अजूनकाही
आपण शालेयवयात कीर्तन वा ऐतिहासिक नाटकात एक संवाद अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीनं ऐकलेला असतो, तो म्हणजे ‘मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना?’
त्या वयात मुंगीनं पर्वत गिळला हेच भलं मोठं आश्चर्य वाटत असल्यानं मेरुपर्वत नेमका कुठे, तो मुंग्यांनी गिळला म्हणजे नेमका होता केवढा? कारण पुण्यात पर्वतीनामक पर्वत आम्ही पहिल्यांदा पाहिला, तेव्हा आमची फसगत झाल्याची जाणीव तीव्र होती. त्यामुळे मेरुपर्वताबाबतचं अज्ञान आजही तसंच आहे. आणि आमची खात्री आहे, हा संवाद १२ कोटी महाराष्ट्रीयांना नक्की माहीत असेल. पण मेरुपर्वताबद्दल माहिती असण्याची शक्यता कमीच. जेव्हा शिक्षकांनासुद्धा असे तपशील माहीत नसतात, तेव्हा तेही ‘शब्दश: अर्थ घेऊ नका, भावार्थ लक्षात घ्या’ असं सांगतात. थोडक्यात ‘मुंग्यांनी मेरुपर्वत गिळला’ म्हणजे अशक्य कोटी सत्यात उतरवणं (२०१४ आणि २०१९ला हा अनुभव विरोधी पक्षांना चढत्या क्रमाने घेता आला.)
आता मुंगी आणि मेरुपर्वताचं आपण भावार्थावर भागवू. पण या पुराणातल्या इतिहासातल्या मुंग्यांना वर्तमानपत्रातल्या खेकड्यांनी (खऱ्याखुऱ्या खेकड्यांनी) पुराव्यानिशी मागे टाकलंय. या महाराष्ट्र देशी कोकण प्रांतात मौजे तिवरे येथील धरण खेकड्यांनी उदध्वस्त केलं, ज्यात २६हून अधिक माणसं पाण्यात वाहून गेली. एरवी टोपलीत भरून, घरी नेऊन, एक एक पाय चवीनं तोडत कोकणी माणूस खेकडा फस्त करतो. याचा राग, संताप येऊन खेकड्यांनी मिळून एक पूर्ण मातीचं धरणच फस्त करून टाकलं. आधी धरण वाहून गेल्याची बातमी आली. मग मृतांचा आकडा आला आणि नंतर मंत्र्यांचं विधान. मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, ‘सदोष बांधकाम वगैरे काही नाही, खेकड्यांनी हे धरण पोखरलं व विक्रमी पावसाने ते वाहून गेलं!’
मंत्र्यांनी मंत्र्याला व शासनाला साजंसं असं नैसर्गिक आपत्ती म्हणता येईल आणि स्वपक्षीय कंत्राटदार, जे माजी आमदारही आहेत, यांच्यावरची आपत्ती टळेल असंच उत्तर दिलं. साहजिकच विरोधी पक्षीयांसह माध्यमांनी त्यांची हुर्यो उडवली. जितेंद्र आव्हाड प्रभूतींना खेकडे माध्यमांसमोर नाचवता आले! (काही लोक म्हणतात, आव्हाडांच्या सौ. उत्तम मासे बनवतात. त्यामुळे पत्रकारांना दाखवून झाल्यावर टोपली ठाण्याला गेली!) हा खरं तर अन्याय होता आमच्या मंत्र्यांवर, कारण त्याच पावसात पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकाच्या प्लॅटफॉर्मचा सुरुवातीचा मोठा भाग असाच कोसळला, ढेपाळला. रेल्वे प्रशासनानं सांगितलं की, हे बांधकाम निर्दोष होतं, मात्र घुशींनी ते पोखरलं, त्यामुळे कोसळलं!
खेकड्यांनी माती उचकली; घुशींनी थेट डांबर, खडी, क्राँकिट इ. पण विरोधकांना घुशी पकडून नाचवणं शक्य नव्हतं आणि घुशींचं पुढे काय करायचं हा मोठाच प्रश्न. त्यामानानं खेकडे आकर्षक आणि लज्जतदार!
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
आता ज्या माजी आमदारांनी हे मातीचे धरण बांधलं, ते आणि मंत्री एकाच पक्षाचे. ‘करून दाखवलं’वाला हा पक्ष. त्यातून खेकड्यांना दोषी ठरवलं तरी मुनगंटीवारांसारखा ‘यांना गोळ्या घाला; कालवण, सूप बनवा’ असा आदेश दिला नाही. त्यामुळे सध्या घरी बसलेल्या मनेका गांधींपर्यंतही काही पोहचलं नाही.
पण आम्हाला कळलेली बातमी अधिक रुचकर आहे. मंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाचे अध्यक्ष जातीवंत मत्साहारी. खेकडा हा तर त्यांच्या पक्वानातला महत्त्वाचा घटक. त्यामुळे खेकड्यांना अभय, जीवदान मिळणं स्वाभाविक होतं. या प्रवीण खेकड्यांना बांद्रे मुक्कामी धाडून त्यांचा छोट्या पकडीनं वगैरे योग्य तो सत्कारही केला गेला असणार!
खेकड्यांना अभय मिळण्याचं आणखी एक ठोस कारण म्हणजे कंत्राटदार आमदार व मंत्री ज्या पक्षाचे, तो पक्ष मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करतो. आणि खेकडे हे तर मराठी माणसाचं नैसर्गिक प्रतीक! एक खेकडा दुसऱ्या खेकड्याला वर जाऊ देत नाही. त्यामुळे टोपलीत न झाकता ते ठेवता येतात. खेकड्यांची लज्जतदार गोष्ट आपले हसमुख मुख्यमंत्री फडणवीस यांना परिचयाची किंवा चवीची नसली तरी खेकड्यांची वृत्ती, मराठी माणूस, त्यांचा प्रातिनिधिक पक्ष याची नीटच माहिती त्यांना आहे. त्यामुळे गेली पाच वर्षं त्यांनी हे खेकडे सत्तेच्या टोपलीत न झाकता ठेवलेत. अगदी परवा त्यांनी एकाला उपमुख्यमंत्री करायचं ठरवलं मात्र, लगेच इतर दोघा-तिघांनी त्याला खाली खेचला! मुख्यमंत्री हसले. कारण ‘हे पद तुम्हाला देतो’ असं मान्य करतानाच त्यांना माहीत होतं, आपल्यावर ते पद द्यायची वेळच येणार नाही!
तर अशा प्रकारे खेकड्यांनी धरणाच्या पाण्यात माजी आमदार, मंत्री, पक्ष वाहून गेले असते; ते वाचवले. आता २२ माणसं गेली हे खरंच, पण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी अनेकांनी या पावसात जीव गमावलाय. शिवाय मागे सावित्री नदीच्या पुलाची दुर्घटना झाली. तुटलेला पूल नीतीनजींनी विक्रमी वेळात बांधला. पण त्याही पुलाचा नवा भाग जिथं जमिनीला टेकतो, तो १०-२० फुटाचा रस्ताही या पावसात खचला! तिथं ना खेकडे होते, ना घुशी! ती सर्वांनी निमूट निसर्ग आपत्ती मानली ना! तिवरे प्रकरणाकडेही आपण निसर्गाचा कोप म्हणूनच पाहिलं पाहिजे. तसंही कोकणात देवदेवस्की मोठ्या प्रमाणात. त्यामुळे या खेकड्यांना तिथं कुणी मंतरून तर नाही ना सोडलं हेही पाहावं लागेल. कोकणात ‘झाड’ सरळ करतात, तिथं धरण ते काय मोठं, तेही मातीचं!
आता मातीचा गुण असतो, तसा मातीचा दोषही असतो. आपले पाटबंधाऱ्यातले प्रति अण्णा हजारे विजय पांढरे म्हणाले की, मातीच्या धरणासाठी कोकणची माती अयोग्य. त्यात धरून राहण्याचा गुणधर्म नाही, ती वाहून जाते.
आता हे म्हणजे खेकड्यांपेक्षा अधिक वर्मी बसणारं! कोकणी माणूस, मातीवरच प्रश्नचिन्ह? ही धरून ठेवत नाही, वाहून जाते? हे म्हणजे एक झाड, एक बांध, सातबारा यावरून हयात कोर्टात घालवणाऱ्या कोकणी माणसाच्या वर्मावरच घाव घातला पांढरेंनी.
आता पांढरेंची साक्ष काढून कंत्राटदार माजी आमदार जर म्हणाले, ‘मातीच दोषपूर्ण असेल तर माझा काय दोष? दिलेल्या टेंडरमध्ये मी योग्य माती शोधून ती आणून धरण बांधू की, आहे त्या मातीतच भागवू? मुळात मातीच्या धरणाचं टेंडर असून असून असणार किती?’ तर? कंत्राटदार म्हणत असेल, ‘२२ जण गेले, दु:ख जरूर आहे, पण त्याबरोबर अख्खं धरणपण गेलं ना वाहून! मग तिथं नवं धरण बांधायचं टेंडर मलाच द्यायला हवं. कारण एक तर मला पूर्वानुभव आणि दुसरं म्हणजे आता ते वाहून जाऊ नये म्हणून पांढरेंच्या मार्गदर्शनाखाली माती शोधून आणेन. निसर्गानं आपल्यावर मात केलीय, पण ती परतवता येईल. फक्त एकदा खेकडे व निसर्ग मान्य करा, मग पुढचं सोपं होईल.’
तिवरे धरण परिसरातले लोक आपल्या नशिबाला आणखीनच दोष देताहेत, कारण मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीत अडकलेले नीतेश राणे त्यांच्या नशिबात का नव्हते?
नीतेशजी असते तर त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता माजी आमदार कम कंत्राटदारांना थेट पाण्यात तरी उचलून फेकलं असतं किंवा उरलेल्या मातीत त्याला गाडलं असतं. स्मारकच बनवलं असतं!
साध्या सरकारी पदावरच्या व वेतनातल्या अभियंत्यावर जर ते एवढे कोपले, तर स्वत:च्या पिताजींना ज्या पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवला (ते काँग्रेसमध्ये गेले तर राष्ट्रवादीला पुढे करून तर कधी कमळाचा देठ पकडून) तो पक्ष संपूर्ण कुटुंबाला सतत खिजवत असतो, त्यांना अशी सदेह गाडायची संधी दोन्ही बंधूंनी सोडली नसती.
पण अभियंत्याचं प्रकरण बाताबाहेर जाऊन अंगाशी आलं. खुद्द पिताजींना दिल्लीत माफी मागावी लागली, मुलाचे कान उपटावे लागले आणि पोलीस कस्टडी वाढली ती वेगळीच. कोकणच्या मातीचा हा धरून न ठेवण्याचा (एखादा पक्ष) आणि वाहत जाण्याचा (दमबाजी, मारामारी, शब्दश: चिखलफेक) गुण कोकण सुपुत्र नीतेजींच्याही अंगात सढळ मुरलेला दिसतोय.
तर अशा या कोकणातल्या पावसाळी गजाली! एका बाजूला माती आणि खेकडे; दुसऱ्या बाजूला माती आणि माणसं! यात आणखी एक योगायोग म्हणजे शिवरायांच्या नावानं स्थापित पक्षाच्या मंत्र्याचं नाव तानाजी सावंत! पण ते आजच्या काळातले तानाजी असल्यामुळे त्यांनी मंत्रीपदाला, पक्षाला, माजी आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत धरण व काही ग्रामस्थ वाहून जाऊ दिले.
त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ असं म्हणण्याची वेळ आली नाही. उलट धरण, माणसं गेली; पण खेकडे वाचले असं ते म्हणाले. कारण मंत्री ज्या पक्षाचे तो मराठी माणसांचा, प्रति खेकड्यांचा. पाय खेचणाऱ्या या खेकड्यांनीच एकोप्यानं धरण गिळलं आणि मुंग्यांचा मेरुपर्वताचा विक्रम भुईसपाट केलाय!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment