वर्णाभिमान, आश्रमाभिमान, जातीचा अभिमान हे सारे वृत्ती असल्याने ती संथ करूनच कोणत्याही जातीची व्यक्ती संत होऊ शकते!
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • पंढरपूरचा श्रीविठ्ठल
  • Tue , 02 July 2019
  • पडघम सांस्कृतिक विठोबा Vitthoba विठ्ठल Vitthal आषाढी एकादशी Ashadhi Ekadashi पंढरपूर वारी PANDHARPUR WARI

आत्मज्ञानप्राप्ती व तज्जन्य मुक्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे जे मानतात आणि स्वत:ला विशिष्ट जातीचे म्हणवतात त्यांच्यासाठी संत श्रीसेना महाराज यांचा पुढील अभंग मार्गदर्शक आहे -

“न्हावीयाचे वंशीं। जन्म दिला ऋषीकेशीं ।

प्रतिपाळावे धर्मासी । व्यवहारासी न सांडी ॥

ऐका स्वधर्मविचार। धंदा करी दोन प्रहर ।

सांगितले साचार । पुराणांतरीं ऐसे हे ॥

करूनिया स्नान । मुखीं जपे नारायण ।

मागुती जाण । शिवू नये धोकटी ॥

ऐसे जे कां न मानिती । ते जाती नरकाप्रती ।

सकळ पूर्वजां बुडविती । शास्त्रसंमतीं ऐसे हे ॥

शिरीं पाळावे आज्ञेसी । शरण जावे विठोबासी ।

सेना म्हणे त्यासी । ऋषीकेशी सांभाळी ॥”

जातिनिष्ठ स्वधर्माचरणाबाबत प्राथमिक माहिती -

संत श्रीसेनामहाराजकृत हा अभंग प्रातिनिधीक आहे. अर्थात, तो इतर सर्व जातींच्या मानवांनाही मार्गदर्शक आहे. यातून जातिनिष्ठ स्वधर्माचरणाबाबत पुढील प्राथमिक माहिती मिळते -

१) विशिष्ट वंशात म्हणजे जातीत जन्म देणे हे देवाच्या हातात आहे.

२) आपल्या जातीचा व्यवसाय करणे हा स्वधर्म होय.

३) दोन प्रहर म्हणजे दिवसाचे सहा तास व्यवसाय करावा.

४) दैनंदिन व्यवसायाचे सहा तास संपले की, कर्तव्यपूर्ती झाली या भावनेने आंघोळ करावी. त्या दिवशी पुन्हा व्यवसायाला शिवू नये. अर्थात, चरितार्थ चालवण्यापुरताच व्यवसाय करावा; अधिक लाभासाठी व्यवसाय करू नये.

५) त्या दिवसाचा उरलेला वेळ देवाचा नामजप, भक्ती वगैरे धर्मसाधन करण्यासाठी व्यतीत करावा.

६) असे न वागता जे अधिकाधिक व्यवसाय करून धन मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात, तसेच मोक्षाचे साधन असलेले नामस्मरण वगैरे करत नाहीत, ते व त्यांचे पूर्वज जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतात.

‘शुकाख्याना’तील समान वा पुष्टीदायक अभिप्राय

स्वधर्मापासून भ्रष्ट झाल्यामुळे, अनीतीने, अधर्माने व्यवसाय केल्यामुळे म्हणजे पापाचरणामुळे अधोगती होते व अनेक जातीत, पशुपक्ष्यादि योनीतही जन्म-मरण-यातना भोगाव्या लागतात, असे संत श्रीनामदेवांनीदेखील ‘शुकाख्याना’त म्हटले आहे. त्याचा भावार्थ असा आहे -

श्रीशुकदेव म्हणतात, “मी पहिल्यांदा ब्राह्मणकुळात जन्मलो होतो. तेव्हा त्रिकाळ संध्यास्नान व अतिथींचे आगतस्वागत केले नाही, देवधर्म केला नाही, अनेक मोहपाशात अडकलो व ब्राह्मणेतरांची कर्मे करू लागलो. या पापामुळे मी हीन यातीत जन्माला गेलो. शूद्र जातीत जन्मलो, शेती वगैरे केली पण देवाची भक्ती मात्र केली नाही. त्यावेळी ज्या राज्यात होतो त्याच्या राजासाठी युद्धात माझे प्राण खर्ची पडले. या सुकृतामुळे मला राजकुळात जन्म मिळाला. परंतु तिथेही मी प्रजेचा छळ केला, राजसभेस जाण्याचे कर्तव्य पार पाडले नाही, संपत्ती मिळवली, स्वकार्य मात्र केले नाही, देवपूजन केले नाही, पवित्र ब्राह्मणांवर रागावलो, त्यांची जमीन वगैरे हिरावून घेतली. या पातकांमुळे मला पुन्हा वैश्याचा जन्म मिळाला. द्रव्य मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकांची लुबाडणूक केली. नंतर पकडला गेलो, शिक्षा झाली. त्यानंतर ‘मनुष्य अवतारामाझारी’ रजक, चर्मक, कुलाळ, नापिक, चांडाळ, अनामिक, तेली, तांबोळी, सुतार, गुरव, साळी, विणकर, शिंपी, खाटिक, धनगर, बुधले या अठरापगड जातीत जन्मलो.”

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

स्वधर्माचरण व परधर्माचरण

यावरून संत श्रीसेना यांना जातिनिष्ठ स्वधर्माचे जे स्वरूप अभिप्रेत आहे, ते तेच श्रीनामदेवांनाही अभिप्रेत आहे, असे स्पष्ट होते. देवाला स्मरत आपल्या जातीचा व्यवसाय प्रामाणिकपणे दोन प्रहर करणे म्हणजे जातिनिष्ठ स्वधर्माचरण करणे होय; याउलट, द्रव्यार्जनाच्या लालसेपोटी जातीव्यवसायाचा अतिरेक झाला आणि परिणामी देवाचे विस्मरण झाले तर तेच कर्म अधर्म बनते, ते पिंडपालनरूप भयावह म्हणजे जन्मरमण परंपरेस कारणीभूत होणारे परधर्माचरण ठरते.

चरितार्थ चालवण्यापुरता जातीचा व्यवसाय केला की किंवा करतानाही देवाचे स्मरण करावयाचे असते. अर्थात, प्रपंच किंवा संसार करत असतानाही देवरूपी परम अर्थासाठीची साधना चालू ठेवायची असते.

संतकृत स्वधर्माचरणाचे स्वरूप

आपला जातीव्यवसाय करत असतानाही विविध जातीत जन्मलेल्या संतांचा ‘नामजपरूपी यज्ञ’ अखंडपणे चालू होता. त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन कर्मातही ईश्वरभक्तीच्या लक्षणांचा, देवसान्निध्याचा, विश्वात्मक देवाचा, चराचरव्यापक ब्रह्माचा प्रत्यय येत होता.

जातिनिष्ठस्वधर्माचरणाचे हे व्यावहारिक किंवा दृश्य स्वरूप उदाहरणार्थ श्रीनरहरी, श्रीनामदेव, श्रीसावता व श्रीसेना यांच्या ज्या अभंगांमधून स्पष्ट होते त्यांचा भावार्थ असा आहे -

१) संत श्रीनरहरी महाराज

देवा मी तुझा सोनार असून तुझ्या नामाचा व्यवहाय करत आहे. देह ही बागेसरी व अंतरात्मा हे सोने होय. सत्त्व, रज व तम या तीन गुणांची मूस करून (म्हणजे त्रिगुणांच्या आधीन न होता त्यांचेकडे साक्षीभावाने पाहात) तिच्यात ‘मी ब्रह्म आहे’ हा सद्भावरूपी रस ओतला आहे. ‘मी जीव आहे’ व ‘मी शिव आहे’, असेही मी अनुभवले. पण जीवभाव व शिवभाव हे दोन्ही भाव फुंकून म्हणजे सोडून देऊन ‘मी सोऽहं आत्मा’ हा सद्भाव अंत:करणात अहोरात्र जागवत आहे. मी नाशिवंत देह नसून मी अविनाशी आत्मा आहे, हा सदसद्विवेक होय. या विवेकाने मी अंत:करणातील कामक्रोधांचा चुरा केला आहे. मन व बुद्धी ही जणू जिची दोन पाती आहेत, त्या कात्रीने रामनामरूपी सोने मी नकळत चोरून ठेवतो. (रामनाम म्हणजे ब्रह्म होय. ते चर्मदृष्टीला गोचर नाही. ते केवळ ज्ञानदृष्टीला दिसत असते. ते मन व बुद्धीरूपी कात्रीतूनही बाजूला पडलेले असते. म्हणून, ते चोरून ठेवले आहे, असे म्हटले आहे.) ते ज्ञानरूपी ताजव्याच्या (तराजूच्या) सो म्हणजे आत्मा व हं म्हणजे जीव या दोन पारड्यात ठेवून ती समान आहेत आहेत, असे मी त्या सोन्यास जोखीत म्हणजे अनुभवत आहे. अर्थात, जीव व आत्मा हे स्वरूपत: समान आहेत, हा भाव मी जपत आहे. या भावाने मिळवलेले रामनामरूपी धन व सर्व साहित्य असलेल्या देहरूपी पोतडीचा भावरूपी भार ध्यानरूपी खांद्यावर घेऊन मी भवसागराच्या पैलतीरावर उतरलो (देवाच्या अखंड सान्निध्यात) आहे. अशा प्रकारे मी नरहरी सोनार आत्मारूपी हरीचा दास असून त्याचे रात्रंदिवस भजन करत आहे.

२) संत श्रीनामदेव महाराज

शिंप्याचे कुळात माझा जन्म झाला आहे; परंतु, माझ्या जीवाला देवाचीच भक्ती करण्याची आस आहे. त्यामुळे रात्रंदिवस शिवणकाम करत असतानाही माझ्या जीवाला खरे सुख नाही. सुई, दोरा, कात्री, गज (टेप) हे सर्व साहित्य म्हणजे सर्वव्यापी देवस्वरूपात मांडलेला पसारा आहे; खरे तर, हे सारे मूलत: देवरूपच आहे, असे मला जाणवत आहे. म्हणून मी जणू देवाचे अंगरूपी कापडच शिवत आहे व या अनुभवामुळेच मी या जगी धन्य झालो आहे.

३) संत श्रीसावता महाराज

(श्रीनामदेवांच्या ज्ञानदृष्टीला ज्याप्रमाणे सारे पदार्थ मूळात देवरूप असल्याचे दिसत होते त्याचप्रमाणे) कांदा, मुळा, भाज्या हे सारे मुळात आत्मारूपी विठ्ठलच आहे; लसूण, मिरची, कोथिंबिरी ही सारी रूपे माझ्या आत्मारूपी हरीनेच धारण केलेली आहेत; मोट, नाडा, विहीर, दोरी हे जड पदार्थदेखील मूळात आत्मारूपी पंढरीच आहेत, असा अनुभव येत असल्याने व मी सावतादेखील विठ्ठलस्वरूपच असल्याने त्याचे पायी माझे सर्वस्व अर्पण करून त्याचे गुणगान करत राहिलो आहे.

४) संत श्रीसेना महाराज

आम्ही वारीक म्हणजे न्हावी असून लोकांची बारीक हजामत करतो. लोकांचा नाशिवंत स्थूल देहाबाबतचा ममत्वभाव घालवून त्यांना आपले खरे अविनाशी स्वरूप समजून येण्यासाठी बारीक म्हणजे सूक्ष्म विचार करावयास लावतो. देहाच्या काही भागावर येणारे केस काढून टाकून देह सुशोभित करण्यास व ठेवण्यास न्हाव्याच्या व्यवसायातून मदत होते. पण, देहरूपी मी हा खरा मी नसून आत्मारूपी मी हेच आपल्या सर्वांचे खरे रूप आहे. ते कळावे म्हणून लोकांना विवेकरूपी आरसा दाखवतो. वैराग्य म्हणजे विविध भोगांविषयीचा विराग (उदासीन भाव). विरागरूपी चिमटा हलवणे म्हणजे विषयासक्तीपासून सावध करणे होय. वाढत जाणाऱ्या विषयासक्तीपायी व्याप वाढतो व त्यामुळे जो संताप होत असतो, डोक्याला जो ताप होत असतो, त्यावर आम्ही संतरूपी न्हावी शांतीरूपी पाणी घोळून लोकांना शांत करतो. मी एक श्रेष्ठ माणूस आहे असे जे लोकांना वाटत असते, तो त्यांचा व्यर्थ अहंकार होय. त्याची शेंडी आम्ही पिळतो. म्हणजे त्या माणसाला नम्र व्हायला शिकवतो. अहंकार कमी झाला तरी ‘मी ब्रह्म आहे, मी ज्ञानी आहे’ असा अतिसूक्ष्म अहंभाव साधक-व्यक्तीच्या अंत:करणात शिल्लक रहात असतो, तिला तो कळतही नसतो. या अर्थाने तो दिसून येत नसतो. म्हणून तो जणू बगलेतील केस होय; तेही आम्ही काढतो व झाडून टाकतो. नखे ही माणसाच्या ठिकाणी असलेल्या हिंसक प्रवृत्तीची निदर्शक होत. म्हणून तीही आम्ही काढून टाकत असतो.

संताभिमत स्वधर्माचे चौवर्णातीत स्वरूप

विशेष म्हणजे, जातिनिष्ठ व्यवसायाचे पारमार्थिक वा श्रेयस्कर स्वरूप सूचित करताना मी चारही वर्णांच्या पलीकडे गेलेलो असून निवांत म्हणजे संत (पूर्णत: शांत) होऊन राहिलो आहे, असा सन्मार्गदर्शक म्हणजे मोठा अर्थवाही निष्कर्ष त्यांनी या अभंगाच्या पाचव्या चरणात व्यक्त करून ठेवला आहे.

‘चौवर्णां हात देऊन निवांत होणे’ म्हणजे चौदेहातीत होणे होय. मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य किंवा मी शूद्र इत्यादि भाव हे देहाभिमानयुक्त असतात. देहाभिमानी व्यक्ती कधीही संत होऊ शकत नाही. तिच्यात अहंकार असल्याने ती अशांत वा असंत असते. श्रीरामदासांच्या भाषेत सांगायचे तर, तिची वृत्ती संथ झालेली नसते. वर्णाभिमान, आश्रमाभिमान, जातीचा अभिमान हे सारे वृत्ती असल्याने ती संथ करूनच कोणत्याही जातीची व्यक्ती संत होऊ शकते.

थोडक्यात, जातिनिष्ठ व्यवसाय करत असतानाही संत होण्यासाठी सोऽहं-नाम जपत राहणे म्हणजे श्रेयस्कर जातिनिष्ठ स्वधर्माची किंवा कर्मयोगाची साधना करणे होय.

संतांप्रमाणे जातिनिष्ठ स्वधर्माचरण करणे म्हणजे मोक्षकारी अधियज्ञ करणे

श्रीनरहरी (सोनार), श्रीनामदेव (शिंपी), श्रीसावता (माळी), श्रीसेना (न्हावी) या संतांनी आपल्या अभंगातून स्वधर्माचरणाचे जे स्वरूप व्यक्त केले आहे, तेच (ब्राह्मण जातीत जन्मले होते त्या) संत श्रीज्ञानेश्वरांनीदेखील ‘अधियज्ञाचे’ स्वरूप स्पष्ट करताना व्यक्त केले आहे. संतांप्रमाणे जातिनिष्ठ स्वधर्माचरण किंवा अधियज्ञ करून आपल्याला आत्मज्ञानजन्य मोक्ष मिळवावयाचा आहे, असे ज्ञानेश्वरीतील संबंधित ओव्यांच्या पुढील भावार्थ वाचताना लक्षात येते.

श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात, “जो शरीररूपी गावात राहून शरीरभाव नष्ट करतो, तो अधियज्ञ मी आहे..... अहंकार नष्ट झाला म्हणजे जीव व परमात्मा यांचे ऐक्य हे मूळचेच आहे. हे ऐक्य जेथे प्रत्ययास येते ते ठिकाण म्हणजे अधियज्ञ मीच आहे. (जे कुणी हा यज्ञ करतात ते) प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या सहाय्याने पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादि विषयरूपी द्रव्याच्या आहुती देतात. नंतर वज्रासनरूपी भूमी शुद्ध करून शरीररूपी मांडवात मूळबंधाचा ओटा तयार करतात. तेथे संयमाग्निच्या कुंडात योगमंत्राने व इंद्रियद्रव्याच्या सहाय्याने रजन करतात. मग मनप्राणाच्या निग्रहरूपी हवनद्रव्याच्यायोगे धुमरहित असा जो निर्दोष ज्ञानाग्नी त्याला संतोषित करतात. अशा रीतीने सर्व यज्ञसाहित्य ज्ञानाग्नीत अर्पण केल्यावर त्या ज्ञानाचाही ज्यात ज्ञेयात लय होतो, त्या उर्वरित परब्रह्मलाच अधियज्ञ म्हणतात.”

योग-साधनेच्या शेवटी ज्ञाता व ज्ञान हे ज्ञेय आत्मरूपात लय पावून निखिल ज्ञप्तिमात्र उरते. या अनुभवस्थितीला श्रीकृष्ण व श्रीज्ञानेश्वर ‘अधियज्ञ’ म्हणतात; त्या स्थितीलाच श्रीनरहरी सोनार ‘पैलथडी’ म्हणतात; श्रीसावता माळी ‘अवघा झाला माझा हरी’ व ‘अवघी व्यापिली पंढरी’ म्हणतात तर, श्रीसेना न्हावी जिथे ‘सेना राहिला निवांत’ ती ‘चौवर्णातीत म्हणजे चौदेहातीत स्थिती’ म्हणतात. म्हणजे त्या एकाच परमप्राप्तव्य स्थितीला संतांनी वेगवेगळी नावे दिली आहेत. ही चराचरव्यापी उर्वरित स्थिती म्हणजे आत्मतत्त्वज्ञानी संतांनी घेतलेले ‘शेष’ होय. ते मी मोठ्या आवडीने घेईन, असे “तुका म्हणे शेष घेईन आवडीं”, या अभंगचरणात श्रीतुकाराम म्हणतात; तर, या आत्मस्थितीचा अभंग अनुभव घेत होते म्हणूनच संत श्रीचोखा मेळा तिला ‘उष्टे’ हे नाव देतात.

अशा प्रकारे त्यांच्या जातीच्या तत्कालीन भीक मागणेरूपी व्यवसायातही संत श्रीचोखा मेळामहाराज हे सर्वच संत ज्याची इच्छा करतात त्या सर्वोत्तम उष्ट्याची म्हणजे नि:श्रेयस्कर शेषाची आठवण करून देतात. ‘देवा, तुमच्या उष्ट्यासाठीच मी ही शरीररूपी पाटी घेऊन आलो आहे’, या अर्थाच्या अभंगातूनही ते श्रीज्ञानदेवांनी उल्लेखिलेल्या परब्रह्मरूपी अधियज्ञाचा निर्देश करतात.

यज्ञपुरुष जो सर्वव्यापक परमात्मा आहे त्यास न जाणता आणि ‘देहच मी’ या अज्ञानरयुक्त भावाने जे यज्ञ करतात, यज्ञाचा अभिमान बाळगतात, त्यांचे ते कर्म ‘वेदबाह्य’ होय. आत्मज्ञान नसताना घडणारे कोणतेही कर्म हे वेदांना स्वकर्म म्हणून अभिप्रेत नाही. अर्थात, आत्मज्ञान नसलेला ब्राह्मण-जातीचा माणूस व आत्मज्ञानरहित असा इतर कोणत्याही जातीचा माणूस व त्यांची आचरणेही तत्त्वत: समानच होत. याउलट, आत्मज्ञानी ब्राह्मणाचे यज्ञकर्म व आत्मज्ञानी सोनाराची, शिंप्याची, माळ्याची, सुताराची, न्हाव्याची म्हणजे सर्व जातिव्यवसायरूप कर्मे ही तत्त्वत: आत्मज्ञानसाधन म्हणून समान होत. ब्राह्मण जातीच्या माणसाला निष्काम भावनेने, निरहंकार मनाने स्वधर्माचरण केल्याने जो आत्मज्ञानरूपी ‘शुभलाभ’ होतो, तोच शुभलाभ कोणत्याही जातीच्या माणसाला निष्काम स्वधर्माचरणाने होतो, अशी स्वकर्माची महती गीता-ज्ञानेश्वरीत गायिली आहे.           

(हा लेख ‘स्वधर्म : विश्वव्यापी मानवधर्म - एक चिकित्सा’ या लेखकाच्या पीएच.डी. प्रबंधावर आधारित आहे.)

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......