अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वी काही तास आधीच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याची शिफारस केली होती. रिझर्व्ह बॅंक आणि पंतप्रधानांनी निवडलेल्या अधिकाऱ्यांची टीम नोटाबंदीच्या तयारीसाठी काही महिने अगोदरच कामाला लागली होती, परंतु नोटाबंदी लागू करण्यासाठी आरबीआयची औपचारिक परवानगी आवश्यक असते. ती आठ नोव्हेंबरला मिळाली. आरबीआयने या घोषणेपूर्वीच साडे चार लाख रुपये किमतीच्या दोन हजाराच्या नोटा छापून ठेवलेल्या होत्या.
रिझर्व्ह बँकेची 'परवानगी' हा निव्वळ एक उपचार असतो. आता परवानगी द्या, असं सरकारने सांगितलं की रिझर्व्ह बँक हाताला हात लावून 'मम' म्हणते. त्यामुळे, हा निर्णय आधीपासूनच हितसंबंधियांना कसा ठाऊक होता, याचा उलगडा या बातमीतून होतो. त्याचप्रमाणे नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांत, अनेक ठिकाणी दोन हजाराच्या नोटांचे गठ्ठे हातात घेतलेल्या माणसांचे फोटो आणि गठ्ठ्यांचे फोटो प्रसृत झाले होते, त्याचंही गुपित उलगडून जातं.
………………………..
२. समाजात काय चालू आहे हे कळण्यासाठी नेत्याला घरप्रपंच असणे गरजेचे असते. समाजात लोक त्या नेत्याविषयी काय बोलतात हे घरचे लोक सांगू शकतात. पण देशाच्या पंतप्रधानांना घर प्रपंचच नसल्याने त्यांना समाजात काय चालू आहे हे कळत नाही. : अजित पवार
अजितदादा, तुम्ही घरप्रपंचवाले. तुम्हालाही घरचे काही ना काही सांगत असतील. तुम्ही ते फारसं मनावर घेतलेलं दिसलंच नाही कधी. शिवाय ज्याला घरप्रपंच नसतो, त्याला गोतावळा नसतो, असं समजू नका. जिव्हाळ्याची नाती सगळीकडे असतात.
………………………..
३. पासपोर्टच्या नव्या नियमानुसार तथाकथित साधू आणि संन्याशांना त्यांच्या जैविक पालकांऐवजी आध्यात्मिक गुरूंच्या नावाचा उल्लेख करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुळात एखादा माणूस साधुसंतसंन्यासी आहे, हे कसं ठरवणार? याचा फायदा दहशतवाद्यांनी ओळख लपवण्यासाठी घेतला तर किती नाचक्की होईल? कोणत्याही धर्माचे हे नसते चोचले कायद्याच्या राज्यात पुरवताच कामा नयेत. उदया एखादा जटाजूटधारी गांजेकस माझा बाप, पालक, प्रतिपालक फक्त परमेश्वरच आहे, असं सांगायला लागला, तर काय तसं लिहिणार का पासपोर्टवर?
…………………………………
४. काळ्यापैशाच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर सुरेश अडवाणी यांचा समावेश आहे. डॉक्टर अडवाणी औरंगाबादमधील सीआईआईजीएमए रुग्णालयात कार्यरत आहेत. कर्करोगावरील उपचारासाठी अडवाणी यांची ख्याती आहे.
पद्मश्री, पद्मभूषण किंवा भारतरत्न हे पुरस्कार त्या त्या माणसाच्या एकेका क्षेत्रातल्या उत्तुंग कामगिरीसाठी किंवा त्या त्या काळातल्या सत्ताधीशांसोबतच्या जवळिकीची बक्षिसी, त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणून दिले जातात. ती त्यांच्या व्यक्तिगत सचोटीची किंवा चारित्र्याची प्रमाणपत्रं आहेत, असं मानण्याचं कारण नाही.
…………………………………
५. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गुरुवारी अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आपल्याला याआधीच राजीनामा द्यायचा होता. मात्र पंतप्रधान मोदींनी राजीनामा न देण्याची विनंती केल्याने आपण थांबलो, असे जंग यांनी सांगितले.
जंग यांच्यावर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचं नाक कापणाऱ्या आम आदमी पक्षाविरुद्ध अधर्मयुद्ध लढण्याची जबाबदारी आहे. ती जंग अजून संपलेली नाही, त्यामुळे खुर्चीला जंग म्हणजे गंज लागेपर्यंत त्यांनी ती सोडू नये, असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे. त्यामुळेच आताही त्यांचा राजीनामा फेटाळला गेला आहे. काँग्रेसने ठेवलेल्या काठीच्या आधारे परस्पर आप ठेचण्याची ही व्यवस्था आहे.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment