे सचिन १९४ धावावर असताना त्यानं डाव घोषित केला याचीच चर्चा अधिक झाली. पाकिस्तानमधल्या त्याच्या २७० धावा कुणी लक्षातही घेत नाही.
स्टीव्ह वॉ जेव्हा आपलं विजयी अभियान भारतात घेऊन आला, तेव्हा त्याने ते इथं to be continue केलं. पहिलाच कसोटी सामना जिंकून त्यानं सलग १६वा कसोटी सामना जिंकला.
आणि मग आली ती ऐतिहासिक कसोटी आणि राहुलची ऐतिहासिक खेळी!
ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात, ४४५ धावा. भारत सर्व बाद–१७१. अपेक्षेप्रमाणे भारताला फॉलोऑन. तिसरा दिवस, भारत ४ बाद २३२ धावा आणि राहुल येतो तेही सहाव्या क्रमांकावर खेळायला.
पुढे लक्ष्मण आणि राहुल ३७५ धावांची पार्टनरशिप करतात. आणि भारताला विजय मिळवून देतात.
ऑस्ट्रेलिया दोऱ्यात २३३ व ७२ धावा करून भारताला विजय मिळवून देणारा हाच अवलिया.
न्यूजीलंडच्या खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहणारा, सबिना पार्क वेस्ट इंडिज एका कसोटीत दोन अर्ध शतके करून पहिला विजय मिळवून देणारा… जिथं लारा, चंद्रपौलसारखे दिग्गज लवकर बाद झाले…
त्याच्या या २ फिफ्टीज आतापर्यंतच्या सर्वोकृष्ट खेळ्या. (असं त्याने पुढे एका मुलाखतीमध्ये सांगितलं!)
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
वेस्ट इंडिज दौऱ्यावर बॉल गालावर लागला. जबडा सुजलेला असूनही त्यानं शतक ठोकलं.
२००२च्या इंग्लंड दौऱ्यावर सुरुवातीचे दोन तास फास्टर बॉलरचे बॉल अंगावर घेऊन शांतपणे खेळणारा. एका मागून एक अनेक षटके निर्धाव खेळून काढणारा. आणि ऊन पडायला लागल्यावर हात खोलणारा.
त्याच सामन्यात सचिन (१९३) पेक्षा कमी धावा करून (१४८) सामनावीराचा किताब घेणारा राहुल द्रविडच होता.
इथून पुढे त्याचा लाडका तिसरा क्रमांक त्याला मिळाला.
आणि या क्रमांकावर एकदिवशीय व कसोटी सामन्यात त्याने १०,००० धावा केल्या.
हा असा विक्रम करणारा बहुदा तो दुसराच खेळाडू असावा.
२०११चा इंग्लंड दौरा. शेवटाकडे प्रवास..
वेस्ट इंडिजचा राहुलनं शतकाने शेवट केला. तोच फॉर्म घेऊन तो इंग्लंडला आला.
पहिल्या कसोटीत शतक ठोकल्यानंतर दुसऱ्याही कसोटीत त्यानं शतक ठोकलं.
पण भारत दोन्हीही कसोटी हरला.
तिसऱ्या कसोटीत तो अपयशी ठरला, हीही कसोटी आपण गमावली.
चौथ्या व शेवटच्या कसोटीत तो ओपनिंगला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहिला. संघाच्या ३०० पैकी त्याच्या धावा होत्या १४६. म्हणजे जवळजवळ ५० टक्के धावा आणि पूर्ण सिरीजमध्ये होत्या ४६१ धावा. ज्या दुसऱ्या क्रमांकाच्या होत्या.
याच वर्षी तो एकदिवसीय सामन्यातून रिटायर झाला.
२०१२मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं रिटायरमेंट घेतली.
तेव्हा सर्व फॉरमॅटमध्ये त्याने धावा केल्या होत्या- ६३,२४२.
कसोटीमध्ये तो पिचवर उभा होता - ४४,१५२ मिनिटं… म्हणजे १५४ मिनिटे प्रत्येक इनिंग्ज.
या १५४ मिनिटांमध्ये किती बॉल त्याच्या अंगावर आदळले असतील याचा हिशेबच नाही.
कसोटीमध्ये तो ३१,२५८ बॉल खेळला. ते एक रेकॉर्ड आहे.
१०९ बॉलतो प्रत्येक इनिंग्जमध्ये खेळला.
हा त्याचा ग्रेटनेस होता.
कालपरवा खेळलेला मयांक त्याला आदर्श मानतो.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
२०१६मध्ये ‘अंडर १९’ला फायनलला घेऊन जाणारा द्रविड तेव्हा कोच होता.
पुढे तर त्याने अंडर-१९चा वर्ल्डकप जिंकून दिला.
आपल्या सुसंस्कृत वागण्यानं ओळखला जाणारा राहुल वरण भाताचा फॅन आहे. क्रिकेटशिवाय त्याला पुस्तक वाचनाच प्रचंड वेड आहे.
त्याने मागे एकदा कुणीतरी देऊ केलेली मानद पदवी नाकारली होती.
रांगेतच उभं राहून आपली कामं करावीत म्हणून सांगणारा आणि त्याच आपल्या मुलांना रांगेत उभा राहून पुढे घेऊनजाणारा… एका मुलीनं लग्न करण्याची मागणी घातली म्हणून, अजिबात विचलित न होता तिला सन्मानानं घरी पाठवणारा राहुल वेगळाच.
कधीही कुणाला कसली शिवीगाळ नाही की, स्लेजिंग नाही.
आपलं काम भलं आणि आपण भले असं त्याचं वागणं.
मान खाली घालून जगणारा एक आदर्श व्यक्ती.
गैरमार्गाचा अवलंब न करणारा.
मी सेहवागसारखा खेळू शकत नाही, हे मोठ्या मनानं मान्य करणारा.
संयमी राहुल द्रविड….
त्याचे कव्हर ड्राईव्ह, स्केअर कट आणि त्याचा फ्लिक पाहण्यासारखा.
जेव्हा वरचे फलंदाज आऊट होतात. तेव्हा एक अभेद्य भिंत पॅव्हिलीयनमधून बाहेर येताना दिसत असते.
त्याचे पांढरे कपडे, शिड-शिडीत बांधा पिचवर येतो.
आणि अंपायरकडे बघून वॉलने स्टान्स घेतलेला असतो.
तेव्हा आपण निर्धास्त होतो.
कारण पुढचे काही दिवस तो तिथंच मुक्काम ठोकणार असतो…
............................................................................................................................................................
लेखक सागर शिंदे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुधागड या तालुक्यात गाठेमाळ ठाकूरवाडीत कार्यरत आहेत.
sagararjunshinde6664@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment