मुले तुमची संपत्ती, तुमच्या स्वप्नपूर्तीची साधने, तुमच्या हातातील खेळणे नाहीत आणि कुंभाराच्या चाकावरील ओली मातीही नाहीत!
पडघम - सांस्कृतिक
शिल्पा कांबळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 03 July 2019
  • पडघम सांस्कृतिक मुलं हिंसा मारहाण पालक शाळा

“Children are sick of being called ‘the future’. They want to enjoy their childhoods, free of violence, now”.

-  Paulo Pinheiro, 2007, UN General Assembly

जगभरात जशी लहान मुलांना त्यांच्या पालकांनी मारण्याची पंरपरा आहे, तशीच परंपरा भारतातही आहे. ‘चाईल्ड रेअरिंग’ (child rearing) हा शब्दच ‘अ‍ॅनिमल रेअरिंग’ (animal rearing) या शब्दाच्या जवळ जाणारा आहे. प्राण्यांचं ज्या प्रकारे नाळ ठोकून किंवा साखळदंडात बंद करून रेअरिंग केलं जातं, त्याच प्रकारे मानवी इतिहासात मुलांनाही वाढवलं गेलंय. या वाढीसाठी कित्येकदा  शारिरीक व मानसिक हिंसेचा वापर पालकांकडून केला जातो. मुलांना मारणं ही त्यांना ‘वळण’ लावण्यासाठीची योग्य कृती समजली जाते. याच प्रकारे मुलांना वाढवणं पालकांचं कर्तव्य मानलं जातं. त्यामुळे लहानपणी आपण सगळ्यांनीच या ना त्या प्रकारे पालकांचा मार खाल्लेला असतो. प्रत्येक जातवर्गात मुलांना मारण्याचं प्रमाण कमी-जास्त असू असतं. दलित कुटुंबांत हे प्रमाण दारिद्रयामुळे व आजूबाजूच्या हिंसक परिस्थितीमुळे जास्त असतं.

माझ्या आईला ती लहान असताना पोलिओ झाला होता. त्यावेळी तिला सारखा ताप यायचा. त्या तापात तिला उभं राहता यायचं नाही. त्यामुळे तिची आई तिला आंघोळ घालत असताना ती सारखी खाली बसायची. ती खाली बसली की, तिची आई तिला पाठीत धपाटा देऊन उभी  करायची. शेवटी डॉक्टरांनी निदान केलं की, ही मुलगी अपंग आहे. त्यामुळे ती उभी राहत नाही. डॉक्टरांच्या या निदानामुळे मग माझ्या आईचा मार बंद झाला.

अज्ञान, असुविधा व घरातील व्यसनाधीनतेमुळे कुटुंबातील स्त्रीवर जो अतिरिक्त ताण येतो, या ताणाचं विरेचन ती तिची ज्यांच्यावर सत्ता असते त्या मुलांना मारून कमी करते. वरील उदाहरण माझ्या अशिक्षित घरातील आहे. परंतु ज्ञानाची व सुबत्तेची परंपरा असणाऱ्या उच्चवर्णीय घरातही पालक त्यांच्या मुलांवर हिंसा करतात. त्याची अनेक उदाहरणं आहेत.

आपल्या भावासोबत त्यांच्या वडिलांनी केलेली हिंसा एक मुलानं स्वतः सांगितली होती. त्या उच्चजातीय, उच्चवर्गीय प्राध्यापक वडिलांनी त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाला तो जास्त वेळ खेळला म्हणून दिवसभर कपाटात कोंडून ठेवलं होतं. या अघोरी शिक्षेचा त्या मुलानं भयंकर धसका घेतला. त्यानं आपल्या धाकट्या भावाला विचारलं की, मी असं काय केलं की, बाबांनी मला ही शिक्षा दिली? त्या मुलाचे सुशिक्षित वडील व्यसनी होते. त्या मोठ्या मुलाला वडिलांचा इतका जाच होता की, तो मुलगा काही वर्षांनी परांगदा झाला. तो जिवंत आहे की, मेला याचीही माहिती आज त्याच्या कुटुंबाला नाही.

तर अशा प्रकारे बालपणी घडलेली भावनिक हिंसा एखाद्या मुलाला त्याच्या कुटुंबापासून अलग करू शकते. तो घरातल्या घरातच ‘होम अलोन’ होतो.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

हिंसा फक्त शारिरीकच असते असं नाही; ती भावनिक, वाचिक व मानसिकही असते. या सर्व प्रकारच्या हिंसेचे मुलांच्या मनावर भयानक परिणाम होतात. ‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं’ हे आपण म्हणतो, पण मुलांना आपल्या हातातली पायपुसणी म्हणून वापरतो. आपण मुलांना घरात नाही तर गॅलरीतील कुंडीत वाढवत असतो. त्या कुंडीत मुलांना पाय पसरायला, आकाश कवेत घ्यायला जागा नसते, म्हणून आपण त्यांच्या इच्छा-आकांक्षांना ट्रिम करून त्यांचा बोन्साय करतो.

मुलांना आपण कशाकशासाठी मारतो?

मुलगा\मुलगी सगळ्यांसमोर कपडे काढते म्हणून

उलट बोलतात म्हणून

शाळेत जात नाहीत म्हणून

क्लासमध्ये जात नाहीत म्हणून

अभ्यास करत नाहीत म्हणून

कर्सिव्ह लिहिता येत नाही म्हणून

ऐकत नाहीत म्हणून

खोटं बोलतात म्हणून

अशा अनेक कारणांसाठी मुलांचा छळ केला जातो. आपल्या कल्पनेत जशी आदर्शवादी मुलं असतात, तशी वास्तवात आपली मुलं नसतात म्हणूनही आपण त्यांना मारतो. त्यांच्याशी अबोला धरतो, धाक दाखवतो, दूषणं देतो.

प्रत्यक्ष\अप्रत्यक्ष हिंसा मुलांच्या आयुष्यात कधीपासून सुरू होऊ शकते? माझी आई सांगते की, मी तीन दिवसांची असताना तिनं मला चापट मारली होती. त्या मागचं तिचं रॅशनल उत्तर असं आहे की, तिचं सिझर झालं होतं. तिच्या पोटात दोन-तीन दिवसांपासून अन्न नव्हतं. तिनं मला मांडीवरून खाली ठेवून हातात ताट घेतलं की, मी रडायला सुरुवात करायचे. तिनं ताट बाजूला ठेवून मला परत मांडीवर घेतलं की, मी परत शांत बसायचे. पण तिच्या पोटात भूकेचा आगडोंब कोसळलेला होता. शेवटी तिनं मला खाली ठेवलं आणि मी रडू लागताच मला चूप करण्यासाठी चापट दिली. असं करताच मी शांत बसले व मग ती निवांत जेवू शकली.

ज्या बाळाला आईच्या कुशीतून दूर केल्यास असुरक्षितता वाटते आणि तो त्या रडण्यातून ‘मला तू घे, मला घे’ असं सांगू पाहतो, त्या बाळाला चापट देऊन समज देण्याची माझ्या जन्मदात्रीची ही कृती क्रूर असली तरी ती ज्या परंपरेचे संस्कार घेऊन वाढली, त्या परंपरेचाच तो परिपाक आहे, असं मला वाटतं. (आंद्रे अगासी या जगप्रसिद्ध खेळाडूला त्याच्या वडिलांनी टेनिस स्टार बनवण्यासाठी निर्दयी पद्धतीनं वाढवलं, हे त्यानं त्याच्या ‘ओपन’ (open) या आत्मचरित्रात बेधडकपणे सांगितलं आहे!)

मुलांना चापट देणं, त्यांच्या कानाखाली देणं, त्यांचे कान ओढणं, हात पिरगाळणं या सगळ्या कृती मुलांसाठी अतिशय अपमानजनक असतात. एक मुलगी ट्रेनमध्ये तोंडात बोट घालते म्हणून तिच्या आईनं तिच्या थाडकन थोबाडीत दिली होती. त्या वेळी त्या बाईनं आधुनिक पेहराव- जीन्स-टीशर्ट वगैरे - घातला होता. परंतु बालसंगोपनाच्या दृष्टीनं ती इतकी अडाणी होती की, तिथंच, त्या ट्रेनमध्ये मला त्या बाईचा आगाऊपणानं क्लास घ्यावा लागला होता!

गेल्या वर्षीचा असाच एक अंगावर येणारा प्रसंग. माझ्या मुलाच्या शाळेत पालकसभा होती. वर्गशिक्षकांनी मुलांचे पेपर पालकांना तपासण्यासाठी दिले होते. एक चुणचुणीत मुलगा त्याच्या आईसमोर अपराध्यासारखा उभा होता. ती आई वाघिणीसारखी त्याच्या एक महिन्यापूर्वी होऊन गेलेल्या पेपरातील ओळ न ओळ तपासत होती. त्या मुलाला प्रत्येक पेपरमध्ये चाळीसपैकी ३५ च्या वर मार्क होते हे विशेष. तर त्या मुलानं उत्तरपत्रिकेत काहीतरी चुकीचं लिहिलं होतं. तिनं सटकन त्या इवल्याशा मुलाच्या कानाखाली दिली. माझं काळीज हललं. माझा मुलगाही केविलवाण्या नजरेनं त्याच्या वर्गमित्राकडे पाहू लागला.

मग या प्रसंगातही मी गप्प बसले नाही. पालकसभा झाल्यानंतर त्या बाईची मुद्दाम ओळख काढली. तिच्याबरोबर काही वेळ घालवला. तिनं जे केलं ते अयोग्य आहे, याची तिला जाणीव करून दिली. त्या बाईनंही उमद्या मनानं कबूल केलं की, तिचं रागावर नियंत्रण राहत नाही. तिच्या सासरच्या मंडळींनाही ही तिची समस्या माहीत आहे. मी तिला माझा नंबर दिला की, या विषयावर कधी काही शेअर करावंसं वाटलं तर मोकळेपणानं फोन करा असं सांगितलं. फक्त निघताना मी तिला प्रश्न केला, ‘तुमची आईही तुम्हाला मारायची का हो?’ तिनं क्षणार्धात उत्तर दिलं- की, ‘हो, माझी आईही माझ्यासारखीच तापट होती!’

मारहाणीची ही सायकल (circle of violence) अशी वर्तुळाकार गतीनं फिरत असते. तुमच्या लहानपणी जर तुम्ही कोणत्याही पद्धतीची हिंसा अनुभवली असेल तर तुम्ही पालक झाल्यावर त्या प्रकारची हिंसा तुमच्या नकळत आपोआप करू लागता. हिंसेनं एक पिढी घडली असेल तर दुसरी पिढीही त्याच प्रकारच्या वातावरणात घडते. जसं प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं, तसंच जर तुम्ही मारहाण दिली तर मारहाणच वाढेल!

लहान मुलांवर पालकांकडून होणाऱ्या या अत्याचाराचे परिणाम मुलं मोठी झाल्यावर अचानक नष्ट होत नाहीत. पालकांच्या या क्रौर्याचा परिणाम त्यांच्या प्रौढ वयातही कायम राहतो. बालपणात असुरक्षितता अनुभवलेली मुलं त्यांच्या कळत्या वयातही मानसिकदृष्ट्या अनारोगी असतात. त्यांच्यात नैराश्य, आत्महत्या करण्याची इच्छा, निद्रानाश, आत्मविश्वासाची कमतरता, आक्रमक स्वभाव अशा अनेक मानसिक समस्या दिसतात.

पालकांनी, घरातल्या व्यक्तींनी केलेली इजा ही मुलांसाठी खूप घातक असते. कारण हेच घरातील पालक मुलांवर प्रेमही करत असतात. प्रेम व हिंसा या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीकडून अनुभवल्यामुळे मुलांमध्ये गोंधळ निर्माण होतो, आणि हिंसेला लेजिटीमटी मिळते. हीच व्यक्ती पुढे तिच्या प्रिय व्यक्तीला ‘ठिक’ करण्यासाठी हिंसेचा वापर करू शकते आणि ती व्यक्ती ‘ठिक’ झाली की, परत तिच्यावर प्रेमही करू शकते!

माझ्या ‘नऊ चाळीसची लोकल’ या कथासंग्रहात ‘किटी, आय लव यू’ या कथेत मी अशाच एका मुलीची गोष्ट सांगितली आहे. या मुलीकडे बॅटरीवर चालणारी एक सुंदर बाहुली आहे. अशी बाहुली की, जिच्या गालावर चापट मारली की, ती ‘आय लव यू’ असं बोलते. बालवयातील हिंसा व नवऱ्याकडून होणारी हिंसा यांचा त्या कथेतील नायिकेनं आपसूक केलेला स्वीकार, हे वास्तव दाखवण्यासाठी त्या कथेत मी बाहुलीचं प्रतीक योजलं आहे.

मुलांना वाढवताना त्यांच्यावर हिंसा करणाऱ्या पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की, मुलं ही तुमची संपत्ती नाहीत, तुमच्या स्वप्नपूर्तीची साधनंही नाहीत. मुले तुमच्या हातातील खेळणंही नाहीत. मुलं कुंभाराच्या चाकावरील ओली मातीही नाहीत. ती स्वयंभू आहेत. त्यांना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मुलं असलीच तर ती देवाघरची फुलं आहेत. नाजूक, सुंदर, मांगल्य असलेली फुलं! ती तुम्हांला आनंद देऊ शकतात, पण त्यासाठी तुम्ही त्या फुलांच्या पाकळ्यावर प्रेम केलं पाहिजे. त्यांना मोठं करण्यासाठी तुम्ही एकाच शस्त्राचा वापर करायला हवा—आणि तो म्हणजे प्रेमाचा.

महान साहित्यिक खलिल जिब्रान यांनी मुलांचं आणि पालकांचं नातं याविषयी लिहिलंय-

“Your children are not your children.
They are sons and daughters of Life's longing for itself. 
They come through you but not from you.
And though they are with you yet they belong not to you.

You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For thir souls dwell in the house of tomorrow, which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them, but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.
You are the bows from which your children as living arrows are sent forth.
The archer sees the make upon the path of the infinite, and He bends you with His might that His arrows may go swift and far.
Let your bending in the archer's hand be for gladness.
For even as He loves the arrow that flies, so He also loves the bow that is stable.” 
............................................................................................................................................................

लेखिका शिल्पा कांबळे यांची ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी आणि ‘नऊ चाळीसची लोकल’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. 

shilpasahirpravin@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ranjeet Bayas

Thu , 04 July 2019

आपण आजच्या so called well educated समाजाच खर रुप समोर ठेवलय... अप्रतिम साजेस अस लिखाण केल.


Alka Gadgil

Thu , 04 July 2019

शिल्पा, कुठे आहे बालहिंसा? असं म्हणत हे अत्याचार मोडीत काढणार्याना खणखणीत चपराक आहे ही, thanks


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......