सदगुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • संत कबीर
  • Thu , 04 July 2019
  • पडघम सांस्कृतिक विठोबा Vitthoba विठ्ठल Vitthal आषाढी एकादशी Ashadhi Ekadashi पंढरपूर वारी PANDHARPUR WARI संत कबीर Kabir

परमेश्‍वरप्राप्ती व गुरु-शिष्य परंपरा    

परमेश्‍वरप्राप्ती ही सर्वश्रेष्ठ सिद्धी होय. हजारो मनुष्यातील कुणी एखादा या सिद्धीने युक्त म्हणजे सिद्ध होण्यासाठीचा प्रयत्न करतो आणि अशा हजारो मनुष्यातीलही क्वचित एखादा परमेश्‍वराला तत्त्वत: जाणतो, असे ‘गीते’त म्हटले आहे. देवाला तत्त्वत: जाणणे म्हणजे श्रीरामकृष्णादी अवतारी महात्म्यांच्या वा देवाच्या मूळ स्वरूपाचे आकलन होणे होय. बाह्य वा समोरच्या वस्तूंना वा व्यक्तींना जसे आपण जाणत असतो, तसे देवाला जाणता येत नाही, हे सूचित करण्यासाठी ‘परमेश्‍वप्राप्ती होणे’, हे शब्द योजिले गेले आहेत. म्हणूनच ‘गीतेचा’ भावार्थ असणार्‍या ‘ज्ञानेश्‍वरी’त शेवटी, परमेश्‍वरप्राप्तीचा ‘तो’ प्रकार जाणता यावा म्हणून किंवा परमेश्‍वरप्राप्ती होते म्हणजे नेमके काय होते ते समजावे म्हणून देवानेच ‘गुरु-शिष्य परंपरा’ रूढ करून ठेवली आहे, असे म्हटले आहे. अर्थात परमेश्‍वरप्राप्तीचे स्वरूप फक्त श्रीसद्गुरूच समजावून सांगू शकतात, त्याबाबतच्या अंतर्निष्ठ अनुभवाच्या वाटेवरून घेऊन जात ते आपल्या शिष्याला देवाची ओळख करून देऊ शकतात. म्हणूनच देव व सद्गुरू प्रत्यक्ष समोर आले असताना आधी सद्गुरूंना नमन करणे, हे सर्वथैव उचित ठरते. हा हितकारक व गुरुमाहात्म्यसूचक विचार संत श्रीकबीर यांनी ज्यात व्यक्त केला आहे, त्या दोह्याचा भावानुवाद असा आहे -

आधी नमू मी कुणां उभे जैं समोर देव गुरू ।

दिला दावुनी देव आपण समर्थ श्रीसद्गुरू ॥

श्रीसद्गुरूंचे स्वरूप

असत्-निरपेक्ष म्हणजे अखंड सत् किंवा सदसद्विलक्षण असे ते देवाचे अविनाशी अंतिम स्वरूप होय. तेच त्याचे अंश असलेल्या तुझे, माझे व आपल्या सर्वांचे खरे वामूळस्वरूप आहे, असे शिष्याच्या अनुभवास आणून देणे हे सद्गुरूंचे सर्वोत्तम कार्य होय. श्रीसद्गुरूंच्या अशा स्वरूपाचा व ते करत असलेल्या या सर्वश्रेष्ठ कार्याबाबतचा संस्कार जनमानसावर व्हावा आणि तो कायम रहावा म्हणूनच गुरू या शब्दाला सत् हा प्रत्यय लावून सद्गुरू हा शब्द तयार केला गेला आहे.

श्रीसद्गुरूच समर्थ असतात

समर्थ हे श्रीसद्गुरूंचे सर्वश्रेष्ठत्व सांगणारे एक खास विशेषण आहे. केवळ श्रीसद्गुरूच सत्शिष्याला आपल्यासारखे करू शकतात; त्यासाठी, संत श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे, त्यांना अनुकूल काळाची वा वेळेची म्हणजे एखाद्या शुभ मुहूर्ताची गरज नसते. त्यांच्या ठिकाणी असलेल्या त्या अनन्यसाधारण सामर्थ्याची कल्पना यावी म्हणूनही त्यांना समर्थ म्हटले जाते. ‘समर्थें समर्थ करावे । तरीच समर्थ म्हणवावे ।....’ या समर्थ श्रीरामदास स्वामींच्या वचनातूनही समर्थ हे विशेषण कुणाला लावणे योग्य आहे व खर्‍या अर्थाने कोण समर्थ आहे, त्याबाबतची जाणीव करून दिली आहे. देव, आपण, शिष्य व पर्यायाने जगातील सर्व सजीव व जडवस्तू मुळात आत्मरूप आहेत. म्हणजे विश्‍वातील सर्वांचा मूळ ‘अर्थ’ (परमोच्च ध्येय वा प्राप्तव्य) सम म्हणजे सारखाच (सारखेच) आहे. असा अखंड अनुभव असणारे व तसे अनुभवास आणून देण्याचे सामर्थ्य असणारे श्रीसद्गुरू सदैव समर्थ असतात.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

श्रीसद्गुरुमाहात्म्य

या लेखात संत श्रीकबीर यांच्या काही दोह्यांच्या व अन्य काही संतांच्या काही वचनांच्या आधारे श्रीसद्गुरूंचे माहात्म्य व कार्यस्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करूयात -

१) श्रीसद्गुरू हे देवाहून श्रेष्ठ होत

देवाचे स्मरण करतात त्यांना पुनर्जन्म वा अनेक जन्म घ्यावे लागतात; पण श्रीसद्गुरूंचे अखंड स्मरण करणारा मात्र याच जन्मीं मुक्त होतो; ‘याच देहीं याच डोळां’ तो ‘मुक्तीचा सोहळा’ अनुभवतो. म्हणूनच सद्गुरू हे देवाहून श्रेष्ठ असल्याचे श्रीकबीर यांनी म्हटले आहे.

२) श्रीसद्गुरूच आत्मज्ञानदीप प्रज्ज्वलित करू शकतात

श्रीकबीर म्हणतात की, लोकांप्रमाणे मीही वेदांच्या आधारे देवप्राप्तीसाठी प्रयत्न करत होतो व त्यामुळे त्यांच्याप्रमाणे देवप्राप्तीसाठीच्या एकमेव मार्गापासून दूर गेलो होतो, म्हणजे वाहवत वा भरकटत गेलो होतो; पण, श्रीसद्गुरूंची भेट झाली आणि त्यांनी माझ्या हातात आत्मज्ञानाचा दीप दिला. त्यांनी माझ्या हृदयात आत्मज्ञानदीप प्रज्ज्वलित केल्यामुळेच माझ्या ठिकाणी पूर्वी होता तो स्वरूपविषयक अज्ञानरूपी अंधार नाहीसा झाला व आत्मारूपी सूर्य सदोदित झाला. ‘गुरुगीतेत’ केली आहे, तशी गुरू या शब्दाची त्यांनीही व्या‘या दिली आहे. त्यांच्या त्या दोह्याचा भावानुवाद  -

‘गुकार तो तमदर्शक जाणा प्रकाशवाचक रू ।

अज्ञानतम ते ज्ञानें निरसी तयां म्हणावे गुरू ॥’

संत श्रीनामदेवांसारखे समर्थ संतही आपल्या कीर्तनांमधून, प्रवचनांमधून जगी म्हणजे लोकांच्या अंत:करणात आत्मज्ञानदीप प्रज्ज्वलित करत होते, करत असतात व करत असतील.

३) श्रीसद्गुरूसेवा : देवभेटीचा एकमेव उपाय

अनंतविश्‍वांचा निर्माता असलेल्या देवाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मदेव, अनेक देवदेवता, मुनी, मानव वगैरे सारे प्रयत्न करतात, ते थकून जातात पण त्यांना ज्याची भेट होऊ शकत नाही, त्या देवाधिदेवाची भेट श्रीसद्गुरूंची सेवा केल्याने मात्र निश्‍चित होते. श्रीसद्गुरूंनी उपदेशिल्याप्रमाणे मार्गक्रमण करणारास म्हणजे नित्यनेमाने, निष्कामभावाने, निरहंकारपणे नामयुक्त ध्यान करणारास देव भेटतो. म्हणूनच श्रीशंकरही अद्याप नामजपयुक्त ध्यान करत आहेत, असे श्रीज्ञानदेवांनीही ‘ज्ञानेश्‍वरी’त म्हटले आहे.

४) श्रीसद्गुरूशिवाय सुखशांती नाही

चौदा विद्या व चौसष्ट कला आहेत. त्या सर्व वा त्यांतील काही जरी प्राप्त असल्या तरी माणूस सुखी समाधानी होऊ व राहू शकत नाही. कारण, श्रीसद्गुरूंच्या कृपेने मिळणारे आत्मज्ञान त्याला झालेले नसते. आत्मज्ञानाशिवाय असलेल्या त्या सार्‍या विद्या व कला केवळ पैसा, संपत्ती व नावलौकिक मिळवून देणार्‍या असतात; खरी सुखशांती देणार्‍या नसतात. त्यांच्या साह्याने मृत्युचे भय हटविणारे आत्मज्ञान होऊ शकत नाही. म्हणूनच श्रीरामदासांनी त्यांना ‘पोटविद्या’ व ‘आत्मज्ञानविरहित करमणूक’ म्हणून अवमानिले आहे. श्रीसद्गुरू हे शिष्यांना आत्मज्ञानप्राप्तीसाठीची साधना शिकवितात व करवूनही घेतात. परिणामी, सत्शिष्य सुखी, समाधानी व शांत असतो व राहतो. 

५) श्रीसद्गुरू हेच महान दाता होत

श्रीसद्गुरूंचे व सत्शिष्याचे लक्षण सांगताना ‘गुरुसमान दाता व शिष्यासमान याचक नाही’ असे विधान श्रीकबीर यांनी केले आहे. त्या दोह्यातच पुढे सद्गुरू हे सत्शिष्यास त्रैलोक्याची संपत्ती दान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. ‘तिन्ही लोकांची संपत्ती सत्शिष्यास मिळते’ हे त्यांचे शब्द मोठे गूढ आहेत. स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक आहेत. ते पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत. विश्‍व ज्यांच्यापासून बनलेले आहे ती पंचमहाभूतेही मुळात, या लेखांचे सुरुवातीस सूचित केल्याप्रमाणे, अविनाशी असा आत्मा होय. अर्थात सर्व विश्‍वात सर्वत्र एक विश्‍वंभरच म्हणजे आत्मारूपी देवच भरून उरलेला आहे. ‘ज्ञानेश्‍वरी’त म्हटल्याप्रमाणे श्रीसद्गुरू कृपेमुळे तो सत्शिष्य आत्मदेवरूपी आपणच हे चराचर विश्‍व झालेलो असल्याचे अनुभवतो. तिन्ही लोकांवर जशी देवाची सत्ता व मालकी असते तशीच सत्ता व मालकी त्या विनम्र व पूर्णत: अहंभावरहित असलेल्या सत्शिष्यास प्राप्त होते. उदाहरणार्थ सर्वसंत श्रीनामदेव, श्रीतुकाराम व श्रीबहिणाबाई यांनीदेखील श्रीसद्गुरू कृपेने आपण देव झालो आहोत व ‘सर्व सत्ता आपल्या हातीं आली’ आहे, असे म्हटले आहे.

६) श्रीसद्गुरू हे ॐकारस्वरूप असतात

संत श्रीएकनाथ यांनीदेखील आपल्या अनेक अभंगांमधून श्रीसद्गुरूंचे स्वरूप व माहात्म्य वर्णिले आहे. ‘ॐकारस्वरूपा सद्गुरुसमर्था’ असे त्यांनी एका अभंगारंभी म्हटले आहे. अर्थात, श्रीसद्गुरू हे ॐकारस्वरूप म्हणजे ॐकाराचेही मूळ असतात. असे सद्गुरू म्हणजे खरे गुरू हे इतर गुरूंपासून कसे वेगळे असतात ते श्रीकबीर यांनीही स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या विद्या व कला शिकवणारे तसेच देव भेटावा म्हणून करावयाच्या प्रयत्नांबाबत उपदेश करणारे अनेक गुरू असतात. खरे तर, त्यांना स्वत:लाच आपले व देवाचे खरे स्वरूप अवगत वा ज्ञात झालेले नसते; त्यामुळे ते देवप्राप्तीसाठी स्वत:ला योग्य वाटणारे असे मंत्रतंत्रयुक्त विविध मार्ग सांगत राहतात. अर्थात, त्यांच्या व त्यांच्या शिष्यांच्याही मनात अपेक्षा, आशा व महत्त्वाकांक्षायुक्त म्हणजे सकाम भाव असतात. अशा व्यक्ती सद्वस्तुचे म्हणजे देवाचे दर्शन घडवण्यास असमर्थ असतात, ते सद्गुरू नसतात व म्हणूनच ते वंदनीय नसतात. याउलट, जे मूळ ‘शब्द’ दाखवून देऊ शकतात तेच खरे सद्गुरू म्हणून वंदनीय असतात, असे श्रीकबीर यांनी म्हटले आहे. शब्द म्हणजे ॐकार होय. आपल्या प्रत्येकाच्या देहात ॐकार वा प्रणव आहे. तो अनुभवास यावा म्हणून (‘ज्ञानेश्‍वरी’त म्हटल्याप्रमाणे) आपल्या ‘प्राणांचा प्रणव करण्याची’ रीत शिकवण्याचे सामर्थ्य ज्या श्रीसद्गुरूंच्या ठिकाणी असते, त्यांना सदैव वंदन करावे, असे श्रीकबीर यांनी म्हटले आहे. त्यांच्या त्या दोह्याचा भावानुवाद असा आहे - 

भेद गुरुगुरूत असती, भिन्न भावविचार ।

वंदावे हो त्यासी देहीं दावी जो ॐकार ॥

आपल्या गुररूंनी आपल्याला आपल्या देहातच प्रणवाचा अनुभव घ्यावयास शिकवले, अकार, उकार मकार इत्यादी ॐकाराचे वा प्रणवाचे भेद आपल्या देहातच उकलावयास म्हणजे सानुभव समजून घेण्यास शिकवले, असे संत श्रीज्ञानदेवांनीदेखील काही अभंगातून सांगितले आहे.

७) श्रीसद्गुरू हे साक्षात परब्रह्म असतात

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्‍वर: । गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥’ या श्‍लोकातून गुरूंच्या म्हणजे श्रीसद्गुरूंच्या स्वरूपाची व माहात्म्याची कल्पना येते. सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, तिचे पालन करणारा विष्णू व सृष्टीचा संहार करणारा महादेव यांनाही ज्या देवाधिदेवाने निर्माण केले आहे, त्याचे स्वरूप ‘परब्रह्म’ या शब्दाने सूचित केले आहे. हा देवाधिदेवच स्वधर्माची शिकवण देण्यासाठी अवतार घेत असतो. त्याचे ते दिव्य जन्मकर्म जाणणारे व त्याच्याशी एकरूप झालेले संतही त्याच्याबरोबर किंवा नंतर जन्म घेत असतात. अर्थात, देवाचे अवतार व संत हे स्वरूपत: परब्रह्म असतात. माणसांसारखे दिसत असले तरी ते सामान्य माणसांप्रमाणे स्वरूपाबाबत अज्ञानी नसतात, सामान्य माणसांप्रमाणे ते मायाधीन वा गुणाधीन नसतात; तर, ते मायेचे नियंते असतात, गुणातीत असतात, अखंड ज्ञानी वा सर्वज्ञ असतात. थोडक्यात, देवाप्रमाणेच संतसद्गुरू हे परब्रह्माच्या सर्वोत्तम अशा सजीव सगुण मूर्ती असतात.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

संतसद्गुरू हे ब्रह्माहून वा परब्रह्माहूनही श्रेष्ठ असतात, असे पटवून देताना समर्थ श्रीरामदास स्वामी यांचे सत्शिष्य श्रीदिनकर स्वामी यांनी ब्रह्म व सद्गुरू यांच्यातील फरक सांगितले आहेत. ते समजून घेताना ‘श्रीसद्गुरू हे साक्षात परब्रह्म असतात’ म्हणजे काय ते आपल्याला थोडे थोडे समजू लागते. म्हणून तेही नंतर पाहूयात. तर, ‘स्वानुभवदिनकर’ या ग्रंथात ते म्हणतात,

८) परब्रह्माहुनी श्रेष्ठ। श्रीसद्गुरू समर्थ ॥

श्रीसद्गुरू म्हणजे सर्वेश्‍वर होय. त्यांच्या ठायी असलेल्या गुणांना मर्यादा ती कशी असू शकेल? तथापि जगाचा उद्धार करण्यासाठी ते मनुष्यवेष धारण करतात. त्यांची कृपादृष्टी झाली की, शरणागत सत्शिष्य ब्रह्मरूप होऊन सृष्टीत वावरू लागतो; आकारास येणे व निराकार होणे या गोष्टी त्याच्यासाठी उरलेल्या नसतात; कारण, त्या समूळ मिथ्या आहेत, असे तो अनुभवत असतो. श्रीसद्गुरूंची प्रकृती मानुषी म्हणजे माणसासारखी दिसत असली तरी त्यांच्या ठिकाणी अमानुष म्हणजे अनंत, अमर्याद सामर्थ्य असते. त्यांच्या केवळ कृपाकटाक्षामुळे जीवास ब्रह्मरूप प्राप्त होते. ब्रह्मसाक्षात्कारी असे ते महापुरुष असतात, स्वयंप्रकाश असे ते साक्षात अवतार असतात, त्यांच्या वाणीद्वारे स्वत: जगदीश अध्यात्माचे सारासार बोललेला असतो व बोलत असतो. त्यांचे बोलणे हे पूर्णत: प्रचीतियुक्त, यथार्थ स्वानुभवयुक्त असते; आत्मानुभवसंपन्न असे ते सर्व शास्त्रांचा अर्थ स्थापन करत असतात व त्या अर्थांचे शिष्यांच्या अंत:करणात उत्थापनही करत असतात (अर्थात त्याप्रमाणे सत्शिष्यांना अनुभव येतो व त्याप्रमाणे ते आचरणही करू लागतात). त्यांची वाणी सुगम व शुद्ध व्याकरणतात्पर्याची खाण असते, त्यांच्या स्वाभाविक चर्चांमधून परम पदांची श्रेणी सहजपणे व्यक्त होत असते. (अर्थात, त्यांच्या सहज चर्चेमधून शिष्यांना परमपदप्राप्तीपर्यंत करावयाच्या प्रगतीचे टप्पे समजून येत असतात). कर्मकांड, उपासनाकांड व ज्ञानकांड ही अतिप्रचंड अशी तीन कांडे (प्रकरणे) होत; पण हे पूर्वपक्ष आहेत असा निवाडा करून म्हणजे ही तिन्ही कांडे फार अलीकडची असून शिष्यांनी त्यांच्याही पलीकडे जाऊन जी परमपदप्राप्ती करून घ्यावयाची असते त्याबाबतचा सिद्धान्त ते स्थापन करतात म्हणजे शिष्यांना त्याबाबतचा निस्संदिग्ध बोध करून देतात. श्रीसद्गुरू हे सदैव परब्रह्मरूप असतात किंवा या चराचराचे ते दैवच म्हणजे भविष्यच असतात (म्हणूनच, उदा. ‘सद्गुरूनाम ठिकाना है’, असे सन्मार्गदर्शक विधान संत श्रीकबीर यांनी करून ठेवले आहे.); शरण आलेल्याचे ते गौरव असतात म्हणजे त्यांच्या कृपाप्रसादाने प्राप्त करून घ्यावयाचे असे ते सर्वश्रेष्ठ गौरवास्पद स्थान असतात.

९) परब्रह्म व श्रीसद्गुरू यांच्यातील फरक

मानवी मनाच्या मर्यादा लक्षात घेऊन देवानेच गुरु-शिष्य परंपरा सुरू करून आजपर्यंत अबाधित ठेवली आहे. यामागील कारण परब्रह्म व श्रीसद्गुरू यांच्यातील फरक -

ब्रह्माला स्पर्श करता येत नाही म्हणजे ते स्पर्शाने ठाऊक होत नाही; श्रीसद्गुरूंना मात्र दोन्ही हातांनी आलिंगन देता येते; म्हणून ब्रह्मास पहावे असे ज्यास वाटत असेल त्याने श्रीसद्गुरूंना अवलोकावे, त्यांचेकडे मोठ्या आदराने, परम सद्भावयुक्त होऊन पहावे. ब्रह्मास पाहू गेले असता परादि चारी वाणी निवर्ततात म्हणजे या वाणींची हालचाल बंद पडते; याउलट श्रीसद्गुरूंची स्तुती, प्रशंसा वाणीने करता येते, श्रीसद्गुरूंशी प्रेमप्रीतियुक्त असा सुखसंवाद मोठ्या आनंदाने करता येतो. ब्रह्मास पाहू गेलेला भक्तजीव ब्रह्मच होऊन जातो. त्यामुळे ब्रह्माची भक्ती करिता येत नाही; याउलट, श्रीगुरूंचे नाना प्रकारे भजन करता येते. ब्रह्मस्वरूपीं काही श्रवण करण्याची सोय (परिस्थिती) उरत नसते; याउलट, श्रीसद्गुरूंचे वाक्य सदैव कानीं पडत असते, (त्यांची प्रवचने आपण ऐकू शकतो). ब्रह्मस्वरूप झाल्यावर कथा कीर्तन करता येत नाही; याउलट श्रीसद्गुरूंच्या माहात्म्याबाबत अनेक उद्बोधक गोष्टी सांगता येतात तसेच त्यांची कीर्तीही गाता व सांगता येते. ब्रह्मरूप झाल्यावर स्मरण व चिंतन करता येत नाही; याउलट, श्रीसद्गुरूंचे सदैव स्मरण करता येते. ब्रह्मस्वरूपीं पादसेवनभक्ती घडत नाही; याउलट श्रीगुरूंची पाद्यपूजा अभिव्यक्त होते. अर्चनवंदनादि भक्तिप्रकारयुक्ती ब्रह्मस्वरूपी सर्वथा चालत नाहीत. चतुर्विध अन्नादि खाद्य नैवेद्य तसेच आपल्या आवडीप्रमाणे उत्तम पक्वान्ने श्रीगुरूंकडून अंगिकारिली वा स्वीकारिली जातात.

अशा प्रकारे ब्रह्माहून श्रीगुरू हे अनंत गुणांनी श्रेष्ठभावयुक्त असल्याचा प्रत्यय येत असतो. शिष्याने कायावाचामने श्रीगुरूंना शरण जावे म्हणजे मग श्रीगुरू कृपा करतात व त्यास ब्रह्मानुभव घडतो. श्रीगुरूंचा हस्त शिष्याच्या मस्तकी पडतो किंवा श्रीगुरू जेव्हा आपला हात शिष्याच्या मस्तकी ठेवतात तेव्हा त्याच्या अष्ट देहांचा निरास होतो व ते ‘तत्वमसि’, ‘अयमात्मा ब्रह्म’ आदि महावाक्य उपदेश करतात व शिष्यास आपण ब्रह्मच असल्याचा अनुभव घडतो. पण तोही अनुभव तेव्हाच घडतो, जेव्हा श्रीगुरूंची पूर्ण कृपा होते आणि शिष्य श्रीगुरूंच्या उपदेशावर पूर्ण विश्‍वास ठेवून साधनारत राहिलेला असतो.

म्हणून परब्रह्माहूनही अनंतपटीने श्रीसद्गुरू समर्थ वा श्रेष्ठ आहेत, असे म्हणणे यथार्थ होय. संतसज्जनांनी माझ्या या वचनाला कृपया दूषण देऊ नये, ही विनंती. कारण, पहा की ब्रह्मासी सख्य कसे बरे करता येईल? श्रीसद्गुरुंसी मात्र हितगुज करता येते. आपला देह श्रीगुरुचरणीं समर्पित करून आत्मनिवेदनही करता येते. अशा प्रकारे नवविधप्रकारे श्रीसद्गुरूंची पूजाअर्चा करता येते की, जी ब्रह्मस्वरूपी करता येत नाही. म्हणूनच ब्रह्माहून श्रीगुरू अनंत गुणांनी श्रेष्ठ आहेत, (असे विधान मी केले आहे.) माया, जीव, ईश्‍वर इत्यादींचा प्रभव कसा होतो त्याचा किंवा परब्रह्माचा अनुभव श्रीगुरूंच्या मुखातून निघणार्‍या वाणीद्वारेच शिष्यास येत असतो. पाहू जाता, ब्रह्म हे केवळ निर्गुण होय तर सद्गुरू हे ‘सगुण असोनि निर्गुण’ असतात. श्रीसद्गुरू वाच्यांश व लक्ष्यांश यांच्यात असल्यासारखे भासतात म्हणजे यांचा वापर ते करत असतात, पण त्याहूनही ते संपूर्णत: वेगळे असतात. श्रीसद्गुरू हे सुखसाम्राज्य सोहळा असतात तर ब्रह्म हे सुखातीत चित्कळा असते; म्हणून ब्रह्माहून अनंत गुणांनी श्रीसद्गुरू हे आगळे असतात. ब्रह्म हे नामरूपकर्मावेगळे असते तर संत सद्गुरू पंचविध त्रिपुटीमाजी असूनही निराळे (नामरूपकर्मातीत) असतात.

अशा प्रकारे, संत, सज्जन व सद्गुरू हे सर्वथैव मूर्तिमंत परब्रह्म असतात. (टीप : हा ‘श्रीस्वानुभवदिनकर, कलाप ४, किरण ३मधील’ काही ओव्यांचा भावानुवाद आहे.)

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 05 July 2019

नमस्कार प्राध्यापक विजय बाणकर! अतिशय सुरेख लेख आहे. लेख वाचून सद्गुरूंचे चरण कवळायची इच्छा होते. लेखानिमित्त धन्यवाद. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......