आमच्या कटु संगीतमय आठवणी
ग्रंथनामा - झलक
रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
  • ‘थट्टा मस्करी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 05 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक थट्टा मस्करी Thatta Maskri रवींद्र तांबोळी Ravindra Tamboli

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांचे ‘थट्टा मस्करी’ हे विनोदी लेखांचे पुस्तक नुकतेच पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. सहजपणे बोलता बोलता समाजातील वैगुण्यांवर बोट ठेवण्याचे काम ते हसत-खेळत करत आले आहेत. त्यांच्या या मिष्किलीत निरीक्षण, अनुभव आणि वेळप्रसंगी जीवनदर्शनही दिसते. त्यांच्या या नव्या पुस्तकातील थट्टा-मस्करी करत लिहिलेला हा एक लेख...

.............................................................................................................................................

रात्रीचे साडेनऊ वाजले होते. आम्ही आमच्या हॉलमधील दिवाणावर लोळत-लोळत टीव्हीवरील साडेनऊच्या मराठी बातम्यांचा आनंद घेत होतो. आम्हाला हे बातमीपत्र फार आवडते, कारण केवळ इथेच सात्त्विक बातम्या पहायला मिळतात. आम्ही पाहात असलेल्या बातमीत एका महिलेची यशोगाथा आम्हाला पहायला मिळाल्याने आम्ही प्रचंड आनंदी होऊ लागलो होतो न होतो तोच आमचे नववीत असलेले चिरंजीव अचानक हॉलमध्ये आले, आमच्या हातातील रिमोट हिसकावून घेत आम्हाला म्हणाले,‘‘पप्पा, त्या फालतू बातम्या बंद करा, मला इंडियन आयडॉल ज्युनिअर बघू द्या!’’

एक रुपयाही कमवण्याची अक्कल नसलेल्या त्या कुमार-वयीन बालकाचे हे वागणे आम्हाला तीव्र राग आणून गेले. रागाच्या भरात आम्ही ओरडलो, ‘‘अरे गाढवा, अक्कल फिक्कल काही आहे की नाही? त्या तुझ्या गाण्यांनी पोट भरणार आहे काय? थोडा अभ्यास करत जा, जेव्हा पहावं तेव्हा गाणे! टीव्हीवर नाहीतर मोबाईलवर! पागल झालीत सारी कार्टी!’’

आमच्या या क्रोधपूर्ण वक्तव्यावर चिरंजीव दु:खी झाले आणि तिथून निघून गेले. त्यांच्या प्रस्थानानंतर आम्हीही आपली ही अशी मनोभूमिका संगीत द्वेष्टी का झाली या विचारात गुंतत गेलो आणि मनातल्या मनात आमच्या बेसुऱ्या त्या आठवणी जाग्या होत गेल्या. या आठवणीत तत्कालीन दाहक वास्तवही पुन्हा चटके देऊन गेले. त्या आठवणीविषयी सांगायचे झाले तर आम्ही ज्या गावी वाढलो तिथे आमचे आई-वडील नौकरीकारणाने स्थायिक झाले होते. आमचे शिक्षणही तिथेच सुरू झाले होते. या शैक्षणिक आयुष्यात आम्हाला संगीताविषयी तिटकारा कधी सुरू झाला ते तंतोतंत सांगणे अवघड आहे, मात्र आमच्या स्मरणात असलेल्या साऱ्या आठवणी या वारंवार हेच सिद्ध करतात की, आम्हाला संगीत लाभत नाही. सुरांनी आमचा घात होतो, तर तालांनी आम्हाला लाथ बसते. आमचे आजवरचे जगणे तसे बेताल मानायला पाहिजे, कारण आम्ही ताळतंत्र सोडूनच जगत आलेलो आहोत. तसे पाहायला गेले तर इयत्ता चौथीची आमची आठवण आजही आमच्या नजरेसमोर जशीच्या तशी जागी होते. ही आठवण तालेसंबंध राखणारी आहे. घडले होते असे की, इयत्ता चौथीमध्ये आम्ही असताना एके दिवशी शाळेत आम्ही एका प्रश्नाचे उत्तर द्यायला म्हणून इतिहासाच्या तासाला आम्हाला शिकवणाऱ्या बाईकडे पाहात हात वर केला. त्यांनी ‘उत्तर सांग’ म्हणून इशारा केला आणि तत्कालीन भारतीय बैठकीच्या आसनव्यवस्थेमुळे आम्ही उभे राहिलो. त्यांचा प्रश्न औरंगजेबाविषयी होता आणि आमचे उत्तर औरंगजेबाविषयी उदात्तीकरण करणारे ठरल्याने त्यांनी आम्हाला ‘‘गप्प बस गाढवा! तुझी खानदान काय त्याची नातेवाईक आहे काय रे मेल्या?’’ असे जळजळीत राष्ट्रभक्तीवर उद्गार काढून आम्हाला ‘हो वर्गाबाहेर आणि उद्या आईला घेऊन ये नाहीतर शाळेत बसू देणार नाही!’’ असा शाप दिला. आमच्या कोवळ्या अंकुरल्या मनात अचानक भीतीची लाट सुरू झाली आणि आम्ही दाणकन खाली मांडी घालून बसायच्या प्रयत्नात असताना आमची चड्डी अचानक उसवली. एकीकडे खवळलेली महिला गुरू आणि दुसरीकडे उसवलेली चड्डी या दुहेरी कुंचबनेमुळे आम्ही आमचे दफ्तर तिथेच सोडून अकस्मातपणे वर्गाच्या दरवाज्याकडे धाव घेतली ती अनेक मुलांच्या पाट्या - पुस्तकांच्या उंचवट्यावरून! आमच्या त्या द्रुतगतीमुळे त्या दिवशी सहा मुलांच्या पाट्या फुटल्या तर सात मुलांची पुस्तके फाटली म्हणे! आम्हाला तेव्हा झालेला तो पाट्या-फुटण्यांचा आवाज, पाने फाटतानांची ती फडफड आजही स्मरते. हे एकीकडे तेव्हा घडले आणि दुसरीकडे, आम्ही जसे वर्गाच्या बाहेर पळून आलो शाळेजवळच्या कडुलिंबाच्या झाडाजवळ पोचलो, तेव्हा आम्ही आमची चड्डी फाटली आहे, आपल्याला ओशाळवाणे वाटते आहे ही भावना पार विसरून गेलो. अचानक आम्हाला स्वमुक्तीचा आनंद भरभरून सुरु झाला. आनंदाच्या भरात कोणीही काहीही करते तसेच आम्हीही तेव्हा करून टाकले. आम्ही तिथे पाहिले की काही कुमारवयीन मुली लंगडीचा खेळ खेळत आहेत. त्यांच्या खेळात नॉन कमर्शिअल ब्रेक द्यावा म्हणून आम्ही त्यांचा खुणेचा तो शहाबादी फरशीचा चौकोनी दगड एका क्षणात हाती घेतला आणि आमच्या घराकडे धूम ठोकली. घराजवळ आम्ही पोचण्याआशी एक-दोन घरे आधी नकळतपणे थबकलो कारण ते घर तबलनवाज विकासमास्तरांचे होते. आम्हाला सूर आणि तालांचे अंगभूत ज्ञान असावे कारण आम्हीही हातातल्या त्या दगडाने ‘ता, धिन, धिन्ना’ वाजवणे कधी सुरू केले ते आम्हाला कळलेच नाही. सूर-तालाच्या अत्युच्च समाधीअवस्थेत जसा श्रोता आणि गवई देहभान विसरून जातो, तशीच आमची अवस्था प्रारंभालाच होऊन गेली. आमच्या त्या स्वर्गीय अवस्थेत एकच दोष होता तो दोष म्हणजे तबल्याच्या ठिकाणी विकासमास्तरांच्याच घरासमोर उभ्या असलेल्या ‘राजदूत’ या मोटरसायकलच्या ‘पेट्रोल टँक’ होता, आणि तालनिर्मिक बोटांच्या स्थानी हातातला तो शहाबादी फरशीचा दगड होता. आमचे ते तालवादन भयसूचक आणि कर्कश्श घडले असावे कारण आमच्या वादनकारणे मास्तर लगबगीने धावत बाहेर आले. त्यांनी आमची ती गंधर्वअवस्था पाहिली. आमच्या अवस्थेला पाहता न पाहताच त्यांच्यात नटराज संचारला आणि त्यांनी मौखिक तांडव सुरू केले. त्या तांडवासोबतच त्यांच्या बिथत्स बोलमुद्रा सुरू झाल्या. या बोलमुद्रेतून त्यांनी रौद्ररूप धारण करीत आमचा चिमुकला देह बकोटीला मारून आमच्या महान व थोर तथा सज्जन व सत्शील पिताश्रींसमोर आम्हाला उभे केले.

उच्चमध्यमवर्गीय असलेले व नुकसानभरपाईस सदा सज्ज असलेले आमचे माता-पिता ओशाळवाणे झाले. नवा पेट्रोल टँक बसवून घ्या असे आर्जव ओवाळून गेले आणि आमचा पहिलाच ताल आम्हाला तोट्यात घालून गेला. हा प्रसंग घडून गेला आणि पुत्रहितकारिणी मानल्या गेलेल्या साऱ्या मातांप्रमाणे आमच्या आईनेही त्यादिवशी रात्री भोजनोपरांत आमच्या पिताश्रींसमोर असे मत व्यक्त केले की, ‘आपले बुद्धिमान असलेले सुपुत्र या गल्लीतल्या वातावरणामुळे बिघडत आहेत. ते संपूर्णपणे बिघडण्याआधीच आपण ही गल्ली आणि हे घर सोडू या! मी गावात भाड्याने मिळणारी दुसरी जागा तातडीने शोधतो त्या जागेला भले भाडे जास्त पडले तरी चालेल, पण ही गल्ली आता नको!’ आमचे पिताश्री हे पत्नीभक्तीपरायण असल्याने त्यांनी तात्काळ आणि अर्थातच नाईलाजाने ही सूचना स्वीकारली. या तालकारणाने आम्हाला आयुष्यातल्या लहानपणीच्या आठवणीतील ही कटु आठवण हयातभर जपावी लागत गेली. खरे तर तेव्हा तिथली इयत्ता तिसरीमधली आमच्या शेजारची सुन्नी नावाची मुलगी आमच्यावर खूप जीव लावत असे. आम्ही तिथेच पुढे दहा-बारा वर्षे राहिलो असतो तर तिचे आमचे कदाचित ‘काफलव, युथलव, अॅक्चुअल, लवमॅरेज’ असे सारे घडले असते, पण आयुष्यात ‘जर-तर’ ला अर्थ नसतो असे म्हणतात हेच खरे मानावे दुसरे काय?

गावातल्या गावात आम्ही दुस-या घरात राहायला गेलो ते साधारणत: महिनाभराच्या कालावधीमध्ये! आमच्या पालकांनी अगदी आधीच्या घराचे आगावू दिलेले महिनाभराचे भाडे पूर्णपणे उपभोगून ते घर सोडले आणि साऱ्या शेजारपाजाऱ्यांना आमच्यापुढे घर सोडत असल्याने कारण घटनाक्रमासह सिद्ध केले. त्यांची दोषांची निवेदन शैली इतकी प्रभावी असावी की, आजही त्यातील दुर्मीळ वयोवृद्ध शेजारी आम्हाला भेटले की, ते ‘‘राजदुतावरील तबलावादन’’ आठवून सुखावत असतात. ती घटना किंवा काय कोण जाणे, त्यानंतर आम्ही कधीही आमची तर्जनी आजवर निव्वळ चुटकी वाजवयालाही वापरली नाही हे मात्र खरे आहे. एवढेच काय तर आम्ही ‘ताजमहाल चाय’सुद्धा कधी पिण्याचे धाडस केले नाही आणि अगदीच सत्य सांगायचे झाले तर झाकीर हुसेनचे केस जरी दिसले तरी आम्हाला वादळ घोंगावणार की, काय ही भीती जागी होते कारण तेव्हा त्यांच्या सोबत वास्तव तबलादर्शन होत असते.

तालबंबाळ झालेले आमचे चिमुकलेपण सोबत घेऊन आम्ही ज्या वसाहतीत राहायला गेलो ती बंगलेवजा घरांची रचना असलेली वसाहत होती. इथे घरासमोर घर, कुंपण,गच्ची अशी तत्कालीन सुविधा उपलब्ध होती. तालभयाने ग्रस्त असलेल्या मनावर आघात करायला इथे सात बेसूर सज्ज होते, हे आम्हाला तेव्हा ज्ञात नव्हते. हा सूरघात फक्त तेव्हा आम्हालाच होऊन गेला पण आजवर त्याची वाच्यता आम्ही कोणालाही केली नाही. तत्कालीन परिस्थितीमुळे आम्ही संगीतद्वेष्टे होऊन गेलो हे मात्र निश्चितपणे आज सांगून टाकतो आहोत.

तेव्हा घडले होते असे की, आमच्या घरासमोरच्या घरातच जे कुटुंब राहात होते. त्या कुटुंबात एकूण नऊ माणसे होती. सात अपत्यांची जबाबदारी घेत ते जमीनदार असलेले माता-पिता आपली कौटुंबिक निष्ठा वृद्धिंगत करण्याचाच तयारीत होते. ही सप्तपुत्रावळ तशी युवकावस्थेत, बेकारावस्थेत, विवाहोत्सुक आणि दिशाहिन होती. ही विशेषणे वापरण्यामागे तत्कालीन परिस्थिती कारणीभूत मानायला हवी. पाच दशकांपूर्वी मनोरंजनाची साधनेही अतिदुर्मीळ होती. दूरदर्शन नव्हते, भ्रमणध्वनी जन्मायचा होता, संगणक स्वप्नातही नव्हता. दळणवळण तुरळक होते. सरकारी नोकरी हा प्रथम व अंतिम पर्याय होता. नोकरी लागेपर्यंतचा काळ हा मातृपितृसान्निध्यात सुखात जात असे. गावातल्या गावातले जे एखादे मध्यम व साधे चित्रपटगृह असे तिथे दीर्घकालीन मुक्कामाला असलेल्या  चित्रपटाचा आनंद घेत हा काळ सुसह्य होई तर रेडिओवरची गाणी ऐकून व ती म्हणून मनोरंजनाचा अनुशेष गाण्यांच्या भेंड्यांतून, शाळेत गाणे म्हणायला लावून, सुगम संगीताच्या महाविद्यालयीन स्पर्धा होऊन ज्याची त्याची संगीतसाधना सिद्ध होई. क्रीडा, मनोरंजन, कला या साऱ्यांच्या तुटवड्याने व वाचनसंस्कृती तेव्हाही क्षीण असल्याने पत्नीसान्निध्य हा श्रेष्ठ विरंगुळा आहे, असे विवाहीत मंडळी मानत तर एकतर्फी प्रेम ही सर्वोच्च जीवननिष्ठा आहे, असे सारे अविवाहीत एकमेकात म्हणत.

आमच्यासमोर राहणारे ते जमीनदार घराणे वरील अर्थाने परिपूर्ण होते. आणि अतिरिक्त परिपूर्णतेचा भाग म्हणजे त्यांचे ते सात बेसुर पुत्र आपल्या भेसूर गायनाने ‘भिकार घराण्याची’ संगीत परंपरा पुढे नेणारे होते. आमच्या नव्या वास्तव्यादरम्यानच्या पहिल्या आठवड्यातच आम्हाला हे लक्षात आले की, आपल्या समोरील ही सप्तपिशाच्चे आपल्या सामुहिक गायनाने आपल्याला भयप्रद स्वप्ने पाडायला कारणीभूत ठरणार आहेत. समोरच्या त्या घरात जेव्हा कोणी एकट्यानेच आपले गायन जेव्हा सुरू करी, तेव्हा आमच्या वसाहतीतील सर्व झाडांवरच्या सार्‍या टिटव्या टिटँव्य - टिटँव्य हा ध्वनी काढत साऱ्या पक्षीजातीत असे ट्विट करत की, न जाणवणारा ध्वनिकंपरूपी भूकंप होतो आहे. वसाहतीतील अबोध व एका वर्षाखालील सारी बालके रडण्यातला हंबरडा फोडत. ही सगळी वस्तुस्थिती आमच्या पालकांच्या लक्षात कधीही आली नाही याला कारण तत्कालीन संगीत निरक्षरता म्हणायला हवे.

लहानपणी आमच्या साऱ्या संवेदना अतितीव्र असाव्यात म्हणूनच आम्ही हे गूढ ओळखू शकलो की सूर आणि ताल यांचे सानिध्य आपल्या आयुष्याचा घात करणार आहेत. हे जाणवायला तेव्हा दुसरे जे कारण घडले. त्यात आम्हाला ईश्वरप्रचितीच कारणीभूत ठरली असे मानायला हरकत नाही.

आमच्या शेजारी निंदक जरी रहात नसला तरी सामोरी मात्र विध्वसंक राहात असल्याने आम्ही सोमवारचे सोळा उपास, मंगळवारची आराधना असे आठवड्यातील तीन दिवस (शनिवारचा हनुमान संकल्प धरून) निरनिराळ्या मंदिरात जाणे सुरू केले. आमचा जो नवस होता त्यात ‘समोरच्या घरातील सर्वांचा आवाज बसू दे आणि फार प्रसन्न झालात तर त्यांना मुकेपणा येऊ दे’ हा होता. नवसाचा सारा धार्मिक भाग काटेकोरपणे व्हावा म्हणून आम्ही सकाळी काकडआरतीवेळ, दुपारच्या कीर्तन वेळा, रात्रीच्या भजनसंध्या यांना पाळणे सुरू केले. हा आमचा कठोर संकल्प सतत चार महिने विनासायास चालू राहूनही व ईश्वराने कोणतीही परीक्षा न घेऊनही समोरच्या घरातील आवाजात काहीही फरक पडता नव्हता. एवढेच काय तर ती सारी भावंड आपल्या समूहगायनात ‘जब भी ये दिल उदास होता है, जाने कोन आस-पास होता है!’’, ‘‘रातका समा, झुमे चंद्रमा!’’ अशी गाणी म्हणत होती. आमच्यावर होणाऱ्या कर्ण अत्याचाराने त्रस्त होऊन आणि त्यामुळे होणाऱ्या श्रवणक्षणतेला भिऊन आम्ही थेट मंदिरातल्या पुजार्‍यांनाच आमच्या नवसाबाबत विचारणा केली आणि विषद केले की, ‘‘साप्ताहिक तीन उपास पाळूनही देव प्रसन्न का होत नाही?’’ तेव्हाचे ते व्यासंगी धर्मगुरू म्हणाले की, बाळा, तू ज्या तीनही मंदिरात जातोस, तिथून देवं निघून गेलेत कारण त्यांनाही सकाळच्या कर्कश्श सूरांचा त्रास होत आहे तर दुपारच्या भेसूर सुरांना ते कंटाळले आहेत. त्या दोन कारणांमुळे जो कोणी त्यावेळेत येतो त्याला केव्हाही फायदा होत नाही. तुला देवाची प्रचिती हवी असेल तर तू पहाटे पूर्वीच येत जा. पुजाऱ्यांचे मार्गदर्शन ऐकून आम्ही शांत जरी झालो तरी आमच्या तेव्हाच्या लहाणपणामुळे तिथे आम्हाला जाणे काही जमलेच नाही व आमच्या ललाटावर सुरांची अवकृपा होणे अविरतपणे चालूच राहिले. हे एकीकडे घडत असतानाच केवळ गद्य गायनामुळे मार खाण्याचा प्रसंग आम्हाला आमच्या शाळेत आला. घडले तेव्हा असे की त्या दिवशी शाळेत आमचे गणिताचे गुरुजी आले नव्हते. ते न आल्यामुळे त्यांच्या जागी आमचे क्रीडाशिक्षक शेख गुरुजी केवळ टाईमपास म्हणून येऊन बसले. रंगीत मिजाजाचे व गझल शौकीत गुरुजींनी वर्गात आल्या आल्या एकेकाला उभे केले आणि आपले आवडते गाणे म्हणायला लावले. आमचीही वेळ जेव्हा आली तेव्हा आम्ही नटश्रेष्ठ अमिताभ बच्चन यांचे कालानुरुप लोकप्रिय असलेले तेव्हाचे ‘मजबुर’ या चित्रपटातले गाणे म्हणने सुरु केले. या गाण्याची सुरुवात गद्यरूपी ज्या शब्दांनी सुरू होते, ते शब्द ‘कभी सोचता हूँ, के मै कुछ कहूँ..’ असे म्हणायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सूरशौकीन शेख गुरुजी मोगल आक्रमकाप्रमाणे आमच्यावर खवळले, हातातील डस्टर फेकून आम्हाला मारला आणि म्हणाले, ‘‘गधे के बच्चे!, तेरे बापने भी कभी कोई गाणा पढके सुनाया क्या?’’ गुरुजी हे क्रीडा शिक्षक असल्याने त्यांचा नेम तेव्हा चुकला मात्र त्यांचे जिव्हारी शब्द आमच्या काळजात जाऊन रूतून बसले. आमचे अतिकोवळे मन तेव्हा हा विचार करीत स्वत:शीच म्हणाले होते की घरी-दारी जर संगीताने घात होत असेल तर त्या संगीताला आपल्या आयुष्यातून वगळून टाकूनच त्यावर मात करून टाकू या! तेव्हापासून ते आजपर्यंत हळूहळू आम्ही संगीत ऐकणे जे टाळत गेलो ते आजपर्यंत. या न ऐकण्याने आमचे काहीही बिघडले नाही, हे मात्र निश्चित!

.............................................................................................................................................

'थट्टा मस्करी' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4971/Thatta-Maskari

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......