अजूनकाही
२००२ च्या गुजरात नरसंहाराबाबत थेट नरेंद्र मोदींविरोधात तक्रार दाखल करणारे पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांना नुकतीच २९ वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. यापूर्वी त्यांना सेवेतून निलंबित व नंतर बडतर्फ करण्यात आले होते. त्यांचे निम्मे घर कारवाई करून पाडण्यात आले. या सर्व संघर्षात त्यांना साथ देणार्या त्यांच्या पत्नी श्वेता भट्ट यांनी आपल्या पतीच्या एकाकी लढाईचे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे रेखाटलेले हे शब्दचित्र. ‘www.dailyo.in’वर २६ जून रोजी प्रकाशित झालेल्या या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
.............................................................................................................................................
१९८८ साली संजीवने आयआयटीमधून भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. खरे तर तो आयआयटी पदवीधर म्हणून अतिशय शांततामय जीवन जगू शकला असता, पण त्याने युपीएससीची परीक्षा देऊन देशाची आणि जनतेची सेवा करण्याचे ठरवले. २७ वर्षे त्याने ही सेवा अतिशय इमानदारीने, काळजीपूर्वक, गांभीर्याने आणि कोणत्याही राजकीय दडपणाला बळी न पडता केली. हे करताना त्याचे ध्येय एकच होते, ते म्हणजे कितीही कठीण आणि दीर्घ संघर्ष करावा लागला तरी उच्च दर्जाची नीतीमूल्ये जगणे आणि व्यक्तिमत्त्वाचा दर्जा ढासळू न देणे.
आता माझी खात्री झाली आहे की, केवळ एका विशिष्ट राजवटीच्या विरोधात बोलण्याचे धाडस केले म्हणून २७ वर्षाच्या समर्पित सेवेचे बक्षीस आज छळ, सूड आणि अन्याय करून घेतले जात आहे. जर कळीच्या मुद्द्यांवर इतर काही सरकारी अधिकार्यांसारखे संजीवने नाटकी विस्मरण झाल्यासारखे दाखवले असते, निष्क्रिय राहिला असता, अन्यायाकडे डोळेझाक केली असती, आपला आत्मा विकला असता तर त्याला नक्कीच त्याला सत्ताधार्यांकडून बक्षिशी मिळाली असती.
पण असे वागेल तर तो संजीव कसला? तो अन्यायाने होरपळणार्या, हिंसेची शिकार झालेल्या माणसांकडे दुर्लक्ष करूच शकणार नाही. अन्याय घडत असताना उघड्या डोळ्याने तो कधी बघूच शकला नाही. नानावटी कमिशन आणि एसआयटीसमोर साक्ष दिल्यापासून संजीवला जो सातत्याने त्रास दिला जातो आहे, त्याने तो खचला नाही की डगमगला नाही. परिणामांचा विचार न करता तो सत्तेशी लढत राहिला. असा हा आत्मसन्मान जपणारा आणि एकसंघ व्यक्तिमत्त्वाचा संजीव!
हाच संजीव माझा पती आहे, जगण्याचा आधार आहे, माझा सखा आहे! संजीव आणि मी ३५ वर्षांपूर्वी भेटलो. मी तेव्हा १९ वर्षांची होते आणि संजीव २० वर्षांचा होता. दोघेही युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. नजरेत चमक होती आणि जग बदलण्याची स्वप्ने होती. आम्ही ३५ वर्षे एकमेकाचे अत्यंत जिवलग मित्र आहोत, एकमेकांचे टीकाकार आहोत आणि एकमेकांविषयी कधीही विचलित न होणारे पोलादी कवच आहोत..
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
संजीव सच्चा मित्र, प्रेमळ पती, कर्तव्यदक्ष मुलगा व जावई आणि उत्तम पिता आहे. त्याने माझ्या आयुष्याला अर्थ दिला आहे. आयुष्याच्या वादळी प्रवासात संकटांच्या लाटा धडकताना एकमेकांची गलबते आम्ही सावरतो आणि एकमेकांची सदसदविवेकबुद्धी म्हणून आम्ही काम करतो. सगळं आयुष्य संजीवच्या भरवशावर सोडून दिले होते, जणू पण ५ सप्टेंबर २०१८ पासून घरातली सगळी सुखाशांतीच संजीवसोबत निघून गेली. तेव्हापासून मी धडपणे झोपूही शकले नाही. मी आणि संजीव रोज सकाळी एकत्र आमच्या बाल्कनीत चहा घ्यायचो, पण मागच्या साडेनऊ महिन्यांत मी चहाही घेतला नाही आणि त्या बाल्कनीत पाय टाकण्याची माझी हिंमतच आता होत नाही...
माझे सुंदर दिवस मी आनंदात संजीव आणि मुलांसोबत घालवले असते, ते दिवस आता मला वकिलांसोबत दीर्घकाळ मिटिंगमध्ये घालवावे लागत आहेत, जगण्यातले कठोरातले कठोर निर्णय घेण्यात घालवावे लागत आहेत. असे कसोटीचे निर्णय घेताना प्रत्येक पावलावर मी अडखळते. गोंधळते. अस्वस्थ होते, चिंतातुर होते. खचून जाते, हताश होते. पण जेव्हा जेव्हा अशा गोंधळात पडते, तेव्हा मी स्वत:लाच प्रश्न विचारते की, अशा वेळी संजीवने कोणता निर्णय घेतला असता? ही परिस्थिती त्याने कशी हाताळली असती? आणि मला मार्ग दिसू लागतो.
रोज मी स्वत:ला प्रश्न विचारते आहे की, माझी श्रद्धा डळमळीत होते आहे का? न्यायाची आशा माझ्या मनात कायम आहे का? पण मीच मला बजावते की, हे दिवसही निघून जातील. दुष्ट शक्ती काही काळ प्रबळ झाल्या, वरचढ दिसल्या तरी अंतिमत: जिंकते ते सत्यच!!!
२२ वर्षापूर्वीच्या जुन्या केसमध्ये ‘जबाब नोंदवायला’ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी ५ सप्टेंबर २०१८ ला भल्या सकाळी सीआयडीचे अधिकारी थेट आमच्या बेडरूममध्ये घुसले, त्या वेळी आता हा काही महीने येणार नाही असे वाटलेसुद्धा नाही. सुरुवातीला मी फेसबुकवर ‘...आज इतके दिवस झाले...” असे लिहीत होते हळूहळू ‘...इतके महिने झाले’ असे लिहू लागले. न्यायालयात कधीकधी काही वकील आणि अधिकारी संजीवसारख्या प्रामाणिक, ज्येष्ठ अधिकार्यबद्दल अतिशय मानहानिकारक भाषा वापरतात, तेव्हा मी खूप उदास होते. पण आजच्या या वातावरणात या सभ्यतेची अपेक्षा करणे म्हणजे पाषाणला पाझर फुटण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे.
तुम्ही एखाद्या निरागस व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यात अडकवता, तेव्हा तुम्ही त्याला एकट्यालाच नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा करत असता.
प्रशिक्षण अकॅडेमीतील प्रशिक्षण संपल्यावर तो जामनगरच्या सहायक पोलीस अधिक्षक पदावर रुजू झाला. ३० ऑक्टोबर लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडवून त्यांना अटक झाल्यावर सर्वत्र दंगली सुरू झाल्या. जामनगरमध्येही हे हिंसेचे लोण पोहोचले. दुसर्या दिवशी भाजप व विश्व हिंदू परिषदेने पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये देशातील सर्व संवेदनशील राज्यात दंगली सुरू झाल्या. जामजोधपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी असूनसुद्धा हिंसेच्या घटना घडतच होत्या. तेव्हा त्या पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी १३३ दंगेखोरांना अटक केली. नंतर मृत झालेले प्रभूदास वैष्णनी आणि त्यांचे भाऊ रमेश यांचाही त्यात समावेश होता. सकाळी ९.३० ते १२.३० च्या दरम्यान या सर्वांना अटक करण्यात आली आणि संजीव तेथे दुपारी १.३० नंतर पोहोचला.
माझ्या माहितीप्रमाणे संजीवने नंतर मृत झालेल्या व्यक्तीला अटक केली ना त्याला कस्टडीत टाकले. त्याची चौकशीसुद्धा केली नाही. त्या व्यक्तीनेही न्यायाधीशांसमोर वाईट वागणूक मिळाल्याची किंवा मारहाण झाल्याची तक्रार केली नाही किंवा जामीन मिळाल्यावरसुद्धा बाहेर पडल्यावर त्याने तक्रार केली नाही. सुटल्यावर १० दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर ही मेडिकल रेकॉर्डमध्येही आत किंवा बाहेर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालातही कोणती जखम आढळली नाही. कस्टडीत मारहाण झाल्याची तक्रार नंतर विश्व हिंदू परिषद-भाजपशी संबंधित असलेल्या अमृतलाल वैष्णवी यांनी केली. या तक्रारीची सखोल चौकशी केल्यावर आणि सर्व मेडिकल अहवाल बघितल्यावर गुजरात सरकार या निष्कर्षावर आले की, संजीवविरुद्ध यात पुरावा नसल्याने व त्याने प्रामाणिकपणे सेवा केल्यामुळे हा खटला दाखल करायला परवानगी देऊ नये. २०११ पर्यंत गुजरात सरकार आपल्या अधिकार्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.
पण ज्या क्षणी संजीवने २००२ च्या नरसंहाराबाबत सत्ताधार्यांविरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले, त्याच वेळी तात्काळ सरकारने या केसमध्ये दाखल केलेला अर्ज काढून घेतला व केस चालवण्याला परवानगी देवून टाकली. जातीय दंगली सुरू असताना आपले कर्तव्य निभावणार्या प्रामाणिक अधिकार्याचा धादान्त खोट्या गुन्ह्यात अडकवून असा छळ करणे, सूड घेणे यासारखे दुसरे उदाहरण नसावे.
पण आता ही लढाई सुरूच राहील. संजीवचा हा लढा केवळ एका व्यक्तिविरोधात नाही, एका पक्षाच्या विरोधात नाही, तर एका विशिष्ट संकुचित विचारधारेविरुद्ध आहे. आपल्या स्वार्थासाठी भीती आणि द्वेष पसरवणार्यांविरोधात आहे. संजीवच्या दृष्टीकोनातून भारत म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नाही किंवा परंपरेने चालत आलेला वारसहक्काचा भूभाग नाही, तर त्याच्या दृष्टीने कोणीही इथे संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगू शकेल, आनंदाने जगू शकेल. सुरक्षित आणि शांतीपूर्ण जीवन जगता येईल. द्वेष आणि भीतीपासून मुक्तता असेल आणि जगण्यासाठी कोणतीही अप्रिय तडजोड करावी लागणार नाही. हे त्याच्या मनातील भारताचे आदर्श चित्र आहे.
आज संजीवसोबत, आमच्यासोबत हजारो लोक आहेत. ते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. मी त्या सर्वांना अभिवचन देते की, संजीवला घरी परत आणल्याशिवाय आणि त्याचा सन्मान अबाधित राखल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
मी जी काही आहे आणि जी काही नाही
ते सर्व काही फक्त फक्त संजीवमुळेच आहे...
तो आहे म्हणून मी आहे... आणखी काय सांगू?
.............................................................................................................................................
‘www.dailyo.in’वर २६ जून रोजी प्रकाशित झालेल्या या मूळ इंग्रजी लेखासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Aru Deosthale
Sun , 07 July 2019
Hats off to Shweta Bhatt and her spirit. A big thank you to Heramb Kulkarni for bringing this to us so passionately!