अजूनकाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थशास्त्र यांच्यात छत्तीसचा आकडा दिसतोय. नुसता शास्त्राशीच नव्हे, शास्त्रज्ञांशीसुद्धा त्यांचा आकडा जुळत नाही. रघुराम राजन, उर्जित पटेल, अरविंद सुब्रमण्यम, विरल आचार्य हे चार शास्त्रज्ञ दोन वर्षांत मोदीराज्यातून परागंदा झाले. यातल्या दोघांनी पुस्तके लिहून आपला मोदी राज्याचा अनुभव जाहीर केला. दुसरे दोघे अजून लिहिते होत नाहीत, पण बोलते झाले आहेत. तरीही मोदी अर्थशास्त्राच्या निमित्ताने आपले अहंकार, आपले अजेयपद आणि आपली ईर्ष्या कुजक्या भाषेत व्यक्त करणे थांबवत नाहीत.
पाच ट्रिलियन डॉलर्सचा अर्थसंकल्प मांडला जाण्याच्या दुसऱ्याच दिवशी मोदी वाराणसीत गेले आणि अस्सी घाटावरच्या गप्पांत बोलतात तसे बोलले की, ज्यांना हा आकडा भारत गाठेल असे वाटत नाही ते सारे ‘व्यावसायिक निराशावादी’ म्हणजे ‘प्रोफेशनल पेसिमिस्ट’ आहेत. टीका, शंका, संशय, पृच्छा, प्रतिवाद, खंडणमंडण यांना हिंदू परंपरेत फार महत्त्व आहे. हिंदू व हिंदुत्व, हिंदूपण यात जसा फरक आहे, तसा टोमणे मारणे आणि एखादा आक्षेप सतर्क खोडणे यात असतो. त्यामुळे मोदी हिंदूराष्ट्राच्या असहिष्णू पायाचा दगड रचत आहेत, असे खेदाने म्हणावे लागते. एक हिंदू म्हणून त्यांनी भारताची मोठी वादपरंपरा अभ्यासायला हवी.
आता मुद्दा असा की, अर्थशास्त्र ‘डिस्मल सायन्स’ (Dismal science) याही नावाने ओळखले जाते. कार्लाईल यांनी माल्थस यांच्या चिंताजनक चिचारसरणीवरून तसे नाव ठेवले होते. ‘डिस्मल’ म्हणजे खेद, उदास, भयाण इत्यादी. निराश चर्या दिसू लागली की, तिला ‘डिस्मल’ म्हणतात. लोकसंख्या वाढते, पण त्या प्रमाणात धान्योत्पादन होत नाही, म्हणून चिंता व्यक्त करणाऱ्या माल्थस याचे अर्थशास्त्र ‘डिस्मल सायन्स’ असल्याचे पुढे रूढच झाले!
पॉप्युलिस्ट पद्धतीने म्हणजे लोकप्रियतेसाठी अचाट, अतिशयोक्त बोलणे राजकारणात खपते. लोकांना स्वप्ने दाखवणे राजकीय नेत्यांचे कामच असते. तसे अर्थशास्त्राचे नसते. जमिनीवरचे वास्तव व त्या आधारे केलेले तर्क, सिद्धान्त, हिशेब यांची मांडणी शक्यतो बिनचूक करावी लागते. रूढार्थाने ते शास्त्र नाही. तरीही ठोकताळे, नियम, सरासरी, सवयी अशा अनेक गोष्टी त्यात विचारात घेतल्या जातात.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt
...............................................................................................................................................................
पाऊसपाणी, हवामान, शेती यांवर ज्या देशाची अर्थव्यवस्था टिकून असते, त्याला तर संभाव्य धोके, टंचाई, संकटे यांची चिंता करावीच लागते. माल्थस तेच करत असे. म्हणून गे (आनंदी) सायन्सचे ‘डिस्मल सायन्स’ होत गेले. निम्मा भाग शंकेचा असल्यावर निम्मी बाजू पेसिमिझमची असणारच! पेसिमिस्ट सदोदित निराशा, हताशा, खेद, औदासीन्य यांत रमणारा नसतो. शंकेसह खातरजमा आणि पडताळणी तो करत असतो. अविश्वास आणि शंका यात फरक आहे ना?
एखाद्या गोष्टीचा प्रतिकूल बाजूने विचार करणारा तो पेसिमिस्ट असतो. ऑप्टीमिस्टचा तो विरुद्धार्थी शब्द आहे. तो निराशावादी असल्याने खचून गेलेला, हातपाय गळालेला व सुस्कारे सोडणाराच असतो, अशी प्रतिमा मोदी रंगवत आहेत. मोदींच्या या वृत्तीला ‘सिनिकल’ म्हणतात. ही विचारप्रणाली ‘सिनिसिझम’ या नाव्याने ओळखली जाते. मोदी विरोधकांविषयी, टीकाकारांविषयी ‘सिनिकल’ झालेत, असे म्हटले तर ते मोदींना आवडेल काय?
‘सिनिकल’ या विशेषणाचा अर्थ दोषैकदर्शी, तिरसट, तुसडा, हुज्जत घालणारा इत्यादी. मोदी प्रचारात ज्या पद्धतीची भाषा विरोधी पक्ष व त्यांचे नेते यांबद्दल वापरायचे, ती निखालस ‘सिनिकल’ या सदरात समाविष्ट अशीच होती. भाषेवरून कोणाविषयी आदर-अनादर आहे, ते कळते.
सबब मोदी मूळचे प्रचारक आणि मूळचे सिनिकल. त्याची प्रतीती दुसऱ्या विजयानंतर हमखास येण्याचे हे चिन्हच!
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 08 July 2019
प्रा. जयदेव डोळे, तुमच्या मते चार अर्थशास्त्री मोदींना सोडून गेले कारण मोदी सिनिकल आहेत. तर मग प्रख्यात अर्थशास्त्री श्री. मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना अर्थव्यवस्थेने गरुडझेप घ्यायला हवी होती. प्रत्यक्षात मात्र या महान अर्थशास्त्र्याची कारकीर्द महान घोटाळ्यांनी गाजली. चुलीत घालायच्या तरी लायकीचा आहे का हा तथाकथित महान अर्थशास्त्री? नाही ना? मग कोणत्या निकषावर तुम्ही मोदींना तिरसट ठरवीत आहात? या मोदींच्याच काळात राखीवपेढी ( = रिझर्व्ह बँक) कडे प्रचंड पैसा शिलकीत पडला ना? मनमोहन सिंगांच्या वेळेस पडला होता का शिलकीत? बाकी, अर्थशास्त्राच्या नियमांबद्दल थोडं हातचं राखूनंच बोललेलंच बरं. आयरिश बटाट्याचा दुष्काळ पडला तेव्हा कसल्याशा अर्थशास्त्रीय नियमांचा हवाला देऊन आयरिश शेतकऱ्यांना भुकेने तडफडत ठेवून भूकबळीगत ठार मारण्यात आलं (इ.स. १८४६ ते १८५०). कालांतराने हा अर्थशास्त्राचा नियमबियम नसून वंशविच्छेदी धोरण होतं हे सिद्ध झालं. असाच दुष्काळ सुमारे १०० वर्षांनी (साल १९४३) मध्ये बंगालात पडला की पाडला गेला. कल्पना करा आज जर असाच दुष्काळ आज पडला तर, हेच निराशावादी अर्थशास्त्री कुठल्यातरी अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा हवाला देऊन नागरिकांना भुकेने तडफडत ठेवून ठार मारण्याचं समर्थन करतील. कोणाला हवीये असली कीड? आपला नम्र, -गामा पैलवान