प्रशासनाला समजते ‘हंटर’चीच भाषा!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • नीतेश राणे यांचा चिखलप्रयोग (छायाचित्र हेमंतकुमार कुळकर्णी, सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने) आणि तीवरे धरण
  • Sat , 06 July 2019
  • पडघम राज्यकारण नीतेश राणे Nitesh Rane नारायण राणे Narayan Rane नोकरशाही Bureaucracy देवेन्द्र फडणवीस Devendra Fadnavis तीवरे धरण Tiware Dam

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबद्दल दोषी धरून राज्य प्रशासनातील एका उपअभियंत्यावर चिखल टाकल्यानं सध्या बराच स्वाभाविक गदारोळ उठला आहे. नीतेश राणे यांच्या चिखल टाकण्याच्या या कृत्याचं किंवा मारहाणीचं समर्थन नाही. एकुणातच, राणे कुटुंबाच्या दहशतीला पाठिंबा तर मुळीच नाहीच नाही, पण बहुसंख्येनं भ्रष्ट, नाठाळ, असंवेदनशील आणि कामचुकार असलेल्या नोकरशाहीला जर हीच भाषा समजत असेल तर लोकप्रतिनिधी आणि जनतेचाही नाईलाज आहे, हे लक्षात घ्यायला हवं. नीतेश राणे असोत की बच्चू कडू यांनी नोकरशाहीवर हात का उचलला याच्या मुळाशी आपण जाणार आहोत किंवा नाही, हा खरा कळीचा मुद्दा आहे. 

मध्यंतरी गप्पा मारत असताना ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते, पुण्याचे विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्याच्या २०१८-१९ या वर्षाच्या महसुली उत्पन्नातले तब्बल ३५ टक्के, म्हणजे १ लाख ३० हजार कोटी रुपये नोकरशाहीच्या वेतन, नेमकं सांगायचं तर, वेतनावर १ लाख २ हजार ६६८ कोटी रुपये आणि सेवानिवृत्ती वेतनावर २७ हजार ३७८ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. यात सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे येणार्‍या बोझाचा समावेश नाही. तो समाविष्ट केला तर हा आकडा सुमारे १ लाख ६० हजार कोटी रुपये होईल. इतकी मोठी रक्कम ज्या जनतेच्या खिशातून ज्या नोकरशाहीच्या वेतनावर खर्च होणार आहे, ती राज्याची बहुसंख्य नोकरशाही जनहिताची कामं किमानही प्रामाणिक/प्रभावी/कार्यक्षम/संवेदनशीलपणे करत नाही, हे कटू सत्य आहे.

इतकी मोठी रक्कम ज्यांच्या वेतन आणि सेवानिवृत्त वेतनावर खर्च होते, त्यांच्यावर अंकुश ठेवायचा कसा? फेसबुकवर प्रशांत सांजनीकर या शासकीय अधिकार्‍याची एक पोस्ट वाचनात आली. त्यात सांजनीकर यांनी अमरावती येथे उपविभागीय अधिकारी असलेल्या नरेंद्र फुलझेले यांच्या तळमळीच्या कार्य शैलीचा आलेला अनुभव सांगितला आहे. तो वाचल्यावर लक्षात येतं की, प्रशासनात असे नरेंद्र फुलझेले यांच्यासारखे अधिकारी बहुसंख्येने हवे आहेत, तरच नीतेश काय किंवा बच्चू काय किंवा रयत काय, यापैकी कुणीच प्रशासनातील कुणावरही हात उचलणं तर सोडाच, पण वाकड्या नजरेनीही बघणार नाही.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशालाही नोकरशाही कशी हरताळ फासते याचा एक अनुभव सांगतो. नागपूरचे एक पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे अकाली निधन झाल्यावर त्यांची पत्नी सुनीता झाडे यांना एक लाख रुपयांची मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करून आता चार वर्षं ऊलटली तरी त्यापैकी एकही छदाम सुनीता झाडे यांना मिळालेला नाही... या संदर्भात सुनीता झाडे यांनी लिहिलं, पाठपुरावा केला; मीही मुख्यमंत्री फडणवीस यांना आजवर या मदतीची आठवण करून देणारे किमान २५ तरी एसएमएस केले आणि त्यांनी प्रत्येक वेळी सकारात्मक प्रतिसाद दिला तरी प्रशासन ढिम्मच; विधानपरिदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा एका आठवड्यात ही मदत देण्याचं आश्वासन सरकारच्यावतीनं देण्यात आलं. त्यालाही आत वर्ष उलटून गेलं तरी काहीच घडलेलं नाही. या संदर्भात दोषी असणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा असं मी फडणवीस यांना सुचवलं, पण तेही त्यांनी केलं नाही. दिलेल्या शब्दाच्या अंमलबजावणीबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच फडणवीसच बेफिकीर आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळण्याइतकी असंवेदनशीलता (की त्यांना फाट्यावर मारण्याचा कोडगेपणा, म्हणू?) असलेल्या नोकरशाहीची काय पूजा करायची का?

आणखी एक उदाहरण देतो. गेल्याच आठवड्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून हाहा:कार माजला, अनेकांचे जीव गेले. बांधल्यापासून अवघ्या पंधरा वर्षांच्या आतच हे धरण फुटण्याचा धोका आहे, अशी माहिती लोकांनी प्रशासनाला वारंवार दिली, तरी धरण दुरुस्तीची कोणतीच कार्यवाही झाली नाही. जी दुरुस्ती झाली ती थातुर-मातुरच झाली. या धरणाजवळ मोठा खड्डा पडला असून त्यातून पाण्याचा मोठ्ठा विसर्ग होत असल्याच्या तिवरे येथील अजित अनंत चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीची प्रत माझ्या हाती आहे, पण, या आणि अशा पत्रांची दखल न घेणार्‍या प्रशासनातल्या कोणाही अधिकार्‍यावर ते धरण फुटून आता आठ दिवस झाले तरी कारवाई नाही.

सरकार ऐकत नाही आणि प्रशासन दखल घेत नाही, अशी विदारक ही स्थिती आहे आणि अशा वेळी धरण खेकड्यांनी कुरतडलं असा बौद्धिक दिवाळखोरीचा दावा करणारे मंत्री राज्यात असतील तर रयतेनी हातात हंटर ( कोरडा ) किंवा रुमणं घेऊन जर ते मंत्री, कर्मचारी आणि अधिकार्‍यांवर उगारला किंवा त्यांना चिखलानं आंघोळ घातली तर त्यात दोष रयतेचा कसा? रयतेच्या रंध्रारंध्रातून पाझरणार्‍या या वेदना समजणारा कधीच या हंटर उगारण्याला दोष देणार नाही, याची खात्री आहे.   

जनतेच्या कामासाठी अगदी गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, परिचारिका ते कृषी सहायक अशी २०-२२ शासकीय कर्मचार्‍यांची एक चमू एका पंचक्रोशीसाठी तैनात असते. यापैकी किती कर्मचारी गावात उपलब्ध असतात याचा शोध कधीच घेतला जात नाही किंवा त्याचा हिशेब किंवा ते हजर असण्याचं वेळापत्रक प्रशासन कधी जनतेला देत नाही. शेवटच्या पातळीवर जे घडतं आहे तेच मंत्रालयात आहे. विधिमंडळाचं अधिवेशन असलं की, अर्धे अधिकारी आणि कर्मचारी अधिवेशनात गेलेले आहेत असं सांगितलं जातं तर अधिवेशन नसेल तेव्हा ‘साहेबांकडे जातो’, असं सांगून ही मंडळी कुठे तरी गायब झालेली असतात, असं हे सार्वत्रिक भयाण चित्र आहे. इकडे वर्षानुवर्षे काम झालं नाही म्हणून जनता आत्महत्या करते म्हणून मंत्रालयात जाळ्या बांधण्याचा शरम आणणारा पराक्रम करणार्‍या प्रशासनातील अकार्यक्षम, भ्रष्ट व कामचुकारांवर कठोर कारवाई न करता त्या जाळ्या बांधण्याला मान्यता देणारं सरकार अशी ही व्यवस्था आहे. जरा कठोर शब्दातच  सांगतो- रयतेच्या विरोधातली ‘संघटित टोळी’ म्हणजे बहुसंख्य प्रशासन आहे आणि सरकार हे या संघटित टोळीच्या हातातील बाहुलं, अशी परिस्थिती गेल्या अनेक दशकापासून झालेली आहे.                      

सरकारनं जनहितैषी निर्णय घ्यावेत आणि त्यांची अंमलबजावणी नोकरशाहीनं इमाने-इतबारे करावी ही कामाची आदर्श पद्धतच आता मोडीत निघाली आहे. प्रत्येक नवीन योजना म्हणजे प्रशासनासाठी भ्रष्टाचाराचं नवीन कुरण असतं. मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या समृद्धी मार्गाचं उदाहरण घ्या- जमीन संपादनाच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी चिंब भिजले आहेत. इतके चिंब झालेले आहेत की, त्यांच्या अंगणातही आता त्या नोटांचा सडा पडलाय! समृद्धी महामार्गात जाणार्‍या जमिनी हक्काचा मोबदला देण्यासाठी ५ ते ६ टक्के दर आहे. शेतात एक झाड वाढवण्यासाठी किमान दहा हजार रुपये घेतले जातात तर कोरडवाहू शेती सिंचनाखालील दाखवण्याचा भाव एकरी किमान २५ हजारावर आहे (समृद्धी मार्ग आणि महसूल खात्यातीलच मित्रांनीच ही माहिती दिली आहे!) आणि या खजिन्याची चावी असे ‘पराक्रमी’ उद्योग करण्यात माहिर असणार्‍या सराईतांच्या हाती आमच्या मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली आहे. 

जनहित मागे पडून एकूणच सरकार व नोकरशाहीचं सुमारीकरण ; महत्त्वाचं म्हणजे ‘बाजारी’करण झालंय. कणखरपणे निर्णय घेणारे, विचारी राज्यकर्ते अभावानंच निवडून येऊ लागले आहेत. राज्यकर्ते आणि नोकरशाही यांच्यात अवैध आर्थिक हितसंबंध तयार झाले आहेत. दोघांतही एकमेकाला वापरुन घेण्याची वृत्ती बोकाळली आहे. आपण जनतेचे सेवक नाही तर राजे आहोत अशी मानसिकता नोकरशाहीत आली आहे. ‘पार्टी वुइथ डिफ्रन्स’चे फडणवीस नोकरशाहीला वठणीवर आणतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली आहे. आजवर एकाही ‘बाबू’वर फडणवीस यांनी कारवाईचा बडगा उगारलेला नाही!

फडणवीस यांच्यावर नसले तरी त्यांचे मंत्रीमंडळातील अनेक सहकारी आणि असंख्य अधिकारी ‘अर्थ’पूर्ण वादग्रस्त ठरले आहेत. नोकरशाहीचा वापर क्षुल्लक राजकीय लाभासाठी करून घेण्याची काँग्रेसी नेत्यांची सवय फडणवीस यांनाही लागल्याचं दिसतं आहे. अशा प्रसंगी कोणतीही भूमिका घ्यायची नसते आणि प्रकरण शांतपणे विस्मरणात जाऊ द्यायचं असतं. या आजवरच्या ‘उज्ज्वल’ परंपरेला ही कृती साजेशीच आहे. इतिहासात डोकावण्याची गरज नाही फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यापासून मोपलवार, कमला मिलमधील अग्नीप्रलयसारख्या एकदोन चौकशा वगळता अन्य कोणत्याही चौकशा आजवर मार्गी लागलेल्या नाहीत. परदेश प्रवासाची कागदपत्रे घरी विसरून आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या सचिवाची ते औरंगाबादच्या गुलछबू पोलिस अधिकार्‍याची अशी ही पूर्ण न झालेल्या ( का, न होऊ दिलेल्या?) चौकशांची फडवीस सरकारची तेजस्वी परंपरा आहे. दु:ख म्हातारी मेल्याचं नाही काळ सोकावण्याचं आहे , हे राज्यकर्त्यांना समजत नाही असा त्याचा अर्थ आहे.

माझे एक नागपूरकर ‘चळवळे’ मित्र प्रमोद पांडे गंमतीनं म्हणतात, ‘आपल्या देशात काम न करण्यासाठी प्रशासनाला पगार मिळतो आणि काम करण्यासाठी लाच मिळते!’ यातली अतिशयोक्ती सोडा कारण संपूर्ण प्रशासन भ्रष्ट नाही, पण प्रशासनात रयतेचं कोणतंच काम लाच दिल्याशिवाय आणि दिल्यावरही वेळेवर होत नाही, ही वस्तुस्थिती सुन्न आणि अंतर्मुख करणारी आहे. अशा प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी ‘हंटर’चीच गरज आहे. तो हंटर सत्ताधारी पक्षाच्या हाती आहे की, कुणा विरोधी पक्ष सदस्याच्या, याला माझ्या दृष्टिकोनातून म्हणून काहीच महत्त्व नाहीये!

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 08 July 2019

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर, जर नितीश राण्यांचं वर्तन समर्थनीय मानलं तर रवींद्र गायकवाडांनी हवाई कर्मचाऱ्यास कानाखाली लगावली तीही योग्यंच म्हणायला हवी. विमानात साधी तक्रार पुस्तिका ठेवता येत नाही आणि बदल्यात 'खुदको मोदी समझता है क्या' असा उर्मट सवाल गायकवाडांनी ऐकून घ्यायचा तो का म्हणून ? असो. बाकी नितेश राण्यांनी हा बनाव घडवून आणलेला वाटतो. चिखल अंगावर घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरची स्थितप्रज्ञता अवर्णनीय म्हणूनंच शंकास्पद आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......